घरफिचर्सचार तासाची थरारक कहाणी ए वेन्सडे

चार तासाची थरारक कहाणी ए वेन्सडे

Subscribe

माणसांतील गुणदोषांबरोबरच त्यांची कुवत, गुणवत्ता, कर्तव्यतत्परता हे सारे ‘ए वेन्सडे’ या चित्रपटात दिसते. एका बॉम्बस्फोटामध्ये जिवलग गमावल्यामुळे अत्यंत व्यथित झालेला सामान्य, पण तंत्रज्ञानात हुशार माणूस तसे स्फोट घडवणार्‍या सूत्रधारांना बुद्धिचातुर्याने कशी शिक्षा देतो, हे दाखवणारा हा चित्रपट पाहताना, अनेक घटनांच्या स्मृतींनी प्रेक्षक सुन्न होतात.

माणसाच्या अंगी सुप्त सामर्थ्य असते असे म्हणतात. याची जाणीव मात्र सर्वांना नसते. त्यामुळेच एखाद्या अडचणीच्या प्रसंगी, साधा दिसणारा माणूसही काही अचाट कृती करून जातो. पण हे कसे करू शकलो, हे त्याला सांगता येत नाही, तशी कृती पुन्हा तो करू शकतोच असेही नाही. केवळ त्या अचानक उद्भवलेल्या प्रसंगात तो त्याच्याही नकळत ते करून जातो. हिरकणीची कथा सुप्रसिद्धच आहे. कित्येकदा आपणही अशा काही घटना ऐकतो. त्याबाबत शंका घ्यायला जागाच नसते.

कारण प्रत्यक्ष आपण बघतो. त्या बघणारे कित्येकजण असतात. ते आश्चर्यचकित झालेले असतात. नंतरही त्या व्यक्तीला आपण हे कसे केले, हे सांगता येत नाही. ते घडले खरे, असे म्हणून ती व्यक्ती तो विषय संपवते. याच प्रकारे एखादी व्यक्ती अचानक सार्‍या व्यवस्थेलाच कशी वेठीला धरते आणि पोलीस खात्यासह राज्यकर्त्यांनाही अत्यंत अस्वस्थ बनवून, सळो की पळो करून सोडते, हे दाखवणारा चित्रपट अकरा वर्षांपूर्वी आला होता. ‘ए वेन्सडे’ असे त्याचे नाव. अतिशय परिणामकारक असा हा चित्रपट.

- Advertisement -

सतत धावपळ असणार्‍या मुंबई महानगरात एका बुधवारच्या केवळ दुपारच्या चार तासांमध्ये काय घडले, हे दाखवणारा चित्रपट प्रभावी आहे, त्याचबरोबर अस्वस्थ करून टाकणाराही आहे. व्यवस्थेमधील त्रुटींवर नेमके बोट तो ठेवतो. त्यामुळे असे का असते, ते सुधारण्याकरता काय करता येईल, असा विचार प्रेक्षकांना करायला लावतो. माणसांतील गुणदोषांबरोबरच त्यांची कुवत, गुणवत्ता, कर्तव्यतत्परता हे सारे यात दिसते. एका बॉम्बस्फोटामध्ये जिवलग गमावल्यामुळे अत्यंत व्यथित झालेला सामान्य, पण तंत्रज्ञानात हुशार माणूस तसे स्फोट घडवणार्‍या सूत्रधारांना बुद्धिचातुर्याने कशी शिक्षा देतो, हे दाखवणारा हा चित्रपट पाहताना, अनेक घटनांच्या स्मृतींनी प्रेक्षक सुन्न होतात.

चित्रपटाची हाताळणी साधेपणे केली आहे, त्यामुळे सार्‍या गोष्टींचे सहज आकलन होते. प्रेक्षक कथेशी एकरूप होतात. प्रत्येकाला आपण याचे साक्षीदार असल्यासारखे वाटते. पुढे काय, याची तो उत्कंठेने वाट पाहतो. दुपारी दोन ते सहा या काळातील घटना असल्याने चित्रपट वेगाने पुढे जातो. शहरात धावपळ चालू आहे. पोलीस चौकीत एक माणूस बायकोशी भांडण झाल्याची तक्रार घेऊन येतो. त्या अधिकार्‍याबरोबर त्याची प्रश्नोत्तरे सुरू असतानाच एकजण हातात जे अँड के अशी मोठी अक्षरे असलेली एअरबॅग घेऊन येतो. त्याला थांबायला सांगण्यात येते.

- Advertisement -

आधीच्या माणसाला बायकोची माफी माग असे सांगून, तो अधिकारी कटवतो. नवागताला, ऐ जम्मू काश्मीर आओ, असे म्हणून बोलावतो. त्याची काय तक्रार आहे असे विचारता तो माझे पाकीट चोरीला गेले आहे, असे सांगतो. त्यात काय होते हे विचारल्यावर सारा तपशील सांगतो. त्याचे नाव पत्ता, फोन नं. इत्यादी घेतले जाते. त्याने आपले नाव शर्मा असे सांगितलेले असते, पण ते आणि पत्ता दोन्हीही खरे नसतात, हे नंतर पोलिसांना कळते. त्यावेळी मात्र त्यांना यात वेगळे काही वाटत नाही. म्हणून, आता जा. आम्ही तुला कळवू, असे म्हटल्यावर, तो टॉयलेट कुठे आहे म्हणून विचारतो. तेथे जातो. तेथे कुणी नाही हे पाहून जवळची बॅग चटकन दिसणार नाही, अशी ठेवून आरामात बाहेर पडतो.

बाहेर पडल्यानंतर तो एका बांधकाम सुरू असलेल्या उंच इमारतीच्या वरच्या मजल्यावरील स्लॅबवर जाऊन बसतो. तेथे आपला लॅपटॉप संगणक, मोबाईल आणि इतर तांत्रिक साहित्य, तसेच फोन, खाण्याचा डबा, चहाचा थर्मास असे सामान मांडून ठेवून मग थेट पोलीस कमिशनर प्रकाश राठोडला फोन करून तुमच्या मुख्य कचेरीसमोरील पोलीस ठाण्यामध्येच एक बॉम्ब आहे. त्याचा स्फोट काही वेळानंतर होईल, असे सांगतो. राठोड त्याला नाव विचारतो. तेव्हा तो केवळ एक नागरिक म्हणून सांगतो. बाकी काही सांगण्याची जरुरी नाही, मात्र त्या बॉम्बचा स्फोट झाला, तर अवघड परिस्थिती निर्माण होईल, असे सांगनू पुढे राठोड काही विचारायच्या आत फोन ठेवतो. फोन कोठून आला वगैरे शोधण्याची आज्ञा राठोड देतो. लगेच तसा प्रयत्न सुरू होतो.

सामान्य नागरिक टी.व्ही. चॅनेलच्या वार्ताहर तरुणीला फोन करतो. कमिशनर ऑफिसमध्ये काय गडबड सुरु आहे ते पहा, असे सांगतो. तीही त्याला नाव विचारते. पण ते न सांगता तो, तू हे करणार, का मी दुसर्‍या कुणा वार्ताहराला सांगू, असा प्रश्न करतो. तुला पुन्हा फोन करीन, असे म्हणून फोन ठेवतो. ती तिकडे धावते. काही वेळाने पुन्हा राठोडला फोन येतो. आधी बॉम्ब शोधण्यासाठी प्रयत्न करा, माझा फोन कोठून आला वगैरे शोध घेऊन काहीही साध्य होणार नाही. बॉम्बचा स्फोट झाला तर मात्र जबाबदारी तुमच्यावर असेल, असा इशारा देतो. मी पुन्हा फोन करीन, असे सांगून ठेवतो.

वार्ताहर तरुणी कमिशनर ऑफिसमध्ये येते. तिला तेथे धावपळ दिसते. ती तेथे कॅमेरामनला काही सांगत असतानाच तिला बोलावण्यात येते. कमिशनरने तिला बाजूला घेऊन, तू येथे का आलीस, असे विचारल्यावर ती आपल्याला फोनवरून माहिती मिळाल्याचे सांगते. त्याबाबत सारी माहिती घेतल्यावर, कमिशनर दोघांनाही एकाच व्यक्तीने फोन केले हे ओळखतो. तिला आम्हाला सहकार्य कर, असे सांगतो. ती तयार होते पण तिलाही त्या फोन करणार्‍याबाबत काहीच माहिती नसते. म्हणून कमिशनर तिला सांगतो की, तुला काहीही कळले तरी आम्हाला सांगत राहा. ती त्याला तयार होते. तिच्या कामाला लागते.

कमिशनरला पुन्हा फोन येतो. त्या नागरिकाचाच. तो सांगतो, माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलेत तर परिणाम फार गंभीर होतील. तेव्हा चटकन कामाला लागा, तुमच्याकडे वेळ थोडा आहे, बॉम्ब तुमच्या समोरच्याच चौकीत आहे, शोध घ्यायला वेळ लागणार नाही. परिस्थितीचे गांभीर्य जाणवल्यामुळे राठोड लगेच हुकूम देतो. ताबडतोब फौजफाटा, बॉम्बचा शोध घेणारे पथक श्वानांसह तेथे जाते. ती वार्ताहरही कॅमेरामनसह तेथे जाऊन सारे काही तिच्या वाहिनीवरून प्रक्षेपित करीत असते. त्यामुळे सर्वत्र गोंधळ सुरु होतो. पोलीस तपासात ती बॅग सापडते. पण ती ठेवणार्‍यानेच फोन केल्याची खातरी राठोडला असते. म्हणून तो त्या माणसाचा शोध घ्यायला सांगतो. त्याला कुणी पाहिलेलेच नाही, असे होणार नाही, म्हणून ती तक्रार घेणार्‍या अधिकार्‍याला विचारले जाते. तो मलाही तसेच वाटतेय असे म्हणतो. मग तू चित्रकाराला त्याचे वर्णन करून सांग. चित्र तयार करायला मदत कर असे कमिशनर सांगतो.

ते काम सुरू असते. तेव्हाच फोन पुन्हा येतो आणि बॉम्ब तेथे नव्हताच. मी ते अन्यत्र ठेवले आहेत, त्यांचा शोध घ्यायला तुमच्याकडे पुरेसा वेळ नाही. तुम्ही माझी मागणी मान्य करा असे सांगतो. कमिशनर म्हणतोः मागणी सांग. तेव्हा तो तुमच्या ताब्यातील तीन अतिरेक्यांना जुहू विमानतळावर घेऊन यायला सांगा. राठोड मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय ते करता येणार नाही, असे म्हणतो तेव्हा फोन बंद होतो. ताबडतोब मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला जातो. फोन करणारा कोठे आहे, याचा तपास सुरूच असतो पण तेथील तज्ञांना ते जमत नसते. एकजण यासाठी हॅकरची गरज आहे, असे सांगतो. हॅकरला बोलावले जाते. काम काय ते सांगण्यात येते. तो कामाला लागतो. मुख्यमंत्रीही येतात, ही मागणी मान्य करावीच लागेल हे राठोड त्यांना पटवून देतो. कारवाई सुरू होते.

तिकडे त्या इमारतीवरून सामान्य नागरिकाला सारे कळत असते. तो आरामात चहा, खाणे करत असतो. वार्ताहर तरुणीलाही तो विमानतळाकडे जायला सांगतो आणि तीही तिकडे जायला निघते. दोन अधिकारी तीन अतिरेक्यांना घेऊन तिकडेच निघतात. त्यांच्यातला एकजण अधिकार्‍याला वाटेल ते बोलून उचकवण्याचा प्रयत्न करतो. तरीही दोघे अधिकारी गप्प राहतात. विमानतळावर पोहोचतात. त्यांच्याशी सामान्य नागरिक त्यांच्याशी संपर्क साधून, त्या अतिरेक्यांना तेथील विशिष्ट उघड्या जागेवर न्यायला सांगतो. पण ते दोघांनाच तेथे ठेवतात. तेथे मिळालेला फोन उचलून ते तो लावण्याचा प्रयत्न करतात तेव्हा बॉम्बस्फोट दोघेही खलास होतात.

तिसर्‍याला टेंपोत नेले नव्हते, हे कळल्यावर राठोडला फोन करून त्यालाही मारा, असा हुकूम द्यायला तो नागरिक सांगतो. मुख्यमंत्री नाइलाजाने परवानगी देतात आणि राठोड तसा हुकूम देतो. ते अधिकारी तिसर्‍याचे एन्काऊंटर करतात. टी.व्ही व्हॅन दिसल्याने एकजण दुसर्‍याच्या हातावर गोळी झाडतो. हे का केलंस असे त्याने विचारताच त्याला तिकडे बघ असे सांगतो, तो उमगतो. तेवढ्यात त्या हॅकरला काही प्रमाणात यश मिळून, तो फोन करणार्‍याचा साधारण पत्ता देतो. स्वतः राठोड तेथे जाण्यासाठी निघतो. नागरिक आपले काम संपवून निघून जात असतानाच दोघे एकमेकांसमोरून जातात. राठोड त्याला थांबवतो. त्याला नाव विचारतो. तो पुन्हा सामान्य नागरिक असे सांगतो. त्याची ओळख पटते. नागरिक आपल्या रोज भेटणार्‍यांच्या मरणाला कारणीभूत झालेल्यांचा काटा काढायचा होता, हे सांगतो. सरकार आणि पोलिसांनी त्यांचे काम केले नाही, तर ही वेळ येते असे म्हणतो. त्यांनी दोनशे मारले आणि मी फक्त तिघांना. पण मला शक्य होते ते मला करायलाच हवे होते असे म्हणतो. दोघे हस्तांदोलन करत असताना चित्रपट प्रेक्षकांना सुन्न करून टाकून संपतो.

अनेक पात्रे असूनही सर्वांनी आपापल्या भूमिका योग्य प्रकारे केल्या असल्या तरी, चित्रपट सामान्य नागरिक नसिरुद्दिन शाह आणि कमिशनर अनुपम खेर या, कोणत्याही भूमिकेत प्रभाव दाखवणार्‍या, दोन अभिनेत्यांचाच झाला आहे. त्यांच्या अभिनय सामर्थ्याबाबत वेगळे काही सांगण्याची आवश्यकताच नाही.

कोणत्याही प्रकारे मिळाला तरी न्याय झाल्याचे समाधान कमी होत नाही. हे नुकत्याच झालेल्या काही घटनेवरून आपल्याला दिसून आले आहेच.

– आ. श्री. केतकर.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -