घरफिचर्सतर्काच्या खुंटीवरील बहुपेडी कथेतील वाच्य-नाट्य

तर्काच्या खुंटीवरील बहुपेडी कथेतील वाच्य-नाट्य

Subscribe

कथेच्या शैलीतील गंमत म्हणजे, ती काल्पनिकतेच्या पलीकडे, म्हणजे मेटा-फिक्शनल शैली स्वीकारत, कथनातील कथनाचे कथन करू लागते. अतर्क्य चमत्कृतींना कथेत सहज सामावून घेताना ती वास्तवाची कास सोडत नाही आणि अखेर जादुई वास्तववादी ( मॅजिकल रिअ‍ॅलिस्टिक) होत जाते.

कथेचे अभिवाचन, हा ‘आकाशवाणी, मुंबई केंद्र, सादर करीत आहोत श्रुतिका’- स्वरूप प्रकार महाराष्ट्र देशी सुरू आहे. श्रुतिका किंवा नाटक यांच्या रेडिओवरील सादरीकरणात, त्यातील नाट्य हा अविभाज्य भाग आहे. तिथे सादर काहीही करता येईल, मात्र त्यात नाट्य असेल तर आणि तरच ते पोहोचेल. असे वाच्य-नाट्य दोन प्रकारे सादर करता येते. एक सरळ श्रुतिका स्वरूप आणि दुसरे कथन स्वरूप. कथन स्वरूप वाच्य-नाट्यासाठी सादरकर्ता तयारीचा, कसलेला हवा. श्रुतिकेतील अनेक पात्रे जी मोनोटोनी ब्रेक करतात ती इथे कर्त्याला साधता यायला हवी. त्याचवेळी या स्वर नियमनातून कथेची प्रवाही सलगता खंडित होऊ नये, यासाठी तो सजग हवा. कथेतील तपशीलाचे सादरीकरण कसे होईल यावर तो ठाम हवा. सादरीकरणासाठी केलेली, ‘तर्काच्या खुंटीवरून निसटलेले रहस्य’ या कथेची निवड, वाच्य-नाट्यासाठी करताना रंगकर्मी अतुल पेठे एक मोठे आव्हान स्वीकारतात.

जयंत पवार यांच्या कथा निर्विवादपणे दृश्यात्मक असतात. कथेतील समाज घटकाची निवड, तिची दृश्यात्मकता आणि निरीक्षकाची तटस्थता या बाबतीत त्या, त्यांचे पूर्वासुरी- भाऊ पाध्ये यांच्याजवळ जातात. भाऊंच्या कथेत एक विस्तृत दृश्यपट सहज खुलत असे आणि कथेतील घटनांमागील विश्लेषक भाग ते टाळत असत. कथेतील पात्रांबाबत लेखकाची करूणेसहित कोणतीही भावना शब्दांत उतरू नये यासाठी भाऊंची लेखणी दक्ष असे. ते टाळण्यासाठी एक निवेदकाचा मुखवटा भाऊ वापरत. असे पाहता, मराठी कथेत अविश्वासार्ह निवेदक आणण्याचा मान भाऊंकडे जातो. आपल्या सुभाषित प्रचुर, उपदेशक साहित्य जगतात भाऊ उपेक्षित राहिले ते यामुळेच!भाऊंच्या या सर्व गुणविशेषासहित जयंत पवार आपली कथा फुलवतात, मात्र हे करताना तिची रचना, घाट आणि शैलीबाबत ते निश्चित असतात. कथेच्या रचनेतील समांतर प्रवाह एकमेकांत गुंतलेले असणे, निवेदन कालपटावर हेलकावत असणे आणि वास्तव आणि कल्पिताचे बेमालूम मिश्रण त्यांच्या कथेतून दिसते. त्यांची शैली वास्तववादी असली तरी रचना उत्तर आधुनिक आहे. कथेच्या शैलीत गंमत आहे. ती काल्पनिकेच्या पलीकडे, म्हणजे मेटा-फिक्शनल शैली स्वीकारत, कथनातील कथनाचे कथन करू लागते. अतर्क्य चमत्कृतींना कथेत सहज सामावून घेताना ती वास्तवाची कास सोडत नाही आणि अखेर जादुई वास्तववादी ( मॅजिकल रिअ‍ॅलीस्टिक) होत जाते.

- Advertisement -

कोणत्याही कथेतील कथनाची विश्वासार्हता तर्काच्या कसोटीवर ते ग्राह्य होण्यावर अवलंबून असते. त्यामुळे कथाकार, वास्तवाच्या पलीकडे जाताना तर्काचे बोट सुटण्याचा धोका घेत असतो. तर्काच्या सुरू होते तीच, जर संत नामदेव- तुकोबाच्या स्वप्नात जाऊन त्यांना विठोबावर शतकोटी अभंग लिहायला सांगू शकतात तर माझे काका मला रहस्यकथा लिहायला का सांगू शकत नाहीत? अशा, वाचकाला विश्वासात घेण्यातून होते. पुढे ती लिहिल्या जाणार्‍या रहस्यकथेत डोकावत, त्यातील पात्रांना जिवंत करतानाच, काकांचे आयुष्य कथन करू लागते. त्यात काकांच्या कथेमधील पात्रे जिवंत करत त्यांना भेटवतानाच लेखकाच्या आयुष्यातील वास्तव मांडते. अशी कथेतील वास्तवाची चौपेडी रचना एकमेकांत गुंफत शेवटी वास्तवाची आणि रहस्याची देखील खिल्ली उडवत निवेदकाची विश्वासार्हता पूर्णपणे नष्ट करते.

अतुल पेठे हे सातत्याने प्रायोगिक नवतेच्या शोधात असलेले रंगकर्मी, नाट्याचे वेगवेगळे नवे रूप शोधत असतात. ‘तर्काच्या खुंटीवरून’ या कथनाला ते मंचकावरून, ब्लॅकआऊट सहित इतर नाट्य तंत्रांचा आधार घेत- अभिवाचन नव्हे तर वाच्य-नाट्य या स्वरुपात सादर करतात. त्यातील निवेदकासहित इतर पत्रांसाठी विवक्षित बोलीचा उपयोग करताना काकांच्या जड जिभेच्या किंचित तोतरेपणामुळे, अर्थ विचलन होण्याचा धोका पत्करतात. दीड तास चालणारे हे वाच्य-नाट्य त्यांच्यातील वाचिक अभिनेत्याचा कस लावते. कथेच्या जादुई मायाजालात ते आपल्याला सहज घेऊन जातात आणि दीड तास एक अनोखा अनुभव देतात. अतुल पेठे या प्रयोगाचा सुवर्ण महोत्सवी प्रयोग, यशवंत नाट्यगृहात सादर करून, उपस्थित जाणकार रंगकर्मींना रिझवत या प्रयोगाची सांगता केल्याचे जाहीर केले. अर्थात त्यांच्या नव्या प्रयोगाचा सुतोवाच करूनच. माधव आचवल लिखित, वास्तुशास्त्रावरील ‘किमया’ चे प्रयोग ते सोबत शिल्प मांडणीचा आधार घेत करणार आहेत.

- Advertisement -

-आभास आनंद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -