अभि… एक निसर्गदूत!

अभिला आता जगाचे काही देणेघेणे उरले नव्हते. निसर्गाच्या आणखी जवळ जाताना त्याने सर्वसामान्य माणसासारखे जीवन जगणे मानसीच्या खाडीत फेकून दिले होते आणि तो आता एका वैराग्यासारखा झाला होता. घरची श्रीमंती वाहून जात असताना त्याच्या अंगावर फक्त लाज झाकेल अशी छोटी पातळ हाफ पॅन्ट आणि वर एक सुती सदरा. कमरेला एक कॉटनचा टॉवेल. सकाळ, संध्याकाळ तो आता समुद्रावरील प्लास्टिक कचरा वेचून निसर्गदूताचे काम करत होता.

Mumbai

महाराष्ट्राच्या दक्षिण किनारपट्टीवरील सर्वात शेवटच्या टोकावर असलेले आणि गोव्याच्या सीमेला खेटून असलेले वेंगुर्ले हे देवाला पडलेले सुंदर स्वप्न आहे. हे गाव माझी जन्मभूमी व्हावी, यासाठी गेल्या जन्मी माझ्या हातून काहीतरी चांगले काम झाले असावे, असे मला नेहमी वाटते. घरातून चालत निघाले की येथे सारे जग संपले आहे याचा भास करणारा निळासार अथांग समुद्र. समुद्राला थोपवू पाहणारे बंदर, बंदराला साक्षी ठेवून समुद्राला मिठीत घेऊ पाहणारी मानसीची खाडी… हे पवित्र मिलन खड्या पहार्‍यानिशी पाहणारा आणि त्यासाठी देव म्हणून उभा असणारा मानसेश्वर… या देवाला आकार नाही.

समुद्र आणि खाडीच्या संगमाशी पाण्यात असलेला हा आमचा देव. भरती, ओहटीचा स्वतःवर अभिषेक करून घेणारा. कांदळवनाचे राज्य उभारून निसर्ग संपत्तीला कोणाला हात न लावू देणारा. पाण्यातील देवराई जपणारा! समुद्राच्या डाव्या बाजूला वेंगुर्ले बंदराच्या डोक्यावर मुकुट परिधान करून उभा असलेला दीपस्तंभ. सूर्य मावळतीला जातो तेव्हा बंदराच्या खडकावर बसून संधीप्रकाशात तो गोल गोल फिरतो तेव्हा अंधार प्रकाशाच्या अद्भूत खेळात पांथस्थाच्या तनामनावर गारुड झालेले असते… अशा अनेक सूर्यास्ताच्या रेषा मी येथे अनुभवल्यात… वेंगुर्ला बंदराच्या याच रांगेत पुढे कोंडुर्‍यात कवी आरती प्रभूंना याच संधिकालात जीवाची घालमेल करणारी….

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझें?
कशासाठी उतरावे तंबू ठोकून?
कोण मेले कोणासाठी रक्त ओकून?
जगतात येथे कुणी मनात कुजून!
तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे!

ही आणि अशा असंख्य कविता सुचल्या असतील…
अशा या देवभूमीने आरती प्रभूंना जन्म दिला तसा येथे प्रत्येक घरात एक वेगळा कलाकारही जन्माला घातला असावा असे मला कायम राहून राहून वाटते. माणसे विक्षिप्त, जगाच्या नजरेने वेडी असली तरी जन्मजात एक वेगळेपण घेऊन आली आहेत. त्यापैकी एक मी पाहिलेला अभिषेक वेंगुर्लेकर…

अभिषेक उर्फ अभिची ही गोष्टही सत्यकथा. त्याच्या वडिलांनी साठीच्या दशकात प्रेमविवाह केला होता. वेंगुर्लेकर गोरेपान, तांबूस रंगाचे आणि अभिच्या आईचेही रूप नटीला लाजवेल असे… अभि मात्र या तुलनेत दिसायला देखणा नाही; पण, कुशाग्र बुद्धीचे लेणे घेऊन जन्माला आलेला. शाळा, कॉलेजमध्ये कायम पहिला… हा मुलगा वेंगुर्ल्याचे नाव काढणार असे कायम वाटायचे. मुंबईत जाऊन मोठ्या कॉलेजमध्ये त्याने आर्किटेक्चरची पदवी घेतली. त्याच्याबरोबरचे आणि कमी हुशार असलेले विद्यार्थी जगात नाव काढण्यासाठी बाहेर पडले. मोठे झाले. अभि मात्र वाट वाकडी करून वेंगुर्ल्याला परतला. त्याच्या वडिलांचे बाजारात मोठे दुकान, प्रशस्त घर आणि बर्‍यापैकी श्रीमंती. अभिने वडिलांचे नुसते दुकान चालवले असते तरी शानशौकीत तो राहू शकला असता… पण त्याच्या डोक्यात काहीतरी उभे राहत होते. आजूबाजूची शेणामातीची घरे जाऊन सिमेंट काँक्रीटचे उभे राहत असलेले जंगल त्याला अस्वस्थ करत होते आणि त्याने निर्णय घेतला की आपण पारंपरिक घरे बांधायची… ना नफा ना तोटा हे गणित वापरून. लाल मातीच्या भिंती, जमीनही लाल मातीची. ती शेणाने सारवलेली. लाकडी छप्पर, मंगलोरी कौले, कोनाडे, माजघर, देवघर, स्वयंपाक घर, त्यात चूल, पाटले दार. मासे करण्यासाठी आणखी एक वेगळी चूल, न्हाणी घर, आणि तांब्याचा बंब. मागे पडवीत गाय. समोर मोठे अंगण. घराभोवती नारळ, सुपारी, आंबा, प्राजक्त, रातराणी, चाफा, बकुळी, सुरंगी… जणू धुंद बहर! अशी खास कोकणी आणि परंपरेचा साज असलेली बरीच घरे अभिने बांधली… निसर्गाला कुशीत घेऊन उभी असलेली अभिची घरे पाहणेही एक निसर्ग सहल! शिरोडा, वेतोरे, बाव अशा असंख्य गावात आपण बांधलेली ही निसर्ग घरे तो मोठ्या प्रेमाने आपल्या जवळच्या लोकांना दाखवतो. या घरांच्या तो आपल्याला प्रेमात पडायला लावतो. सिमेंटचे जंगल नको, निसर्गाकडे चला असे सांगत तो तुमचा हात धरून पुढे नेतो…

अभिचे हे निसर्ग घर प्रयोग देशातच नव्हे तर जगात नाव झालेले. आर्किटेक्चर कॉलेजमधील मुले त्याच्या घरी कायम शिकायला. नामवंत वास्तूविशारदही त्याचे हे प्रयोग पाहण्यासाठी सिंधुदुर्गात हजर. भारतातील नामवंत वास्तूरचनाकारांपैकी अभि एक होऊन गेला असताना अचानक त्याचे हे निसर्गप्रेम अति चिकित्सक पातळीवर पोहचले होते. आता तो मी म्हणेल ती पूर्व दिशा करणारा झाला होता. जगण्याच्या अगदी साध्या सोप्या पद्धती घेऊन पुढे जाऊ पाहणार्‍या अभिला पैसा, समाज, घरदार याची फिकीर नव्हती. मात्र त्याच्या घरच्यांना त्याची काळजी लागली होती. याच दरम्यान त्याची आई अंथरुणाला खिळली. तिची देखभाल करण्यासाठी गावातील डॉक्टर हिना शेख येत असे. अगदी आपल्या आईसारखी तिची काळजी घेई. याच दरम्यान अभि आणि हिना मनाने जवळ आले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. वेंगुर्ल्यासाठी मोठा धक्का होता. मात्र अभिला त्याची पर्वा नव्हती. तो आपल्याच धुंदीत जगण्यासाठी पुढे जात होता. हा धक्का असेल की काही माहीत नाही; पण आधी अभिची आई आणि नंतर वडील गेले. अभि घरचा श्रीमंत तशी हिनाही पैसेवाल्या घरातील, एकुलती एक… दोघांकडेही पैशाला काही कमी नव्हती. आमच्या गावासाठी अभि-हिनाची जोडी कौतुकाचा विषय होती. हिनालाही पैशाची घमेंड नव्हती. हिना आपल्याला समजून घेईल, आपल्या निसर्गप्रेमावर माझ्याइतकेच प्रेम करेल, याची अभिला खात्री होती आणि हिनाही त्याच्या रस्त्यात आडवी कधी उभी राहिली नाही. त्याला त्याच्या मनाप्रमाणे जगू देत होती. तिची डॉक्टरकीची प्रॅक्टिसही बर्‍यापैकी चालली होती…

अभिला आता जगाचे काही देणेघेणे उरले नव्हते. निसर्गाच्या आणखी जवळ जाताना त्याने सर्वसामान्य माणसासारखे जीवन जगणे मानसीच्या खाडीत फेकून दिले होते आणि तो आता एका वैराग्यासारखा झाला होता. घरची श्रीमंती वाहून जात असताना त्याच्या अंगावर फक्त लाज झाकेल अशी छोटी पातळ हाफ पॅन्ट आणि वर एक सुती सदरा. कमरेला एक कॉटनचा टॉवेल. सकाळ, संध्याकाळ तो आता समुद्रावरील प्लास्टिक कचरा वेचून निसर्गदूताचे काम करत होता. गावातल्या लोकांना वाटले की अभिच्या डोक्यावर परिणाम झाला असावा… पण त्याला जगाची फिकीर नव्हती. लोकांच्या नाकावर टिच्चून कमरेचा टॉवेल आता डोक्याला गुंडाळत तो बेफिकीर होऊन खरोखर फकीर झाला होता. त्याला जगाचे भान नव्हते. मासे, मटण सोडून तो पूर्ण शाकाहारी झाला होता आणि तेसुद्धा उकड्या तांदळाची पेज, पातळ भात, डाळ, खिचडी असे मोजकेच त्याचे जेवण झाले.

चाळीशीचा अभि पन्नाशीचा वाटू लागला…त्याचे शरीर कृश होत चालले होते. मात्र आपल्या विचारांवर तो आणखी ठाम होत चालला होता. गावाला आल्यावर अभिकडे मी कधी गेलो नाही, असे कधी झाले नाही. त्याचे घर प्रयोग, निसर्ग विचार ऐकणे ही एक पर्वणी असते आणि त्याचे मोल जगाला मोजता आले नसले तरी गूढतेच्या अपार काळोखात निर्सगाला पूजणारा तो शेवटचा देवदूत आहे, याची मला पक्की खात्री होती… अजितच्या अवाढव्य निसर्ग घरात हा एकटा. उघडाबंब. खाली फक्त छोटी चड्डी. लाज झाकण्यापुरती. ‘कधी ईलय. बरो असय मा… तुझो पेपर काय म्हणता’, असे मोजके बोलून अभि हातात पाणी देऊन म्हणतो, पिऊन बघ. वास येता मा. ओवळाचा ता… म्हणजे बकुळीचे. रात्री पाण्यात ही फुले गजरे करून ठेवायची. हे पाणी प्यायले की उन्ह बाधत नाही. हे सांगून झाले की स्वारी चुलीवरची उकड्या तांदुळाची पेज आणणार. वर, ‘पेज, बरी रे जीवाक. जीव ही जगता आणि माणूसही माजना नाय… काय करुचे हत नखरे. जीव जगलो झालो’. अजितचे लग्न होऊन बरीच वर्षे झाली तरी त्याला मूलबाळ नव्हते. गणपतीला एकदा घरी गेलो असताना त्याचा निसर्ग गणपती चक्क पाळण्यात झोपला होता. चारी बाजूला झाडे, वेली, फळे, फुले आणि काळोख… या गच्च अंधारात एक छोटासा दिवा पेटलेला. बाळ गणपतीला कुठलाही आवाज, प्रकाशाचा त्रास होऊ नये, अशी निरव शांतता. गणपती शाडूच्या मातीचा. त्यावर कुठलेही रंग नाहीत. बाळ गणपती ही अभिच्या घरी येणार्‍या बाळाच्या पाऊलखुणा होत्या. अभि आणि हिनाने दत्तक बाळ घेण्याचा निर्णय घेत आपल्या घरी छान गोंडस मूल आणले आणि अभिच्या घरचा वारस कोण चालवणार याला उत्तर दिले.

अभिच्या घरी जगप्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ आणि त्यांची टीम येऊन काही दिवस राहतात. जगात, देशात आणि आपल्या राज्यात पर्यावरण वाचवण्यासाठी काय काय चालले आहे, याची चर्चा करून आणखी जोमाने काम करण्यासाठी बाहेर पडतात. अभिच्या या निर्सगप्रेमावर भाळून मी आणि माझ्या धाकट्या भावाने वेंगुर्ल्यात पारंपरिक घर बांधण्याचा निर्णय घेतला. कागदावर तयारीही झाली… आणि आमच्या घरच्या बायका संतापल्या. शेणाने घर कोण सारवणार, मातीच्या भिंतीची डागडुजी कोण करणार, वासे नळे वर्षाला कोण परतणार, वाळवीचे काय करणार असे सांगून आम्हा दोन्ही भावांच्या डोक्याचा भुगा केला… अभि मात्र गालातल्या गालात माझ्याकडे बघून हसत होता. तो पारंपरिक घर बांधण्यावर ठाम होता आणि आमच्या गृहमंत्र्यांना ते नको होते. शेवटी मध्यम मार्ग काढून थोडेसे पारंपरिक आणि बरचशे नवीन पद्धतीने घर बांधण्याचा आम्ही निर्णय घेतला. आज आमचे घर वेंगुर्ल्यात बांधून उभे होत आहे. अभिने यातही आपली छाप सोडली आहे. हवा आणि प्रकाशाला हातात हात घालून त्याने जांभळ्या लाल चिर्‍याला खाली जमिनीत हात घालून वर आणल्यासारखे उभे केले आहे. ही वास्तूही अभिसारखीच हसत हसत आम्हाला निसर्गावर प्रेम करायला शिकवत आहे…!