घरफिचर्सअभिनय एक आत्मचिंतन...

अभिनय एक आत्मचिंतन…

Subscribe

प्रामुख्याने नाटकामध्येही नाटकाची संहिता किंवा संकल्पनेऐवजी नाटकाच्या तांत्रिक बाजूंवर खूप भर दिला जातो. म्हणूनच अभिनय हा गिमिकमध्ये अडकून आहे किंवा पाश्चिमात्य शैलीत अडकलेला आहे. थिएटर ऑफ रेलवन्सच्या नाट्य प्रक्रियेत समजले की, अभिनय बाहेरील स्रोतांवर अवलंबून नसतो, तर अभिनय एक मनोवैज्ञानिक प्रक्रिया आहे, जी एक व्यक्ती म्हणून स्वतःलाच स्वतःसोबत करावी लागते.

आत्मचिंतन ते अभिव्यक्ती आणि अभिव्यक्तीतून आत्मशोध. आत्मशोधातून आत्मप्रेरणा…हा प्रवास मी केला, जगला आणि अनुभवला..या आत्मशोधासाठी मला माझ्या अभिनय प्रक्रियेने खूप प्रेरणा दिली. प्रेरणा मिळते ती तत्वाने, चिंतनाने, संकल्पनेने. संकल्पनेतून संदर्भाचा शोध वाढीस लागतो.

- Advertisement -

शोधातून आत्मशोध….. आत्म म्हणजे ‘मी’..मी स्वतःला ओळखते का? मी या जगात का आहे? माझ्या जगण्याचे ध्येय काय? या प्रश्नांतून विचारांच्या प्रवासाला सुरुवात झाली..आणि समजलं की आयुष्याच्या सर्व गोष्टींमधून वाट काढत स्वतःला समजण्याची यात्रा … म्हणजे आत्मशोध… अभिनय आणि आत्मशोध यांचा एकमेकांशी थेट संबंध आहे…

तो असा की कलाकार नेहमी स्वत:ला सतत आपल्या कलेतून नव्यानं शोधत असतो… कोणतीही कला आत्मशोधाला प्रेरित करते…नाट्यकलेच्या माध्यमाने अभिनेता, अभिनेत्री अभिनयातून अभिव्यक्त होतात…अभिव्यक्त होणे म्हणजे स्वतःच्या मनातील भावना, विचार जसे आहेत तसे मांडणे की त्यांना दिशा देऊन अभिव्यक्त करणे, यासाठी आत्मशोध !
नाट्यकला माझ्या अभिव्यक्तीचे माध्यम ठरली…

- Advertisement -

नाटकाची आवड कॉलेजमध्ये शिकत असताना जडली…एकांकिका करता करता कळले की आपल्याला नाटकातील अभिनयही बर्‍यापैकी जमतोय…सुरुवातीला नाटकाकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन तात्कालिक आवड किंवा हौस म्हणूनच होता. हे माझ्याच बाबतीत आहे असे नाही, तर कलाकार होऊ इच्छिणार्‍या बहुतांश व्यक्तींकडून मी हे असेच ऐकले आहे. तर मुद्दा हा की, एकांकिकामधून, नाटकांतून काम करताना..दिग्दर्शक म्हणेल ते करायचे. दिग्दर्शक सांगायचा की दोन पावले चाल..मग मागे वळून डायलॉग बोल, ती जागा घे, लाईट घे.. पण त्याचा संदर्भ काय हे नाही सांगायचा…मी सांगतो म्हणून कर.

स्थिर भाव, रोमांच भाव, आक्रोश आणि एक्साईटमेंट हे सर्व दिग्दर्शक सांगायचा…शून्यात बघत सोलोलोकी बोलायची…. एका श्वासात संवाद बोलायचा.. दोन पावले चालून असे वळायचे..मग फुटेज घे….मग मध्येच पंच टाकायचा, आवाजाचा थ्रो शेवटच्या रांगेपर्यंत जायला हवा आणि पात्र दाखविण्यासाठी तशी वेशभूषा करायची…इत्यादी…इत्यादी ..हे करता करता अशीच माझीही समज झाली की हाच अभिनय आहे.

थिएटर ऑफ रेलेवन्स या नाट्य प्रक्रियेत येऊन समजले की, नाटक रंगमंचावर येण्याआधी मेंदूत जन्म घेते. मंजुल भारद्वाज लिखित – दिग्दर्शित छेडछाड क्यों? नाटकाची सुरुवात झाली तेव्हा कळलं की अभिनय आणि मेंदू यांचा संबंध आहे…अभिनय म्हणजे विचार …अभिनय म्हणजे थिंकिंग प्रोसेस…हे समजले.

तथाकथित रंगभूमीवरील दिग्दर्शक सगळ्या तांत्रिक बाजू सांगून कलाकाराला नक्कीच कुशल करतो; पण कलाकारासाठी महत्त्वाची आहे ती त्याच्या मेंदूची मशागत ती कुठला दिग्दर्शक करतो? किंवा ही बाजू समजणारे दिग्दर्शक मोजकेच असतात…

प्रामुख्याने नाटकामध्येही नाटकाची संहिता किंवा संकल्पनेऐवजी नाटकाच्या तांत्रिक बाजूंवर खूप भर दिला जातो. म्हणूनच अभिनय हा गिमिकमध्ये अडकून आहे किंवा पाश्चिमात्य शैलीत अडकलेला आहे. थिएटर ऑफ रेलेवन्सच्या नाट्य प्रक्रियेत समजले की, अभिनय बाहेरील स्रोतांवर अवलंबून नसतो, तर अभिनय एक मनोवैज्ञानिक प्रक्रिया आहे, जी एक व्यक्ती म्हणून स्वतःलाच स्वतःसोबत करावी लागते. म्हणून अभिनयासाठी व्यक्ती सक्षम असणे आवश्यक आहे.

नाटक ही एक मनोवैज्ञानिक कला आहे. ती जेवढी सांघिक तेवढीच वैयक्तिक प्रक्रिया आहे. सहसा आपण पाहतो की, नाटकात एक कलाकार म्हणून माझा रोल, माझे कॅरॅक्टर, माझे संवाद इथपर्यंतच कलाकार मर्यादित असतात. पण थिएटर ऑफ रेलेवन्सच्या प्रक्रियेत केवळ संवाद आणि रोलपर्यंत मर्यादित न राहता…आम्ही कलाकार पूर्ण नाटकाच्या संकल्पनेला आपलंसं करण्यासाठी नाटकाच्या सर्व दृश्यांना इन्डिव्हिज्युअली परफॉर्म करतो. जेणेकरून मला माझ्यासोबत, माझ्या सहकलाकारांचा नाटकातील प्रवास कळतो व त्यातून एक कलाकार म्हणून अभिनयाची व्यापकता वाढते.

अभिनयासाठी आवश्यक असणारा अजून एक पैलू म्हणजे निरीक्षण.. तथाकथित रंगभूमीवर नाटक करत असताना सांगितले जाते की निरीक्षण करा पात्राचे..वस्तूूूचे आणि तशीच हुबेहूब नक्कल करा; पण थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य प्रक्रियेत समजले की अभिनयासाठी उपयुक्त असलेला निरीक्षण हा आयाम केवळ निरीक्षण करून नक्कल करण्याइतपतच न राहता केलेल्या निरीक्षणाचे विश्लेषण करणे आवश्यक आहे…ज्याने पात्राची मनोभूमिका कळते. निरीक्षण केलेली घटना, वस्तू किंवा व्यक्ती, कार्य यांचा माझ्याशी संबंध काय? त्याकडे पाहण्याची माझी दृष्टी काय? याचे विश्लेषण आधी केले जाते. नाटकात एक पात्र कलाकार रंगवत असतो, हे पात्र समाजाच्या घटकातून आलेले असले तरी एक व्यक्ती म्हणून माझ्या शरीरात त्याला जागा द्यायची आहे, म्हणजे एक पात्र त्याची विचारसरणी, त्याची जीवनशैली, त्याचे भाव, त्याची अंगयष्टी याला स्वतःच्या आत उतरवण्याची मनोवैज्ञानिक प्रक्रिया मला करण्यासाठी आधी स्वतःला जाणणे महत्त्वाचे आहे. म्हणून बाहेरील निरीक्षणाआधी आत्मनिरीक्षण-आत्म अवलोकन करणे आवश्यक आहे.

पारंपरिक अभिनय शैलीत रंगभूमीवरील मातब्बर रंगकर्मी स्वतःला 15-15 दिवस एका खोलीत बंद करून घेत होते, आणि खोलीबाहेर पडून एकाच भावमुद्रेत राहत होते. त्यांनी रंगभूमीवर अभिनयाचा एक मानदंड स्थापित केला आहे. इथे माझा प्रश्न आहे की, जडत्व तत्व आहे का? हे जडत्व म्हणजे चरित्र आहे का? की जडत्वाने प्रेक्षकांना केवळ एक भाव दाखवणे.

पारंपरिक अभिनय शैलीतील हाच वरवरचा भाव संमोहनापर्यंत घेऊन जातो किंवा हा भाव तत्कालीक संमोहित करतो. पण मेंदूला भेदत नाहीत. असे रंगकर्मी अभिनय भावमुद्रा करून तत्काल प्रभाव टाकतात आणि थिएटर ऑफ रेलेवन्सची अभिनय प्रक्रिया मंथन विवेचनेकरिता चैन रिअ‍ॅक्शन सुरू करते.

कलाकृती कोणतीही असो, कलाकृतीमधील समग्रता व जाणीव त्या कलाकृतीला व्यक्ती व काळासोबत जोडते आणि थिएटर ऑफ रेलेवन्स ही जाणीवच प्रत्येकात निर्माण करते. जाणीव माणुसकीची… जाणीव स्वतःच्या असण्याची. जाणिवेतून तत्वाची मांडणी होते. या तत्वाने रंगभूमीवर जेव्हा नाटक होते तेव्हा ते नाटक निव्वळ रंजनात्मक न राहता चेतनात्मक होते. या चेतनेला जागृत करण्यासाठी ‘दृष्टी संपन्न अभिनय’ अभिनय प्रक्रियेचा मुख्य भाग! म्हणजे पर्पज याला आपण हेतू, ध्येय असे म्हणतो, तर माझ्या अभिनयाला हेतू असणे, ध्येयं असणे आवश्यक आहे.

सहसा अभिनेत्री, अभिनेता यांचा, अभिनयातून मनोरंजन कसे होईल याकडे कल असतो. त्यामुळे असे कलाकारही प्रासंगिक विनोद, अंगिक हालचाली, टाइमिंग या स्वतःच्या कौशल्यांवर भर देतात. मान्य ही कौशल्य ही उपयुक्त, पण केवळ या कौशल्याने अभिनय होत नाही.

नाटकात अभिनयाची पराकाष्ठा चिंतन व अनुभवांतून गाठली जाते. म्हणून अभिनयात चिंतन प्रक्रिया ही शारीरिक हालचाली किंवा चेहर्‍याचे व्यंगात्मक भाव निर्माण करण्यापलीकडची आहे.

थिएटर ऑफ रेलेवन्सच्या अभिनय प्रक्रियेत अभिनेत्री व अभिनेत्याच्या शरीराला (बॉडी) महत्त्व आहे…कलाकाराच्या शरीराला काय वेगवेगळे आकार आहेत, शेप आहेत. यातून अभिनयाचा एक नवीन पैलू या प्रक्रियेत समजला. कलात्मक आकृती, आखीव-रेखीव रचना, मुद्रा यांद्वारे अभिव्यक्त होऊन संहिता (तत्व) आणि शरीराचा समन्वय साधणे हे अभिनयाचे सौंदर्यशास्त्र आहे.

अभिनेता, अभिनेत्री सतत स्वतःच्या अभिनयातून एक एक साचा निर्माण करत असतात आणि तो तोडतातही म्हणून, माझ्यासाठी अभिनय म्हणजे लर्न आणि अनलर्न करण्याची प्रक्रिया आहे..

इथे एक गोष्ट मात्र नक्कीच आहे की, मानवीमूल्यांना संवेदनशील दृष्टीने पाहणे कलाकारासाठी अनिवार्य आहे. या दृष्टीशिवाय कलाकाराचा अभिनय फक्त एक दिखावा आहे. यासाठी अभिनय हा रंगमंचावर करायचा, जीवनात नाही..जीवन प्रवाही आहे ते जगायचे आणि नाटकातून जीवन जगण्याचा दृष्टीकोन द्यायचा हे अभिनयाचे- अभिव्यक्तीचे मूल्य थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य तत्वाने माझ्या आत रुजवले.

-(सायली पावसकर – रंगकर्मी)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -