घरफिचर्सकार्यकर्त्यांचा नेता

कार्यकर्त्यांचा नेता

Subscribe

साब, वहां हमारे इलाके में लफडा हुआ, पुलीस अपने लडकों को उठाके ले गई साब, कुछ करो साब,साब, चार बोतल खून की जरुरत है, गरीब नवाज इलाकेवाले उस्मान के बेटे का मोहसीन का बाईक अ‍ॅक्सीडेंट हुआ है, सिरियस है वो सिवीलमें, सायब टीएमसीचे सायब लोक रोज भाजीचा धंदा उचलून नेतात, गरिबानं खायचं काय? जगायचं कसं? तुमीच सांगा!

Sir, please save our lives. We are helpless. you are our last hope!
भाषा वेगळ्या…अडचणी वेगळ्या…त्या घेऊन येणारी माणसं भिन्न धर्माची…जातीची…पण समस्येचं निराकारण एकच जितेंद्र आव्हाड…त्याचं कारण…इथलं लाख मोलाचं वाक्य…लाव रे त्याला फोन!

- Advertisement -

या वाक्यानंतर संबंधितांना फोन लागतो. फोनवरुन समोरच्याला समजेल अशा ‘भाषेत’ संवाद साधला जातो…तो संवाद कधी सीनियर पीआयशी असतो, कधी डीनशी, कधी महापालिकेच्या उपायुक्तांशी तर कधी सीमेपलीकडून अलीकडून इनोसंट मंडळींना अकारण आपल्या वक्रदृष्टीत घेणार्‍या एखाद्या भाईशीही… समोर आलेला माणूस आपल्याकडे मदत मागायला आलाय. इतकंच तुमच्या कामासाठी पुरेसं असतं. तिथं पायावर पडणं गरजेचं नसतं की शेठ, मालिक, म्हणून आरती उतरणंही गरजेचं नसतं. तुम्ही आधी किती वेळा आलात नंतर किती वेळा येणार? तुमच्या बरोबर कोण आला की तुम्ही कोणाच्या ‘रेफरन्स’ ने आलात असले फिझूल प्रश्न इथे उपस्थित होत नाहीत. कारण हे कार्यालय असतं ‘नाद’ खुळा असलेल्या आणि परिस्थितीच्या मुशीत ठोकून-ठाकून असंख्य घाव झेलत तावून सुलाखून निघालेल्या बावन्नकशी सोन्याचं…अर्थात जितेंद्र सतिश आव्हाड नावाच्या वेड्या आव्हानाचं… या नावामागे मी डॉक्टर किंवा नावानंतर साहेब लावलं नाही म्हणून आपल्यापैकी अनेकांना शहारायला होईल. कारण सध्या या दमदार नेत्याचा जलवा सुरु आहे. राजकीय बाजारात आणि कारोबारींच्या दुनियेत याच्या ब्रॅण्डला उठाव आहे.

आणि हा कुठला कोण एक छोटासा पत्रकार साहेबांचं नाव घेतोय. असं काहींना वाटेल; पण खरं सांगायचं तर डॉक्टर, साहेब, आमदार, मंत्री या सगळ्या झुली आहेत एका हत्तीवर चढवलेल्या. खरं काय असेल तर त्या हत्तीचं सामर्थ्य… आणि त्या सामर्थ्यवान हत्तीशी माझी असलेली दोस्ती…ठाण्यात माझी उबदार मैत्री कुणाशी आहे याची अनेकजण चर्चा करतात; पण म्हणून आव्हाडांवरचं माझं असलेलं प्रेम या मित्राच्या वेगळेपणात आहे. काहींना मी हत्तीशी केलेली त्यांची तुलना अतिशयोक्ती वाटेल. काहींना मी वाढदिवसाच्या निमित्तानं लिहिलेला शब्दांचा फुलोराही वाटेल; पण मी माझ्या यथाशक्तीनं मला दिसलेला, जाणवलेला आणि अनुभवलेला एक सच्चा, प्रामाणिक कार्यकर्ता, नेता, चळवळ्या माणूस, इव्हेंट ऑर्गनायझर, निष्ठावान समर्थक, पुरोगामीत्व जपण्यासाठी धडपडणारा राजकारणी, असं बरंच वेगवेगळं दर्शन देणारा ‘वेगळा माणूस’ उलगडवण्याचा हा माझा यथाशक्ती प्रयत्न आहे. कारण आजचा वाढदिवस हा जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी किंवा त्यांच्यावर प्रेम करणार्‍यांसाठी खास आहे. याचं कारण हा जितेंद्र आव्हाड यांचा हा पुनर्जन्म आहे आणि त्यातला त्यांचा हा वाढदिवस म्हणूनच खास आहे.

- Advertisement -

अख्खं जगं ज्या कोरोना महामारीने हादरवलं त्याचंच लक्ष्य ठरलेले आव्हाड मृत्यूला भोज्या करुन काही दिवसांपूर्वीच माघारी परतलेत. या भयंकर आजारातही सोशल मीडियावरून त्यांना लक्ष्य केलं जात होतं. मिम्स, शेरेबाजी, जहरी टीका हे सगळं सुरू होतं. काहींना वाटत होतं जितेंद्र आव्हाड आता हॉस्पिटलमधून परत येत नाहीत. तर काहींना वाटत होतं याच्यानंतर आपण जगायचं कसं?वरच्या कर्त्याला साकडं दोघंही घालत होते. पण देव चांगल्या माणसांचं ऐकतो तसं तो पुन्हा एकदा ऐकला…आणि एका वेड्या आव्हानाचा पुनर्जन्म झाला…

मी पत्रकारितेच्या तीन दशकाच्या कारकिर्दीत अनेक नेते, मंत्री जवळून बघू शकलो. त्यांची कामाची शैली, आवाका, समज, श्रध्दा, बांधिलकी बरंच काही…यातले काही मोजके नेते जसे बाहेर आहेत तसेच आतही जाणवले…तर काही धूपछाँव कपड्यांसारखे. सावलीत एक रंग प्रकाशात दुसराच. जितेंद्र आव्हाड हा नेता मला या गर्दीत मात्र वेगळाच जाणवला. कार्यकर्त्यांचा नेता म्हणून मला हा माणूस अधिक भावला. आपल्या दारावर काम घेऊन आलेला माणूस आधी स्वत: प्रयत्न करुन नंतरच आपल्यापर्यंत आलाय याची नेमकी जाण इथे ठेवली जाते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे कामांसाठी आचारसंहिता नसते. अगदी नोकरी हवी इथं पासून ते सासू आणि नवरा छळतो इथपर्यंत…आणि टेंडर पाहिजे इथपासून अ‍ॅडमिशन पाहिजे इथपर्यंत…काहीच वर्ज्य नाही. यातल्या प्रत्येक कामात सत्तेच्या कुठल्याही टप्प्यावर म्हणजे आमदार असो वा मंत्री, आव्हाड स्वत: बोलतात. अगदी मुंब्य्रातल्या पोरांचा राडा असो की आपल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या महापालिकेतल्या कामांच्या फायली. हा माणूस स्वत: बोलतो स्वत: भिडतो. हे करत असताना जन्मतः मिळालेल्या चेहर्‍यावरचा उग्रपणा असो की डोळ्यातला अंगार…या सगळ्यातून वाट काढतो तो घटक म्हणजे ‘माझा’. हो हो अगदी खरंय माझा हाच शब्द!

सध्या राजकारण प्रचंड जीवघेणं झालंय. अशा परिस्थितीत आपला मतदारसंघ, आपलं मंत्रीपद, त्यातलं कामकाज, आपले समर्थक आणि छोटे कार्यकर्ते यांना सांभाळण्याचं काम आव्हाड नीट करतात. ठाण्यातल्या अनेक नेत्यांचा अभ्यास करताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे आपल्याला त्रासदायक ठरणारे, नेतृत्वाकडे तक्रार घेऊन जातो सांगून घाबरवणारे फायदे का सौदा करुन घेत असतात. ज्यांना असुरक्षित वाटतं ते अशा पक्षातल्या आणि पक्षाबाहेरच्या घटकांना आर्थिक ताकद देत असतात. सोयीसुविधा पुरवत असतात; पण ब्लॅकमेल करू आणि मिळवू या कसोटीवर आव्हाड मात्र कधीच बधत नाहीत. ते एखाद्याला पाठीशी घालतात, श्रीमंत करतात, शक्य होईल ते देतात; पण त्यासाठी तुम्ही त्यांना घाबरवून काही मागाल तर ते शक्य नाही. याचं कारण दडलंय आव्हाड यांच्या मतदारसंघाच्या बांधणीत. मुंब्रा-कळवा हा मुस्लीमबहूल मतदारसंघ आव्हाड यांनी असा काही बांधलाय की त्यांच्या बांधणीचा थोरल्या पवारांनाही हेवा वाटतो. हा मतदारसंघ बांधताना मुस्लीम व्होट बँकेकडे आव्हाडांच्या अति झुकण्यामुळे ते सोशल मीडियात ट्रोल होतात. माध्यमांमध्ये लक्ष्य होतात. पण त्याची फिकीर त्यांच्या गावीही नसते. कारण एव्हाना त्यांना कळून चुकलंय, राज्याच्या संसदीय राजकारणात पहिल्या फळीत राहायचं असेल तर यासारखा मतदारसंघ नाही. आणि पुरोगामीत्वासारखा मंत्र नाही.

आपल्याकडे असलेल्या गोष्टी कशा चपखल वापरायच्या याचं तंत्र, शास्त्र या नेत्याला उत्तम अवगत झालंय. ठाण्यातला दहीहंडीचा इव्हेंट असो की मुंब्य्रातली कव्वाली…आव्हाड पुरस्कर्ते, निमंत्रित, माध्यम प्रायोजकत्व याची अशी काही रचना की सामान्य कार्यकर्ता ते स्वत:ला न्यूज आयकॉन म्हणवणारे राष्ट्रीय माध्यमातले तुर्रम सगळेच स्वत:ची स्पेस आव्हाडांच्या समोर बनवण्यासाठी ‘संघर्ष’ करतात. याच जोरावर आव्हाड मात्र आपली पवारांबद्दलची स्वामीनिष्ठा वेळोवेळी सक्षमपणे व्यक्त करतात. साहजिकच पक्षातला एक प्रभावी वर्ग सतत आव्हाडांच्या मागे हात धुऊन लागलेला असतो. त्याला अति स्वामीनिष्ठेमुळे जितेंद्र आव्हाड आवडत नाहीत. हा गट ठाण्यातली किंवा पुण्यातली वेगवेगळी प्यादी वापरुन आव्हाडांना घेरतो. राजकीय, सामाजिक आव्हानंही देतो. पण हा वंजारी गडी त्यांना पुरुन उरतो. हे करताना जितेंद्र आव्हाड यांना कुठे महापालिका आणायची आहे, जिल्हा परिषद आणायची आहे असा अट्टाहास करताना ते दिसत नाहीत.

त्यामुळे क्राऊडपुलर म्हणून ते चांदा ते बांदा असा कॅनव्हास व्यापत नाहीत. त्यांचा राजकीय अजेंडा मर्यादित आहे. त्यात पवारनिष्ठा, मुंब्रा-कळवा मतदारसंघ, दलित-मुस्लीम मतदार, बहुजन इतकंच… पण हा अजेंडा किती ठाशीव पध्दतीनं मांडायचा हे त्यांनी ठरवलंय… तरीही त्यांना स्वत:चा असा चाहता वर्ग आहे. हा एका विशिष्ट धाटणीचा आहे. त्याचे परिणाम-दुष्परिणाम आव्हाडांना भोगावे लागले. कधी कोरोनासारख्या जीवघेण्या आजाराने तर कधी हिंदूद्वेष्टा या उपहासानं. पण म्हणून हा माणूस बिथरला घाबरल्याचं मी तरी पाहिलं नाही. त्याचवेळी तणावाखाली येऊन किंवा विरोधकांना मात द्यायची म्हणून या माणसानं कधी कमरेखाली वार केलेला नाही. ठाण्यातल्या एका नेत्याचा मुलगा परदेशी तरुणीच्या प्रेमात पडला. या नेत्याच्या मुलाबरोबरचं वांद्य्रातील पंचतारांकित हॉटेलातलं खासगी क्षणांचं ‘फुटेज’ माध्यमांच्या हाती लागलं. त्या तरुणीने या मुलावर काही आरोप केले. प्रकरण तापलं. यावर आव्हाडांनी प्रतिक्रिया दिली तर मसाला मिळेल म्हणून काहीजण आव्हाडांपर्यंत पोचले. दुसरा कुणी नेता असता ‘ऑफ द रेकॉर्ड’ देऊन मोकळा झाला असता. आव्हाड म्हणाले, ए छॅट, मी काय याच्यावर बोलणार नाही. त्या पोराला मी लहानाचा मोठा होताना पाहिलाय. आणि माझं जे काही आहे त्याच्या बापाबरोबर आहे. आणि ते ही राजकीय आहे. मी तिथेच बघेन काय करायचं. तुम्ही पण त्या पोराला छळू नका’!

दुसर्‍या एका प्रकरणात सेनेच्या एका नगरसेविकेला म्हाडाच्या एका सभागृहाचं कंत्राट मिळणार होतं. ती आणि तिचा पती बराच काळ त्यासाठी धडपडत होते. टेंडर प्रक्रिया पण तीच जिंकली. तिच्या विरोधातील तिच्याच पक्षाच्या आमदारांनी आव्हाडांना केबिनमध्ये गाठून ते रद्द करण्याची गळ घातली. सोबत राष्ट्रवादीची काही ‘लोकल’ मंडळी नेली. आव्हाड काही बधले नाहीत. त्या वजनदार आमदाराला म्हणाले, तुम्हाला काय पाहिजे ते सांगा, ते मी देतो. त्यांनी टेंडर मिळवलंय, अधिकारी त्यांना सतावणार नाहीत हा मी शब्द त्यांना दिलाय. तो आता फिरवणार नाही. काहीही होवो…

हे जे काय जितेंद्र आव्हाडांचं आहे ते जबरदस्त आहे.

स्व. बाळासाहेब ठाकरे, स्व.आनंद दिघे, स्व. विलासराव देशमुख, स्व.गोपीनाथ मुंडे, राज ठाकरे, नारायण राणे, गणेश नाईक, एकनाथ शिंदे हे असे नेते आहेत त्यांना तुमची जी काही अडचण असेल ती खरीखुरी सांगा ते तुमच्या मागे पर्वतासारखे उभे राहतात. मदत करणं शक्य नसेल तर समोरासमोर सांगतात काय अडचण आहे आणि काम कसं होईल. (मी शरद पवार, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा याबाबत स्वत: अनुभव घेतलेला नाही. गैरसमजाबद्दल क्षमस्व) या यादीत अगदी मानानं बसणारा नेता म्हणून तुम्ही जितेंद्र आव्हाडांची निवड करू शकता… म्हणूनच त्यांना नव्या इनिंगसाठी खूप खूप शुभेच्छा!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -