घरफिचर्सओल्या डोळ्यांच्या सातबार्‍याचा शोध

ओल्या डोळ्यांच्या सातबार्‍याचा शोध

Subscribe

गेल्या पावशतकातील पंच्याहत्तर हजार विधवा स्त्रियांच्या जगण्याचा काळीज पिळवटून टाकणारा हा ‘ओल्या डोळ्यांच्या सातबार्‍याचा’ प्रातिनिधीक शोध आहे. मुख्यत: या बहुतांश स्त्रिया 20 ते 40 या तरुण आणि उमेदीच्या वयोगटातील आहेत. त्यामुळे हे लेखन वाचताना कोणत्याही संवेदनशील माणसांचे डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाही. जिस तन लागे वहिं तन जाने ।बीजा क्या जाने गव्हारा रे॥या कबीराच्या दोह्याप्रमाणे दीप्ती राऊत यांनी या स्त्रियांच्या अंतर्मनाचा ठाव घेत त्यांच्या वेदनेला नेमकेपणाने शब्दात पकडलेले आहे.

शेती ही मानवी संस्कृती निर्माणाचे कारण ठरलेली आहे. शेतकर्‍याच्या घामावर जगभरातल्या जीवनवाटा प्रकाशमान झालेल्या आहेत. भारतीय अर्थव्यवस्था ही तर शेतीला केंद्रस्थानी ठेवूनच आकाराला आलेली आहे. असे असले तरी या कृषीप्रधान देशात पूर्वापार काळापासून शेती आणि शेतकर्‍यांची लूट सातत्याने होत आलेली आहे. अस्मानी-सुलतानीच्या फेर्‍यात अडकलेली शेती आज काळोखाच्या दिशेने वाटचाल करते आहे. अनेक सत्तांतरे झाली, परंतु या सत्तापालटात शेती नि शेतकरी मात्र बदलला नाही. ‘अन्नदाता उपाशी’ ही त्याची ओळख अधिकाधिक ठळक होत गेलेली आहे. नापिकी, दुष्काळ, अतिवृष्टी, शेतमालाच्या किमती यामुळे निर्माण झालेल्या अडचणी आणि त्यातून वाढत गेलेले कर्जबाजारीपण-दारिद्य्र या कारणांनी नव्वदच्या दशकानंतर ‘शेतकरी आत्महत्यां’चे भयावह वास्तव समोर आलेले आहे. 19 मार्च 1986 ला यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील चिलगव्हाणच्या साहेबराव करपे यांनी त्यांची पत्नी मालती आणि मुलांसह सहकुटूंब आत्महत्या केली. ही महाराष्ट्रातील कर्जबाजारी शेतकर्‍याची पहिली वैयक्तिक आणि सामूहिक आत्महत्या आहे.

गेल्या पंचवीस वर्षांत भांडवली अर्थकारणाच्या नीतीमुळे देशात जवळपास साडेतीन लक्ष आणि एकट्या महाराष्ट्रात पंच्याहत्तर हजार शेतकर्‍यांनी जगण्याला कंटाळून जीवन संपवले आहे. ‘बळीराजा’असा त्याचा होणारा गौरव आत्महत्यांच्या या वास्तवाने हास्यास्पद ठरला आहे. अन्न पिकवणारी हाडामासाची जिवंत माणसं मरणाला मिठी मारतायत आणि आम्ही संवेदना बधिर झाल्यागत आकड्यांची मोजदाद करत कृतिशून्यपणे हा विषय चघळत बसलो आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवा स्त्रिया नि त्यांच्या मुलाबांळाची स्थिती तर त्याहून भयंकर आहे. काही संवेदनशील लेखक-कलावंत-कार्यकर्ते-पत्रकार-समाजसेवी संस्था यांचा अपवाद सोडला तर त्याकडे कुणाचेही फारसे लक्ष नाही. आत्महत्येनंतरच्या अंधारात असणार्‍या या स्त्रियांच्या हुंदक्यांचे, त्यांच्या संघर्षाचे-दु:खभोगाचे आणि एकूणच जगण्याच्या परवडीचा आलेखपट सामाजिक बांधिलकी मानत सातत्याने लोकांच्या प्रश्नांसाठी पत्रकारिता करणार्‍या दीप्ती राऊत यांनी ‘कोरडी शेतं…ओले डोळे’या शोधपुस्तकातून मांडला आहे. शेतकरी विधवा स्त्रियांच्या जगण्यातील अनेकविध अनुत्तरीत प्रश्नांना या लेखनाने वाचा फोडली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रातील निवडक आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवा स्त्रियांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांचे दु:ख आणि परिस्थिती समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न दीप्ती राऊत यांनी या समाजशास्रीय परिप्रेक्षातील अभ्यासातून केलेला दिसतो. प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील आत्महत्याप्रवण क्षेत्रातील स्त्रियांच्या भेटी घेऊन त्यांच्या जगण्याच्या स्थितीगतीचा जमाखर्ज या लेखनातून मांडलेला आहे. त्यांचे प्रश्न आणि त्यांचा संघर्ष, त्यांच्यासाठी कार्यरत स्वयंसेवी, शासकीय प्रयत्न समाजापुढे यावा, त्यांचे सामाजिक-राजकीय-आर्थिक पैलू उजेडात यावेत, समाजाने त्यांच्या अस्तित्त्वाची आणि त्यांच्या प्रश्नांची दखल घ्यावी हा या अभ्यासाचा उद्देशअसल्याचे राऊत यांनी या पुस्तकाच्या मनोगतात नमूद केलेले आहे.या उद्देशाला केंद्रभागी ठेवत हा अभ्यास बारा लेखांद्वारे एकशे बावीस पृष्ठांच्या या पुस्तकातून विश्लेषित केलेला आहे.

आत्महत्या आणि त्यानंतर’, ‘खंडीभर हिंमत’, ‘लोकांच्या नजरा’, ‘दुहेरी संकट’, ‘आधाराच्या काड्या’, प्रश्नांचा डोंगर’, शासकीय उदासीनता’, ‘स्वयंसेवी आधार’, ‘उत्तरांची किरणं’, ‘तगण्याची कारणं’, ‘अपेक्षा आणि आकांक्षा’व ‘निष्कर्ष आणि शिफारसी’या लेखांच्या माध्यमातून केलेल्या या पुस्तकाच्या रचनेचे केंद्रसूत्र आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या विधवा स्त्रियांच्या जगण्याचे आजचे वास्तव आणि त्या वास्तवाला असणार्‍या बहुपरिणामी बाजूंची चर्चा घडून आणणे हेच आहे. अनिता डुकरे, सुमन उंदरे, ज्योती देशमुख, ताराबाई पडोळ, शुभांगी जिरापुरे, अर्चना म्हसे, इंदिरा उईके, मनीषा भगत, संगीता पवार, सुनीता पांदेरे, अरूणा अहिरे अशा अनेक स्त्रियांच्या फरपटीच्या लालित्यपूर्ण दाहक कहाण्या जिवंतपणाने या लेखनातून रेखाटलेल्या आहेत. या स्त्रिया विविध भौगोलिक प्रदेशातील असल्या तरी त्यांच्या दु:खाचा अवकाश सारखाच आहे. शेती समोरील आव्हाने आणि तिच्या पडझडीची चिकित्सक कारणमीमांसाही या लेखनातून झालेली आहे.

- Advertisement -

या स्त्रियांची आर्थिक, सामाजिक, मानसिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक स्थिती, कौटुंबिक आणि शेतीसंबंधीचे वर्तमान प्रश्न, त्यांच्यासमोरील समस्या-अडचणी, शासकीय व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीतील सत्यता, त्याचा त्यांच्या जगण्यावर झालेला परिणाम, कुटुंब-नातेवाईक-गावकरी-राज्यकर्ते-भाऊबंद-प्रशासन यांचा या स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोन, शासकीय योजनांचा झालेला फायदा-तोटा, त्यांच्या समाज-सरकारकडून असणार्‍या अपेक्षा, तसेच गावगाड्याच्या पारंपरिक काचाला या स्त्रिया कशाप्रकारे सामोर्‍या जातात, व्यवस्थेचा मुका मार मूकपणे सहन करत जगण्याच्या पायवाटा कशापद्धतीने प्रशस्त करतात आणि एकूणच संबंध व्यवस्था या स्त्रियांकडे कोणत्या नजरेने पाहते यांचा वस्तुस्थितीवर आधारीत शोध अभ्यासपूर्ण आणि तटस्थ वृत्तीने राऊत यांनी घेतलेला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लेखिकेने ‘माणूस’ म्हणून या स्त्रियांचे प्रश्न समजून घेण्याची दृष्टी ठेवल्याने हे लेखन एकाच वेळी वाचकांच्या भावनेला हात घालत अस्वस्थ करते आणि दुसर्‍या बाजूला या प्रश्नांची सखोल चिकित्सा करत त्याच्या व्याप्तीची जाणीव करून देते.

आजच्या शेतीअरिष्टांचा विविधांगी वेध घेत परिस्थितीने हतबल-असहाय-नैराश्यग्रस्त झालेल्या आणि जगण्याशी धाडसाने-नेटाने-कष्टपूर्वक संघर्ष करण्यार्‍या अशा दोन्ही प्रकारच्या स्त्रियांच्या दु:खाने लदबदलेली गाथा या पुस्तकातून साक्षात झालेली आहे. गेल्या पावशतकातील पंच्याहत्तर हजार विधवा स्त्रियांच्या जगण्याचा काळीज पिळवटून टाकणारा हा ‘ओल्या डोळ्यांच्या सातबार्‍याचा’ प्रातिनिधीक शोध आहे. मुख्यत: या बहुतांश स्त्रिया 20 ते 40 या तरुण आणि उमेदीच्या वयोगटातील आहेत. त्यामुळे हे लेखन वाचताना कोणत्याही संवेदनशील माणसांचे डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाही. जिस तन लागे वहिं तन जाने ।बीजा क्या जाने गव्हारा रे॥ या कबीराच्या दोह्याप्रमाणे दीप्ती राऊत यांनी या स्त्रियांच्या अंतर्मनाचा ठाव घेत त्यांच्या वेदनेला नेमकेपणाने शब्दात पकडलेले आहे. एक स्री म्हणून या स्त्रियांच्या अनुभूतीचे अंतरंग त्यांनी मनस्वीपणे उलगडून दाखवल्याने या लेखनाचे मोल वाढलेले आहे.

महात्मा जोतीराव फुले यांनी 1882 साली ‘शेतकर्‍याचा आसूड’च्या माध्यमातून एकोणाविसाव्या शतकातील भारतीय शेतकर्‍यांचा आक्रोश आणि दारिद्य्रमय हलाकीचे चित्र जगासमोर आणले होते. त्यानंतर असे प्रयत्न फार थोडे झाले. दिप्ती राऊत यांनी एकवीसाव्या शतकातील या स्त्रियांच्या पाहणीतून केलेले हे लेखन महात्मा फुले यांच्या लेखनमार्गाने जाणारे आहेत. ‘शेतकर्‍याचा आसूड’मधे रेखाटलेला शेतकरी आणि प्रस्तुत पुस्तकातून या स्त्रियांच्या अनुषंगाने चर्चिले गेलेले शेतीवास्तव यात फारसा फरक नाही. उलट दिवसेंदिवस शेतीभोवतीचे फास घट्ट होत गेले असल्याचे या लेखनातून स्पष्ट होते. महात्मा फुले यांनी शेतकर्‍यांचे प्रश्न समजून घेतले नाही तर ते ‘प्राणत्याग’ही करतील असे त्यांच्या लेखनामधून सूचित केले होते. त्याचाच प्रत्यय मागील पंचवीस वर्षांत भारतीयांना आलेला आहे. दिप्ती राऊत यांनीही एकापेक्षा अधिक प्रश्नांचा सामना एकाचवेळी करावा लागल्याने सहनशक्तीचा कडेलोट झाल्यावर ताण असह्य होऊन शेतकरी महिलांनीही आत्महत्येचा पर्याय स्वीकारण्याच्या भीषण वाटेवर आपला समाज येऊन ठेपला असल्याचा इशारा या पुस्तकातून दिला आहे.‘आसूड ते ओले डोळे’ हा शेतीच्या दु:स्थितीचा प्रवास विनाशकारी आहे. तो सर्वांनीच गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे.

कथा, संवाद, आणि निबंध या फॉर्मचे गुणविशेष रिचवत आकारलेले हे गद्यलेखन भाषेच्या प्रवाहीपणामुळे वैशिष्ठ्यपूर्ण ठरणारे आहे. रिपोर्ताज, लालित्यमयता, वैचारिकता व माहितीप्रधानता यांच्या संयोगातून या लेखांची घडण तयार झालेली आहे. वस्तुनिष्ठ आकडेवारी, प्रत्यक्ष पाहणीतून आलेली सत्याधारित निरीक्षणे, या विषयासंबंधी झालेल्या अभ्यासाचे विश्लेषण पुरक संदर्भ, घटना-प्रसंगाचे हुबेहुब वर्णन करणारी कथात्म शैली, निश्चित भूमिका असलेला लेखिकेचा मानवतावादी संशोधकीय दृष्टीकोन यामुळे हे लेखन मूल्यवान झालेले आहे. त्यामुळेच या लेखनाला सामाजिक इतिहासाचे विश्वसनीय साधन म्हणूनही संदर्भमूल्य प्राप्त झालेले आहे. या अनुषंगाने अधिक अभ्यास करू इच्छिणार्‍या संशोधकांना हे लेखन मार्गदर्शक ठरणारे आहे.

-केदार काळवणे

– सहायक प्राध्यापक, मराठी विभाग, शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय,कळंब,

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -