एअर स्ट्राइक : चर्चा आणि वास्तव

Mumbai
एअर स्ट्राइक

बालाकोटवर केलेल्या हल्ल्यात किती लोक मारले गेले हे भारतीय हवाई दलाने जाहीर करावं, हा प्रश्न हास्यास्पद म्हणावा लागेल. जिथं हल्ला झाला तिथे मदरसा होत्या आणि त्यात मानवी हालचाली होत्या, यात अजिबातच शंका नाही. जे लोक हल्ल्याबाबत शंका उपस्थित करत असतील, ते स्वतःची फसवणूक करताहेत असं वाटतं. हल्ला झालाच नसेल तर थेट अमेरिकेच्या अध्यक्षांनी हस्तक्षेप कशासाठी केला असता. काहीतरी तर झालंय, ज्यामुळे थेट त्यांना स्वतःची भूमिका जाहीर करावी लागली.

पंतप्रधानपदावर कोणत्याही पक्षाचा, कुणीही व्यक्ती असता आणि पुलवामा घटना घडली असती तर भारताकडून हवाई हल्ला हा झालाच असता. निवडणुकांमुळे आरोप-प्रत्यारोप होणं स्वाभाविक असलं तरीही, थेट हवाई दलाच्या एवढ्या अभिमानास्पद कामगिरीवरच शंका घेतली जाणं, ही अत्यंत दुर्दैवी बाब म्हणावी लागेल. हल्ल्यावेळी विमान २८ ते ३० हजार फूट उंचीवर साधारण हजार किलोमीटरच्या गतीने उडत असतं. अशावेळी हल्ला करुन सुपरसॉनिक गतीने (आवाजापेक्षा अधिक वेगात) सुरक्षित परतणं हेच वैमानिकाचं लक्ष्य असतं. हल्ला कसा झाला, हे पाहण्यासाठी एक क्षणही त्याच्याकडे नसतो. त्यामुळे हवाई दलाकडे हल्ल्यावेळचे पुरावे मागणं, ही बाब हास्यास्पद आहे. दुसरा मुद्दा म्हणजे, कुणी आदेश दिला आणि तातडीने हल्ला केला, असं कधी होत नाही. अशा हल्ल्यांचं नियोजन दोन-तीन महिने आधीच झालेलं असतं. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून भारतीयांनी लष्कराच्या बाजूने उभं राहण्याची ही वेळ आहे. अन्यथा, माथेफिरू सद्य:स्थितीचा गैरफायदाही घेऊ शकतात.

पुलवामा घटनेचा रोष आणि त्यानंतर भारतीय हवाई दलाने थेट पाकिस्तानात जाऊन दहशतवाद्यांच्या तळांवर केलेल्या हल्ल्यानंतर दररोज वेगवेगळ्या बातम्या आणि चर्चांना उधाण आलं आहे. काही चर्चा या राजकीय हेतूने प्रेरित असल्याने थेट लष्कराच्या कामगिरीवरच शंका घेतली जाते आहे. या पार्श्वभूमीवर प्रांजळपणे सांगावंसं वाटतं की, चर्चा आणि वास्तव यात मोठी तफावत आहे. कुणी म्हणतं की, हल्ला झाला तर नुकसान दाखवा, कुणी म्हणतं मृतदेह दाखवा. अशा व्यक्तींना सांगावंसं वाटतं की, पूर्वी एखादा बॉम्ब टाकला की, प्रचंड विस्फोट होऊन संपूर्ण परिसर उध्वस्त व्हायचा. मात्र, तंत्रज्ञान जसजसं बदलत गेलं, तसं या क्षेत्रातही अचूकता येत गेली. हल्ल्यात परिसरातील सर्वसामान्य नागरिकांचा बळी जाऊ नये, यासाठी अलिकडे पेनेट्रेशन बॉम्बचा वापर केला जातो. भारतानेही अशा बॉम्बनेच बालाकोटमध्ये हल्ला केला.

सीमेवरचे जवान हे सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी कार्यरत आहेत. कुणा एखाद्या राजकीय पक्षासाठी नाही. समजा, कुणी वरिष्ठ अधिकारी राजकीय पक्षापासून प्रभावित असेल तर अन्य अधिकारी तरी का ऐकतील. कारण प्रत्येकाचं पद आणि त्याचे अधिकार वेगवेगळे असतात. पंतप्रधानपदावर कुणीही असतं तरी पुलवामा घटनेनंतर बालाकोटवरील हवाई हल्ला झालाच असता. समजा उद्या जम्मूमध्ये काही घटना झाली तर तेव्हाही आपल्याकडून कसं प्रत्युत्तर दिलं पाहिजे, याचंही नियोजन लष्कराकडून झालेलं असेल. त्यामुळे एखाद्या मोठ्या घटेनंतरची प्रतिक्रिया ही त्या घटनेच्या तीव्रतेवर अवलंबून असते. घटना घडली आणि लष्कराला जाग आली असं लष्कराच्या बाबतीत कधी होत नसतं. संरक्षणासाठी कार्यरत यंत्रणा ही सदैव सज्ज असते. आधी अशा घटना होत नव्हत्या असं नाही, तर त्या केवळ आजएवढ्या गतीने प्रसिद्ध होत नव्हत्या.

दुसरी आणखी एक चर्चा चाललीय ती म्हणजे, तिथे काही नुकसानच झालं नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की, रॉयटर्सची टीम गावापर्यंत गेली. मदरशाचा फोटो दाखवला. जर नुकसान झालंच नव्हतं तर त्यांना १०० मीटर थोडं पुढे आतमध्ये जाऊन फोटो का काढू दिले नाहीत. नॉर्वे आणि फिनलँड प्लॅनेट लॅबने बॉम्ब हल्ल्यापूर्वी आणि नंतरचे काही फोटो प्रसिद्ध केले आहेत. तिथे स्पष्ट दिसतंय की, त्या भागातील वाळूचे उत्खनन होऊन ढिगारे निर्माण झाले आहेत. याच फोटोंमध्ये मदरशाच्या छतावर बर्‍याचे ठिकाणी भगदाडे पडलेली दिसतायत. या फोटोंमध्ये छत तसेच असून, अन्यत्र चार-पाच ठिकाणी भगदाडे आहेत. पाकिस्तानी लष्कराला किती वेळ लागणार छताचे शिट्स लावायला. एका दिवसाचं ते काम असतं. त्यामुळे हल्ला झालाच नाही, असं म्हणणं चुकीचं ठरेल. दोन आठवडे उलटूनही पाकिस्तानी लष्कर जिथं हल्ला झाला त्या ठिकाणी जाऊ देत नाही. काही झालंच नाही तर जाऊ द्यायला पाहिजे आत.

या हल्ल्यात किती लोक मारले गेले हे भारतीय हवाई दलाने जाहीर करावं, हा प्रश्नदेखील हास्यास्पद म्हणावा लागेल. दुसरा मुद्दा, इस्त्रो किंवा उपग्रहाचे नियंत्रण असलेल्यांना किती मृतदेह आहेत, हे मोजायला सांगणंदेखील तसंच आहे. एखादी हालचाल, इमारत किंवा रस्ते पाहण्यापर्यंत हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरतं. मात्र, एखाद्या वास्तूमधील व्यक्तींची मोजदाद करणं, हे निदान आज अशक्य वाटतं. जिथं हल्ला झाला ते ठिकाण मदरसा होत्या आणि त्यात मानवी हालचाली होत्या, यात अजिबातच शंका नाही. जे लोक हल्ल्याबाबत शंका उपस्थित करत असतील, ते स्वतःची फसवणूक करताहेत असं वाटतं. हल्ला झालाच नसेल तर थेट अमेरिकेच्या अध्यक्षांनी हस्तक्षेप कशासाठी केला असता. काहीतरी तर झालंय, ज्यामुळे थेट त्यांना स्वतःची भूमिका जाहीर करावी लागली.

विमानातून लक्ष्य भेदण्यासाठी ठेवण्यात आलेल्या बॉम्बवर कॅमेरा असणं आणि त्याच्या बॅकअपसाठी उपग्रहांची मदत घेणं ही फार खर्चिक बाब असते. हा खर्च जवळपास दुपटीने वाढतो. अमेरिकेसारख्या प्रगत देशाकडे असे काही बॉम्ब आहेत, ज्यावर हे तंत्रज्ञान वापरण्यात आलंय. कुणाला पुरावे द्यावे लागतील म्हणून त्यावर कॅमेरे बसवून मग हल्ला करणं, हे हाती असलेल्या निधीचा विचार करता अजिबातच व्यवहार्य वाटत नाही. कारण त्याच पैशात आणखी एक बॉम्ब खरेदी करता येतो. त्याऐवजी उपग्रह छायाचित्रांची मदत घेता येते. एखाद्याचा विश्वासच नसेल तर त्याचा घटनास्थळी नेऊनही विश्वास बसणार नाही आणि कुणी केवळ हवाई दलावर विश्वास ठेवून एकही प्रश्न उपस्थित करणार नाही.

सर्वसामान्य भारतीयांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की, पंतप्रधानांनी सांगितलं आणि हल्ल्याचा बनाव रचला गेला, असं कधी होत नाही. आजवर कधी झालं नाही. विमानं घेतली आणि पाकिस्तानात जाऊन बॉम्ब हल्ला केला, असं नसतं. सुरक्षेसाठी तैनात जवानांमध्ये एकवाक्यता आणि संघटन भावना असते. एखादी मोठी घटना घडली की, प्रत्येकाला वाटतं की बदला घ्यावा. मग, योग्य वेळ आणि ठिकाण पाहून कोणतं दल त्यासाठी पुढाकार घेईल हे एकत्रित नियोजनानंतर ठरतं. दुसरं असं की, जे काही झालं त्याचं राजकारण कुणी करू नये. शहीद जवानांचे फोटो मागे लावून, मतांचं राजकारण करू नये. सर्वसामान्यांनी ही बाब जाणून घ्यावी. प्रत्येक जवानावर विश्वास ठेवा. जवान तुमचेच आहेत आणि तुमच्यासाठीच आहेत!

हा राजकीय स्टंट नाही
बालाकोटमधील हल्ला हा काही अचानक झालेला नाही. त्याचे नियोजन तीन महिन्यांपूर्वीच झालेलं असेल. आम्ही कोणत्याही परिस्थितीसाठी सज्ज आहोत, हे लष्कराचे अधिकारी सांगतात, हा त्याचाच भाग म्हणावा लागेल. उद्या दिल्लीत काही झालं तर त्याचंही नियोजन झालेलं असावं. पाकिस्तान नेहमीच अणुबॉम्बची भीती दाखवत आलाय. त्यांना केव्हातरी जाणीव करून द्यायची होती की, आम्हीही सक्षम आहोत. त्यांनी दहशतवादी पाठवले, त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी आपण हल्ला केला. पाकिस्तानने भारतातील घुसखोरीसाठी कोणतं विमान वापरलं, याचाही जाब अमेरिका विचारणार आहे. त्यामुळे पाकिस्तानची चारही बाजूने कोंडी झाली आहे.

पेनेट्रेशन बॉम्बची कामगिरी
पेनेट्रेशन बॉम्ब हा निश्चित केलेल्या ठिकाणाचा अचूक वेध घेत बोअर केल्याप्रमाणे लक्ष्याच्या आत शिरतो आणि त्यानंतर त्याचा विस्फोट होतो. त्यामुळे त्याचा परिणाम हा आतल्या भागात होत असतो. इमारत पडत नाही. बालाकोटमध्ये ज्या मदरशात दहशतवादी लपलेले होते, त्या ठिकाणी पेनेट्रेशन बॉम्बने अपेक्षित कामगिरी केली. छताच्या आत जाऊन हे बॉम्ब फुटल्याने बाहेरून या हल्ल्याच्या तीव्रतेचा अंदाज येत नाही. स्पाइस २००० किंवा पोपेय एजीएम हे बॉम्ब अशा हल्ल्यांसाठी वापरले जातात. लेझर गाइडेड बॉम्ब जेव्हा एकदा लक्ष्य निश्चित करुन सोडले जातात, त्यानंतर ते बॉम्ब स्वतःच लक्ष्य भेदतात.

पाकिस्तान माध्यमांना घटनास्थळी का नेत नाही
वेगवेगळ्या वृत्तसंस्था, चॅनेल्सकडून जिथं हल्ला झाला त्या भागातील फोटो आणि व्हिडिओ प्रसारीत केले गेले. ज्या वास्तूवर हा हल्ला झाला, त्या ठिकाणाहून काही मीटर अंतरावरुन हे वृत्तांकन केले गेले. आणखी थोडं अंतर पुढे जाऊन आतलेही फोटो किंवा व्हिडिओ प्रसिद्ध केले असते तर निदान त्यांना नेमकं काय सांगायचं हे आपोआपच जनतेला कळलं असतं. तसं का होत नाही, याचा सर्वांनीच विचार करावा. काही झालंच नसेल तर पाकिस्तान सरकार किंवा लष्करानेही माध्यमांना थेट घटनास्थळी न्यायला पाहिजे होतं. ज्या ठिकाणी हा हल्ला झाला, तेथून बाजूलाच वाळूचे मोठे ढिगारे निर्माण झाल्याचं चित्र आहे. याच ठिकाणी मृतदेहांना पुरल्याची शंका उपस्थित होते आहे.

– विंग कमांडर जयेश पै (निवृत्त), कमांडंट, भोसला मिलिटरी स्कूल
-माजी व्यवस्थापकीय संचालक, मिनिस्ट्री ऑफ मायक्रो, मीडियम अँड स्मॉल एण्टरप्रायजेस
-आयआयटी मुंबईतून पुढे भारतीय हवाई दलात तब्बल २५ वर्षे कार्यरत

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here