घरफिचर्सतुटलेला पाटा, हरवलेल्या वाटा

तुटलेला पाटा, हरवलेल्या वाटा

Subscribe

अलिबाग पिकनिक आयुष्यात अविस्मरणीय ठरली. कारण मुंबई ते अलिबाग या प्रवासात केलेली धमालमस्ती तर होतीच; पण, मजामस्तीच्या नादात एका गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यामुळे मोठा अनर्थ घडणार होता. मात्र सुदैवानं आम्ही सर्वजण थोडक्यात बचावलो.

आयुष्यात काही घटना या नेहमीच अविस्मरणीय ठरतात. अशा घटना अंगावर काटा आणणार्‍या असतातच शिवाय रंजकही असतात. त्यापैकीच एक घटना म्हणजे आमची अलिबाग पिकनिक. वन नाईट स्टॅण्डचा प्लान असल्याने सर्वजण उत्साहात होते. शनिवार आणि रविवार असा दोन दिवसांचा मस्त प्लान आणि एका रात्रीचं वास्तव्य असल्याने सर्वजण जोशात होते. आमचा एकूण १५ जणांचा ग्रुप होता. मुंबईहून आम्ही शनिवारी सकाळीच १७ सीटर टेम्पो ट्रॅव्हलरमधून निघालो. २० ते ३० वयोगटातील सर्वजण असल्यामुळे धमाल मस्तीची कमतरता नव्हती. पण मस्तीची नशा जेव्हा चढते तेव्हा आपल्या पुढे काय अनिष्ट वाढून ठेवलंय याची आपल्याला कल्पना नसते.आमच्या बाबतीतही नेमकं हेच घडणार होतं. मुंबईच्या बाहेर पडतानाच एका पेट्रोलपंपावर थांबलो असता गाडीचा पाटा निखळल्याची शंका ड्रायव्हरला आली. परंतु, त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं.

आम्हीही पिकनिकच्या मस्तीत असल्याने त्याकडे लक्ष देऊ शकलो नाही. मुंबई ते अलिबागचा असा जवळपास १०० किलोमीटरचा प्रवास आम्ही तशाच स्थितीत केला. रस्ता चांगला होता, तोपर्यंत गाडी तग धरून होती. परंतु, खेडेगावातील रस्त्यांवर गाडी धावायला लागल्यावर गाडीची स्थिती अजूनही खराब होत गेली. पण आम्ही सारे मस्तीच्या धुंदीत होतो. त्यामुळे कशाचीच पर्वा नव्हती. रात्री अलिबागच्या महान या गावी पोहचल्यानंतर रात्रभर भरपूर मजा केली. सकाळी गावात शनिवारच्या रात्री वास्तव्य केल्यानंतर आम्ही दुसर्‍या दिवशी मुरूड जंजिरा किल्ल्याकडे रवाना झालो. रस्ता तोच आणि गाडीही तशीच; पण अजूनही तसाच प्रवास रेटत होतो.

- Advertisement -

गावातील अरूंद रस्ते आणि खराब रस्त्यांमुळे आधीपासूनच निघालेला पाटा आता रस्त्याला घासू लागला होता. तरी देखील आम्हाला माहीत नव्हतं. गाडी मुरूड समुद्रकिनारी येऊन थांबली. सर्वांनाच पाण्यातील अभेद्य जंजिरा खुणावत होता. त्यामुळे पटापट सर्वांनी गाडीतून उड्या टाकत किनार्‍याकडे धाव घेतली. गाडी बिचारी म्हणत असेल,‘अरे पोरांनो माझ्याकडे बघा जरा, मुंबईला जायचं आहे की नाही.’ सर्वजण बोटीत बसले आणि किल्ल्यावर पोहचले.सिद्धी, संभाजीराजे यांचा इतिहास आणि किल्ल्यावरील गाईडच्या शायर्‍या पण ऐकत संध्याकाळचे ७ कधी वाजले हे कळले देखील नाही. सर्व जड पावलांनी मुंबईला जायला निघाले. मुंबईचा प्रवास ४ तासांचा होता. त्यामुळे मजा-मस्तीत तो कसा जाईल हे सगळ्यांना ठाऊक होतं. परंतु, पुन्हा किनार्‍यावर आल्यावर ड्रायव्हर चेहरा पाडून बसलेला दिसला. त्याला काय झालं विचारलं, तर म्हणाला की,गाडीचा पाटा तुटलाय गाडी चालू शकणार नाही,ते ऐकून सर्वांच्याच काळजात धस्स झाले. काही करावं, सुचेनासं झालं.

आम्ही लहान मुलं आणि आमचे मोठे भाऊ असे ७ मुलं आणि ८ मुली होतो. सारेजण तिशीच्या आतील.परंतु, रात्र काढणं जिकीरीचं काम होतं. गाडीसाठी मेकॅनिकही मिळत नव्हता. तोपर्यंत रात्रीचे ११ वाजले. मुंबईवरून आई-वडील काळजीने फोन करत होते. आम्ही जिथे थांबलो होतो, तेथे खराब परिस्थितीचा सामना करावा लागला असता. त्यामुळे रात्री १२ वाजता आम्ही पुन्हा महान गावी जायचा निर्णय घेतला. त्यानंतर रात्री २ वाजता तेथे पोहचून पुन्हा सकाळी मुंबईचा रस्ता धरला. तोपर्यंत गाडी ठिक झाली होती. रात्री आमच्या समोर उभ्या ठाकलेल्या परिस्थितीपेक्षा सुदैवाने गाडीचं दुखणं किनार्‍यावर बाहेर आलं ते बरं झालं. नाहीतर अनर्थ घडला असता. रात्री किनार्‍यावर आलेल्या मेकॅनिकलचं ते वाक्य आठवल्यावर अजूनही अंगावर काटा उभा राहतो,‘ऐसी ही गाडी आगे जाती तो सौ टक्का पलटी खाती’.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -