घरफिचर्समेलेल्याच्या टाळूवरचं लोणी!

मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी!

Subscribe

बॉलिवूडमधल्या खूप मोठमोठ्या नावांवर सध्या आरोप होत आहेत. या नावांची जी काही लार्जर दॅन लाईफ प्रतिमा लोकांच्या, त्यांच्या चाहत्यांच्या, बॉलिवुडमधल्या सहकलाकारांच्या किंवा इतर मंडळींच्या मनात होती, त्या प्रतिमेला आता मोठमोठाले तडे जाऊ लागले आहेत. या आरोपांमधून बॉलिवुड नावाच्या या चंदेरी गावाची अजून एक काळी बाजू समोर येऊ लागली आहे. सुशांत सिंह राजपूतच्या प्रकरणात नक्की काय झालंय, हे बाहेर येईल तेव्हा येईल, किंवा कदाचित ते कधीच येणार देखील नाही. पण, त्याच्या मागून बॉलिवुडचा हा अंधारातला चेहरा आता उजेडात येऊ लागला आहे आणि तो चेहरा जर आरोप करणार्‍यांच्या दाव्यांप्रमाणेच भीषण आणि काळाकभिन्न असल्याचं सिद्ध झालं, तर मात्र त्याची मोठी किंमत या नावांना चुकवावी लागेल. पण, आजवरच्या अशा अनेक प्रकरणांमध्ये ती चुकवावी लागणार नाही, याची पुरेपूर काळजी ही मंडळी घेत आलेली आहेत.

एक गाव…मध्यरात्री सगळे डाराडूर असताना अचानक किचकिचाट, गडबड, गोंधळ झाला आणि खाडकन् सगळ्यांची झोप उडाली..काही डोळे चोळत उठले, तर काहींची थोबाडं सुजली म्हणून उठले…घराघरातून सगळेच आवाजाच्या दिशेनं धावत सुटले..गर्दीत एकटे पडू नये म्हणून गर्दीचा भाग होऊ लागले…स्वत:ही निरनिराळे आवाज काढून बोमट्या मारू लागले…घटनास्थळी पोहोचले तेव्हा एका घरात दरोडा पडल्याचं दिसलं..सगळं लुटल्यामुळे घर आता मोकळं झालं होतं…गर्दीत त्या घरावरून रोज जाणार्‍यांसोबतच लांबून कधीतरी कुणी आपल्या घराच्या गच्चीवरून नजर टाकताना त्याही घरावर चुकून नजर गेलेली मंडळीही होती…त्या घरात जाऊन चहापानी करून आलेली जशी होती, तशीच त्या घराच्या पाण्यावरही वाकडं तोंड करून बहिष्कार घातलेली होती…भकभकून उजाडल्यानंतर मोठ्या सायबानं जाहीर केलं, दरोडा पडलेल्या घराला नुकसानभरपाई मिळणार! झालं…आख्ख्या गावात घराघरात पडलेल्या दरोड्याच्या सुरस कथा सुरू झाल्या, ऐकवल्या आणि चघळल्या जाऊ लागल्या… हळूहळू गावातल्या मंडळींची त्यांच्या कथांमधून त्यांच्या घरावर पडलेल्या दरोड्याच्या नुकसानभरपाईची मागणी करण्यासाठी सायबाच्या कचेरीत रीघ लागली… काही हात धुवायला, तर काही हात शेकायला… आता सायबाला प्रश्न पडला की कुठल्या गावकर्‍यावर विश्वास ठेवावा आणि कुठल्याची कथा कल्पना म्हणून सोडून द्यावी! बॉलिवुडची गत सध्या या गावासारखी झाली आहे!

आठवड्याभरापूर्वीपर्यंत हे बॉलिवुड नावाचं गाव एकदम सुशेगात नांदत होतं. सर्व काही स्थिरस्थावर ज्याच्या त्याच्या ठिकाणी सुखेनैव होतं. हसणार्‍या पार्ट्या, भिडणारे खांदे, साजरे होणारे १००-२००-३०० कोटींचे पल्ले, गुपचुप चघळले जाणारे गॉसिप, जाहीरपणे दिसणारं प्रेम, डीजे बुलाव गाना बजाव धमाका असं सगळं सगळं होतं. बाहेरून बघणार्‍यांना सगळं कसं छान छकोर शब्दश: चंदेरी वाटत होतं. करोनाच्या लॉकडाऊनमध्ये या चंदेरी सृष्टीतले काही तारे निखळले, तरी ती दुनिया तिचा साज लेवूनच उभी होती. पण, सुशांत सिंह राजपूत नावाचं एक वादळ या गावात घोंगावलं आणि तो साज तिची लाज चव्हाट्यावर आणेपर्यंत टराटरा फाटला. याआधी देखील इंडस्ट्रीमध्ये सिनेतारक-तारका किंवा पडद्यामागच्या हातांनी आत्महत्येचं पाऊल उचललं नव्हतं असं नाही. जसं वादळ जिया खानच्या वेळी उठलं, तसंच वादळ प्रत्युषा बॅनर्जीच्या वेळीही आलं, तसं ते कुशल पंजाबीच्या वेळीही आलं. पण, यावेळच्या वादळात या दुनियेतल्याच गावकर्‍यांनी तिचा साज फाडून तिचं दुसरं रूप लोकांसमोर आणायला सुरुवात केली. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडची ही काळी किनार अधिक काळी कुळकुळीत आणि ठळकपणे समोर यायला लागली.

- Advertisement -

खरंतर सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येमागचं वास्तव अजूनही समोर यायचं आहे. पोलिसांचा तपास पूर्ण व्हायचा आहे. खरंच सुशांतवर इंडस्ट्रीचं प्रेशर होतं, की त्याच्या वैयक्तिक आयुष्याच्या तणावातून त्यानं आत्महत्या केली की अगदी टोकाचा तर्क म्हणजे त्याची कुणी हत्या केली आणि ती आत्महत्या भासवली? तर्क-वितर्क असंख्य असू शकतील. ना सुसाईड नोट ना इतर कुठली स्पष्ट कारणं असल्यामुळे पोलिसांनाही अजून या तपासाची नेमकी दिशा समजलेली नाही. पण, या घटनेमुळे बॉलिवुड मात्र वेगळ्याच दिशेने वाहू लागलं आहे. ज्या बॉलिवुडमधून आजपर्यंत चित्रपटांनी कमावलेला गल्ला, उभारलेले मोठमोठाले सेट, शहेनशाह-चॉकलेट बॉय-झिरो फिगर-बोल्ड अ‍ॅण्ड हॉट असल्याच गप्पा ऐकायला मिळायच्या, तिथे आज एक नवीन मी टू सुरू झालं आहे!

पोलिसांचा तपास आणि त्याचा निष्कर्ष येण्याआधीच बॉलिवुडमधल्या सेलिब्रिटी मंडळींनी सो कॉल्ड अर्थात तथाकथित बिग शॉट्सवर निशाणा साधून ही मंडळी कसं इतर छोट्या माशांना खाऊन या समुद्रातली बडी मछली झाली आहेत, यावर सोशल मीडियावर लंब्याचौड्या पोश्टी आणि व्हिडिओबाजी करायला सुरुवात केली. कुणी काही अज्ञात वर्षांपूर्वी त्यांच्या झालेल्या बुलिंगबद्दल बोलायला लागलं, तर कुणी आपल्या संपलेल्या करिअरबद्दल आकांडतांडव करायला लागलं. कुणाला आपल्या वेळेआधीच संपलेल्या करिअरची जाणीव झाली तर कुणाला गायन क्षेत्रात होणार्‍या भावी आत्महत्यांचा आत्ताच साक्षात्कार झाला! थोबाड फुटल्यासारखा गाव जागा झाला आणि आवाजाच्या दिशेनं ओरडत सुटला!

- Advertisement -

अनुराग कश्यप या प्रथितयश बॉलिवुड सेलिब्रिटीचा भाऊ अभिनव कश्यपने त्याचं करिअर सलमान खान अ‍ॅण्ड फॅमिलीने संपवल्याचा दावा केला. अभिनेत्री कंगणा राणावतने पुन्हा एकदा तिच्यावर अन्याय झाल्याचा आरोप केला. अभिनेत्री आयेशा टाकियाने तिला सामना करावा लागलेल्या बुलिंगबाबत तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर भलीमोठाली पोस्ट टाकली. साहिल खान नावाच्या एका अभिनेत्याने आपलं अभिनेता म्हणून करिअर कसं संपवलं गेलं, याबद्दल अचानक भरभरून बोलायला सुरुवात केली. बिग बॉस नावाच्या एका रिअ‍ॅलिटी शोच्या १३ व्या सीजनमध्ये दिसलेला अभिनेता अरहान खान डिप्रेशनमध्ये असल्याचं त्याच्या प्रवक्त्याने जाहीर केलं. गायक सोनू निगमने तर या सर्वावर कडी करत भविष्यात संगीत विश्वातूनही आत्महत्यांच्या बातम्या तुम्हाला ऐकायला मिळतील, असं जाहीरही करून टाकलं. गाव रांगेत लागला!

गेल्या वर्षी अशीच एक मीटू चळवळीची लाट उठली होती. त्याची सुरुवात जरी परदेशातून झाली असली, तरी बॉलिवुडमध्ये त्याची सुरुवात झाली ती एकेकाळची बॉलिवुड अभिनेत्री आणि सध्या परदेशात वास्तव्यास असलेली तनुश्री दत्ता हिच्यापासून. तिने थेट नाना पाटेकर यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला. प्रकरण प्रचंड गाजलं. त्यामागून अनेक अभिनेत्रींनी असे मीटू हॅशटॅगवर आपले अनुभव सांगितले. त्यातून काहींची हातातली काही कामं, काही शो गेले. पण, याऊपर त्याचं काही झालंय असं अजिबात दिसलं नाही. सर्वात विशेष म्हणजे, ज्या तनुश्री दत्ताच्या आरोपांवरून याला बॉलिवुडमध्ये सुरुवात झाली होती, त्या प्रकरणात अद्याप कळलं नाही की नक्की खरं कोण बोलत होतं? ते वादळ जसं उठलं, तसंच शांतही झालं. इंडस्ट्री पुन्हा सुखेनैव सुरू झाली! त्या त्या कलाकार, गायक, संगीतकार, अभिनेत्यांचं आयुष्य जस्ट फॉर चेंज इतकं हललं आणि पुन्हा स्थिरस्थावर झालं. सध्या बॉलिवुडमध्ये हेच मीटू नव्या प्रकारात अवतरलं आहे. पण, त्याचा परिणाम तोच होईल की अजून काही?

बॉलिवूडमधल्या खूप मोठमोठ्या नावांवर सध्या आरोप होत आहेत. या नावांची जी काही लार्जर दॅन लाईफ प्रतिमा लोकांच्या, त्यांच्या चाहत्यांच्या, बॉलिवुडमधल्या सहकलाकारांच्या किंवा इतर मंडळींच्या मनात होती, त्या प्रतिमेला आता मोठमोठाले तडे जाऊ लागले आहेत. या आरोपांमधून बॉलिवुड नावाच्या या चंदेरी गावाची अजून एक काळी बाजू समोर येऊ लागली आहे. सुशांत सिंह राजपूतच्या प्रकरणात नक्की काय झालंय, हे बाहेर येईल तेव्हा येईल, किंवा कदाचित ते कधीच येणार देखील नाही. पण, त्याच्या मागून बॉलिवुडचा हा अंधारातला चेहरा आता उजेडात येऊ लागला आहे आणि तो चेहरा जर आरोप करणार्‍यांच्या दाव्यांप्रमाणेच भीषण आणि काळाकभिन्न असल्याचं सिद्ध झालं, तर मात्र त्याची मोठी किंमत या नावांना चुकवावी लागेल. पण, आजवरच्या अशा अनेक प्रकरणांमध्ये ती चुकवावी लागणार नाही, याची पुरेपूर काळजी ही मंडळी घेत आलेली आहेत.

खान, भट्ट, कपूर आणि या सर्व बॉलिवुडमधल्या ऐरावती घराण्यांसोबत फिल्म्स करणारा करण जोहर हे सध्या टार्गेटवर आहेत. जणूकाही ही मंडळी बॉलिवुडमधली खरी व्हीलन असल्याचाच भास आता होऊ लागला आहे. जो उठतोय तो या सगळ्यांना टार्गेट करून आपल्यावर कसा अन्याय झाला होता, याचे दाव्यांमागून दावे करतोय. कदाचित येत्या काही काळात या सर्व व्हीलनच्या रांगेत अजून काही नावं समाविष्ट होतील. पण, या सगळ्यांमध्ये एक गोष्ट मात्र कॉमन आहे. यातलं कुणीही ते करत असलेल्या आरोपांच्या पुराव्यादाखल काहीही सादर करत नाहीयेत किंवा करू शकत नाहीयेत. त्यामुळे आता लोकांसमोर प्रश्न पडला आहे की कुठल्या आरोपांवर विश्वास ठेवावा आणि कुठले फक्त आपली भडास काढण्याची संधी म्हणून केलेले काल्पनिक दावे म्हणून सोडून द्यावेत? गावकरी प्रचंड आकांडतांडव करतायत आणि सायबाकडे हा सगळा तमाशा फक्त बघत राहण्याशिवाय कोणताही पर्याय नाही!

Pravin Wadnerehttps://www.mymahanagar.com/author/pravin/
समाजाशी बांधिलकी, बदल घडवण्याची प्रामाणिक इच्छा, त्यासाठी प्रयत्न करण्याची तयारी आणि त्याच तयारीचा एक भाग म्हणून माध्यमांमध्ये प्रवेश. लेखनाची आवड, त्यासाठी वाचनाची निवड. सोबतीला फोटोग्राफीचा छंद, जगण्यासाठी अजून काय पाहिजे?
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -