घरफिचर्सजय-पराजयातला धडा

जय-पराजयातला धडा

Subscribe

कुठलाही सामना वा लढाई होते, त्यात एका बाजूचा विजय आणि दुसऱ्याचा पराजय होण्याला पर्याय नसतो. म्हणूनच येडीयुरप्पांच्या राजीनाम्याने ज्यांचा विजय झालेला आहे, त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा! उलट ज्यांना आपला पराजय झाला असे वाटते, त्यांच्यासाठी काय गमावले यापेक्षा काही मिळवले आहे का, त्याचा शोध घेणे हा धडा असतो. इतक्या घाईगर्दीने काँग्रेसने गौडांच्या पक्षाला पाठींबा देऊन भाजपाचा हिरमोड केला, ही राजकीय बाजीच आहे. पण त्यामुळे त्याच दोन पक्षांना आता सरकार स्थापन करायचे आणि ते सरकार इतक्या विपरित परिस्थितीत चालवणे, हे मोठे आव्हान आहे. त्यातल्या अडचणी शपथविधी उरकला जाण्यापुर्वीच समोर यायला लागल्या आहेत. मंत्रिमंडळात कोणाला घ्यायचे वा कुठल्या पक्षाचे किती मंत्री घ्यायचे? कुठल्या पक्षाला कोणती खाती वा कुठल्या जातीजमातीला उपमुख्यमंत्रिपद द्यावे? असले प्रश्न सध्या काँग्रेस, जनता दलाला सतावत आहेत. यातून भाजपाचीही सुटका नव्हती. पण येडींनी राजीनामा टाकल्यामुळे भाजपाची सध्या अशा समस्येतून सुटका झालेली आहे. ज्यांनी बाजी मारली त्यांना उरलेली कसरत करावी लागणार आहे. थोडक्यात पुढली पाच वर्षे विधानसभेची मुदत असेपर्यंत हे सरकार चालवणे भाग आहे. सर्व सेक्युलर पक्ष मिळून असा देशव्यापी पर्याय मोदींना देऊ शकतात, हेही सिद्ध करण्याचे आव्हान समोर आहे. त्यात कोणा कोणाला आपल्या अहंकाराला मुरड घालावी लागणार, त्याचीही साक्ष मिळणार आहे. पण पराभूत झालेल्या भाजपाच्या हाती काय राहिले व काय साध्य झाले त्याचाही विचार करायला हरकत नाही ना? की त्याचा विचारच करायचा नाही? उकिरड्यातही काही उपयुक्त वस्तू लोक शोधत असतील, तर पराभवातही काही उपयुक्त असू शकते ना? हे सरकार पडण्यापासून वाचवणे ही दोन पक्षांची कसरत असताना, ते पाडण्याचा मनोरंजक खेळ भाजपासाठी उपलब्ध आहे ना?

आता वास्तविकता बघू. एकूण २२४ जागांपैकी २२२ जागांसाठी मतदान झाले. त्यामुळे आजच्या विधानसभेत दोन जागा मोकळ्या असून कुमारस्वामी दोन जागी जिंकल्याने त्यांना एक जागा सोडावी लागणार आहे. म्हणजे एकूण तीन जागा विधानसभेत अजून निवडून यायच्या आहेत. त्या तिन्ही जागा भाजपाने जीव ओतून काबीज करायचा चमत्कार घडवला, तर विधानसभेतील संख्याबळ बदलू शकते. ११७ विरुद्ध १०७ असे समीकरण होऊन जाते. त्यात दोन अपक्ष बाजूला काढले वा त्यांची मतं फिरली, तरी ११५ विरुद्ध १०९ असे संख्याबळ होते. म्हणजे आगामी काळात कुमारस्वामी यांना आपल्या ११७ संख्याबळाला कायम जपत राहिले पाहिजे. त्यातला कोणी नाराज होऊ नये आणि त्याने आक्रस्ताळेपणा करून काठावरच्या बहुमताची नौका बुडवू नये; अशा दडपणाखाली मुख्यमंत्री कायम असतील. हेच यापूर्वी दहा वर्षे आधी झालेले होते. काठावरचे बहुमत मिळवून भाजपाने सत्ता स्थापन केल्यावर येडीयुरप्पा सुखनैव कारभार करू शकलेले नव्हते. वेळोवेळी त्यांच्याच पक्षातले काही आमदार मस्ती करायचे आणि मुख्यमंत्र्यांची तारांबळ उडून जायची. श्रीरामलू व रेड्डीबंधूंनी हा खेळ केला होता. दोन-चार आमदारांच्या बळावर मुख्यमंत्र्यांना ओलीस ठेवलेले होते. दोनदा मुख्यमंत्री बदलावे लागलेले होते. तेव्हाचे भाजपाचे एकपक्षीय संख्याबळ बहुमताचा आकडा पार करणारे असले, तरी आजच्या कुमारस्वामी यांच्यासारखेच काठावरचे होते. अशा सरकारला एकाच सत्ताधारी पक्षातले मूठभर आमदार ओलीस ठेवू शकत असतील, तर दोन पक्षांचे कडबोळे चालवणाऱ्या मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची कसरत किती अवघड असेल? आताच मंत्रिमंडळात कोणाला घ्यायचे यातून हाणामाऱ्या सुरू झालेल्या आहेत. पुढला तमाशा किती रंगतदार असेल? तो तमाशा जितका विकृत व अधाशीपणाचा असेल, तितका लोकसभेच्या आघाडीचा फटका मोठा असेल ना?

- Advertisement -

निकाल पूर्ण व्हायच्या आधीच कुमारस्वामींना एकतर्फी पाठींबा देणाऱ्या काँग्रेसने येडींचा राजीनामा झाल्यावर आपले दात दाखवायला आरंभ केलेला आहे. कुमारस्वामी यांना जनपथावर मांडलिकत्व पत्करण्यासाठी जावे लागलेच. पण उपमुख्यमंत्री व महत्वाच्या खात्यांपासून अधिक मंत्रिपदांची मागणी पुढे आली. त्यात गैर काहीच नाही. जो पक्ष मोठा असेल, त्याला सत्तेत अधिक हिस्सा मिळालाच पाहिजे. पण त्याची जाहिर चर्चा होताच उपमुख्यमंत्री लिंगायत, दलित की मुस्लीम याच्यावरूनही भांडणे रंगलेली आहेत. ही भांडणे कशाही मार्गाने तात्पुरती मिटवली जातील. पण कायमची संपतील, असे मानायचे कारण नाही. आज गप्प बसणारे काही काळ आपल्या गोष्टी मान्य होतील म्हणून प्रतिक्षा करतात आणि नसेल तर सत्तेचे तारूही बुडवित असतात. अशा सत्तेसाठी वा सत्तापदांसाठी आसुसलेल्यांना चार तुकडे फेकण्यानेही सरकार जमीनदोस्त होऊ शकत असते. गौडापुत्राच्या सत्तालालसेने सेक्युलर युती बारा वर्षांपूर्वी त्याच कर्नाटकात बुडवली होती ना? वीस महिन्यांचे मुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी हेच कुमारस्वामी काँग्रेसला लाथ मारून भाजपाच्या गोटात सगळे आमदार घेऊन आलेले होते. मग तशीच अन्य कोणाची सत्तालालसा प्रज्वलित होण्याची भाजपाने वाट बघायची आहे. त्यामुळे कर्नाटकची सत्ता मिळण्याला महत्व नाही. त्यापेक्षा लोकसभेत होऊ घातलेली पुरोगामी आघाडी जमीनदोस्त होण्याचा डाव खेळला जाऊ शकतो. हे सेक्युलर नाटक फक्त सत्ता बळकावण्यासाठी आहे आणि सत्तेचा तुकडा फेकला, तर कुठलाही पक्ष विचारांना लाथ मारून जातीयवादाचा मित्र होऊ शकतो. याचा त्यामुळे लोकसभेपूर्वीच मोठा साक्षात्कार घडवला जाऊ शकतो. त्याने फक्त कर्नाटकी राजकारण नव्हे तर देशव्यापी पुरोगामी नाटकाचा पर्दाफाश केला जाऊ शकतो. म्हणूनच कर्नाटकातील हे संयुक्त सरकार, ही भाजपासाठी लोकसभेच्या युद्धातील सर्वात मोठी संधी आहे.

येडींचा राजीनामा येऊन चार दिवस लोटलेले नाहीत आणि उपमुख्यमंत्रिपद आपल्याच जाती वा धर्माला मिळाले पाहिजे, म्हणून चाललेली रस्सीखेच कशाची लक्षणे आहेत? कुठलीही किंमत मोजून भाजपा वा मोदींना पराभूत करण्याच्या निर्धाराचे तर ते नक्कीच लक्षण नाही. २००४ सालात हेच दोन पक्ष संयुक्त सरकार बनवायला एकत्र आले, तेव्हा त्यातली सत्तालालसा दोन पक्षांच्या नेत्यांपुरती मर्यादित होती. आता तिच सत्तालोलुपता नेत्यांच्या जातीपर्यंत जाऊन पोहोचली आहे. लिंगायत मुस्लीम यांची मते मिळवण्याच्या नादात काँग्रेसने आपल्या पक्षाची सूत्रे त्या जातीधर्माच्या हाती सोपवली आहेत. येडींना राजीनामा देऊन बाजूला व्हायची परिस्थितीच आली नसती, तर हे वादविवाद झाकले गेले असते. वर्षभरात विसरलेही गेले असते. पण विनाविलंब सत्तेच्या जवळ आल्यावर प्रत्येक जाती धर्माला सत्तेतला आपला मोठा वाटा तात्काळ हवा आहे. शपथविधी होईपर्यंतही थांबायची कोणाची तयारी नाही. या पुरोगामित्वाचे इतके जगजाहीर वस्त्रहरण भाजपाला भाषणातून वा प्रचारातून नक्कीच करता आले नसते. सत्तेची शक्यता दिसताच पुरोगामी पक्ष व नेते ज्याप्रकारचा कॅबरे डान्स करू लागले आहेत, तो मतदाराला खुश करणारा असल्याचे ज्यांचे म्हणणे असेल त्यांना म्हणूनच शुभेच्छा. कारण त्यांच्या अशा वागण्याचा लाभच मोदींनी सतत मिळवला आहे. येडीयुरप्पांचे सरकार कसरती करून टिकले असते, तर पुरोगामित्वाचे इतके वस्त्रहरण होऊ शकले नसते. मतदाराला अशा मोठ्या प्रमाणात प्रचार भाषणांनी विचलित करणेही शक्य नव्हते. थोडक्यात कुमारस्वामी व काँग्रेस यांची तारांबळ आणि भाजपासाठी नव्या मतदाराची बेगमी, यापेक्षा कुठला मोठा राजकीय लाभ असू शकतो? हिरमुसून बसलेल्या भाजपा समर्थकांना हे बघता येत नसेल, तर त्यांचा पक्षाला उपयोग नसतो. त्यापेक्षा असे पुरोगामीच कामाचे असतात. मोदींना भाजपाने नव्हेतर अशाच पुरोगाम्यांनी महान करून ठेवले ना?

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -