अण्णा बसले गाजराच्या मळ्यात!

Mumbai
Anna Hazare
अण्णा हजारे पंतप्रधानांना पत्र लिहिणार

काँग्रेसच्या भ्रष्टाचारी सरकारला ‘चले जाव’ आणि भाजपच्या मोदी सरकारला ‘चले आव…’ म्हणत हे उपोषण पार पडले. त्यानंतर अण्णा शांत होते. गेल्यावर्षी त्यांनी लोकपाल आणि लोकायुक्त कायद्यासाठी उपोषण करून हातपाय मारले खरे, पण ते चार वर्षे मोदी सरकारच्या काळात कसे छान चालले आहे, असे समजून ‘गाजराच्या मळ्यात’ बसले होते आणि फडणवीस सरकारही अतिशय छान काम करत आहे, असा समज करून घेत होते. ते मळ्यातून उठून उपोषणाला बसले आणि आता फडणवीस यांनीच आश्वासन दिल्याने पुन्हा एकदा जाऊन गाजराच्या मळ्यात बसले आहेत… किती छान!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मागण्या लेखी आश्वासन देऊन पूर्ण केल्यामुळे मी उपोषण सोडत आहे… असे जाहीर करत अण्णा हजारे यांनी सातव्या दिवशी उपोषण सोडले आणि रसाचा प्याला तोंडाला लावला… अख्या महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी आले! राळेगणसिद्धीवासीय ढसाढसा रडले…एकच गजर झाला! अण्णांचा विजय असो. वाजवा टाळ्या!

फ्रंट पेजवर बातम्या झळकल्या. सर्व कसे छान छान झाले… आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे! जणू रामराज्य आता या कलियुगात अवतरणार, असे झाले.

ज्यांनी कोणी महात्मा गांधी बघितले नाहीत, त्यांना याची डोळा याची देही गांधी समोर असल्याचा भास झाला… गांधी मरत का नाही, हे या निमित्ताने का होईना, पुन्हा एकदा सिद्ध झाले… हिंदू महासभेच्या कोणी बिनडोक अशोक आणि पूजा पांडेय यांनी गांधीजींच्या पुतळ्याला गोळ्या मारल्या म्हणून गांधी काही मरत नाही… जेथे अहिंसा आहे, जेथे मानवता आहे तेथे गांधी आहेत… उपोषणाचा मार्गही अहिंसेच्या दारातून जातो. उपोषणाच्या सातव्या दिवशी गांधी राळेगण सिद्धीला होते. आपले अस्त्र बोथट होण्याचा ते ‘सत्याचा प्रयोग’ पाहत होते.

या निमित्ताने २०१४ चे रामलीला मैदानावरचे अण्णांचे उपोषण आठवले. काँग्रेसच्या भ्रष्टाचारी सरकारला ‘चले जाव’ आणि भाजपच्या मोदी सरकारला ‘चले आव…’ म्हणत हे उपोषण पार पडले. त्यानंतर अण्णा शांत होते. गेल्यावर्षी त्यांनी लोकपाल आणि लोकायुक्त कायद्यासाठी उपोषण करून हातपाय मारले खरे, पण ते चार वर्षे मोदी सरकारच्या काळात कसे छान चालले आहे, असे समजून ‘गाजराच्या मळ्यात’ बसले होते आणि फडणवीस सरकारही अतिशय छान काम करत आहे, असा समज करून घेत होते. ते मळ्यातून उठून उपोषणाला बसले आणि आता फडणवीस यांनीच आश्वासन दिल्याने पुन्हा एकदा जाऊन गाजराच्या मळ्यात बसले आहेत… किती छान! देवेंद्र फडणवीस यांना मी चांगले समजत होतो, पण तेसुद्धा इतरांसारखे खोटे निघाले. माझा त्यांच्यावरचा विश्वास उडाला, असे सांगत चारित्र्य प्रमाणपत्रे वाटणार्‍या अण्णांना उपोषणाच्या सातव्या दिवशी सहा तासांच्या चर्चेत फडणवीस हे अचानक चांगले कसे काय भासले? आणि त्यांची आश्वासने कशी काय खरी भासली… डोके गरगर फिरले आणि पुन्हा जाग्यावर आले. गाजर हलवा कामाला आला आणि अण्णा पुन्हा गाजराच्या मळ्यात जाऊन बसले.

मळ्यात गेलेले अण्णा आठव्या दिवशी जरा उभे राहिले आणि म्हणाले, खबरदार मला गाजराचा हलवा द्याल तर, याद राखा. मी देशभर फिरून मोदी आणि फडणवीस किती खोटारडे आहेत, हे भारताला ओरडून सांगेन… पुन्हा उपोषणाला बसेन आणि असे धीम्या आवाजात सांगत (उपोषणाने वजन कमी झाल्याने त्यांचा आवाज क्षीण झाला होता) अण्णा पुन्हा एकदा जाऊन गाजराच्या मळ्यात बसले… विलासराव देशमुख, गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस असे अण्णांना गाजराच्या मळ्यात नेऊन बसवण्याचे एक चक्र पूर्ण झाले.

हे चक्र पूर्ण होत असताना गाजलेला ‘सिंहासन’ चित्रपट समोर आला. अण्णांचे उपोषण संपताच सोशल मीडियावर या चित्रपटातील काही भाग फिरला… सीमाप्रश्न सोडवण्यासाठी सुप्रसिद्ध समाजसेवक तात्या उपोषणाला बसले आहेत आणि तेसुद्धा थेट मुख्यमंत्री अरुण सरनाईक यांच्या बंगल्यासमोर. या उपोषणाने सरकारच्या प्रतिमेला छेद जातोय, असे दिसताच सरनाईक तात्यांचे उपोषण ज्या काही राजकीय सराईतपणे बगलेत मारतात तो प्रसंग आताच्या अण्णांच्या उपोषणाला चपखल शोभणारा आहे.

चित्रपटातील प्रसंग : मुख्यमंत्री तात्यांच्या उपोषणाच्या ठिकाणी येतात. तात्या आत्ममग्न. कार्यकर्ता त्यांना जागे करतो. तात्या, अहो, मुख्यमंत्री आलेत. कोण मुख्यमंत्री, असे विचारत तात्या डोळे उघडतात. मुख्यमंत्री : आपले चालू द्या. आपल्यासारख्या देवमाणसाचे दर्शन झाले, धन्य झालो. तात्या : आधी सीमाप्रश्न सोडवा. मुख्यमंत्री : आपले प्राण पणाला लावल्यामुळे हा प्रश्नही सुटेल. तात्या : सीमा प्रश्न सोडवा. मुख्यमंत्री : माझ्यासारख्या गरीबाच्या झोपडीसमोर तुमच्यासारखे महाराष्ट्राचे भीष्माचार्य उन्हातान्हात बसतात. हे बरोबर नाही. तुम्ही समोर माझ्या घरी चला. तेथे उपोषण करा. पण, असे बाहेर बसू नका. तात्या : आधी सीमाप्रश्न सोडवा. मुख्यमंत्री : आता मी पण गादीवर झोपणार नाही. पुढे सरनाईक तात्यांच्या पाया पडत म्हणतात : आता मी जमिनीवर झोपेन, एक वेळ जेवेन. आपल्या जीवाला आराम पडो, अशी देवाजवळ प्रार्थना करेन. असे बोलून मुख्यमंत्री डोळ्यात पाणी आणतात. अश्रू पुसतात. तात्या : अहो हे काय करताय. आता तुम्ही म्हणत असाल तर मी येतो आपल्या बंगल्यावर. पण, उपोषण सोडणार नाही. प्राणांतिक उपोषण. सीमाप्रश्न सुटलाच पाहिजे. मुख्यमंत्री : चालेल. अरे, उचला रे सामान. चला तात्या. सांभाळून हा…
आणि लगेच दुसरा प्रसंग. वर्तमानपत्राची कचेरी. मधुकर तोरडमल संपादक आणि समोर वार्ताहर निळू फुले. संपादक : मारला की नाही तुमच्या भीष्माचार्याला बगलेत. आणि ते मुख्यमंत्री तात्यांच्या पाया पडत असतानाचा फोटो आपल्या वार्ताहराला दाखवतात.

वार्ताहर (हसत हसत) : खरे सांगू, हे परमेश्वरालाही खिशात टाकतील. टाका, टाका फ्रंट पेजवर बातमी टाका…
अरुण साधू यांच्या ‘सिंहासन’ या कादंबरीवर आधारित आणि जब्बार पटेल दिग्दर्शित ‘सिंहासन’ हा सिनेमा कालच्या आणि आजच्या राजकारणावर अचूक बोट ठेवणारा आहे. तेच तात्या आणि हेच अण्णा. संदर्भ बदलले, पण उपोषण,आंदोलने काखेत मारण्याचा प्रयोग आजही सुरू आहे.

अण्णांचे उपोषण, त्यांच्या मागण्या, त्याचा गवगवा आणि नंतर राज्यकर्त्यांची एन्ट्री आता नवीन राहिलेली नाही. २०१४ चे उपोषण आणि २०१९ चा अन्नत्याग यातला फरक आता स्पष्टपणे पुढे आला आहे. एक राळेगणसिद्धी सोडली तर या उपोषणाने फार काही वादळ उठलेले दिसले नाही आणि त्यांच्या गावातही हवा जोरात वाहिली तरी ती सहज शांत झाली आणि अण्णा गाजराच्या शेतात जाऊन बसले, हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले. या निमित्ताने सोशल मीडियावरची अशोक अरुणराव पवार यांची एक फेसबूक पोस्ट डोके गरगर फिरवणारी आहे.

मिलिटरीतील सेवा पूर्ण करून अण्णा राळेगणसिद्धीला आले. पेंशन आणि थोडीबहुत शेती करू लागले. अंबेजोगाई येथील डॉ. द्वारकादास लोहिया यांच्या मानवलोक या संस्थेचे ग्रामीण विकासाचे काम पाहून ते प्रभावित झाले आणि राळेगणचा कायापालट करण्यासाठी प्रेरित झाले. मुळात मिलिटरीत ड्रायव्हर असलेले अण्णा यांचा वैचारिक पाया कच्चाच. अगोदर त्यांचे भाषण हे ज्ञानोबा तुकोबांच्या ओव्या आणि अभंगांच्या पलीकडे जायचे नाही. डॉ.बाबा आढाव यांनी अण्णा, पन्नालाल सुराणा (भाऊ) ग.प्र.प्रधान मास्तर आणि भाई वैद्य या दिग्गज समाजवादी लोकांसोबत एक बैठक टिम्बर मार्केट, पुणे येथे ठेवली. त्यात अण्णांच्या नेतृत्वाखाली व्यापक भ्रष्टाचारविरोधी मोहीम आणि ग्रामीण भागाकरिता पाणलोट क्षेत्र विकास योजना हाती घ्यायचा कार्यक्रम आखला. या बैठकीस सदर पोस्टकर्ता उपस्थित होता आणि तो त्याकाळी राष्ट्र सेवादलाचा पूर्णवेळ कार्यकर्ता होता. अण्णांच्या भाषणात गांधीजी, साधनसुचिता आणि गांधीजींना अपेक्षित ग्रामीण विकास यायला लागला. त्याचे श्रेय ग.प्र.प्रधान मास्तरांनी लिहून दिलेल्या आणि अण्णांना झेपेल अशा भाषेला आहे.

सदर बैठकीत डॉ.बाबा आढाव मला म्हणाले “पंटर गप्प का बसलास, तुला राळेगणला जायचंय. काहीतरी बोल?” यावर मी म्हणालो, जेवढं आयुष्य तुम्ही सामाजिक कार्यात घालवलंत तेवढं अण्णांचं वय नाही. आपण नाय जात राळेगणला. त्यावेळी पन्नालाल भाऊंनी असू, दुधी रुईघाट पिंपरी, ता.परांडा येथे पाणलोट क्षेत्र विकास आणि वृक्षपट्टा योजना हाती घेतली होती आणि मी ती कामं बघत होतो. मी चिडलो म्हणून प्रधान मास्तर म्हणाले “अशोक,आपण व्ही.पी.सिंग यांचे नेतृत्व मान्य केलं की नाही. हेही तसेच”. मी म्हटलं, मास्तर व्ही.पी. अंजीर आणि हे उंबर आहे. प्रधान मास्तर यांचा निरागसपणा आणि पन्नालाल भाऊंचा माझ्यावर असलेला विश्वास यामुळे मी राळेगणला मुक्काम हलवला. पहिल्याच दिवशी दणका बसला, राळेगणला गायछाप मिळत नव्हती.

मी बापूसाहेब काळदातेना फोन लावून या गंभीर प्रश्नाला वाचा फोडली. बापूंनी इच्छा तिथे मार्ग, असं म्हणून फोन ठेवला.भाजीपाला आणि किराणा आणायला एक गाडी शिरूरला जायची, त्या गाडीचा ताबा घेऊन गायछाप आणि इतर गोष्टींचा पक्का बंदोबस्त केला. मी गेलो तेव्हा अण्णांच्या आई होत्या.एक शेळी घेऊन बिचारी फिरायची.अण्णांबद्दल अनेक प्रश्न मी त्यांना विचारीत असे. पण सगळ्या प्रश्नांना “येडय ते” असे ठरलेले उत्तर मिळायचे. अण्णांना पद्म पुरस्कार जाहीर झाला आणि राळेगण ब श्रेणीचे तीर्थक्षेत्र झाले, साला रोजच जत्रा. इथेच संघ आणि भाजप घुसले आणि पद्म पुरस्कार घ्यायला दिल्ली पाहून आलेले अण्णा चेकाळले. त्यांना “राष्ट्रीय संत” होण्याचा हव्यास लागला. डॉ.वीणाताई सुराणा यांनी मात्र अण्णांना “तुम्ही लग्न न करून मूर्खपणा केलाय हे तोंडावर म्हणाल्याचे मी या कानांनी ऐकले आहे. सबब मोठ्या पावसात वहात निघालेला एक ओंडका धक्के खात खात “आधुनिक गांधी” व्हायचा असफल प्रयत्न अजूनही चालूच आहे. बाकी २०१४ चे रामलीलाचे कळाखाऊ उपोषण आणि त्यापुढील प्रवास तुमच्यापुढे आहेच.

ही पोस्ट खूप काही सांगून जाणारी आहे… आणखी काही सांगण्याची गरज नाही. आणि म्हणूनच एका कवितेने या लेखाचा शेवट करूया. पत्रकार प्रमोद चुंचूवार यांची अण्णा हजारे यांच्या ताज्या उपोषण नाट्यावरील ही कविता आहे….

चिंतातूर गाली बाई खुलली कमळे
रस प्यायलो जेव्हा कुस्करून गाजरे
जागतो मैत्रीला मी कमळाबाईच्या
उपोषणवीर मीच तो अण्णा हजारे

कंटाळतो कोपर्‍यात पडून
कॅमेरे अन मीडिया न फिरकता
हुक्की येते मज अधूनमधून
राळेगणी मग राळ देतो उडवून
झळकती सर्वत्र मग माझेच चेहरे

लोकपाल कोण तो स्वामिनाथन
निमित्त पुरे करण्या मज उपोषण
माझा न अभ्यास, न माझे चिंतन
प्रसिद्धी लाभे, घटते माझे वजन
टायमिंग अचूक मजला साधे रे

राज बोलले कानात
गंगाप्रसाद होईल तुमचा
त्या निलाजर्‍या मित्रांसाठी
का फुकटचा जीव देता
दीनदयाळ स्मरताच भरले कापरे

सीएम उपाशी बातमी वाचता
त्या इशार्‍याची खात्री ही पटली
सत्ताधीशाच्या चिंतेत आमची
मित्र माध्यमे किती हो खंगली
फार्स झाला बहु, तंबू-गबाळे आवरे

लांडगा आला रे आला म्हणुनी
उडो भले खिल्ली उपोषणाची
इशारे पोकळ, हवेत विरती
बोळवणीस पुरे,समिती नियुक्ती
दोस्ती तुटायची नाय, प्रभाव जरी ओसरे