अर्णव आणि कंगना हा देश चालवत आहेत का?

Kangana was born to play Rani Laxmi Bai, says Manoj Kumar

गेले काही दिवस हा देश फक्त दोन माणसे अर्णब गोस्वामी आणि कंगना रनौत चालवत आहेत, हे चित्र जगातील मोठी लोकशाही म्हणून अभिमानाने मिरवणार्‍या भारतासाठी निश्चितच चांगली गोष्ट नाही. कोरोनाचा विळखा तसेच खिळखिळी झालेली अर्थव्यव्यस्था यावर प्रभावी उपाययोजना शोधून काढण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारच्या मदतीने पुढाकार घेण्याची गरज होती. मात्र, अर्णव, कंगना ही दोन माणसे महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबई आणि पोलीस यंत्रणा यांच्यावर चिखलफेक करत असताना केंद्र सरकार शांत बसून मजा बघत आहे. एकप्रकारे या दोन माणसांना भाजप सरकारचा पाठिंबा असल्याचे सर्वसामान्य लोकांना वाटणे यातच एक प्रकारे लोकशाहीची मोठी थट्टा सुरू असल्याचे सरळ सरळ दिसून येते. विशेष म्हणजे देशाची रसातळाला गेलेली अर्थव्यवस्था यावर अर्णव आणि कंगनाने दोन प्रश्न उपस्थित केले असते तर आपण समजू शकलो असतो; पण यावर मिठाची गुळणी घेऊन अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणावर हे दोघेजण रान उठवतात.

मुख्य म्हणजे अर्णवची या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी नावाने उल्लेख केला जातो, हा प्रकार अतिशय भयंकर आहे. मुख्यमंत्री पदाला देशाच्या संविधानाच्या दृष्टीने मोठी किंमत असताना अर्णबचा पत्रकारितेच्या नावाखाली जो काही धिंगाणा सुरू आहे तो एक प्रकारे स्वतःचे न्यायालय चालवण्यासारखे आहे. हाच माणूस लोकांना आरोपी ठरवणार आणि शिक्षा ठोठावणार! आणि ते सुद्धा इतक्या प्रचंड मोठ्याने आरडाओरडा करत. उभा राहून, हातवारे करत, जोरजोराने रेकणारा अर्णवला बघून आता लोकांनी त्याचा रिपब्लिक टीव्ही बघायचा सोडून दिला आहे. कोणाची तरी सुपारी घेऊन हा माणूस राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर चिखलफेक करत असेल तर पत्रकार आणि समाज माध्यम यावरचा लोकांचा उरलासुरला विश्वास संपल्यात जमा झालाय, असे म्हणावे लागेल. आपल्या कार्यक्रमात लोकांना बोलावून जे आपल्या बाजूने बोलतील त्यांना पाठीशी घालून आणि ना बोलणार्‍यांचा अपमान करून आपलाच मुद्दा रेटण्याचा प्रकार अर्णव गेले अनेक वर्षे करत आला आहे. त्याच्या आक्रमकपणाने अतिरेकी टोक गाठल्याने त्याचा शो ही चर्चा राहिली नाही तर त्याचा तमाशा झाला.

या तमाशाचा राजा, प्रधान आणि सेनापती अर्णवअसल्याने तो सांगेल ती दिशा आणि ठरवेल तो आरोपी असा लयाला गेलेल्या पत्रकारितेचा हा प्रकार झाला. सुशांत प्रकरणात हाताशी ठोस पुरावे नसताना या माणसाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे थोरले चिरंजीव आणि राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना आरोपीच्या जाळ्यात उभे करणे म्हणजे हाच माणूस पोलीस आणि न्यायालय झाल्यासारखे आहे. उद्धव ठाकरे सरकारऐवजी देवेंद्र फडणवीस सरकार असते तर या माणसाने असे आरोप केले असते का हा लाखमोलाचा सवाल आहे. कारण तसे करण्याची हिंमत जरी केली असती तर मोदी सरकारने कधीच अर्णवची चारी बाजूने कोंडी केली असती, जशी मोदी सरकारच्या कारभाराविरोधात बोलणार्‍या, लिहिणार्‍या पत्रकारांची केली जाते तशी. आज या देशात मोदी सरकारने उजवे आणि डावे, आपले आणि त्यांचे अशी सरळ दोन गटांत पत्रकारितेची विभागणी केली असून आपल्या बाजूने बोलणारे पत्रकार हे देशभक्त ठरवले जात असून उरलेले देशद्रोही. संविधानाने लोकशाहीचा चौथा खांब म्हणून पत्रकारितेला मान दिला असेल तर ती या व्यवस्थेला प्रश्न विचारू शकत नाही, मग आपल्या लोकशाही आणि हुकूमशाहीत फरक तो काय? पण, देशाचा अर्थव्यवस्थेची अतिशय चिंताजनक परिस्थिती असताना त्याविषयी पत्रकारांनी प्रश्न विचारायचे नाहीत. फक्त विचारायचे सुशांतचे काय झाले? लोकांच्या जीवन मरणाच्या प्रश्नांची उत्तरे द्यायची नसतात, कोसळणारी अर्थव्यवस्था सावरण्यासाठी मोदी सरकार काय उपाययोजना करत आहेत, याचे स्पष्टीकरण द्यायचे नसते तेव्हा केंद्र सरकारला पडद्यामागून सुशांत प्रकरणाला हवा द्यायची असते आणि मग त्यांना थयथयाट करण्यासाठी अर्णव हवा असतो. आता एवढे करून भागत नाही म्हटल्यावर सीबीआय, ईडीसारखी शस्त्रे बाहेर काढून विरोधकांना घायाळ करता येते. सुशांत प्रकरणात मुंबई पोलिसांना बाजूला सारून सीबीआयच्या हाती तपास सोपवल्यानंतर जे काही चित्र समोर येत आहे ते हे प्रकरण म्हणजे ड्रग्ज आणि आत्महत्या असल्याच्या दिशेने जाणारे आहे. पण, तोपर्यंत हव्या त्या लोकांना बदनाम करण्याचा जो काही हेतू होता तो पूर्णत्वास गेला आहे.

दुसरीकडे ज्या कंगनाला मुंबईने अभिनेत्री म्हणून ओळख दिली, नाव दिले, मान दिला त्याच कर्मभूमीला या नौटंकी बाईने थेट पाकव्याप्त काश्मीर म्हणून नाव ठेवले. आणि वर एक स्त्री म्हणून मुंबई हे शहर सुरक्षित वाटत नाही तेथेच आता ही बाई आता नाव आणि पैसे कमवायला येणार आहे. ती पण, मोदी सरकारच्या कृपेने वाय सुरक्षा घेऊन. या आमच्या माय मुंबईने देशातील अनेकांना जगवले, मोठे केले तिचा असा अपमान आतापर्यंत कोणीच मुंबईचा केला नव्हता. एक तर ज्याच्या मेंदूवरचे नियंत्रण गेले असेल किंवा मेंदू ताब्यात असूनही कोणाच्या तरी तालावर नाचायचे असेल असाच माणूस सुशांत प्रकरणात मुंबईवर टीका करण्याचा नादानपणा करेल. या बाईचा सुरुवातीचा प्रवास संघर्षमय असा होता. तसा मुंबईत आपले आयुष्य घडवण्यासाठी आलेल्या प्रत्येक माणसाला करावा लागतो. तो कोणालाच चुकलेला नाही. पण, चंदेरी पडद्यावर नाव कमावण्यासाठी आपण कुठल्या थराला जायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण, आपल्यावर अन्याय झाला म्हणून सगळे जग चोर आहे, अशी बोंब ठोकणे म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार झाला. कंगनाचा हा आरडाओरडा मुंबईला नवा नाही. सुरुवातीच्या काळातील अपयशानंतर तिच्या वाट्याला आलेल्या सिनेमांचे आपल्या उत्तम अभिनयाने तिने चीज केले. ती ज्या सिनेमा जगताला नाव ठेवते त्या जगतातील भल्या माणसांमुळेच तिला मान-सन्मान मिळाला. राष्ट्रीय पुरस्काराने तिचा सन्मान झाला. पण, आज हे यश तिच्या डोक्यात गेले असून आता ती वाटेल ते बडबडत सुटली आहे. इतकी वर्षे मुंबईत राहताना तिला हे शहर सुरक्षित वाटले आणि आताच ते असुरक्षित कसे काय झाले? आणि सर्वात भयानक म्हणजे तिने सुशांत प्रकरणात मुंबई पोलीस आणि राज्य सरकारला दोषी ठरवत अर्णबसारखाच सूर लावला आहे. तिचाही बोलविता धनी कोणी दुसराच आहे, असा हा सारा संशयास्पद प्रकार आहे.

या सार्‍याचे पडसाद दोन दिवसांच्या पावसाळी विधिमंडळ अधिवेशनावर पडून अर्णब आणि कंगनावर हक्कभंग प्रस्ताव आणण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांचा एकेरी उल्लेख करून अवमान केल्याबद्दल रिपब्लिक टीव्ही या वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्या विरोधात विधानसभेत शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी हक्कभंग दाखल करताना आणि या प्रस्तावाला संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी अनुमोदन देताना मांडलेली भूमिका खूप महत्त्वाची वाटते. ‘सुशांत सिंह प्रकरणाच्या वार्तांकन करताना वाहिन्यांची स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत लोकशाहीची थट्टा करण्याचे काम सुरू आहे. यापूर्वी पत्रकार लोकशाहीची कधीही थट्टा करत नव्हते. मात्र, रिपब्लिक टीव्ही या वृत्तवाहिनीवरील अँकर अर्णब गोस्वामी महाविकास आघाडीतील मंत्र्यांचा जाणूनबुजून एकेरी उल्लेख सुरू केला आहे. या कृतीबद्दल गोस्वामी यांचा निषेध व्यक्त करून त्यांच्यावर हक्कभंग दाखल करण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली. अर्णव गोस्वामी सुपारी घेऊन काम करत असून त्याने फक्त मुख्यमंत्र्यांचाच नाही तर महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेचा अपमान केला आहे, त्यामुळे त्याला शिक्षा दिलीच पाहिजे, असे परब म्हणाले. याचवेळी मुंबईबद्दल केलेल्या विधानाबद्दल कंगना रनौतविरोधात विधान परिषदेत काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला. लोकशाहीचा सन्मान करणे आणि त्याची मूल्ये पाळणे हे प्रत्येक भारतीयाचे काम आहे. या देशापेक्षा कोणीही मोठे नाही आणि हा देश आपण चालवत आहे, अशा भ्रमात तर कोणी राहू नये. त्याच्या भ्रमाचा फुगा फुटल्याशिवाय राहणार नाही.