घरट्रेंडिंगतुम्ही व्हॉट्स अँप वर आहात?

तुम्ही व्हॉट्स अँप वर आहात?

Subscribe

मग तुम्ही आउट डेटेड झाला आहात किंवा होऊ घातला आहात.

कारण सोशल नेटवर्किंग साईट्सवर पडीक असणारी जनता आता व्हॉट्स अँप आणि फेसबुक ओलांडून शेअर चॅट आणि हॅलो या प्लॅटफॉर्म्सवर ये जा करताना दिसते आहे. शेअर चॅट आणि हॅलो ही व्हॉट्स अँप पेक्षा अधिक वेगवान अशी समाज माध्यमं आहेत आणि फक्त भारतीय भाषांमध्ये आहेत. शेअर चॅट आणि हॅलो ही व्हॉट्स अँप आणि फेसबुकचीच नवी कोरी आधुनिक भावंडं आहे असं म्हटलं तरी चालेल. फरीद एहसान (24), अंकुश सचदेव (23), भानू प्रताप सिंग (24) या तीन आयआयटी कानपूरमधून शिक्षण घेतलेल्या तरुणांनी तीनच वर्षांपूर्वी प्रयोग म्हणून शेअर चॅट सुरु केलं. भारतातल्या बहुतेक सगळ्या प्रमुख भाषांमध्ये असणारा हा सोशल मिडिया प्लॅटफॉर्म अतिशय रंजक आणि इंटरेस्टिंग आहे.

- Advertisement -

सुरु केल्याच्या पहिल्या अठरा महिन्यात 25 दशलक्ष ऍक्टिव्ह वापरकर्ते मिळवलेल्या या माध्यमातून 1.5 दशलक्ष हुन अधिक शेअर्स रोजच्या रोज होत होते. मराठीतही हा प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे. 14 ते 22 वयोगटातल्या भारतीय तरुणतरुणींमध्ये हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म प्रचंड प्रसिद्ध आहे. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची गंमत ही आहे कि इथे इंग्रजीला पूर्ण फाटा दिला गेला आहे. सगळं चॅटिंग आणि मेसेजिंगचं शेअरिंग हे भारतीय भाषांमध्ये होतं. म्हणूनही इंग्रजी न वापरणार्‍या भारतातली मोठ्या लोकसंख्येला हे माध्यम जवळचं वाटतं आहे. सेल्फी पासून भन्नाट मराठी मिम पर्यंत अनेक गोष्टींचं इथे तुफान शेअरिंग सुरु असतं.

असाच अजून एक प्लॅटफॉर्म आहे हॅलो . हॅलो हे मुळात चायनीज स्टार्ट अप टौटीओ चा सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म आहे. पण भारतात फक्त भारतीय भाषांमध्ये हा प्लॅटफॉर्म असल्यामुळे प्रचंड प्रसिद्ध झाला आहे. इतका कि येत्या काळात व्हाट्स अँप आणि फेसबुकच्या तोंडाला शेअर चॅटच्या सोबतीने हॅलो फेस आणणार असं या कक्षेत्रातल्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे. भारतात 2018 मध्येच सुरु झालेल्या या अँपचे काही महिन्यातच 1 मिलियनपेक्षा अधिक डाऊनलोड्स आहेत. पस्तीस वर्षीय झान्ग ईमिंग या चिनी तरुणाने टौटीओ ही कंपनी सुरु केली असून म्हणता म्हणता त्याने सोशल मीडियातल्या भल्या भल्या कंपन्यांना सळो की पळो करून सोडलं आहे. त्याच्या वारकर्त्यांचे आकडे ज्या झपाट्याने वाढता आहेत ते बघता व्हॉट्स अँप, फेसबुक, ट्विटर या प्रस्थापितांना त्यांच्या फीचर्स आणि पॉलिसीजचा विचार करावा लागणार आहे हे उघड आहे.

- Advertisement -

शेअर चॅट आणि हॅलो या दोन्ही सोशल मिडिया प्लॅटफॉर्म्सनी सध्या आभासी जगात धुमाकूळ घातला आहे. लोक बिनधास्त अनेक गोष्टी इथे शेअर करत असतात. ऍडल्ट कन्टेन्ट ही मोठ्या प्रमाणावर इथे शेअर होत असतो. वापरकर्त्यांमध्ये हीट असलेल्या या माध्यमांचा फेक न्यूजसाठी मात्र मोठ्याप्रमाणावर वापर होतो आहे असंही आता दिसायला लागलं आहे. फेक बातम्यांची इंडस्ट्री चालवणार्‍या शक्तींसाठी हे दोन्ही प्लॅटफॉर्म म्हणजे खोट्याचा भरणा सहज करण्याचं मोठं माध्यम बनत चाललं आहे जे अतिशय चिंताजनक आहे. राजकीय, ऐतिहासिक, सांस्कृतिक माहितीची तोडफोड करून खोटी माहिती सोशल मिडियावर व्हायरल करण्यासाठी या प्लॅटफॉर्मचा वापर होत असल्याचं आठळून येत आहे. हिंदुस्थान टाइम्सने यासंदर्भात केलेलं सर्वेक्षण नुकतंच प्रसिद्ध झालं आहे. या सर्वेक्षणानुसार 50 दशलक्ष वापरकर्ते शेअर चॅटचे आहेत आणि 5 दशलक्ष वापरकर्ते हॅलो चे आहेत. आणि हे सगळे वापरकर्ते खोट्या माहितीचे बळी ठरण्याची शक्यता असू शकते.

शेअर चॅट वापरणार्‍यांपैकी 10 दशलक्ष पेक्षा अधिक वापरकर्ते हे मध्यम आणि लहान गावातले वापरकर्ते आहेत. हे वापरकर्ते माध्यम साक्षर असण्याची शक्यता कमीच आहे. आपल्या पर्यंत जे काही पोचतं ते खरं असतं हा जो मोठा समज एकूण भारतीय मानसिकतेत जोपासला गेला आहे त्याचा वापर विघातक शक्ती इथे राजरोस करताना दिसतात. अशावेळी त्यांच्यापर्यंत पोचणारी माहिती खरी आहे असा समज होण्याची, त्यावर विश्वास ठेवला जाण्याची शक्यता मोठ्याप्रमाणावर असू शकते. विशेषतः राजकीय संदर्भातली खोटी माहिती, खोट्या बातम्या या प्लॅटफॉर्म्सवरून सर्रास व्हायरल होतात असेही या सर्वेक्षणात दिसून आले आहे.

ज्याप्रमाणे राजकीय तणाव आणि खोट्या बातम्या व्हायरल करण्याचं या माध्यमातलं प्रमाण प्रचंड आहे त्याचप्रमाणे हिंदू मुस्लिम यांच्यात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्नही या माध्यमातून मोठ्याप्रमाणावर होत असल्याचंही या सर्वेक्षणात नमूद करण्यात आलं आहे. शिवाय या प्लॅटफॉर्मवर जाऊन बघितलं कि लक्षात येतं अतिशय भडक पद्धतीने हिंदू आणि मुस्लिमांना एकमेकांविषयी द्वेष निर्माण होईल अशा पद्धतीने खोट्या बातम्या, मेमे, मेसेजस सर्रास व्हायरल होत असतात. आणि याकडे फेस न्यूज बाबत चर्चा करणार्‍या बुद्धीजीवी मंडळींचं कितपत लक्ष आहे कुणास ठाऊक! इथे येणार्‍यांची संख्या रोजच्या रोज वाढते आहे आणि त्यांच्यापर्यंत पोचणार्‍या खोट्या माहितीचं प्रमाणही..व्हाट्स अँप आणि फेसबुकवरच्या खोट्या माहितीच्या व्हायरल पोस्टने काळजी करणार्‍यांनी एकदा या अँपवर जाऊन बघावं.. तिथला फेक न्यूजचा हैदोस बघून तोंडाला फेस आल्याशिवाय राहणार नाही

माहिती बाबत सजगता नसणं, माध्यम साक्षरतेबाबत उदासीन असणं याचे दुष्परिणाम आताही आपण सोसतो आहोतच पण भविष्यात याची दाहकता वाढत जाणार आहे. सोशल मिडिया वापराबाबत जर आपण जनमानसाला साक्षर करू शकलो नाही तर एका मोठ्या संकटात आपण स्वतःलाच ढकलून देणार आहोत. ट्रोलिंगच्या निमित्ताने आभासी जगात होणारी शाब्दिक हिंसा प्रत्यक्षात उतरायला सुरुवात झाली आहे. त्याचं प्रमाण वाढून विकृत आणि विद्रुप होऊ द्यायचं नसेल तर माहितीबाबत वापरकर्त्यांना सजग करावं लागेल, माध्यम साक्षरतेकडे पाठ वाळवून चालणार नाही..

अन्यथा काही करोड वापरकर्ते असलेली ही माध्यमं माणसांचा मनोसामाजिक विध्वंस करण्यास कारणीभूत ठरतील.

मुक्ता चैतन्य,
(लेखिका समाज माध्यमांच्या अभ्यासक आहेत.)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -