गो कल्याणी ऽऽऽऽऽ

कल्याणीचे लग्न का टिकले नाही. माझ्या डोक्याचा भुगा झाला होता, कोणीच काही सांगायला तयार नव्हते. कल्याणीचा आत्मविश्वासाने भरलेला चेहरा खचल्यासारखा झाला होता, त्यात माझे काय चुकले असा भाव होता, खोदून खोदून विचारले तर ती सांगायला तयार नव्हती. शेवटी जे ऐकले ते अंगावर सरकन काटा उभा करणारे होते.

Mumbai
lotus flower
कमळ फुले

कल्याणीचे लग्न का टिकले नाही. माझ्या डोक्याचा भुगा झाला होता, कोणीच काही सांगायला तयार नव्हते. कल्याणीचा आत्मविश्वासाने भरलेला चेहरा खचल्यासारखा झाला होता, त्यात माझे काय चुकले असा भाव होता, खोदून खोदून विचारले तर ती सांगायला तयार नव्हती. शेवटी जे ऐकले ते अंगावर सरकन काटा उभा करणारे होते.ही सत्यकथा आहे.
माझ्या काळजाच्या कोपर्‍यात ती घट्ट रुतून बसलीय… तिचा आवाज घुमला पाहिजे, असे राहून राहून वाटत होते आणि अखेर ती वेळ आली.

मुंबईतून गावात उतरले आणि गावची वेस ओलांडली की एक तळे लागते आणि ते नजरेच्या टप्प्यात आल्यावर माझी नजर भिरभिर फिरायची. त्या नजरेत कोणाचा तरी शोध असायचा आणि नकळत माझ्या तोंडून बाहेर पडायचे, गो कल्याणी ऽऽऽऽऽ पहिल्या आवाजात ओ दिली नाही, तर समजायचे कल्याणी तळ्यात कुठेतरी आत असेल. तिला खूप कमळे काढून बाजारात विकायची असतील आणि त्यावर तिची घरची चूल पेटणार होती. रिक्षातून उतरून मी सामान बिमानाची पर्वा न करता कल्याणीची वाट बघत उभा राहायचो. तिलाही तो आवाज गेलेला असायचा. पण टोपली भरून कमळे काढल्याशिवाय ती बाहेर येणार नव्हती, हे ठाऊक असल्याने वाट बघत बसणे एवढेच हातात असायचे…… आणि ती तळ्याच्या चिखलातून सावकाश पाय टाकत बाहेर यायची. एखादी जलपरी यावी तशी. जणू पाण्याखालून बाहेर आलेली. तशी ती दिसायला चारचौघीसारखी. नाकी डोळी नीटस. एक वेणी आणि स्कर्ट ब्लाऊज. सर्व अंग भिजलेले… पण, अंग चिंब झाल्यापेक्षा खूप कमळे मिळाली म्हणून चेहरा कमालीचा खुललेला. गहूवर्णीय रंग आणि सामान्य ठेवण असूनही मला सर्वात भावायचा तो तिचा चेहर्‍यावरील आत्मविश्वास. ती माझ्यापेक्षा वयाने मोठी आणि मोठेपणाच्या अधिकारातून ती, रे संज्या… सहज बोलून जायची आणि आमचा संवाद मालवणीतून सुरू व्हायचा. तिला चाकरमान्यांच्या शहरी बोलीचा राग यायचा. रे, कसो आसय? आवस बरी आसा? पोटा पाण्याचा बरा चलला मा? तुझा बरा आसा. पगार, पाणी सुरू आसा, बापाशीची खोली असाना काय, डोक्यावर आधार हा. आमचा बघ, रोज दुसर्‍याच्या मेरेर गेल्याशिवाय पॉट काय भराचा नाय आणि ही कमळा आसत… सणासुदिक दोन पैशे गाठीक जमतत. तेवढीच दिवाबत्तीची सोय! ती भरभरून बोलत राहायची आणि मी फक्त तिच्या बोलण्यातील जगण्याची प्रामाणिक धडपड ऐकत बसायचो.

पहाटे उठून कल्याणीचा कमळे काढून सुरू झालेला दिवस दुपारी कधीतरी संपायचा. सकाळी तयारी झाली की बाजाराची एक फेरी ठरलेली असायची. सणासुदीचे दिवस भरकन निघून जात असल्याने नात्यांपेक्षा जगायची धडपड करणार्‍या माणसांना भेटण्यात, त्यांच्याशी दोन शब्द बोलण्यात माझा रस असायचा. बाजारात खूप माणसे भेटायची. तालुक्याचा बाजार असल्याने आजूबाजूच्या गावातील माणसे भेटली की चहा आणि भजी ठरलेली. ती झाली की बाजारातून एक फेरी. त्यावेळी कल्याणी दिसायची. हातात कमळे घेऊन विकत उभी. टोपलीभर कमळे संपल्याशिवाय ती घरी परतणार नाही, हे मला ठाऊक असूनही मी उगाचच…. गो कल्याणी, चाय पिऊक येतय. तिचा फटकळ स्वभाव लगेच उफाळून यायचा. दिसना नाय, माझी कमळा अजून खपाक नाय, तुझी चाय बिय माका नुको.

सणासुदीचे दिवस हा हा म्हणता संपायचे, मात्र कल्याणी तळ्यात कमळे काढत असताना बघत मी मुंबईचा रस्ता धरलेला असायचा…. कल्याणी, मग तळ्यातील पाणी आटले की जत्रेत केळी विक, बाजारात काही किडुक मिडूक विक असे करत आपला संसार चालवायची. खरे तर तिच्या घरातील सर्वच माणसं कष्टाळू… आई काजू सोलायची आणि दोन भाऊ आणि एक बहीण मजुरीची कामे करायची. घरातील प्रत्येक माणूस जगण्याच्या लढाईत सामील झालेला. कल्याणीच्या घरातील कोणीच मुंबईत नसल्याने जगण्याचा एकमेव आधार मजुरी हाच होता.

वर्षे भरभर संपत होती. कल्याणीच्या भावांची, बहिणीचे लग्न झाले. कल्याणीचे वय वाढत चालले होते. मी तिला नेहमी म्हणायचो, गो कल्याणी लाडू कधी? मेल्या लाडवाशिवाय तुका काय दिसना नाय की काय. ती विषय टाळत असायची. आणि एके दिवशी मला समजले. कल्याणीचे लग्न झाले! त्या दिवशी मी आनंदाने उड्या मारायचा बाकी होतो. माझ्यासारखी कल्याणीच्या कष्टाळू जगण्यावर प्रेम करणारी सर्व गावातील आणि मुंबईतील माणसे खूश होती. आता कल्याणी स्कर्ट, ब्लाऊजवरून साडीत आली होती… पण आमचा सगळ्यांचा आनंद काही महिने टिकला. कल्याणी पुन्हा माहेरी आली होती…. आणि पुन्हा साडीचा पदर खोचून तळ्यात कमळे काढत होती.

कल्याणीचे लग्न का टिकले नाही. माझ्या डोक्याचा भुगा झाला होता, कोणीच काही सांगायला तयार नव्हते. कल्याणीचा आत्मविश्वासाने भरलेला चेहरा खचल्यासारखा झाला होता, त्यात माझे काय चुकले असा भाव होता, खोदून खोदून विचारले तर ती सांगायला तयार नव्हती. शेवटी जे ऐकले ते अंगावर सरकन काटा उभा करणारे होते. कल्याणीचा नवरा एका देवळात कर्मचारी होता. त्याची घरची परिस्थिती फार बरी नव्हती. पण तरीही कल्याणी बर्‍याच वर्षांनी लग्न झाल्याने सुखात होती. सुखी संसाराची ती स्वप्न रंगवत होती….आणि तिच्या स्वप्नांचा चुराडा झाला. नवरा तिच्या बाजूला झोपायला तयार नव्हता. त्याला बरे वाटत नसेल म्हणून असे झाले असेल, म्हणून तिने सुरुवातीला दुर्लक्ष केले; पण हे दररोजचे झाले. त्यामुळे तिने नवर्‍याला डॉक्टरकडे जाऊया का, असे विचारले. तर तो आणखी बिथरून म्हणाला, गो, माका डॉक्टरकडे जावचा नाय हा. त्याचा राग थोडा शांत झाल्यावर तिने डॉक्टरांचा विषय काढल्यावर त्याने स्पष्ट सांगितलं. तुका असाच माझ्या वांगडा र्‍हवाचा आसात तर र्‍हव नाय तर तुज्या मायेरचो रस्तो धर.

कल्याणीच्या पायखालची वाळू सरकली… तिला काय करावे कळेना. पण परिस्थितीशी दोन हात कसे करायचे, याची उपजत जाण असल्याने तिने नवर्‍याला विश्वासात घेतले. आओ असा काय करतास… काय होता हा तुमका? पण तो काहीच ऐकायला तयार नव्हता. कल्याणीने माहेरी येऊन ही गोष्ट भावांच्या कानावर घातली. भाऊ कल्याणीला घेऊन तिच्या सासरी आला. नवरा, त्याच्या घरच्यांना समजवले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. कल्याणीच्या तोंडून तिच्या नवर्‍याचे सत्य ऐकायला मिळाले. हे सत्य जमीन हादरवणारे होते. एका रात्री बाजूला झोपायचा विषय निघाला. कल्याणीने विश्वासाने त्याला विचारले, काय झाला हा, असा काय करतास, आपला लग्न झाला हा. आपण घोवा बायलेसारखे कित्याक नाय र्‍हवना …आणि तो म्हणाला, माका ता काय जमाचा नाय. माका ता आवडना नाय. मी आपलो ऐकटो आसय तो बरा आसा. त्याच्या घरच्यानाही या गोष्टीची कल्पना नव्हती… आई-वडील सांगतात आणि समाज काय म्हणेल यासाठी त्याने लग्न केलं होतं. कल्याणीप्रमाणे त्याच्या आईवडिलांना धक्का बसला होता.

या घटनेनंतर कल्याणी बॅग भरून माहेरी आली ती कायमचीच. पण ती खमकी होती, आयुष्य असे रडत काढणारी नव्हती. पुन्हा साडीचा पदर खोचून ती जगण्याच्या लढाईत उतरलीय. आता ती कमळे काढत नाही. बाजारात तिने स्वतःचे फुलांचे दुकान घातले आहे आणि दोन मुले कामाला ठेवलीत…. आणि मी आता, गो कल्याणी… म्हणत बाजारात हाक मारली की तीच मला बोलावून चहा पाजते. बस रे संज्या…असा वरचा सूर लावून !

 


-संजय परब