घरफिचर्सकाश्मीर के दामाद

काश्मीर के दामाद

Subscribe

एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर माझ्या मित्राने कमेंट केली- ‘काश्मिरी मुली सुंदर आहेत तसंच काश्मिरी तरुणही सुंदर आहेत. आपल्या बहिणी, देखण्या मैत्रिणी काश्मीरच्या सुना होतील. किती छान !’ त्याच्या या कमेंटनंतर एकदम ग्रुपवर सन्नाटा छा गया. म्हटलं इतना सन्नाटा क्यूँ है भाई? तर काश्मीरचे भावी जावई म्हणाले, ‘लेका जोक करत होतो, एवढा का सिरियस झालास?’ ज्या काश्मिरी मुलींचे फोटो पोस्ट करुन कमेंट्स सुरू होत्या त्यावर मित्र म्हणाला, हेच जर तुझ्या बहिणीचे, गर्लफ्रेंडचे फोटो असते तर ?

ज्युनियर कॉलेजला असताना अगदी पहिल्या आठवड्यातच एक अतिशय देखणी मुलगी माझ्या वर्गातच दिसली. माझ्या बेंचपासून अगदी जवळच बसणारी ही कन्या पाहून माझ्यासाठी वर्गाचं होकायंत्र बदललं. मान वळवून पाहणं माझ्या शेजारच्या मित्राच्या लक्षात आलं. एके दिवशी न राहवून तो म्हणाला, ‘ भाई, वो अपुनकी आयटम है.’ आपण जणू पाहतच नव्हतो तिच्याकडे आणि आयटम म्हणजे काय, वगैरे न कळणारे सात्विक भाव माझ्या चेह-यावर आणण्याचा मी प्रयत्न केला. ‘आपुनकी आयटम’ या संज्ञेचा अर्थ- ती माझी आहे म्हणजे कबीरसिंगच्या भाषेत ‘अपनीवाली बंदी’ है आणि तू तिच्याकडं बघायचं धाडस तरी कसं काय करतोस, असा सखोल अर्थ यात दडला होता. ‘आयटम’, ‘सामान’, ‘माल’ अशा अनेक उपमा ऐकत माझा शब्दकोश समृद्ध झाला. शिवाय मुलींच्या शरीराकडे पाहून त्यांना मोबाइल कंपन्यांच्या हॅण्डसेटच्या लहानमोठ्या मॉडेल्सच्या उपमांचा वापर होत असल्याचं हळूहळू लक्षात आलं. ही मुलगी आहे की वस्तू आहे, असा प्रश्न लगेच त्या क्षणी पडला नाही, पण नंतर आपण तर पोरींना वस्तू असल्यासारखं बोलतो आहोत, हे समजलं.

हे सगळं आता अचानक आठवायचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी संविधानातील काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला आणि त्यामुळे काश्मीरमधली जमीन विकत घेता येणार आणि संपत्तीबाबतचे कायदेही बदलणार, यामुळे एक प्रचंड आनंदाची लाट पसरली. अंबानी, अदानीपासून ते पवारांपर्यंत लोकांचे जमिनी विकत घेण्याचे मनसुबे लोकांनी ठरवून टाकले आणि जोक्सचा भडीमार झाला. काश्मिरी मुलीसोबत विवाह केला तर मुलीला संपत्तीवरचा हक्क गमवावा लागत होता, आता तेही बदलणार अशा धारणेतून अनेक तरुण खूश झाले आणि त्यातून काश्मिरी पोरींचे फोटो पोस्ट करायला सुरुवात झाली. अनेक ठिकाणी हे पोरींचे फोटो पोस्ट करुन ‘आता काश्मीरचे जावई होणार’ वगैरे वगैरे वल्गना सुरु झाल्या. या मुलींना उपमा देणं सुरु झालं. त्यांच्या सौंदर्यावरुन कमेंट्स सुरु झाल्या. मला वाटलं- आपण ज्यु. कॉलेजला असताना जे वेड्यासारखं, चुकीचं वागत होतो, ते किती सर्रासपणे सुरु आहे आणि कोणालाच यात काही चुकीचं वाटत नाही. काश्मीरची समस्या नेमकी काय आहे, तिथलं गुंतागुंतीचं राजकारण, इतिहास, भूराजकीय महत्त्व, कलम ३७० हे काहीच ठाऊक नसणारे आनंदात नाचत होते. काश्मीरची जमीन आणि मुली आपल्या मालकीच्या होणार किंवा त्यासाठीच हे पाऊल उचललं आहे, असं वाटावं या प्रकारे जल्लोष सुरू होता. एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर माझ्या मित्राने कमेंट केली- ‘काश्मिरी मुली सुंदर आहेत तसंच काश्मिरी तरुणही सुंदर आहेत. आपल्या बहिणी, देखण्या मैत्रिणी काश्मीरच्या सुना होतील. किती छान !’ त्याच्या या कमेंटनंतर एकदम ग्रुपवर सन्नाटा छा गया. म्हटलं इतना सन्नाटा क्यूँ है भाई? तर काश्मीरचे भावी जावई म्हणाले, ‘लेका जोक करत होतो, एवढा का सिरियस झालास?’ ज्या काश्मिरी मुलींचे फोटो पोस्ट करुन कमेंट्स सुरू होत्या त्यावर मित्र म्हणाला, हेच जर तुझ्या बहिणीचे, गर्लफ्रेंडचे फोटो असते तर ?

- Advertisement -

मुद्दा असा की जमीन असो वा बाई, ही जणू आपली बाय डिफॉल्ट मालमत्ता आहे, अशा अविर्भावात आपण वागत असतो. काश्मीर हवा म्हणजे काश्मीरवर मालकी हवी. म्हणजे तिथल्या जमीनीवर मालकी हवी, पण तिथं जिवंत माणसं आहेत, त्यांचंही काही म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं- त्यांची ‘मन की बात’ न ऐकता पेलेट गन्स वापरुन तो प्रदेश आपल्या मालकीचा करणं याला काय अर्थ आहे. ‘तू हां कर या ना कर, तू है मेरी किरन’ अशा प्रकारे समोरच्याचं म्हणणं ऐकून न घेता बळजबरीनं ‘आपलं’ म्हणणं ही आपली पुरुषी वृत्तीच आहे. ‘क्यां करु वो लेडीज, मै हूं आदत से मजबूर’ असं आपल्या रिकी बहलचं लाडकं स्पष्टीकरण असतं. राजकारणातही हीच प्रवृत्ती दिसते म्हणून तर कुण्या राज्याचा मुख्यमंत्री म्हणतो, आता काश्मिरी पोरींशी तुम्हाला लग्न करता येईल. कुणी आमदार जाहीर कार्यक्रमात म्हणतो, पोरगी तुम्हाला ‘नाही’ म्हणते का, मी तिला पळवून आणायची व्यवस्था करतो.

आपल्या प्रत्येकाच्या मनात एक काश्मीर आहे. हा काश्मीर म्हणजे कुठला प्रदेश नाही. मालकी गाजवण्याचा मनानं ठरवलेला अवकाश आहे. समोरच्याचं ऐकून न घेता त्याच्यावर लादणं. वर्चस्व गाजवणं. प्रत्येकाला असा काश्मीर हवा आहे. अशा मनानं रचलेल्या काश्मीरचं जावई व्हायचं, या कल्पनेनंच त्यांच्या दिल में लड्डू फुटता है. कुणावर कुरघोडी करुन आनंद कसा मिळू शकतो ! मालकी सांगून बाईचं शरीर भोगता येईल, पण तिचं मन कसं जिंकता येईल? आक्रमण करुन कुठला प्रदेश ताब्यात घेता येईल, पण तिथल्या माणसांसोबतचं नातं कसं घट्ट होईल? वस्तूंवर मालकी सांगता येईलही, पण सजीव माणसांचं काय? सिकंदरासारखं सारं जग जिंकताना आपण आतून हरलो तर त्याहून वाईट आणखी काय !
आपण स्वतः स्वातंत्र्य उपभोगत असताना समोरच्याच्या स्वातंत्र्याचा आदर करणं अभिप्रेत आहे. समोरच्याचं जे काही मत असेल ते समजून घेणं आवश्यक आहे. वर्चस्व आणि मालकीतून माणूस स्वतः आतून पोखरत जातो, अधिकाधिक पोकळ बनत जातो. आतून बाहेरुन पोखरलेल्या माणसांना माणसाच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही. ‘काश्मीर के दामाद’ बनू इच्छिणा-यांनी हे लक्षात ठेवायला हवं. काश्मीरला नंदनवन, स्वर्ग म्हटलं जातं. स्वर्ग आहे की नाही, माहीत नाही, पण एकमेकांसोबतच्या लोकशाहीपूर्ण संवादातून उत्तरं सापडू शकतात तरंच स्वर्गीय आनंदही मिळू शकतो नाहीतर गालिब म्हणेल, ‘हमको मालूम है जन्नत की हकीकत मगर दिल बहलाने के लिए ये प्रपोगंडा अच्छा है.’

- Advertisement -

– श्रीरंजन आवटे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -