घरफिचर्सलॉकडाऊनमधली जगण्याची ऊर्जा!

लॉकडाऊनमधली जगण्याची ऊर्जा!

Subscribe

मला कलाकार आणि व्यक्तीमध्ये आज एक विरोधाभास जाणवतो तो म्हणजे एक नाट्य कलाकार प्रेक्षकांशी प्रत्यक्षात भेटतो, संवाद साधतो, कला सादर करतो त्यावेळीच कलेमधील सत्व,तत्व, विचार आणि स्पंदनं स्पष्ट होतात पण आज माझ्यातल्या व्यक्तीला सांगितले जातंय की सुरक्षित अंतर महत्त्वाचे आहे. प्रेक्षकांशी प्रत्यक्षात भेटणे शक्य नाहीये .. आणि आज ती काळाची गरज आहे. व्यक्ती म्हणून मला जागृत, सावध राहायचे आहे आणि कलाकार म्हणून माझी भूमिका आहे, सकारात्मक मनोवैज्ञानिक ऊर्जा निर्माण करणे. आज आजारी पडल्यावर आपली औषधे, डॉक्टर्स आहेतच, पण लॉकडाऊनच्या काळात मानसिक ताकद निर्माण करण्यासाठी सकारात्मक ऊर्जेची गरज आहे जी निर्माण करण्याची जबाबदारी कलाकारांवर आहे.

कलाकार म्हणजे नेमके कोण? जे प्रेक्षकांचे मनोरंजन करतात? ज्यांना पैसा-प्रसिद्धी आणि समाधान मिळते? रंगमंचावर काम करतील, संवाद बोलतील पण कलाकार म्हणून घडतील का? नाही कलाकाराची खरी ओळख किंवा त्याची भूमिका त्याचवेळी स्पष्ट होईल ज्यावेळी कलेची संकल्पना स्पष्ट होईल … कला माणसाला माणूस बनवते. कलेची दृष्टी माणसात माणुसकी जागवते, कोणतीही कला असू दे. ज्यावेळी व्यक्ती आपली कला प्रस्तुत करतो त्यावेळी तो त्याच्या वेगळ्या विश्वात भ्रमण करत असतो.

त्या विश्वात उच्च-नीच, जाती भेद कोणत्याही भेदापलीकडे तो वास्तव्य करतो. आज आपल्या आजुबाजूला पाहिले, ऐकले की कळतं माणसाचे नेमके मूल्य काय उरलंय? केवळ आणि केवळ एक वस्तू ! हो, या जागतिकरणाच्या, वस्तुकरणाच्या धोरणाने माणूस खरेदी आणि विक्री या चक्रात अडकला आहे. माझा काय फायदा? या पलीकडे विचारशक्ती संपते. माणसाला माणूस म्हणून स्वतःचीच ओळख नाही राहिली तर माणूसपणाची अपेक्षाच न केलेली बरी! माणूसपण टिकवले नाही तर जगाचा विध्वंस निश्चित आहे. हे सगळ्यांना माहिती आहे की जग टिकते ते माणुसकीवर, माणुसकी या तत्वावर, तरीही आपल्या डोळ्यांवर असलेल्या नफा आणि तोट्याच्या पडद्याला आपण दूर करत नाही. कारण भय वाटतं मी जगाच्या मागे पडेन, जग पुढे निघून जाईल व आपण एकटे राहू, पण जग नेमके कोणत्या दिशेने चाललंय बघा तरी, ही दिशा, ही चेतना कला आपल्यात जागवते आणि ती अभ्यासत ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’ सिध्दांत काळाला आकार देणार्‍या कलाकाराची व्याख्या देते.

- Advertisement -

येणार्‍या परिस्थितीची पाळंमुळं आपणच खणलेली असतात. आता आपल्या समोर आलेले करोना नावाचे संकट मानवनिर्मित आहे. निसर्गात केलेली दखल आज आपल्या जीवाशी आली आहे आणि आपण सगळे आज आपापल्या घरात ’सुरक्षितते’(?) साठी अडकलो आहोत.

या अवस्थेला अडकलेली अवस्था म्हणून मानायचे की एक सुंदर संधी हे आपल्यावर आहे. आपल्या सैरभैर असलेल्या मनाला आत्मावलोकन, आत्मपरीक्षणाकडे नेण्याची संधी आहे. या प्रक्रियेत मला ही दृष्टी मिळाली की मनुष्य जन्म प्रक्रिया म्हणजेच नऊ महिने आईच्या गर्भातला प्रवास, क्षणाक्षणाने आणि कणाकणाने वाढत जाण्याचा प्रवास.. प्रवास यासाठी कारण एका बिंदूपासून दुसर्‍या बिंदूपर्यंत पोहोचण्याची ही प्रक्रिया आहे. असाच एक प्रवास सुरू झाला आपल्या सगळ्यांचा २२ मार्चपासून. एका गर्भात राहण्याचा, पण हा गर्भ आहे आपल्याला नवीन जन्म देण्याचा, सृष्टीला नवदृष्टीने पाहण्याचा. हा लॉकडाऊनचा गर्भ आपल्याला काय देणार यापेक्षा मी या गर्भातून कसा/कशी जन्म घेणार? हे महत्त्वाचे आहे. जन्माला आल्याआल्या बाळ रडतं ते जगण्यासाठी, त्याच्या रडण्याला दिशा आणि ध्येय असते. हेच तत्व आताही लक्षात ठेवणे गरजेचे आहे. अडचणी आव्हाने आताही आहेत ती उद्या बाहेर दुपटीने वाढणार, पण माणूस म्हणून जगण्याचे माझं बाळकडू जे माझ्यात आहे, जे मी जगलेय त्या बिंदूला मी या बिंदूशी नक्कीच जोडणार.

- Advertisement -

थिएटरचा थेट संबंध सामाजिक घडामोडींशी असतो. म्हणून सध्या असलेली सामाजिक परिस्थिती त्याचे विश्लेषण आणि त्याचा माझ्यावर पडत असलेला प्रभाव असा समग्र अभ्यास करणे कलाकाराची जबाबदारी आहे.या एकांतवासामध्ये कलेचे ध्येय, संकल्पना रंगकर्माचे ध्येय आणि कलाकार म्हणून माझे ध्येय, तसेच समाज, राजसत्ता कलेला कसे पाहतात या दृष्टीने मंथन करणे गरजेचे आहे. संकट काळातच माणसांची खरी ओळख होते आणि या संकटाने तर सगळ्यांना उघडे पाडले आहे. सगळ्यांचा खरा चेहरा समोर आला आहे. या खरेपणाला कलाकाराने मांडावे जेणेकरून भविष्यात योग्य समाजाची जडणघडण होईल.

पोट भरण्यासाठी पैसा हवाच, पण मेंदू म्हणजेच विचारच नसतील तर काय होईल? आणि हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की, पोट भरण्यासाठी वैचारिक शक्तीच कामाला येते. प्रत्येक व्यक्तीला त्याचे अस्तित्व टिकवण्यासाठी सजग करणे आजच्या घडीला आवश्यक आहे. पोटापुरते अन्न व पाणी मिळवणे आवश्यक आहेच. परंतु, प्रत्येकाने आपल्या जबाबदारीचे निर्वहन करणे आवश्यक आहे. कलाकार म्हणून हे बौद्धिक वलय निर्माण व्हावे यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत. ज्याने समाज स्वतःच्या उद्धारासाठी स्वतः उभा राहील. स्वतःच्या ठायी तेज विश्वाला करी सतेज ‘स्व’ ते ब्रम्हांड, ‘स्व’ ला जगताना विश्वासोबत जगण्याची प्रक्रिया जगताना काळाला घडवतो तो सृजनकार. आज प्रकृती सोबत मानवी प्रकृतीला निरोगी करण्याची संधी आणि जबाबदारी आपल्याकडे आहे. सृजनकाराला प्रकृतीचा सोबती होऊन मानवतेला जगवायचं आहे.

मला कलाकार आणि व्यक्तीमध्ये आज एक विरोधाभास जाणवतो तो म्हणजे एक नाट्य कलाकार प्रेक्षकांशी प्रत्यक्षात भेटतो, संवाद साधतो, कला सादर करतो त्यावेळीच कलेमधील सत्व,तत्व, विचार आणि स्पंदनं स्पष्ट होतात, पण आज माझ्यातल्या व्यक्तीला सांगितले जातंय की सुरक्षित अंतर महत्त्वाचे आहे. प्रेक्षकांशी प्रत्यक्षात भेटणे शक्य नाहीये .. आणि आज ती काळाची गरज आहे. व्यक्ती म्हणून मला जागृत, सावध राहायचे आहे आणि कलाकार म्हणून माझी भूमिका आहे, सकारात्मक मनोवैज्ञानिक ऊर्जा निर्माण करणे. आज आजारी पडल्यावर आपली औषधे, डॉक्टर्स आहेतच, पण मानसिक ताकद निर्माण करण्यासाठी सकारात्मक ऊर्जेची गरज आहे जी निर्माण करण्याची जबाबदारी कलाकारांवर आहे.

लॉकडाऊनची बंदी उठल्यावर, बाहेर पडल्यावर परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी वेळ लागणार. कारण या लॉकडाऊनने समाजात एक पोकळी निर्माण केली आहे. तेव्हा समाजाची मानसिकता, त्याची गरज आणि बदल याचा एक कलाकार म्हणून मी शोध घेते आहे. कारण हा समाज आहे तसा राहणार नाही. या अभ्यासासोबत स्वतःचे कलाकार म्हणून माझ्या प्रवासाचे लिखाण तसेच समग्र चिंतनात्मक, विचारात्मक आणि भावनात्मक अभ्यास सुरू आहे. कलाकार हा वर्तमान परिस्थितीत घटनेचे अवलोकन करणारा असतो म्हणूनच आज मजुरांवर ओढवलेल्या परिस्थितीची संवेदनशीलता मी जाणून घेतेय. मजुरांचा चालत जाण्याचा निर्धार, त्यांची उत्कट भावना एक कलाकार म्हणून मी माझ्यात शोधतेय. हाच कलात्मक अभ्यास मनोवैज्ञानिक सकारात्मक ऊर्जा स्पंदीत करतो, तरंगीत करतो. जो कलाकाराला या निराशावादी काळात एक व्यक्ती म्हणून निरोगी राहण्यास मदत करतो आणि सार्थक कलात्मक सृजनसाठी उत्प्रेरित करतो.

नाटक त्यातील भूमिका म्हणजे अमूर्त आणि तिला साकारण्यासाठी गरज असते ती मूर्त अशा शरीराची. कलाकार एकापाठोपाठ कलाकृती सादर करतो व कलाकार साचेबद्ध अभिनय करत करत मॅकेनाइस होत जातो. म्हणून प्रत्येक वेळी आपल्या अभिनयासाठी लागणार्‍या पंचेंद्रियांच्या संवेदनशील तंत्रांना जोडण्याची आवश्यकता आहे. म्हणून या लॉकडाऊनच्या काळात मी एक कलाकार म्हणून माझ्या मुद्रा, हावभाव माझा आवाज आणि त्याचे स्वर अभ्यास याकडे लक्ष केंद्रित करत आहे. नाटकात लागणार्‍या संरचना निर्माण करण्यासाठी एक कलाकार म्हणून माझ्या शरीरात लवचिकता, चपळता आणि योग्यता निर्माण करण्याची ही उत्तम संधी मी मानतेय.
एक रंगकर्मी म्हणून स्वतःकडून असणारी अपेक्षा या कवितेतून स्पष्ट होते.

मुझे अपेक्षा है ऐसे रंगकर्म की
-मंजुल भारद्वाज

भूमंडलीकरण के वस्तुकरण के भयावह दौर में
जहाँ मनुष्य ‘वस्तु’ बनने और बनाने को श्रेष्ठ मानता है
मेरी रंगकर्मियों से अपेक्षा है
अपने रंगकर्म में ऐसा दृश्य दिखाएं
जिसे देख सिद्दार्थ बुद्ध बन जाए
संवाद में कबीर की वाणी हो
जो धर्म और विकार के पाखंड को उजागर करे
जाति,राजा और रंक का भेद मिटे
नानक का एक संगत, एक पंगत का सपना साकार हो
जज्बा, जोश, भाव एक इंकलाब हो
हर दर्शक को भगत सिंह का अहसास हो
कला का ऐसा सौंदर्यबोध हो
जो जन्म आधारित कुरूपता से
लड़ने का जज्बा पैदा करे
जन्म के संयोग को चुनौती देनेवाले योद्धा
अम्बेडकर से प्रेरित हो संविधान का अनुसरण करे
मुझे अपेक्षा है ऐसे रंगकर्म की
जिसे देख कोई मोहनदास
सत्य की डगर पर चलना सीख ले !
ही कविता सांगतेय कलाकाराचा प्रवास सिद्धार्थ ते बुद्धापर्यंत असावा. आपली कला ही कबीरच्या वाणी सम रोखठोक असावी, सत्य असावी, कलाकार जातीपाती धर्मभेदाच्या पलीकडे एक संगत-एक पंगत, या गुरूनानकांच्या विचारांप्रमाणे असावी. जन्माच्या संयोगातून, कुरुपतेतून बाहेर पडण्यासाठी कलेच्या तात्विक सौंदर्याला निर्माण करावे आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये विवेक जागा करावा जेणेकरून माणूस, माणूस म्हणून घडेल !

अश्विनी नांदेडकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -