रोमँटिसिझम कभी मरता नही…

अचानक त्या मुलांनी ठरवून केल्याप्रमाणे आता गुणगुणनं बंद करून टीपेचा सूर लावत गाणं गायला सुरुवात केली होती. गाण्याचे बोल होते, ‘वो एक्टिंग करते है भाई, हम फाइटिंग मे मरते है भाई, सब सेटर बैठे है भाई, सब चीटिंग करते है भाई’. गाणं ओळखीचं होतं. आठवलं. फार पूर्वी संभाजी भगतांना हे गाणं म्हणताना ऐकलं होतं पार्कात, चैत्यभूमीवर. माझी उत्सुकता चाळवली आणि आता ती मुलं पुढे काय करतात याची वाट मी बघत बसलो. वाटलं, रोमँटिसीजम अभी भी जिन्दा है??.... येस ! वो जिन्दा है. इनफॅक्ट, वो कभी मरता ही नहीं. बहता रहता है पीढी दर पीढी. जनरेशन टू जनरेशन.

Mumbai

शनिवारची गोष्ट. वेळ साधारण संध्याकाळी आठ- साडेआठची असावी. मी कल्याणच्या दिशेने जाणार्‍यागाडीत फर्स्टक्लासच्या डब्यातून प्रवास करत होतो. ठाणे स्टेशनवर गाडी पोहचली आणि मी जिथे बसलो होतो, त्याच्याशेजारी असलेल्या बेंचजवळ तीन पोरगेलेसे तरुण येऊन उभे राहिले. नेहमीच येणार्‍या कॉलेजच्या मुलांसारखी हीसुद्धा असावीत, असं समजून माझ्यासहीत गाडीतले इतर प्रवासी सवयीने आपापल्या व्यापात मग्न होते. कुठे आपापसांत घरगुती गप्पा चालू. कुठे एकमेकांत स्वत:ला गुंतवून जगाला विसरून गेलेली जोडपी. काही आळसावलेले आणि त्यातल्या त्यात झोप घेण्याच्या प्रयत्नात असलेले आणि कुणी माझ्यासारखे, खिडकीबाहेर बघत बसून असलेले.

गाडीने ठाणे स्टेशन सोडलं आणि थोड्याच वेळात लांबवर कुणीतरी समूहाने गाणी गात असल्याचा भास मला झाला. उत्सुकता म्हणून मान वळवून पाहतो तर ती तीन मुलं गुणगुणत आपापल्यात कुठल्याशा गाण्याची प्रॅक्टिस करत होती. हेसुद्धा नेहमीचंच. यात नवीन ते काय? असं समजून मी पुन्हा मान खिडकीबाहेर वळवली. असतील कुठल्यातरी गाण्याची रिहर्सल करत. सगळं नॉर्मल चाललं होतं. अचानक त्या मुलांनी ठरवून केल्याप्रमाणे आता गुणगुणनं बंद करून टीपेचा सूर लावत गाणं गायला सुरुवात केली होती. गाण्याचे बोल होते, ‘वो एक्टिंग करते है भाई, हम फाइटिंग मे मरते है भाई, सब सेटर बैठे है भाई, सब चीटिंग करते है भाई’. गाणं ओळखीचं होतं. आठवलं. फार पूर्वी संभाजी भगतांना हे गाणं म्हणताना ऐकलं होतं पार्कात, चैत्यभूमीवर. माझी उत्सुकता चाळवली आणि आता ती मुलं पुढे काय करतात याची वाट मी बघत बसलो. दरम्यान, फर्स्टक्लासमधली घडी काहीशी मोडल्यासारखी वाटत होती. इतर प्रवाशांना हे सगळं नवीनच होतं. असं काही आणि तेसुद्धा इथे या डब्यात? काही नजरा त्या तिघांना आपादमस्तक स्कॅन करू लागल्या. काही उत्सुकतेने तर काही तिरस्काराने पाहू लागल्या. काही जोडप्यामधली आपापल्या जोडीदारासोबत बोलता बोलता तिरक्या नजरेने या त्रिकूटावरही लक्ष ठेवून होती.

हा असा रिस्पॉन्सचा अदमास घेत ती मुलं आता आपला पुढचा स्टान्स घ्यायच्या तयारीत होती. पब्लिकच्या रिअ‍ॅक्शन्सचा त्यांच्यावर तसा काही खास परिणाम झालेला दिसत नव्हता. आता तिघामधल्या एकाने आपल्या बॅगेतून एक डायरी काढली आणि पुन्हा आपापसांत चर्चा करून पुढच्या गाण्याची सिद्धता केली. पद्धत तीच. आधी गाणं गुणगुणल्यासारखं करून मग अचानक समेवर येत टीपेचा जोरकस सूर. गाणं होतं, ‘माझ्या भीमानं भीमानं, बुद्धाला मानलं’. आंबेडकरी जलशामध्ये सादर होणारं असावं बहुतेक. गाण्याचा आशय हिंदू धर्मातील अनिष्ट रूढी, कल्पना आणि कर्मकांडांवर टीका करणारा होता. तेहतीस कोटी देव वगैरे. आता मात्र माझं सगळं लक्ष त्यांना ऐकण्यात लागलं होतं. आधीच्या गाण्यात पोलिटिकल स्टेटमेंट आणि आता डायरेक्ट धर्माबिर्मावर आसूड. क्षणाचाही गॅप न घेता त्यांनी लगेच तिसरं गाणं सुरू केलं. गाणं होतं, आम्ही ज्ञानपाखरं, ज्ञानसूर्याला वंदीतो, आम्ही हत्यारं उचलितो, पाटी पेन्सिल धरितो. इतकी वेरीयेशन्स असलेली गाणी सादर झाल्यानंतर आता मला स्वस्थ बसवेना. सारखं त्या पोरांसोबत कधी एकदा बोलतो असं झालं होतं, पण संधी मिळत नव्हती कारण माझ्या जागेपासून दहा-बारा पावलं लांब उभे होते ते. शेवटी मला ज्या स्टेशनवर उतरायचं होतं, त्याच्या एक स्टेशन आधीच मी उठलो आणि त्या तिघांच्या ग्रुपमध्ये जाऊन उभा राहिलो.मोठ्या उत्सुकतेने त्यांना मी विचारले, तुम्ही पथनाट्य सादर करता का कुठे? तिघांपैकी एक मुलगा जो सर्वात जास्त पॅशनेटली गात होता, तो म्हणाला, नाही.मग ही गाणी तुम्ही कुठून मिळवली आणि ही गाणी कोणाची आहेत ? कोणी लिहिली आहेत ?ही गाणी सचिन माळी सरांची आहेत आणि आम्ही ती गातो कॉलेजमध्ये.

कॉलेज म्हटल्यावर मी त्यांना विचारलं कुठल्या कॉलेजमध्ये आहात म्हणून. तर ते म्हणाले, ठाण्याचं जोशी-बेडेकर. सचिन माळीचा संदर्भ ऐकल्यावर मी त्यांना साहजिकच विचारलं, तुम्ही कनेक्टेड आहात का कबीर कला मंचाशी वगैरे? त्यावर त्यांचं उत्तर पुन्हा नकारार्थी. आमचा हा संवाद सुरू असताना बाकीच्या दोघांनी त्यातून हळूच काढता पाय घ्यायला सुरुवात केली होती, असं मला जाणवलं. जणू काय ते विदाउट तिकीट प्रवास करताहेत आणि मी आता त्यांना पकडून जाब विचारतोय.

मी पुढे त्यांना विचारले, मग ही गाणी तुम्ही का गाता? त्यावर त्या पोरांचं म्हणणं होतं, कुणीतरी विद्रोह केला पाहिजे ना? मी म्हटलं, शंभर टक्के मान्य. बरं महाराष्ट्राला लाभलेल्या विद्रोही परंपरेचा वारसा आणि त्याच्या इतिहासाबद्दल तुला माहिती असेलच? विद्रोहाची तुझी व्याख्या काय? विद्रोही संमेलनं माहीत आहेत का? काय काय विद्रोही वाचलं आहेस? आणि सर्वात शेवटी विद्रोहसुद्धा मॅनेज केला जातो, हे तुला माहिती आहे का?माझ्या प्रश्नांची अशी सरबत्ती ऐकून तो मुलगा ब्लँक झाल्यासारखा वाटला. मग मी ते गात असलेली गाणी कशासंदर्भात आहेत असं विचारलं असता ते म्हणाले, शिक्षणाचं झालेलं खासगीकरण वगैरे वगैरे. मी म्हणालो, पण हा मुद्दा तर तुमच्या कुठल्याही गाण्यात रिफ्लेक्ट होताना दिसत आणि ऐकू येत नाही वगैरे वगैरे. अजून बरंच बोलायचं होतं त्यांच्याशी. पण वेळेअभावी बोलता नाही आलं. जाता जाता त्यांना शेवटचं म्हणून विचारलं, इथेच का गावीशी वाटली ही गाणी? या फर्स्टक्लासच्या डब्यात? इथे तर सगळी बथ्थड मंडळी बसलीयत. तुमच्या गाण्याचा काहीएक परिणाम त्यांच्यावर झालेला दिसत नाही. यावर मात्र त्यांनी मोठ्याने हसून, होकारार्थी मान डोलावून सगळ्यांचा बथ्थडपणा मान्य केला.

शेवटी एकदाचा मी माझ्या स्टेशनवर उतरण्यासाठी म्हणून पुढे चालू लागलो. आमच्या या संभाषणाचे श्रोते असलेल्या इतर प्रवाशांच्या प्रतिक्रिया मी त्यातल्या त्यात नोट केल्या….. त्या नेहमीसारख्याच तटस्थ आणि त्रयस्थ. उतरण्यासाठी मी वळणार तितक्यात पाठीमागून हलकेच त्या पोरांची कुजबूज कानावर आली. चला. एवढ्या गर्दीत कुणीतरी आपल्याला ऐकलं आणि येऊन विचारलं हेसुद्धा काय कमी नाही.मी पटकन पाठीमागे वळून माझ्या तोंडावर हास्याची लकेर चमकवत आणि हँड्स अप करत त्यांना बाय केलं आणि उतरून रस्ता चालू लागलो. आता वाटेत माझे स्वगत चालू झाले….. रोमँटिसीजम अभी भी जिन्दा है ??…. येस ! वो जिन्दा है. इनफॅक्ट, वो कभी मरता ही नहीं. बहता रहता है पीढी दर पीढी. जनरेशन टू जनरेशन. बस उसका फलसफा अक्सर मायुसी लेकर आता है.

तरुण वयात प्रेयसीने दिलेल्या दग्यासारखा रोमँटिसीजमसुद्धा जोशिल्या पोरांना दगा देत आलाय आणि तरीही तो हवाहवासा वाटतो. त्या वयाची गरजच असते तो ब्लाइंड रोमँटिसीजम…. उमंगो भरी उम्र है और पुरे आलम को फतेह करने की उम्मीद…… कोणास ठाऊक ? याच पोरांमध्ये उद्याचा संभा भगत किंवा शाहीर विलास घोगरे दडला असावा. यू नेवर नो !…… लेकिन एक बात तो है. जालीम सच्चाई का पता चलने के लिये पहले ब्लाइंडली रोमँटिक होना बेहद जरूरी है… स्वत:शीच गप्पा मारता मारता घरी पोहचलो होतो एव्हाना. जेवण आटपून कुणाशीही काही न बोलता गुपचूप पांघरूण घेऊन झोपलो आणि बघता बघता स्वप्नात हरवून गेलो. स्वप्नात पाहिलं. तेच तिघे तरुण आता बरेचसे पोक्त झाल्यासारखे वाटत होते. असंच एके दिवशी एकमेकांच्या ख्यालीखुशाली विचारत कधीकाळी जिथं विद्रोह गायला होता, त्याच ट्रेनमधून आपापल्या घरी चालले आहेत ते आणि त्यांच्यासमोर असाच एक पोरांचा घोळका येतो आणि तडफेने गाऊ लागतो, वो एक्टिंग करते है भाई, हम फाइटिंग मे मरते है भाई सब सेटर बैठे है भाई, सब चीटिंग करते है भाई……….. सच है. रोमँटिसीजम कभी भी मरता नही.

समीर दळवी