घरफिचर्सपडद्यावरील दोस्तीपटांचं वर्ष

पडद्यावरील दोस्तीपटांचं वर्ष

Subscribe

हिंदी पडद्यासाठी १९८० चं दशक रोमँटिक मैत्रीपटाचं होतं. या वर्षी शान, राम बलाराम, कुर्बानी, दोस्ताना असे अनेक मैत्रीपट आले. हे वर्ष गाजवलं ते खर्‍या अर्थाने फिरोझ खान आणि विनोद खन्नाने, त्यानंतर शत्रुघ्न सिन्हा आणि अमिताभची दोस्तीही दोस्तानामधून गाजली, शानमध्ये सोबतीला शशी कपूरही आला होताच. तर राम बलराममध्ये धर्मेंद्रची अमिताभला सोबत झाली. धर्मेंद्र, विनोद खन्ना आणि विनोद मेहरा, नवीन निश्चल, जितेंद्रचा द बर्निंग ट्रेन हा दोस्तीपटही या वर्षी महत्त्वाचा सिनेमा ठरला...

हिंदी सिनेमांसाठी १९८० हे वर्ष कमी महत्वाचं नव्हतं. फिरोझ खानच्या एफ के इंटरनॅशनल बॅनरला या वर्षी कुर्बानीमुळे घवघवीत यश मिळालं. श्रीमंतीचे रईसी प्रदर्शन, महागड्या गाड्यांची मोडतोड, हायटेक म्युझिक, सिनेमॅटोग्राफी, इंग्रजी प्रभावाखाली असलेला मसालेदार सिनेमा, सुंदर सुंदर हिरॉईन्सच्या रोमँटिक दृश्यांचा भडीमार, दर्जेदार डायलॉग्स असलं सगळं काही फिरोझच्या सिनेमात होतं. त्या तुलनेत छोटा भाऊ संजय मेला, दोस्ती असे भावनिक मवाळ स्वरुपाचे चित्रपट करत होता. फिरोजचं तसं नव्हतं. त्याची आपली स्टाईल होती. सत्तरचं दशक राजेश खन्नाचं होतं. मात्र ८० च्या दशकाची सुरुवात धमाकेदार करून फिरोजनं सगळ्यांना मागे टाकलं. निरनिराळ्या नस्लचे घोडे आणि त्यांच्या रेसचा शौकीन असलेल्या कायम हॅट घालून चामड्याचे बूट आणि लेदर जॅकेट परिधान केलेल्या काऊ बॉयच्या वेषात असलेल्या फिरोजला सुपस्टारपदाच्या घोडदौडीत मात्र इंटरेस्ट नव्हता. ७० च्या दशकातील स्वतः निर्मित केलेल्या चित्रपटांनंतर त्याने ८० च्या दशकात स्वतःच्या चित्रपटाचा स्वतःच नायक व्हायचं टाळलंच.

ऐंशीच्या दशकात त्यानं कुर्बानी बनवताना त्यात देखण्या विनोद खन्नाला घेतलं होतं. विनोद खन्नाच्या १९७१ च्या मेरे अपनेपासून ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीपर्यंतच्या १० वर्षांतील सर्वाधिक देखणेपण त्याला कुर्बानीनं बहाल केलं. मात्र यातली नायिका झीनत फिरोज खानला मिळाल्याने हम तुम्हे चाहते है ऐसे, गाण्याच्या विरहापलिकडे विनोदच्या पदरात काहीच पडलं नाही, दोस्ती के लिए प्रेम आणि जानची कुर्बानी देणारा हा एक दोस्तीपट होता. कुर्बानीमध्ये एका सीनमध्ये श्रीमंतीचा माज असलेल्या अमरिश पुरीची गाडी फिरोझ खान मोडून तोडून टाकतो आणि त्याच्याशी लावलेली चार आण्याची पैज हारतो. हा प्रसंग प्रभावी व्हावा यासाठी फिरोझने म्हणे खरीखरी नवी कोरी मर्सिडीज गाडी तोडून फोडून टाकली होती.

- Advertisement -

याच वर्षात जे ओमप्रकाशचा आशा ही रिलिज झाला होता. मराठी लेखक साहित्यिक, कथाकार राम केळकर यांचं लेखन होतं. आशाचं कथानक नैतिक मूल्ये, माणसाच्या जन्म-मृत्यूची शक्यता आणि स्त्रीवादावर आधारीत होतं. जितेंद्र, रिना रॉय, रामेश्वरी असं कास्टिंग होतं. लक्ष्मीकांत प्यारेलालचं संगीत तर आनंद बक्षींचे स्वरशब्द होते. आशामध्ये गिरीश कर्नाड यांचीही महत्त्वाची भूमिका होती. कर्नाड त्यावेळी रंगभूमीवरील मोठं नाव होतं तर जितेंद्र हिंदी पडद्यावरील नावारुपाला आलेला कलाकार होता. या सिनेमात जाने हम सडक के लोगे से ये दुनिया वाले क्यूं जलते है….या गाण्यात जितेंद्रसोबत तेव्हाचा बालकलाकार आणि आताचा सुपरस्टार हृतिक रोशनही झळकला होता. कौटुंबिक कथानकाचा आशा सिनेमा तिकिटबारीवर उत्तम चालला. १९८० मध्येच विजय आनंद यांनी मल्टिस्टारर बिग बजेट राम बलराम बनवला. धर्मेंद्र, अमिताभ, झीनत, रेखा, प्रेम चोप्रा, अमजद खान, अजित असे मोठे कलाकार यात होते. राम बलराम उत्तम चालला, मात्र विजय आनंदच्या इतर चित्रपटांच्या तुलनेत राम बलरामला अपेक्षित यश मिळालं नाही. राम बलराम हा धर्मेंद्र आणि अमिताभचा एकत्र काम केलेला तिसरा चित्रपट होता. दोन नायकांच्या मैत्रीचं कथानक होतं. याच वर्षी अमिताभची मैत्री शत्रुघ्न सिन्हाशीही झाली होती. चित्रपट होता दोस्ताना…राज खोसलांचं दिग्दर्शन आणि सलीम-जावेदची कथा पटकथा दोस्तानासाठी होती. अ‍ॅक्शन, इमोशन, ड्रामा असं सगळा हीट फॉर्म्युला दोस्तानामध्ये होता. प्रणयसुंदरी झीनतमुळे अमित आणि शत्रूच्या मैत्रीत दरी तयार होते. त्याचा गैरफायदा प्रेम चोप्रा आणि त्याचे खलनायक मित्र मंडळ घेत असते. अखेरीस गैरसमज दूर होतात. दोस्ती के लिए प्यार की कुर्बानी, वेळीच नायकांच्या लक्षात येते आणि दोस्ताना पुन्हा मजबूत होऊन प्रेम चोप्रा आणि त्यांच्या अमरिश पुरी, सुधीर या मित्रमंडळाला दोन्ही मित्रांकडून बुलकावून काढले जाते.

दोन नायकांचं वर्ष १९८० खर्‍या अर्थानं होतं. जी.पी. सिप्पी यांनी सलीम जावेद यांना सोबत घेऊन रमेश सिप्पींकडून शोलेनंतर शानही बनवून घेतला. शोलेमधला व्हीलन ग्रामीण भागातला परंपरागत डाकूपट होता. तर शानमधला व्हीलन शाकाल हा कमालीचा हायटेक होता. आजच्या कोई मिल गया सारखा किंवा हॉलिवुडातल्या स्टार ट्रेकचा परिणाम शानच्या कथानकावर होता. कुलभूषण खरबंदा यांनी साकारलेला शाकाल पुरेसा भीतीदायक झाला नाही. मात्र फ्युजी कलरमध्ये बनलेला सिनेमास्कोप शान आर.डी. बर्मनचं संगीत असूनही बॉक्स ऑफीसवर अमिताभ, शशी आणि शत्रुघ्न असतानाही मल्टिस्टारर शान, सीप्पी फिल्मच्या सुपरहीट परंपरेची पुरेशी शान राखू शकला नाही. याच वर्षी बी आर चोप्रांच्या यशराज बॅनरखाली द बर्निंग ट्रेन पडद्यावर आला. यातही धर्मेंद्र, जितेंद्र, विनोद खन्ना, विनोद मेहरा, डॅनी डेंझोप्पा, हेमा मालिनी, परवीन बाबी, नितू सिंग अशी मल्टिस्टारकास्ट होती. पेटलेल्या ट्रेनमधील प्रवाशांच्या जीव वाचवण्याचे काही तासांचे कथानक द बर्निंग ट्रेनचा विषय होता. त्या काळातल्या मर्यादित साऊंड इफेक्ट्स आणि सिनेतंत्राच्या तुलनेत हा सिनेमा आजही तेवढाच रोमहर्षक बनवला होता. दासरी राव यांनी त्याआधी जितेंद्र, मौशमी चटर्जी, सारिका, विनोद मेहरा आणि वहीदा रेहमान यांच्या सोबत ज्योती बने ज्वाला बनवला होता. हा एक अत्याचाराचा घेतलेला बदलापट होता. अलिबाबा और चालीस चोर या अरेबियन नाईट्सच्या कथेवर आधारीत महत्त्वाचा चित्रपट याच वर्षी आला होता. तेच अलिबाबाच्या जादुई गुहेचं, या सिनेमाची जादू थेटरात तुफान चालली आणि निर्मांत्यासाठी बॉक्स ऑफिसवर गुहा उघडली गेली. या वर्षी अखेरचा जो महत्वाचा चित्रपट रिलिज झाला तो सुभाष घईंचा कर्ज…गोरख शर्मा या गिटारवादकाने शूटिंगच्या सेटवर इक हसीना थी गाण्याच्या आधीची गिटारची ट्यून आर. डी. बर्मनच्या सांगण्यावरून ऐन वेळी वाजवली होती. शर्मांनी ही ट्यून जशी वाजवली, पंचमनी तशीच्या तशीच कर्जमध्ये वापरली. ऋषी कपूरचा कर्ज सुपरहीट झाला त्यानंतर पुनर्जन्मांच्या प्रेमपटांची लाट हिंदी पडद्यावर सुरू झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -