घरफिचर्सखतनाला नाही म्हणताना

खतनाला नाही म्हणताना

Subscribe

एखाद्या महिलेचा विवाह होणार आहे, म्हणून तिची खतना करणे गैरच आहे.असे न्यायालयाने म्हटले आहे, तसेच ही सुनावणी करताना पतीला सुखी ठेवण्याची जबाबदारी फक्त महिलांचीच का? असा प्रश्नही न्यायालयाने यावेळी उपस्थित केला होता. त्या अनुषंगाने केलेली ही चर्चा..

गेल्या वर्षी महिला अत्याचाराच्या खटल्यावर निकाल देताना या देशात महिलांना शांततेने का जगू दिले जात नाही? असे न्यायालयाने म्हटले होते. याही वेळी मा.सर्वोच्च न्यायालयाच्या या सुनावणीवर अनेक प्रकारच्या चर्चा ऐकायला येत आहेत. सामाजिक प्रथा,

समाजातील महिलांचे स्थान आणि महिलांची लैंगिकता म्हणून विचार केला तर आजही महिलांच्या लैंगिकतेबद्दल फारस बोललं जात नाही. बाई आणि तिची लैंगिकता हा विषय समजूनच घेतला जात नाही. या सगळ्यातून जमेची बाजू म्हणून पाहिलं तर गेल्या दोन वर्षात प्रदर्शित झालेले चित्रपट लिपस्टिक अंडर माय बुरखा, वीरे दी वेडिंग, पार्च्ड, शुभमंगल सावधान या सगळ्या चित्रपटांतून आणिलस्ट स्टोरीज सारख्या वेब सिरीजमधून महिलांच्या लैंगिक अधिकाराबद्दल प्रखरपणे मांडणी होतांना दिसून येते.

- Advertisement -

या २२ जून रोजी महाराष्ट्रातील एकल महिलांच्या स्वतंत्र धोरणाचा मसुदा विकास अध्ययन केंद्र, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि कोरो या संस्थामार्फत जाहीर करण्यात आला.या धोरणाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील अनेक भागांत जाण्याचा योग आला. त्याचप्रमाणे मराठवाड्यातील दुष्काळाचा एकल महिलांवर होणारा परिणाम अभ्यासत असताना भेटलेल्या एकल महिलांचे लैंगिक शोषणाचे अनुभवही विदारक होते. अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई होती. मात्र दुष्काळ जाणवला बाईला माणूस (human being) या अर्थाने न समजण्याचा. बाई एकटी आहे तर उपलब्ध आहे हे गृहीतच धरून टाकले जाते.

त्यातून ती स्वत:च्या इच्छेने तिच्या आवडीच्या जोडीदारासोबत आनंदाने आयुष्य जगत असेल तर तिच्याबाबतीत काय काय बोलले जात असेल याचा विचार न केलेला बरा. अशाच काही महिलांच्या संघर्षगाथा सांगाव्या वाटतात. अर्थात,सर्व नावे काल्पनिक आहेत. अवघ्या विसाव्या वर्षी लग्न झालेली मीता. लग्न झालं. सासरी गेली. नव्या नवरीचे नऊ दिवस संपले तरी पती जवळ येत नाही हे तिच्या लक्षात आलं. एक दिवस न राहून सासरच्या मंडळीसोबत बोलली. यावर तिला उत्तर मिळालं नवरा नसला म्हणून काय झाल, मी किंवा तुझा भाया (सासरा किंवा पतीचा मोठा भाऊ) येईल. एक मूल होईपर्यंत सगळ ठीक होईल. मीताने यावर आवाज उठवला आणि माहेरी पळून आली.पुढे न्यायालयात पती शारीरिकदृष्ट्या अक्षम असल्याचा दावा दाखल केला आणि पतीसोबत झालेला विवाह अवैध ठरवला. न्यायालयाने विवाह अवैध ठरवला असला तरी माहेर आणि सासर दोन्हीकडच्या लोकांनी मुलीला समजून न घेता तिलाच दोष द्यायला सुरुवात केली.

- Advertisement -

शेवटी मुलीने सासरचे लोक जबरदस्ती करत होते हे सांगितलं तेव्हा परिस्थिती थोडी बदलली. मीता म्हणते, जी व्यक्ती लग्न करतांनाच मला फसवते आणि लग्न झाल्यावर पुन्हा मला अन्य कुणासोबत राहण्याबाबत बोलतो तेव्हा अशा व्यक्तीसोबत मी का राहू? आणि अजून कोणासोबत राहायचे असेल तर मी माझ्या इच्छेनुसार राहीन. त्यासाठी मला कोणाची जबदरदस्ती कशाला हवी? लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारी मनीषा. एका महिन्यात तिची पाळी चुकली. तपासणीसाठी डॉक्टरकडे गेली तेव्हा डॉक्टरने तिला आरोपीच्या पिंजर्‍यात उभं केलं. तुझी तपासणी मी तुझा जोडीदार किंवा घरचे कोणी आल्याशिवाय करणार नाही. आताच्या आता तू कोणाला तरी फोन करून बोलावून घे म्हणून तिच्यावर दबाव टाकला. शेवटी ती डॉक्टरच्या केबिनमधून बाहेर पडली. ती म्हणते, मी एक प्रौढ स्त्री आहे. मला माझ्या जीवनात लैंगिक सुख घेण्याचा अधिकार आहे. माझ्या आरोग्याच्या बाबतीत निर्णय घेण्याचा माझा हक्क आहे. त्यासाठी मला माझा जोडीदार किंवा घरचे यांची परवानगी डॉक्टरांनी मागू नये.’

मालिनीला लग्न होऊन १५ वर्षे झाली तरी मूल नाही.पती संबंध ठेवतो पण मूल होऊ देत नाही. गर्भ राहिला तर तिच्याकडून इतक्या वाईटपद्धतीने घरातील काम करून घेतले जायचे की तिचे मिस कॅरेज व्हायचे! शेवटी तिने निर्धार करून एक तरी मूल मला पाहिजेच असं सुनावलं. यावर पतीने तिला तुझे काम फक्त मला लैंगिक सुख देणे आहे असे बोलून मारहाण केली. मालिनीने मात्र स्वत:च्या निर्णयात बदल न करता मूल होऊ दिले. त्यासाठीही तिला फार संघर्ष करावा लागला.या केसेसचा आणि खतना प्रथेवरबंदी घालावी या न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणांचा विचार केला तर एक बाब अधिक स्पष्ट होते ती म्हणजे, महिला कोणतीही असो,कोणत्याही समाजातील असो, तिचं काम पुरुषाला लैंगिक सुख देणं हाच विचार आजही समाजात प्रस्थापित आहे.

दुसरे, काहीही करून महिलांची लैंगिकता नियंत्रित करणे,तिसरी बाब म्हणजे महिलांच्या मनाचा, भावनांचा विचार न करता तिचे लैंगिक शोषण करणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तिला लैंगिक सुखाचा अनुभव मिळू नये किंवा तिने लैंगिक सुख उपभोगू नये, यासाठी सुंता/खतनासारख्या प्रथांचा तिच्यावर दबाव टाकत तिची लैंगिकता नियंत्रित करायची. दाऊदी बोहरा समाजातील खतना प्रथा,कंजारभाट समाजातील महिलांचे विवाहपूर्व कौमार्य परीक्षण करण्याची प्रथा, एकट्या राहणार्‍या महिलांच्या लैंगिक अधिकाराबाबतचे चेंज पिटिशन,किंवा अशाच प्रकारच्या अन्य कोणत्याही प्रथा असो.त्यात महिलांच्या मानवी अधिकारांचे हनन मोठ्या प्रमाणात होतांना दिसून येते.यातीलच एक प्रथा म्हणजे स्त्रियांची खतना.

आफ्रिका आणि आशिया खंडातील एकूण तीस देशांमध्ये ही प्रथा सर्रास सुरू आहे. ज्यात महिलांचे लैंगिक अवयव अंशत:किंवा पूर्णपणे कापले जातात आणि काही ठिकाणी थेट जाळलेही जातात. या अघोरी प्रथेला खतना असे म्हणतात. भारतात ही प्रथा मुस्लीम समाजातील दाऊदी बोहरा समाजात मोठ्या प्रमाणात आढळून येते. या प्रथेच्या बळींमध्ये १५ वर्षाच्या आतल्या मुलींचे प्रमाण सर्वाधिक आहे. यात एकूण चार पद्धतीने महिलांची किंवा मुलीची खतना केली जाते. याचे मुख्य कारण म्हणजे महिलांची किंवा मुलींची लैंगिकता नियंत्रित करणे आहे. ज्या महिला ह्या सगळ्या बुरसटलेल्या विचारांवर घाव घालतात त्यांना समाजात सहजासहजी स्वीकारले जात नाही. आज समाजात एकट्या राहणार्‍या मुली/स्त्रियांची संख्या वाढत आहे. शिक्षण,करियर आणि नोकरी याला प्राधान्य देवून मुली आपला मार्ग निवडत आहेत. कुटुंबांचीही जबाबदारी पार पाडत आहे.समाजात अशा एकट्या राहणार्‍या स्त्रियांचे मानवी हक्क बर्‍याच वेळा नाकारले जातात.

त्याच्या लैंगिक हक्काबद्दल तर साधं बोलण्याची मुभाही नाही.परिणामी या सगळ्यांचा महिलांच्या शारीरिक-मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. महिलांची किंवा मुलीची खतना केली जाते तेव्हा त्याचा तिच्या आरोग्यावर होणारा परिणाम कधीच लक्षात घेतला जात नाही. उलटह्या सगळ्या प्रथा धर्मात आणि धार्मिक ग्रंथात दिलेल्या आहेत म्हणून त्या पाळल्या पाहिजेत असा दबाव मुलींवर टाकला जातो.कुटुंबाच्या प्रतिष्ठेचे कुभांड रचले जाते.या कुप्रथांचे लोढणे महिलांवर लादले जाते.खतना याविषयाला घेऊन सहियो नावाची संस्था काम करते. त्यांचे संकेतस्थळ पाहिले तर त्यावर अनेक महिलांनी त्याची आपबीती त्यांच्या शब्दात मांडली आहे.खतना सारखीच सुंता ही प्रथा मुस्लीम धर्मात पुरुषांच्या बाबतीतही आहे. महिलांच्या खतनाविरोधात गेल्या दोन वर्षांपासून मोठ्या प्रमाणात चर्चा होतांना दिसत असताना, पुरुषांच्या सुंतेविषयी काहीच बोललं जात नाही. या दोन्हींत नेमका काय फरक आहे का? हे जाणून घेतले असता, मुलांची सुंता ही कुठल्याही प्रकारे लैंगिक भावभावनांशी,लैंगिक सुखाशी संबंधित नाही.तसेच त्यांच्या कुठल्याच जनन अंगावरही परिणाम होत नाही.त्याच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होत नसल्याचं डॉक्टर सांगतात.

मात्र, महिलांची खतना ही प्रथा पुरुषी मानसिकतेतून आलेली आहे.खतना करण्यामागचे मुख्य कारण स्त्रियांची लैंगिकता नियंत्रित राहावी,हा आहे. खतना करताना महिलांचे जनेंद्रिय जितके खोल कापले गेले असेल,तितका जास्त त्यांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो.खतना झालेल्या महिलांना शरीरसंबंधांच्या वेळेस,प्रसूतीच्या वेळेस असह्य वेदनांना सामोरे जावे लागते.त्यामुळे पुरुषाची खतना आणि महिलांची खतना यात फरक आहे.जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालनुसार महिलांची खतना/सुंता याचा त्याच्या आरोग्यावर केवळ आणि केवळ दुष्परिणामच होतो असे स्पष्ट केले आहे. खतना झाल्यानंतर मुलींना प्रचंड वेदना,सातत्याने रक्तस्त्राव,संसर्ग,मानसिक ताणतणावाला सामोरे जावे लागते.काही वेळा यात मुलीचा मृत्यूही होतो.सर्वोच्च न्यायालयाने केलेली सुनावणी या सगळ्या दृष्टीने खूप महत्वाची आहे.ही प्रथा देशातच नव्हे तर जगात यावर बंदी घालणे गरजेचे आहे.यासोबतच समाजामध्ये महिलांच्या लैंगिक अधिकाराविषयी मोकळेपणाने बोलणे ते समजून घेणे ही भूमिका रूढ होणेही गरजेचे आहे. हा प्रश्न केवळ महिलांच्या लैंगिक अधिकारांशी संबंधित नसून तो महिलांच्या मानवी हक्कांशी संबंधित आहे. या प्रथा म्हणजे महिलांच्या घटनात्मक अधिकारांचे हनन आहे.


– रेणुका कड

(लेखिका सामाजिक कार्यकर्त्या आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -