रे बाबल…!

रे बाबल...! ही हाक कानी येताच आताही टचकन डोळ्यात पाणी येते... जीव घाबराघुबरा होऊन जातो. तीन चार मिनिटे काही सुचेनासे होते. तो या जगात नाही, ही कल्पनाच सहन होत नाही. सत्यकथेच्या पलीकडची ही गोष्ट आहे. माणसाचे पाय जमिनीवर घट्ट रोवून धरणारी आणि माणसाचे माणूसपण जिवंत ठेवणारी!

Mumbai
Social work

आम्ही कुर्ला चुनाभट्टीला राहत होतो. स्वदेशी मिलच्या पाठच्या बाजूच्या डोंगरावरील झोपडपट्टीत. त्याला चाळ हे नाव फक्त कागदोपत्री. मी आणि माझे बाबा मोठ्या काकांच्या सोबत राहत होतो. आई आणि भावंडे गावाला वेंगुर्ल्याला. घरातील आणि आजूबाजूची सारी माणसे मिलमध्ये काम करणारी..सकाळी सात आणि तीनचा मिलचा भोंगा ऐकून आपली कामे ठरवणारी आजूबाजूची कष्टकरी माणसे. महिन्याच्या शेवटी दातावर मारायला पैसा नाही आणि प्रत्येकी घरात पाच सहा माणसे खाणारी, पण आत्महत्येचा विचार न कधी शिवला नाही आणि एकमेकांची गरज भागवताना हात कधी आखडला नाही, असे ऐंशीच्या दशकातील दिवस होते…मिल कामगारांचा भयानक संप याच काळात आम्ही सार्‍यांनी अनुभवलेला. या काळात तो मोठा होत होता. जाणीवेने आणि वयाने. माझ्यापेक्षा एक वर्षांनी मोठा. माझ्या मोठ्या काकांचा मोठा मुलगा. बाळा! मुंबई महापालिकेच्या वक्तृत्व स्पर्धेत आमच्या चुनाभट्टीच्या शाळेने सहभाग घेतलेला. झोपडपट्टीतील मुले, त्यामुळे अंगी परिस्थितीने रुजलेला धीटपणा.

बाळा त्या स्पर्धेत मुंबईतून पहिला आला…पेपरमधील त्याचा फोटो चुनाभट्टीचा कौतुकाचा विषय होता. तो धीट तर होताच; पण त्याचे काळीज आईच्या मायेचे होते. त्या वयातही ते दिसत होते… साने गुरुजींसारखे… सगळ्या जगाला प्रेम अर्पण करणारे! मला संजय म्हणण्याऐवजी, रे बाबल! ही त्याची हाकही त्याचीच साक्ष होती. आम्ही सरळ रेषेत शिकत होतो आणि तो शिकता शिकता आयुष्य उलटेपालटे करून पाहण्याचे धडे गिरवत होता… त्याने ठरवले असते तर अंगभूत प्रतिभेच्या जोरावर तो रूढार्थाने मोठा माणूस झाला असता… आजूबाजूच्या जगासारखा. गाडी, घर आणि उत्तम बँक बॅलन्स असलेला. पण, तसे जगेल तो बाळा कसला? पदवीधर होण्याच्या आणि त्यानंतरच्या दोन एक वर्षाच्या काळात त्याने घरातले आणि दारातले सांगतात म्हणून उगाचच नोकरी करण्याचा प्रयत्न केला; पण हे आपले काम नाही, इतकी अस्वस्थता त्याच्या देहबोलीत दिसायची… पण आपले दुःख त्याने कधीच बोलून दाखवले नाही. आमची घरची कशीबशी जगवणारी परिस्थितीही त्याला तशी बोलू देत नव्हती!

आणि त्याने आपला मार्ग पक्का केला… आपल्याच विचारांच्या, सामाजिक बांधिलकीची जाण असलेल्या मुलीबरोबर लग्न करून दोघांनी मिळून आदिवासींचा संसार सावरण्याचा निर्णय घेतला. आमच्यासाठी ही धक्कादायक गोष्ट होती. पण, बाळा शांत होता. घरात खूप आदळाआपट झाली… पण त्याने हू कि चू केले नाही. त्याच्या डोळ्यासमोर आपल्याला आयुष्यात काय करायचे आहे, हे भान पक्के होते. कर्जतजवळील एका आदिवासी गाव मेचकरवाडीत पूर्ण वेळ काम करण्याचे त्याने निश्चित केले. जंगल, मजुरी, अंधश्रद्धा, दारूचे व्यसन आणि यामधून आयुष्याला चिकटलेली गोचडीसारखी रक्तपिपासू गरिबी! अंधाराच्या या काळ्याकुट्ट जगातून आदिवासींना प्रकाशाकडे नेण्याचा मार्ग बाळाने दाखवला. त्यांच्यातला तो एक झाला! त्यांची कुडाची घरे त्यांनी पक्की केली. स्वच्छ पाणी पिण्याची सोय त्याने निर्माण केली. मुख्य म्हणजे दारू पिऊन बरबाद झालेल्या थोरल्या आदिवासींना सुधारण्या बिधारण्याच्या भानगडीत न पडता त्यांच्या धाकटी पाती म्हणजे त्यांच्या मुलांना पायावर उभे करण्याचा निर्णय घेतला.

शाळेचे तोंडही न पाहणार्‍या मुलांना त्याने शिक्षणाचा रस्ता दाखवला. आधी जिल्हा परिषद, नंतर हायस्कूल, आयटीआय आणि हुशार मुलांना कॉलेजमध्ये घातले. याच दरम्यान आपणही छोटा मोठा व्यवसाय करून या सर्व कामासाठी लागणारा पैसा बाळा उभा करत होता आणि त्याच्या आदिवासी मायेला समजून घेणारी त्याची बायको सुरेखा शहरी भागात राहून शिकवण्या करत होती… बाळा, ती आणि तिची दोन मुले या चौघांचा संसार तिने एकटीने चालवला आणि बाळाच्या मागे ती समर्थ सावलीसारखी उभी राहिली. याच दरम्यान शनिवार, रविवारी दोन्ही मुलांना काखेत मारून सुरेखा आदिवासींबरोबर एक होऊन राहिली.बाळाच्या नजरेखाली आदिवासी मुले मोठी होत होती… त्यांना जगण्याचा मार्ग कळला होता आणि हा मार्ग दारू आणि अंधश्रद्धा यात बुडालेल्या त्या मुलांच्या घरातील मोठ्या माणसांना अंधारातून बाहेर काढत होता.

मेचकर वाडीत नव्या प्रकाशाची पहाट झाली! बाळा आणि सुरेखाच्या या कामाने प्रभावित होऊन त्याच्या दोन लहान भावंडानी सरिता आणि शैलेशनेही मेचकरवाडीसाठी आपला वेळ आणि आर्थिक मदत देण्यास सुरुवात केली. हा हा म्हणता आदिवासी मुले शिकून सावरून शिक्षक, प्रोफेसर, सरकारी कर्मचारी आणि काही छोटे व्यावसायिक झाले… आता त्यांना नीट जगणे कळले होते. याच दरम्यान बाळाने वर्षाला एक मोठे आरोग्य शिबीर मेचकर वाडीत घेण्याचा निर्णय घेतला आणि मला या शिबिराला बोलावले… तोपर्यंत तो नक्की काय काम करत आहे, याचा पत्ता लागू दिला नव्हता. त्याला न बोलता ते सगळे दाखवायचे होते. मुंबईतील नामांकित हॉस्पिटलमधील डॉक्टर तिथे नेऊन बाळाने आता आरोग्यावर काम करायला सुरुवात केली होती. तपासणीनंतर ज्यांना गंभीर आजार आहे, अशांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापासून त्यांची मायेने काळजी घेण्याचे काम तो करत करायचा.

आता पूर्णवेळ शैलेशही त्याच्या सोबत होता. सुरेखाही दसरा आणि दिवाळीला आपल्या घरात दिवे पेटले पाहिजेत, याची काळजी न करता फराळ, कपडे, पुस्तके घेऊन आदिवासींसोबत प्रकाशाचा आनंद घेत होती… दोन तपाच्या अथक मेहनतीनंतर बाळाने मेचकरवाडी सक्षम केली होती…, आता दारू पाजून त्यांना कोणी फसवणार नव्हते, शासकीय योजना घरापर्यंत कशा आणायच्या, याची जाण त्यांच्या नव्या पिढीला आली होती. गावात पहाट झाली होती…आणि बाळाला आता तिथून निघून पुन्हा अंधार दूर करण्यासाठी दुसर्‍या गावात जायचे होते… सुरेखा, शैलेश आणि सरिता सोबतीला असल्याने त्याचा आत्मविश्वास वाढला असताना आमच्या सर्वांच्या आयुष्यातील तो काळाकुट्ट दिवस उजाडला… शैलेशचा फोन आला. बाळा गेला! एक क्षण पायाखालची जमीन सरकली. काही कळेनासे झाले. शैलू धाय मोकलून रडत होता… कामानिमित्त गाडीवरून जाताना त्याचा अपघात झाला होता. त्या दिवशी उशिरा रात्री त्याचे प्रेत घरी आणले, तेव्हा आमच्यापेक्षा मेचकर वाडीतील प्रत्येक उंबर्‍याने फोडलेला हंबरडा आजही कान चिरून टाकतो… आणि त्याची ‘रे बाबल..’ ही हाक काळीज पिळवटून टाकते.