घरफिचर्सदिल का भंवर - रिअॅलिटीतलं वास्तव!

दिल का भंवर – रिअॅलिटीतलं वास्तव!

Subscribe

-सुशील सुर्वे

हिंदी-मराठी अशा कोणत्याही गाण्यांचा रतीब त्या चिमुरड्यांना त्या रिअॅलिटी शोमध्ये घालायचा होता. त्यात तो रिअॅलिटी शो सुरू झाल्या झाल्या एक गंमत झाली. पुढच्याच महिन्यात स्वातंत्र्य दिन येऊ घातला होता. त्यामुळे शोच्या दिग्दर्शकाला स्वातंत्र्य दिनाला साजेशी गाणी हवी होती. हा दिग्दर्शक म्हणजे टेलिव्हिजन उद्योगातली फक्त बिझनेस कॅलक्युलेशन्स जाणणारा कॅलक्युलेटर होता. चार्ज केला आहे म्हणून लुकलुकणारा. त्याच्याशी कुणी गाण्याबद्दल, संगिताबद्दल बोलायला गेलं की त्याचं चार्जिंग पार उतरायचं. काही वर्षंच झाली असतील त्या गोष्टीला.

- Advertisement -

एका चॅनेलच्या रिअॅलिटी शोचं काम चाललं होतं. शो म्हणजे काय तर दहा ते पंधरा वर्षांच्या मुलामुलींना टॅलंट हंटच्या नावाखाली कुठून कठून हुडकून काढलं होतं. त्यात एक-दोन गावाकडली चिमुरडीसुध्दा होती. त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांची गावरान निरागसता अगदी ओसंडून वाहत होती. त्यांनी त्यांच्या गाण्यातला सा लावण्यासाठी आ वासण्याआधीच चॅनेलच्या थ्री-फोर्थ घातलेल्या डिजिटल पोरी त्यांना हाऊ क्युट, हाऊ क्युट म्हणत होत्या. महाराष्ट्रातल्या दूरगामी कोपऱ्यातून त्यांनी त्या निरागसतेचा शोध घेतला होता म्हणे.

हिंदी-मराठी अशा कोणत्याही गाण्यांचा रतीब त्या चिमुरड्यांना त्या रिअॅलिटी शोमध्ये घालायचा होता. त्यात तो रिअॅलिटी शो सुरू झाल्या झाल्या एक गंमत झाली. पुढच्याच महिन्यात स्वातंत्र्य दिन येऊ घातला होता. त्यामुळे शोच्या दिग्दर्शकाला स्वातंत्र्य दिनाला साजेशी गाणी हवी होती. हा दिग्दर्शक म्हणजे टेलिव्हिजन उद्योगातली फक्त बिझनेस कॅलक्युलेशन्स जाणणारा कॅलक्युलेटर होता. चार्ज केला आहे म्हणून लुकलुकणारा. त्याच्याशी कुणी गाण्याबद्दल, संगिताबद्दल बोलायला गेलं की त्याचं चार्जिंग पार उतरायचं. संगीताचा विषय त्याच्याकडे कुणी काढला की तो फोर-कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचा. लाइट्सबद्दल बोलायचा. कॉस्च्युमबद्दल बोलायचा. पण संगिताबद्दल ब्र काढायचा नाही. बरं, त्याच्या ह्या ब्र न काढण्याबद्दल सेटवर कुणीही ब्र काढायचं नाही, कारण तो शोचा दिग्दर्शक होताच, पण चॅनेलमधल्या बड्या हस्तीचा उजवा हस्तक होता. मग तर कोण कशाला त्याच्या संगिताच्या अज्ञानाबद्दल आणि ज्ञानाबद्दलही बोलतोय!

- Advertisement -

…तर ह्या दिग्दर्शकाने फतवा काढला, म्हणाला, स्वातंत्र्य दिन येतोय, ह्या सगळ्या सूर निरागसांकडून स्वातंत्र्य दिनाची गाणी गाऊन घ्या, आपल्या चॅनेलवर आपण एकदम जोशात स्वातंत्र्य दिन साजरा करूया. झालं, सगळे कामाला लागले. निरागसांच्या रिहर्सल्स सुरू झाल्या. निरागसांबरोबर निरागसांचे आईबाप, दादा, ताई, मास्तर, अंकल असा सगळा सपोर्ट स्टाफ तिथे दाखल झाला.(सपोर्ट स्टाफ हल्ली काय फक्त क्रिकेट टीमलाच असतो?) सपोर्ट स्टाफने स्वत:कडली स्वातंत्र्यदिनाची गाणी काढली. ती सगळी निरागसांना गाऊन दाखवली. निरागसांकडून गाऊन घेतली. अर्थात, गाणी जुनी, म्हणजे पार पुराणीच. सगळा निरागस लॉट जन्माला येण्याच्या खूप आधीची. पण निरागसांनी ती गाणी आपल्या गळ्यात घोटवून घोटवून रुळवली, किमान रिअॅलिटी शोसाठी तरी तना-मनात बिंबवली, कट-पेस्ट केली.

ऐ वतन, ऐ वतन, तुझको मेरी कसम…कर चले हम फिदा जानो तन साथियो…मेरे देश की धरती, सोना उगले, उगले हिर मोती…अजिंक्य भारत, अजिंक्य जनता ललकारत सारे…हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे…अशा बर्याच गाण्यांचा स्टॉक सपोर्ट स्टाफने निरागसांच्या दिमतीला हजर केला. पण त्यातली दोन गाणी रिहर्सलला भलतीच भाव खाऊन जायची…एक म्हणजे मुकेशचं- छोडो कल की बाते, कल की बात पुरानी, नये दौर पे लिखेंगे हम मिल कर नयी कहानी, हम हिंदुस्थानी…आणि दुसरं लता मंगेशकरांचं- वंदे मातरम, सुजलाम , सुफलाम, सस्य शामलाम, मातरम, वंदे मातरम…असं ’आनंदमठ’मधलं सुरांचं अणकुचिदार नक्षीकाम केलेलं.

रिहर्सल्स दरम्यान दिग्दर्शक मध्येच टपकायचा. निरागस कंपनीच्या ह्या दोन गाण्यांवर मान डोलवायचा…आणि फोर कॅमेरा सेटप असं काहीसं पुटपुटत तिथून पसार व्हायचा. एकदा मात्र तो जाता जाता तिथे थांबला, म्हणाला, ‘ही गाणी जुनी आहेत ना?‘…खरं तर त्याला म्हणायचं होतं, ‘ती जुनाट आहेत ना?‘ मग त्याने दिग्दर्शक म्हणून त्याचं अस्तित्व दाखवत त्याच्या राकट आवाजात सुचवलं, ‘हे ’ हम हिंदुस्थानी’ आणि ‘वंदे मातरम’सारखी गाणीं आजच्या मार्केटमध्ये नाहीत का?

दिग्दर्शकाच्या कॅलक्युलेटेड नजरेसमोर आजचा टार्गेटेड प्रेक्षक म्हणजे जीन्स-टी-शर्टातली तरूणाई होती. दिग्दर्शकाच्या पंटर कंपनीने लागलीच माहिती पुरवली, म्हणाले, शंकर महादेवनचं ‘सब से आगे होंगे हिदुस्थानी’…आणि ए.आर.रेहमानचं ‘वंदे मातरम्’ आहे ना!

झालं, निरागस कंपनी ते महादेवनी ‘सब से आगे होंगे हिंदुस्थानी’ आणि रहेमानी ‘वंदे मातरम्’ जमेल तेवढं सुश्राव्य घोकू लागली. पण मुकेशच्या ‘हम हिंदुस्थानी’मधला आतपर्यंत पोहोचून झिरपत राहणारा हळवा सूर महादेवनच्या ‘हम हिंदुस्थानी’मध्ये काही निरागसांना मिळेना… आणि दुसरीकडे लता मंगेशकरांच्या ‘वंदे मातरम’मधला रोम रोम थरारून टाकणारा तो नाद रेहमानच्या ‘वंदे मातरम’मध्ये सापडेना! निरागस कंपनीचे चेहरे उतरले. त्यांच्या खळ्ळ् खट्याक ठिकरऱ्या ठिकऱ्या झाल्या.

दिग्दर्शकाने निरागसांना स्वत:च निरागस प्रश्न केला, ‘काय झालं, नाही जमत का ती गाणी?‘

बहुतेक निरागसांनी मौन पत्करलं. पण त्यातला एक पुढे आला, त्याने सगळ्यांचं प्रतिनिधित्व करताना म्हटलं, ‘ती गाणी गाताना जितकी मजा येते नि जोश येतो ना तितका ही गाणी गाताना येत नाही म्हणून आम्ही…’

आता दिग्दर्शकाच्याच चेहर्याचं खळ्ळ खट्याक झालं होतं. आजचं मार्केट कळणार्या त्या तरूण माणसाला संगीत कळत नव्हतं, पण आज हे कळून चुकलं होतं की स्वातंत्र्य दिनाची गाणी ही स्वातंत्र्य मिळाल्याच्या त्या ताज्या ताज्या काळातल्या लोकांनीच अजरामर करून ठेवली. काळजापर्यंत पोहोचवली. आजच्या माइंडब्लोविंग, ऑसम, चाबूक वगैरे लोकांनी तशी गाणी केली; पण ती नुसती कानावर आदळली आणि काळजापर्यंत न पोहोचताच आपापल्या पेनड्राइव्हमध्ये गुडूप झाली. स्वातंत्र्य दिनाला त्या जुन्याच गाण्यांना मार्केट आहे, स्वातंत्र्य दिनाला हे नवे लोक म्हणजे डाउन मार्केट आहेत. अगदी निरागसांच्या नजरेतूनही!

तो खुर्चीवरून उठला आणि म्हणाला, ‘शिट्!‘

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -