घरफिचर्सदिल का भंवर बाबुजींचं चिरंतन गाणं!

दिल का भंवर बाबुजींचं चिरंतन गाणं!

Subscribe

बाबुजींनी आपल्या संगिताचा बाज काळाप्रमाणे बदलत नेला,म्हणून बाबुजींचं संगीत लोकप्रिय झालं,लोकांच्या मनात घर करून राहिलं.अगदी आजच्या टेक्नॉलॉजिकल संगिताच्या काळातही बाबुजींचं गाणं वाजतगाजत राहिलंय हे विशेष !

टीव्ही कल्पनेतसुध्दा नव्हता तेव्हाचा तो रेडिओचा काळ.भरजरी गीतसंगिताचा.अशा काळातल्या वातावरणात सुधीर फडकेंचं गाणं जन्माला आलं.तत्वाचं,सत्वाचं गाणं होतं ते. नको तिथे झुकणारं, वाकणारं गाणं नव्हतंच ते. नको ती तडजोड,मोडतोड झालेलंही गाणं नव्हतं ते. एका सरळ रेषेत आलेलं,सुरेल,सुंदर,प्रवाही गाणं असायचं ते.
अर्थात,तो जमानाच तसा होता. शब्दातलं, भाषेतलं सौंदर्य लक्षात घेऊन त्यावर संगिताचा साज देताना ते सौंदर्य अधिक कसं वाढेल, ह्याची काळजी घेणार्‍या लोकांचा तो जमाना होता.सुधीर फडके हे अशाच एका जमान्यातलं एक ठळक,लखलखणारं नाव होतं.इकडची तिकडची चारदोन गिर्रेबाज गाणी करून नाहक झगमगणारं नाव नव्हतं. ह्यासाठी किती गाण्यांची साक्ष काढायची!…धुंदी कळ्यांना,धुंदी फुलांना,शब्दरूप आले मुक्या भावनांना; ’मधुराणी तुला सांगू का? तुला पाहून चाफा पडेल फिका’; आकाशी झेप घे रे पाखरा,सोडी सोन्याचा पिंजरा; पान जागे फूल जागे,भाव नयनी जागला,चंद्र आहे साक्षीला…गाण्यांची नुसती फौजच आहे तशी साक्ष द्यायला!

सुधीर फडके म्हणजे सर्वांचे लाडके बाबुजी. त्यांच्या गाण्यातून, त्यांच्या संगितातून नेहमीच त्यांचा एक स्वभाव दिसून आला आहे. शुध्द आणि सात्विक स्वरांचा. त्यांनी गायलेलं कोणतंही गाणं घ्या,त्यातल्या प्रत्येक शब्दाचा उच्चार शुध्द आणि सुस्पष्ट. त्यांनी त्यांच्या किंवा दुसर्‍या संगीतकाराच्याही संगीतात गायलेल्या गाण्यातला शब्द ऐकणार्‍याला पुसटसा किंवा अंधुकअधुरा ऐकू आला आहे असं कधीच घडलेलं नाही. आज राणी पुर्वीची ती प्रीत तू मागू नको, सखी मंद झाल्या तारका,देहाची तिजोरी’.बाबुजी म्हटलं की अशी अनेक गाणी कानामनात तरळू लागतात. पण त्यातलं कोणतंही गाणं ऐकताना आपण ते गाणं टिपण्यासाठी कागद आणि पेन घेऊन बसलो की बाबुजींनी उच्चारलेला एखादा शब्द आपल्याला नीटसा कळला नाही असं होणं केवळ अशक्य.आशा भोसलेंसारख्या गायिकेने जाहीरपणे त्यांच्या गाण्याची नक्कल करताना नक्कल कशाची केली तर त्यांच्या शुध्द उच्चारणाची.

- Advertisement -

शब्दांच्या उच्चारणाबद्दल काटेकोर असलेले बाबुजी भाषेतल्या अचूकतेबद्दल कसे आग्रही होते, ह्याचा एक किस्सा सांगण्यासारखा आहे. १९८७-८८साल असावं ते. टीव्हीवर तेव्हा रामायण ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. अशाच सुमारास एका प्रसिध्द वर्तमानपत्रात काम करणारी एक पोरसवदा पत्रकार त्यांच्याकडे आली. तिने बाबुजींच्या गीतरामायणाबद्दल त्यांची मुलाखत घेतली आणि बाबुजींनी तिला ती मुलाखत लिहून झाल्यावर त्यांना दाखवण्यासाठी यायला सांगितलं होतं.बाबुजींनी ती मुलाखत वाचायला घेतली. त्या पत्रकार मुलीने मुलाखतीची प्रस्तावना लिहिताना लिहिलं होतं-आजच्या टीव्हीवरच्या महाभारताप्रमाणेच बाबुजींचं रेडिओवरचं गीतरामायणही भयंकर लोकप्रिय झालं होतं. बाबुजींनी हे वाक्य वाचलं आणि तात्काळ त्या मुलीकडे पेन मागितलं.लोकप्रिय ह्या शब्दाच्या आधी आलेल्या भयंकर ह्या भयप्रद विशेषणावर त्यांनी काट मारली आणि तिला अतिशय नम्रपणे म्हणाले, ह्यातला भयंकर हा शब्द मी खोडला आहे,पण तो तुमच्या वर्तमानपत्रात छापून येणार नाही ह्याची खात्री करून घ्या.

वास्तविक तो शब्द त्या पत्रकाराने त्या मुलाखतीत बाबुजींच्या तोंडी घातलेलाही नव्हता, पण तरीही भाषेच्या,शब्दांच्या बाबतीत काटेकोर असलेल्या बाबुजींनी तो शब्द काढायला लावला.माझ्यासमोर घडलेला तो किस्सा होता. माझ्या मनात आलं की भयंकर हा शब्द खोडून बाबुजींना अतिशय असा शब्द घालता आला असता आणि आपलं गीतरामायण अतिशय लोकप्रिय अशी आपली टिमकी वाजवता आली असती. पण तेही बाबुजींनी सहजपणे टाळलं.बाबुजींनी ज्योतीकलश छलके सारखं स्वरालंकारांनी सजलेलं-धजलेलं,लकलकणारं गाणं हिंदीत केलं होतं आणि ते स्वरसमा्रज्ञी लता मंगेशकरांनी गायलं होतं.खुश है जमाना आज पहली तारीख है,हे किशोरकुमारच्या आवाजातलं गाणंही बाबुजींच्या संगीतातलं आहे हे कळतं तेव्हाही आजच्या काही लोकांच्या भुवया वर जातात.पण बाबुजींनी त्या काळात हिंदी गाणीही केली होती ही वस्तुस्थिती आहे.

- Advertisement -

बाबुजींनी आपलं संगीत ज्या काळात सुरू केलं, त्या १९४०-४५ च्या काळात गजाननराव वाटवे आणि त्यांचं वारा फोफावला हे गाणं फॉर्मात होतं. पण बाबुजींनी आपल्या संगिताचा बाज काळाप्रमाणे बदलत नेला,म्हणून बाबुजींचं संगीत लोकप्रिय झालं,आजही लोकांच्या मनात घर करून राहिलं.बाबुजींनी पुढे शापितसाठी दिस जातील,दिस येतील,भोग सरल,सुख येईल ह्यासारखं वेगळंच गाणं केलं. पुढचं पाऊलसाठी एकाच ह्या जन्मी जणू,फिरूनी नवी जन्मेन मी ह्यासारखं नितांतसुंदर गाणं दिलं.बाबुजींच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने आज ह्या सगळ्याची आठवण मनात गडद झाली!…


-सुशील सुर्वे

(लेखक संगीत अभ्यासक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -