घरफिचर्सरोगापेक्षा राजकारणच जड ठरणार का?

रोगापेक्षा राजकारणच जड ठरणार का?

Subscribe

बिहारमध्ये आलेल्या मेंदूज्वराच्या साथीने सुमारे १२५ मुलांचा बळी घेतला आहे. ही मेंदूज्वराची साथ नेमकी कशामुळे आली याबद्दल डॉक्टर, तज्ज्ञांमध्ये मतभिन्नता आहे. मात्र, ही विषाणूजन्य साथ असल्याचे सर्वांचेच एकमत आहे. या विषाणूंची पैदास अस्वच्छ ठिकाणी होत असते. कचर्‍याचे ढीग, उकिरड्यावर हे विषाणू पोसले जातात. त्यांना प्रतिबंध करायचे असले तर स्वच्छता हाच प्रमुख उपाय आहे. त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे मेंदूज्वर बळावला गेला आहे. या मेंदूज्वरावरील उपाय राजकारण नाहीतर स्वच्छता हा आहे. त्यासाठी श्रीमंतापासून गरिबांपर्यंत सर्वांनीच प्रयत्नशील रहायला हवे.

मेंदूज्वराने बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये थैमान घातले आहे. या तापामुळे आतापर्यंत सुमारे १२५ लहान मुले मृत्युमुखी पडली आहेत. मात्र, हा ताप नेमका कशामुळे येतोय आणि तो इतका प्राणघातक का झालाय, याचे उत्तर डॉक्टरांसकट कोणालाही नाही. काही डॉक्टरांनी त्याचे निदान उपाशीपोटी खाल्ल्या गेलेल्या लिची फळाला दिले आहे. उपाशीपोटी लिची खाल्ल्यामुळे त्यातील विष लहान मुलांमध्ये भिनले. त्यामुळे शरीरात साखर निर्माण होण्याच्या प्रक्रियेला बाधा निर्माण झाली आणि मेंदूज्वराने उचल घेतली, असा काही डॉक्टरांचा अंदाज आहे, तर काही डॉक्टरांनी याचा दोष हा बिहारमध्ये आलेल्या उष्णतेच्या लाटेला दिलेला आहे. उष्णतेच्या लाटेमुळे शरीरातील पाणी कमी होऊन ही मुले मेंदूज्वराला बळी पडली असे मत काही डॉक्टरांनी व्यक्त केले आहे, पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे या मेंदूज्वराबाबत अद्याप तरी बिहार आणि केंद्र सरकारला तोड मिळालेली नाही. हे सत्य आहे. त्यामुळे गरीब घराची लहान मुले मृत्युमुखी पडत असून, दुसर्‍या बाजूला या संपूर्ण घटनेचे राजकारण सुरू झाले आहे. काँग्रेससह विरोधी पक्षांनी यावरून केंद्रातील मोदी आणि बिहारमधील नितीशकुमार सरकारला धारेवर धरायला सुरुवात केली आहे. एक विरोधी पक्ष म्हणून त्यांची सरकारवर अंकुश ठेवण्याची भूमिका योग्यही आहे, पण त्यामुळे या मेंदूज्वरावर खरंच उपाय मिळणार आहे का? की हा मेंदूज्वर आटोक्यात येणार आहे. त्यामुळे त्यावर राजकारण करणे योग्य आहे का?

२००९ सालात देशात असेच काहूर माजलेले होते. तेव्हा कोणाला मुझफ्फरपूर येथे मेंदूरोगासारख्या बालरोगाची साथ असल्याचे ठाऊक नव्हते. त्यावेळी देशात स्वाईन फ्लू नावाची प्रणघातक साथ आलेली होती आणि कुठल्याही महानगरात लोक तोंडावर कपडा झाकूनच फिरत वावरत होते. या साथीच्या आजाराचा अकस्मात फैलाव होईल अशी तत्कालीन सरकारला कल्पना नव्हती आणि जेव्हा त्याची लागण झालेले रुग्ण आढळू लागले, तेव्हा धावपळ सुरू झाली. त्या आजाराचा पहिला बळी पुण्यात पडलेला होता. मात्र, त्या रुग्णाला स्वाईन फ्लूची बाधा झालेली असली, तरी त्याचा बळी त्या आजाराने घेतलेला नव्हता. अज्ञान व अर्धवट अकलेने त्याला मृत्यूच्या दाढेत ढकलून दिले होते. त्या रुग्णाचे नाव रिदा शेख असे होते. ती कुठल्या दुर्गम खेड्यातल्या अडाणी मातापित्यांच्या पोटी जन्माला आलेली मुलगी नव्हती, की घरात अठराविश्वे दारिद्य्र नव्हते. चांगल्या घरची श्रीमंती होती आणि पुण्यातल्या अत्यंत नामवंत अत्याधुनिक इस्पितळात तिच्या पालकांनी धावपळ करून रिदाला उपचारार्थ दाखल केलेले होते. तिथे प्राणवायूचा तुटवडा नव्हता की कुठल्या औषधे व साधनांची कमतरता नव्हती. अतिशय निष्णात डॉक्टर रिदावर उपचार करत होते आणि रिदा शुद्धीत येण्यापूर्वीच इहलोकीची यात्रा संपवून निघून गेली. तिच्या मृत्यूचे कारण चुकीचे रोगनिदान आणि डॉक्टरांची बुद्धीवादी अंधश्रद्धा असेच होते. ही अवस्था सुशिक्षित डॉक्टरांची असेल, तर ज्यांना वैद्यकीय शास्त्रातले काहीही उमजत नाही, अशा तथाकथित शहाण्यांनी आपल्या अडाणीपणाचे प्रदर्शन मांडल्यावर काय होईल? आज मुझफ्फरपूर बालमृत्यूच्या बाबतीत रस्त्यावरचा कोणीही जाणता व विशेषज्ञ झालेला आहे.

- Advertisement -

गेल्यावर्षी उत्तर प्रदेशच्या गोरखपूर भागात आणि पूर्व उत्तर प्रदेशात एका भयंकर बालरोगाने थैमान घातले होते. त्यात दोन दिवसात मिळून ३० मुलांचा मृत्यू झाला. त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व आरोग्यमंत्री सिद्धार्थनाथ सिंग यांना लक्ष्य बनवण्यात आले. एकूणच असा सूर लावला गेला की, जणू याच दोघांनी त्या प्राणघातक आजाराचे विषाणू त्या परिसरात आणून टाकलेले आहेत. त्यामुळे बालकांना मृत्यूच्या दाढेत ढकलले जात आहे. संकट भयंकर आहे आणि त्याची व्याप्ती गंभीर आहे. त्यात सरकारी यंत्रणेची दिरंगाई व हलगर्जीपणा नक्कीच झालेला आहे. पण हे संकट नवे नाही आणि आज ज्यांनी त्यासाठी टाहो फोडलेला आहे, त्यांना यापूर्वी असे काही भयंकर संकट असल्याचा सुगावाही कधी लागलेला नव्हता. अशा काळात म्हणजे मागल्या सोळा सतरा वर्षांत त्याच भागातले खासदार म्हणून योगी आदित्यनाथ यांनी त्यावर संसदेत सातत्याने आवाज उठवलेला होता. चर्चा घडवून आणलेल्या होत्या. त्या चर्चेची किती माध्यमांनी व आरोपकर्त्या शहाण्या लोकांनी दखल घेतली होती? जे मागील कित्येक वर्षे या समस्येकडे वा संकटाकडे ढुंकून बघायला तयार नव्हते, तेव्हा एकच माणूस त्यासाठी आक्रोश करीत होता, तर त्यालाच या आजाराचा पत्ता नसल्याचा कांगावखोरपणा चालला आहे. मुद्दा इतकाच की, मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री म्हणून अशा आजाराचे निर्मूलन करणे व प्रतिबंध घालणे ही नक्कीच आदित्यनाथ यांची जबाबदारी आहे, पण दुसरीकडे आपल्या मुलाबाळांना अशा आजाराची बाधा होऊ नये, ही सामान्य नागरिकांची जबाबदारी वा कर्तव्य आहे की नाही? या पालकांनी आपल्या बालकांच्या आरोग्यासाठी आजवर कोणते प्रयत्न केलेत? की त्यापैकी बहुतांश नागरिक अशा आजारांना आमंत्रण देण्यात पुढे असतात? देश निष्क्रिय व नाकर्त्या नागरिकांमुळे सार्वभौम होत नसतो की स्वावलंबी होत नसतो.

दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त साधूनच स्वच्छ भारताची घोषणा केलेली होती. त्यात त्यांनी प्रत्येक भारतीय नागरिकाला आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी व कचर्‍याचे नियोजन करण्यासाठी आवाहन केले होते. किती नागरिक त्याला प्रतिसाद देऊन पुढे आले? रोगबाधा झालेल्या नागरिकांना आरोग्यसेवा पुरवणे ही सरकारची जबाबदारी आहेच, पण आपल्या प्रयत्नातून आपण निरोगी राहणे, हे नागरिकाचेही कर्तव्य नाही काय? आपला परिसर शक्य तितका स्वच्छ राखला, तर रोगराई पसरणार नाही. त्यात सामान्य नागरिक जितके योगदान देऊ शकतो, तितकी सरकारी यंत्रणाही काम करू शकत नाही. मागली चार दशके गोरखपूर व पूर्व उत्तर प्रदेशात या रोगाची साथ पावसाळ्यात येत असेल तर त्यापूर्वीच कचर्‍याचे नियोजन करून रोगबाधेला प्रतिबंध घालण्याचे कर्तव्य नागरिकांचे नाही काय? त्यांच्या मुलांना आजाराची बाधा झाल्यावर डॉक्टरकडे घेऊन जाण्यापुरते पालकांचे कर्तव्य असते काय? या रोगाचा प्रादुर्भाव घाण व उकिरड्यातून होत असेल, तर त्यालाच आवर घालण्यातून अधिक परिणाम मिळू शकतात. हे नागरिकांचे कर्तव्य नाही काय? की घाण कचरा करणे व त्याचे ढीग उकिरडे उभे करण्याचे अधिकार आपल्याला मिळालेले आहेत? रोगाला आमंत्रण त्यातून मिळते हे कोणी सांगावे? इतक्या आवेशात इस्पितळ वा सरकारला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केल्याने पुढल्या वर्षी हाच आजार बालकांचे बळी घेणार नाही, अशी कोणाची समजूत आहे काय? सवाल रोगाच्या प्रतिबंधाचा आहे आणि त्यात नागरिक मोठी भूमिका पार पाडू शकतात.

- Advertisement -

आज मुझफ्फरपूर येथे आलेल्या मेंदूज्वराच्या साथीला विषाणू जबाबदार असल्याचे सांगितले जाते. शेकडो मुलांचे प्राण घेणारा मेंदूज्वर विषाणूंमुळे फैलावलेला आहे. या विषाणूंच्या वाढीसाठी अस्वच्छता हे मुख्य कारण आहे. मृत्युमुखी पडलेली मुले ही कचर्‍याच्या ढिगार्‍यांवर, कचरा टाकण्याच्या ठिकाणी नेहमी खेळत असल्याचे आढळून आले आहे. त्या कचर्‍यामुळेच या मुलांना मेंदूज्वराची लागण झाली आहे. इतकेच काय पण ज्या सरकारी रुग्णालयात या मुलांना दाखल करण्यात आले होते, त्या रुग्णालयाला लागूनच मोठ्या प्रमाणात कचर्‍याचे ढीग असल्याचे दिसून आले आहे. अस्वच्छता हे या रोगाचे प्रमुख कारण आहे. ती तशीच राखायची की परिसर स्वच्छ करून रोगाला प्रतिबंध करायचा हे तेथील नागरिकांच्या हाती आहे. त्यादृष्टीने लोकजागृती करून स्वच्छता मोहिमेत अधिकाधिक लोकांना सहभागी करून घेेणे महत्त्वाचे आहे. नाहीतर रोगापेक्षा राजकारणच जड ठरणार आहे. अशा राजकारणात बळी गेलेल्यांचा आक्रोश कोणाच्याच कानावर पडणार नाही.

Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -