घरफिचर्सअ‍ॅलेक्सा, डू यू गेट धिस ?

अ‍ॅलेक्सा, डू यू गेट धिस ?

Subscribe

आर्टिफिशियल इंटिलिजन्सची धमाल पाहून मला कमाल वाटली. मी लहान मुलाच्या उत्सुकतेने अ‍ॅलेक्साशी बोलू लागलो. अ‍ॅलेक्सा मला उत्तरं देऊ लागली. शेवटी मी तिला विचारलं- अ‍ॅलेक्सा, व्हेन आर गौरीज सिटींग? गौरी केव्हा बसणार आहेत, असा मराठमोळा प्रश्न मी कुठल्याही इंग्रजी प्राध्यापकास शोभेल अशा प्रकारे इंग्रजीत भाषांतरित करून विचारला तर ती म्हणाली, ‘सॉरी, आय डोन्ट नो अबाउट धिस.’

अगदी अलीकडेच माझ्या जवळच्या मित्र-मैत्रिणीच्या घरी गेलो होतो. हॉलमध्ये बसलो होतो तेवढ्यात आतमधून कसलासा आवाज आला. या जोडीच्या घरात हा तिसरा अनाहुत पाहुणा कोण, अशी उत्सुकता माझ्या मनात निर्माण झाली. मी आतमध्ये गेलो तर माझी मैत्रिण एका यंत्रासोबत बोलत होती. ती म्हणाली, ‘अ‍ॅलेक्सा, व्हाइट लाइट’ आणि क्षणार्धात पांढरा प्रकाशझोत पडला. मग तिनं ‘लाइट ऑफ’ सांगितलं तर लगेच अ‍ॅलेक्सानं लाइट बंद केली. ती कमांड देत होती आणि ही अ‍ॅलेक्सा तिचं ऐकत होती. काही प्रश्न विचारला की फटाफट उत्तरं देत होती. ही अ‍ॅलेक्सा म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचं ‘जिवंत’ उदाहरण. या यंत्राला ऑर्डर द्यायच्या की ही अ‍ॅलेक्सा लगेच ऐकते.

आर्टिफिशियल इंटिलिजन्सची धमाल पाहून मला कमाल वाटली. मी लहान मुलाच्या उत्सुकतेने अ‍ॅलेक्साशी बोलू लागलो. अ‍ॅलेक्सा मला उत्तरं देऊ लागली. शेवटी मी तिला विचारलं- अ‍ॅलेक्सा, व्हेन आर गौरीज सिटींग? गौरी केव्हा बसणार आहेत, असा मराठमोळा प्रश्न मी कुठल्याही इंग्रजी प्राध्यापकास शोभेल अशा प्रकारे इंग्रजीत भाषांतरित करून विचारला तर ती म्हणाली, ‘सॉरी, आय डोन्ट नो अबाउट धिस.’ उत्तर येत नसेल तर अ‍ॅलेक्सा मला माहीत नाही, मला प्रश्न कळला नाही, असं सांगू लागली. हळूहळू माझी भाषा कळत नाही, असं ती सांगू लागली तेव्हा मला जरा बरं वाटलं.

- Advertisement -

मी खिडकीबाहेर पाहिलं तर पाऊस आणि वाटलं, हे आपल्याला तरी कुठं कळतंय.

तो सतत कोसळतोय. एकसारखा. कधी संततधार ठिबकतोय तर कधी बेभान बरसतोय अन् ताटकळत उभाय दाराशी. त्याला काहीतरी सांगायचं असावं. मला त्याची भाषा कळत नाही. अर्थ उगवून येत नाही तोवर हे संदिग्ध गर्भारपण कसं पेलायचं ?

- Advertisement -

न समजणारी लिपी आहे ही.
हे लिप्यंतर कसं करायचं ?

खरंतर इतक्या वर्षांपासून तर हेच होत आलंय आणि माझ्या प्रजातीलाही इतिहास आहे म्हणे लाखो वर्षांचा. शिवाय मानवी प्रजात सर्वांत बुद्धिमान; पण अजूनही ही पावसाची भाषा समजत नाही. अर्थ उकलत नाही. घट्ट झाकण बसलेल्या डब्यासारखी अवस्था. काढायची घाई; पण निघता निघत नाही. समजा निघालंच झाकण तर सारा अर्थच सांडून जाईल, अशी मनोमन भीती वाटते आणि निसर्गाची भाषा कळत नाही तोवर निरक्षर माणसासारखं आपण चाचपडतच राहणार, अशी उगाच खात्रीही वाटते. अशा प्रसंगीच दैवी संकेत चाल करून येतात आणि मनात घरोबा करतात; पण मुळात इथं एक गाणं होतं, त्याचं काय झालं? एक सुप्त गाणं सुरू होतं इथं शांत लयीत. त्याची चाल कशी ऐकू येत नाही? कुणालाच कसं ऐकू येत नाही?

अमेझॉनचं जंगल आक्रंदत होतं तेव्हाही आला नाही आवाज? कृष्णामाई कोपली तेव्हाही कानी पडलं नाही काही? त्सुनामीच्या धडकांनी किनारे हादरले तेव्हाही काहीच समजलं नाही? शे-सत्तावीशे झाडं तोडतानाची ‘आरे’रावीची भाषाही ऐकू येत नाही का आपल्याला? कितीही सिग्नल दिले तरी आपल्याला ऐकू कसं येत नाही? पंचेंद्रियं बंद केलीत आपण की बंद झालीत वर्षानुवर्षांच्या वापराच्या अभावातून. आपली अडचण आहे खरी. निसर्गाची तर दूर; पण अगदी माणसांची म्हणजे एकाच प्रजातीतल्या लोकांना तरी कुठं कळते परस्परांची भाषा ?

तबरेज अन्सारीच्या किंकाळ्या रेकॉर्ड झाल्या नाहीत व्हिडिओत किंवा पहलू खानला पाडलं जमिनीवर तेव्हा काढताच आला नाही त्याचा कार्डिओग्राम किंवा सुबोध कुमार सिंगच्या डोळ्यात पाहताच आलं नाही झुंडीला आणि सुरेखा भोतमांगेच्या आंवढ्यांची कुठेच झाली नाही नोंद, म्हणून कळत नाही का आपल्याला एकमेकांची भाषा की आपण ठरवून घेतलं आहे काय पहायचं, काय ऐकायचं आणि कधी बोलायचं? ‘जो तुमको हो पसंद वही बात करेंगे’, हे आपण ठरवून टाकलं आहे का? गांधींच्या तीन माकडांचा चुकीचा अर्थ तर आपण लावला नाही ना? कानात हेडफोन, डोळ्यांवर गॉगल आणि नाकावर मास्क लावून आपण एका वेगळ्याच दुनियेत प्रवेश केला आहे का? स्वतःला स्वतःपासून तोडणार्‍या अनामिक दुनियेत आपण आहोत, पब्जी गेममधल्या अनोळखी प्रदेशासारखं भासत आहे हे सारं. व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीनं तयार केलेली मनोरम इमारत. झाडं आहेत स्टिकर्सची आणि पीयुपीत आहे चांदणं. हिरव्या फांदीवर डोलणारे पक्षी लुप्त झालेत. अंगणात चिमणी येत नाही आणि अर्थात आपणही अंगणात धान्य ठेवत नाही. मुळात त्यासाठी अंगण तरी असायला हवं. अंगण संपलं तिथं ही भाषाच संपत गेली.

आपल्या अवतीभवती घडणार्‍या घटना मला दिसतात तेव्हा त्यांना त्या दिसतच नाहीत का? इतक्यात लिपी बदलली कुठली की शब्दांचे आपल्या परस्पर अर्थ बदलले गेले? पगार झालाच नाही वेळेवर किंवा स्टॉक मार्केट क्रॅश झालं हे क्षणार्धात कळतं आपल्याला; पण एका आवंढ्यात दडलेलं विस्तीर्ण महाभारत समजत नाही तेव्हा आपण ‘अ‍ॅलेक्सा’ झालेलो असतो का? जेवढं फीड केलेलं असतं तेवढंच उत्तर येतं. मातृभाषेपासून पारखे झालेलो आपण कुठल्या दिशेने निघालो आहोत? उजाड माळरान तयार करून नवा विकासाचा संसार थाटायला निघालेलो आपण वेडेच आहोत का? कुणी प्रेषित येईल की नाही, माहीत नाही. निरोप आपल्याला देईल की नाही, ठाऊक नाही; पण इथंच परग्रह निर्माण झालाय का आणि एलियन असलेली अ‍ॅलेक्सा आपली जिवलग मैत्रिण झालीय आणि आपला इथल्या मातीपासून संपर्क तुटलाय? अ‍ॅलेक्सा, डू यु गेट धिस?

-श्रीरंजन आवटे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -