घरफिचर्सपुन्हा ‘नभा’च्या उदास कडा..!!

पुन्हा ‘नभा’च्या उदास कडा..!!

Subscribe

पावसाळ्या राती पडलेलं टिपूर चांदणं पाहून पोटात पडतो पीळ. डोळ्याला डोळा लागू देत नाहीत चिंतेचे ढग रात्रभर. नुसता मागचा-पुढचा हिशोब चालू मनातल्या मनात..मन असतंच कुठं थार्‍यावर, पसरत राहतं पाण्यावर सांडलेल्या तेलासारखं तवंग बनून. अन् उरफटा सुटलेला ‘वारा’ अन् बोडखं ‘शिवार’ भीती दाखवत असते डोक्यावर घोंगत असलेल्या ‘सावटा’ची!

ऐन हंगामात दाटून आलेलं ‘आभाळ’ एकदाचं महिनाभर पांगल की पोटात गोळा येतो.‘हंगाम’ वांझ निघाला तर…या विचारानेच पोटात धस्सऽऽ होतं. उठता बसता ‘आभाळ’ न्याहाळणार्‍या माणसाला आभाळाच्या रंग-रुपात बदल दिसला नाही तर, मनात उदास विचारांचं काहूर माजतं. नेमकं काय वाढून ठेवलं असेल पुढे? चेहर्‍यावरच्या सुरकुत्या आड लपता लपत नाहीत दुःख. आला दिवस कसा ढकलायचा? हाच प्रश्न.

जसं सगळ्याचं होईल, तसं आपलंही होईल. मन मनाचीच समजूत घालीत असतं, तरी पांढर्‍या-उजाड आभाळावर स्थिरावलेली नजर पडू देत नाही चैन जीवाला. आपलं होईल कसंही, पण मुक्या जनावरांचं काय? अशा अमुक तमुक प्रश्नांच्या ‘वावटळीत’ उठलेले मातीचे लोट येत नाहीत लवकर भुईवर. तशा हातपायाला मुंग्या येऊन बधीर होत जात काळीज. पांगलेल्या मनाला वाटत नाही कशातच रया. अन्न पाण्यावरून उडतं मन. अडकतो घास घश्यात, पाण्यालाही उरत नाही चव. पावसाळ्या राती पडलेलं टिपूर चांदणं पाहून पोटात पडतो पीळ. डोळ्याला डोळा लागू देत नाहीत चिंतेचे ढग रात्रभर. नुसता मागचा-पुढचा हिशोब चालू मनातल्या मनात..मन असतंच कुठं थार्‍यावर, पसरत राहत पाण्यावर सांडलेल्या तेलासारखं तवंग बनून. अन् उरफटा सुटलेला ‘वारा’ अन् बोडखं ‘शिवार’ भीती दाखवत असते डोक्यावर घोंगत असलेल्या ‘सावटा’ची….!

- Advertisement -

आभाळाकडे डोळे लावून बसलेला कष्टकरी आणि त्याची क्रूर थट्टा करणारे आभाळ, हे मराठवाड्याच्या नशिबी आलेलं तसं कायमचे उदास चित्र. कधी त्यात नक्षत्र बदल होत असेल इतकाच काय तो फरक. पण गत तीन दशकात रोहिण्यांपासून स्वातीपर्यंत नक्षत्र दर नक्षत्र करीत समाधानाने पडला पाऊस असे अपवादाने तरी झाले असेल का?एप्रिल महिन्याचे तांबडं फुटलं की हवामान खाते ‘बाग’ देते. यंदाच्या हंगामात सरासरी इतका पाऊस होईल वगैरे…रामप्रहरीच्या काकड आरतीपेक्षा ही पवित्र वाटते ही भविष्यवाणी ऐकायला..सुखावून जातात पारावरची पांढरी मने. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या जगात ‘अज्ञान’ तरी कसे म्हणावे याला? हा खरा प्रश्न. म्हणून विश्वासाने सुरु होते लगबग हंगामाची. भर वैशाखात काळ्या ठेकळात राब राबताना मनी असते आस यंदाचं साल चांगलं जाईल म्हणून. मशागतीने केली जाते काळी-पांढरी भुसभूशीत, स्वप्नं पेरली जावीत मातीत म्हणून. उसनं पासनं करून होते जुळवाजुळव बी-भरण, खतपाणी असल्यानसल्याची…
तसं वैशाख ऊन कललं की चाहूल लागते ॠतू बदलाची. यंदा मान्सूनचे आगमन लवकर, बळीराजासाठी आनंदाची बातमी अमुकतमुक…वारं पिऊन जगणार्‍या लोकांच्या या घोषणा उभारी देऊन जातात ऊन भोगलेल्या शिवाराला…!

सुरू होतो पुन्हा तोच आतबट्ट्याचा खेळ. शेती म्हणजे जुगारच की हो!
‘बरे झालो देवा कुणबी केलो,
नाही तरी असतो दंभेची मेलो’
उच्च नीचतेचा ‘दंभ’होऊ नये म्हणून तुम्हाला ‘कुणबी’ होणं बरं वाटले महाराज; पण आज वर्तमानात तुम्ही असता तर ‘कशाला देवा कुणबी केलो’ हे स्वगत प्रसवले असते तुम्हीच. तुमच्यासाठी ‘कुणबीक
‘विष्णूमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ’
या न्यायाने पवित्रच होती महाराज, कधी काळी ‘कुणबीक’ अभिमानाची गोष्ट असेलही; पण आता काळ बदलला तसे संदर्भ बदलले. काबाडकष्ट करणार्‍या माणसांवर मौसम फितूर झाला, अन् माणसं पारखी होत चालली जगण्याला..दिवसेंदिवस वाढत चालले ‘बळींचे’ आकडे पाहिले की गलबलून येत असेल ना महाराज तुम्हालाही. की तुम्हीही वर्तमानपत्राचं पान उलटावं तसं टाळता बातमी वाचायची.

- Advertisement -

तुम्हीच म्हणाला होतात
‘मढे झाकुनिया करिती पेरणी,
कुणबियाची वाणी लवलाहो’
म्हणून तर… आजही मोठा डोंगर कोसळला तरी थांबत नाही तो काळ्या आईची कूस उजवायला. तुम्ही सांगितलेल्या रितीभाती अजूनही पाळल्या जातील अनादी काळ..कैक पिढ्या पोसल्यात तिने. म्हणून कधी अडखळत नाही चाड्यावरची मूठ.
पण या निसर्गाच्या लहरीपणाचे करावे काय महाराज? आलाच पाऊस तर हंगामाच्या सुरुवातीलाच धोधो कोसळतो…यंदाचं साल चांगलं दिसतंय म्हणून नादी लावतो. अन् परागंदा होतो पुन्हा महिनाभर. तर कधी सुरुवातच करतो हंगामाची दिंड्या पंढरपुरात पोहोचल्यावर…मग हाती उरते काय हंगामात…
तुम्हीच सांगा!

कधीकधी तर एकाच दिवसात कोसळतो सालभराचा. सरकारी भाषेत काढली जाते सरासरी, एका दिवसाच्या पावसाची. पण पिकांना हे तंत्र कुठे माहीत. माना टाकलेल्या पिकांना कुठं कळतं एकादच प्यावं पाणी पोटभर, सरासरी इतकं वर्षभराचं..तो अडला-नडला की टाकतात ते माना. कोवळी स्वप्नं डोळ्यादेखत वाळलेली पाहून, उकरावी वाटते माती आणि घ्यावं गाडून एकदाचं, असं वाटत नसेल तरच नवल ना! मनातल्या मनात केलेली गणितं पांगली की तोंड दाखवायला उरत नाही जागा. रात्री पडलेले चांदणं पाहून भीती वाटते. या अंगावरून त्या अंगावर बदलत राहतो नुसती कूस..

पण आता…‘कूस’ बदलून प्रश्न सुटणार नाहीत, ठाऊक असते त्याला. म्हणून तो करतो आर्त विनवणी विठोबाला.‘पाठीवर मार, पण पोटावर मारू नकोस’ म्हणून. पांगत चाललेला ‘बारदाना’ सावरायला पायात उरत नाही ‘बळ’ तरी आस असते आभाळाच्या भरवशावर सारं होईल अबादानी. भिरभिरणार्‍या पाखराप्रमाणं उडणारं मन दाटून आलेलं ढग कोसळावं शिवारभर हा एकच विचार घेऊन भिरभिरत असतं आकाशात…आठवतं त्याला पै पै गोळा करण्यासाठी झिजवलेले उंबरठे. फसलेला गत हंगाम अन् डोक्यावर टांगलेले ओझं. ओझं उतरायचंय तर हंगाम साधला जावा नीटनेटका! पण उलट सालागणिक डोक्यावर असतं नवं ‘सावट’कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, कधी अवकाळी..कधी अस्मानी तर कधी सुलतानी उरले सुरले लाल्या, मावा, तुडतुड्या, बोंडअळी अमुकतमुक हे ‘चक्रव्यूह’ सोडत नाहीत पाठ..यातून पदरात पडलेच माप, तर ‘बाजार’ मारतोच की पोटावर. कष्ट कवडीमोल विकताना पाहून तीळ तीळ तुटतो तो आतून..‘हमीभाव’च्या आडून केली जाते थट्टा…पण तो उचलत नाही ‘आसूड’. उलथून टाकू व्यवस्था असला विचारही शिवत नाही त्याच्या मनाला. कारण हरघडी डोक्यावर बसलेलं नवं ‘सावट’ करू देत नाही बंड त्याला..तो फक्त ‘इडा पीडा टळो’ म्हणून भाकत असतो आर्त करुणा विठ्ठलाची.!!!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -