घरफिचर्सआला आषाढ आषाढ...

आला आषाढ आषाढ…

Subscribe

आषाढ हा सृजनाला संजीवनी देतो. कवीच्या बाबतीत नव्हे तर सकल सृष्टीचा विचार करता, ज्या आषाढातल्या एका काळ्या ढगाला बघून ‘मेघदूत’ या अमरकाव्याची निर्मिती झाली. त्या दृष्टीने या सृष्टीला पल्लवित करणारा हा पाऊस तर संपूर्ण अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था यांचा पाया आहे, हल्लीचे बदलते ऋतूचक्र बघता प्रत्येक आषाढाच्या पहिल्या दिवशी या काळ्या मेघाचे दर्शन होईल असे नाही. आषाढातल्या पहिल्या दिवशी चक्क आकाशात कोरडे ढग दिसू लागतात. आज जगातली अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे. शेतकरी तर हा काळा ढग बघण्यासाठी आतुर झालेला आहे.

सृजनसृष्टीचा महिना कोणता ….तर तो आषाढ ! … पहिल्या पावसाचा तो पहिला बहर ओसरला गेला आहे आणि सृष्टीच्या सृजनाचा महिना सुरू झाला आहे. मी आषाढाला सृजनाचा महिना म्हटलं याच कारणदेखील तसंच आहे… या महिन्यात एका महाकाव्याची निर्मिती झाली… आषाढ महिना म्हटलं की, आठवतो तो कालिदास आणि या महान माणसाची अजरामर कलाकृती मेघदूत.

या मेघदूताच्या निर्मितीची कहाणी तशी अचाटच आहे ….कुबेराच्या पदरी गुह्यक नावाचा एक सेवक होता, त्याने कामात काही कुचराई केली म्हणून या यक्ष नगरीच्या अधिपतीने-कुबेराने या गुह्याकाला शिक्षा म्हणून त्याला एक वर्ष राज्यातून हद्दपार केले. बिच्चारा तो यक्ष आपल्या घरादाराला आणि सुंदर, तरूण पत्नीला सोडून शिक्षा भोगण्यासाठी नगरीच्या बाहेर गेला आणि दूर रामगिरी पर्वतावर जाऊन राहिला.

- Advertisement -

पत्नीचा वर्षभर विरह झाल्यामुळे मनातून हा यक्ष दुखीकष्टी झाला होता.त्याच्या चेहर्‍यावरचे तेज लोप पावले होते, तो प्रकृतीने कृश झाला होता. याच दरम्यान पावसाळा सुरु झाला, आकाशात काळ्या मेघांची गर्दी झाली. रामगिरी पर्वतावरून ते विहंगम दृश्य बघताना त्याला त्याच्या पत्नीची आठवण आली. त्याच्या हृदयात कालवाकालव झाली. त्याचवेळी आकाशात दिसणारा एक काळा मेघ त्याला त्याच्या घराच्या वाटेवर जात आहे असा भास झाला. त्या मेघालाच त्याने आपला दूत बनवलं. त्यातूनच कालिदासाचे मेघदूत सिद्ध झाले.

मेघदूत म्हणजे यक्षाने ढगांशी केलेला एकतर्फी संवाद आहे. पाण्याने भरलेला तो मेघ पाहून तो यक्ष त्या मेघाला म्हणतो, संतप्ताना त्वमसि शरणं तत्पयोद, प्रियायाः

- Advertisement -

संदेश मे हर घनपतिक्रोधविश्लेशितस्य याचा अर्थ पाण्याने भरलेल्या मेघा मी तुला शरण आलो आहे, मी पत्नीच्या विरहाग्नीने इथे पोळलो आहे. आता यातून मला तारून नेईल असा एकमेव आसरा म्हणजे तू…त्यावेळी या मेघाच्या उत्तराची वाट न बघता हा यक्ष त्या मेघाला आपल्या नगरीचा मार्ग सांगतो. त्याला आपल्या पत्नीच्या विरहाचे वर्णन करतो. हे वर्णन इतके सुंदर आहे की, त्यासाठी कालिदास वाचयला हवे. यक्ष आणि ढग …जो खरतर निर्जीव आहे. त्यांच्यातील संवाद कालिदासाने ज्या ताकदीने मांडला आहे, त्यामुळेच की काय, कुसुमाग्रज असोत की, बा.भ.बोरकर असोत शांता शेळके, सीडी देशमुख यांनीदेखील या संस्कृतमधील अमर काव्याचा मराठीत अनुवाद केला.

मुळात आषाढ हा सृजनाला संजीवनी देतो. कवीच्या बाबतीत नव्हे तर सकल सृष्टीचा विचार करता, ज्या आषाढातल्या एका काळ्या ढगाला बघून मेघदूत या अमरकाव्याची निर्मिती झाली. त्या दृष्टीने या सृष्टीला पल्लवित करणारा हा पाऊस तर संपूर्ण अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था यांचा पाया आहे, हल्लीचे बदलते ऋतूचक्र बघता प्रत्येक आषाढाच्या पहिल्या दिवशी या काळ्या मेघाचे दर्शन होईल असे नाही. आषाढातल्या पहिल्या दिवशी चक्क आकाशात कोरडे ढग दिसू लागतात. आज जगातली अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे. शेतकरी तर हा काळा ढग बघण्यासाठी आतुर झालेला आहे.

भारत हा कृषीप्रधान देश आहे हे जेव्हा आपण म्हणतो …याचा अर्थ कालिदासाच्या प्रतिभेला ज्या एका काळ्या मेघाने संजीवनी दिली त्या काळ्या मेघाचे महत्व किती आहे हे नेहमीच मला आमच्या कोकणात पाऊस पडण्यासाठी जे विधी केले जातात त्याची आठवण होते ….. या विधीला विशिष्ठ असे नाव नाही. कोकणात पाऊस तर मुबलक पडतो, मग एखाद्यावेळी पाऊस पडायला उशीर झाला किंवा दुष्काळसदृश परिस्थिती दिसू लागली की, पाऊस मागण्याचा विधी करतात. त्यावेळी गावाच्या सीमेवर सावर नावाच्या झाडाची होळी केली जाते आणि पावसासाठी देवीला -देवतेला गार्‍हाणे घातले जाते. अर्थात, या विधी केल्याने पाऊस पडतो का …. हा मुद्दा नाही पण निसर्गाशी आपले नाते हे आदिम काळापासून. या पंचमहाभूतांनी बनलेली ही सृष्टी …याचे रक्षण करण्यासाठी पुन्हा या पंचमहाभूतांकडे मागणे मागायचे नाही तर कोणाकडे …? ..हा साधा विचार.

पावसाच्या आगमनासाठी धोंडी नावाची कल्पित देवता रचून तिच्यासमोर पावसासाठी आर्जव करताना लहानमुले गावभर फिरतात. यातील काही मुलं अंगावर वस्त्र परिधान करत नाहीत. केवळ अंगाभोवती कडूलिंबाच्या डहाळ्या बांधल्या जातात. ही मुले हातात एक काठी घेऊन मध्ये बेडूक लटकवतात आणि गावभर फिरून,

धोंडी धोंडी पाणी दे रे
साळ माळ पिकू दे रे

असं म्हणतात.
या गीताकडे केवळ एक लोकगीत म्हणून न बघता, या उत्स्फूर्त येणार्‍या ओळी कुठेतरी सृजनाशी संबंध जोडताना आढळतात. पाऊस… विशेषतः आषाढात पडणारा पाऊस हा शेतीच्या दृष्टीने महत्वाचा असतो. या आषाढसरींची बरसात होण्याची वाट फक्त शेतकरी नाही तर शहरी संस्कृतीत वाढलेला शहरी माणूसदेखील बघतो. आषाढ सुरू झाला, त्याच्या बिल्डिंगच्या समोरचा नाला भरून वाहू लागला की, त्याने मनोमन मुंबईतली सारी तलावं एव्हाना भरली असतील अशी खुणगाठ बांधली असते. हे तलाव तुडूंब भरून वर्षभराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून एक दिवस मुंबईतल्या लोकल बंद झाल्या तरी चालेल ..अशी एक मनात सुट्टीची कल्पना त्याने मांडलेली असते.

आषाढात किती पाऊस पडेल याच्या अंदाजावर शेतकर्‍याने पीक धरले असते. आषाढात भरपूर पाऊस पडला तर भातच पिकं भरपूर येणार हा अंदाज त्याने कित्येक वर्षं आधीपासून मनात बांधून ठेवला आहे. याला वेधशाळेचे अंदाज कसे बांधतात याच्याशी काही सोयरेसुतक नसते. त्याने आकाशातला तो काळा मेघ मनात साठवून ठेवला आहे. हा काळा मेघ आता कुठल्या अलकानगरीला जाऊन यक्षपत्नीला निरोप देणार नसतो. तो आषाढसरींच्या बरसण्याचे आवतान घेऊन आलेला असतो. या विज्ञाननिष्ठ जगात पाऊस पडण्यासाठी केलेले हे विधी फार महत्वाचे वाटत नसले तरी त्यांच्या मागील लोकसंकेत हे फार महत्वाचे आहेत.

त्यामुळे यक्षाला दिसलेला मेघ हा त्याचा दूत वाटला. त्याच्या प्रियपत्नीसाठी तो संजीवनी देऊन गेला. आता हा काळामेघ शेतकर्‍याला आपल्या पिकासाठी संजीवनी देणारा वाटतो. पण आषाढाच्या पहिल्या दिवशी किंवा आषाढात काळा मेघ हा दिसावा लागतोच…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -