घरफिचर्सउष:काल होता होता...

उष:काल होता होता…

Subscribe

महाराष्ट्राने आपल्या निर्मितीपासून अनेक धक्के अनुभवले. कधी लातूरच्या भूकंपाचे तर कधी राज्याचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या वाट्याला आलेल्या दगाबाजीच्या राजकारणाचे. त्या प्रत्येक वेळी महाराष्ट्र जिगरबाजीने सावरला, उभा राहिला. शनिवारच्या पहाटे मात्र मराठी मुलखाला जो राजकीय ‘सर्जिकल स्ट्राईक’ अनुभवायला मिळाला त्याने सारेच हादरले. या राजकीय भूकंपाचे हादरे राजभवनापासून चांदा ते बांदा, असे संपूर्ण राज्याला बसले. त्याचा केंद्रबिंदू मात्र दिल्लीच होता. या भूकंपाने राजकारण्यांपासून ते सामान्यांपर्यंत सगळ्यांनाच हादरवलं. हा हादरा इतका जोरदार होता की देशातील दोन प्रथितयश कुटुंबांना याच्यामुळे मोठे तडे गेलेत. त्यातलं एक खानदान आहे बारामतीच्या पवारांचं तर दुसरं कुटुंब आहे मुंबईतल्या ठाकरेंचं. एका परिवारात उभी फूट पडलीय तर दुसर्‍या कुटुंबियांची मन:स्थितीच्या पार ठिकर्‍या उडाल्यात. या सगळ्याला कारणीभूत ठरला तो देवेंद्र फडणवीस यांचा दुसर्‍यांदा झालेला शपथविधी.

पहाटेच्या काळोखात देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी जमवाजमव करण्यात आली. मध्यरात्री मेलबाजी झाली आणि सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. महाराष्ट्रासारख्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना-उपमुख्यमंत्र्यांना छायाचित्रकार, पत्रकार आणि कार्यकर्त्यांच्या जल्लोषाशिवाय शपथ घ्यायला लागली हे खूपच दुर्दैवी आहे. संशयास्पद आणि अनाकलनीय आहे. शुक्रवारी रात्री सगळे राजकीय नेते नेहरु सेंटरहून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री पदासाठीच्या उमेदवारीचा विचार करत घरी परतले. आणि सकाळी त्यांचे डोळे उघडले तेच मुळी राजकीय अंधार डोळ्यासमोर घेऊनच. हा अंधार फक्त अजित पवारांसारखा नेता संशयास्पद रितीने उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल नव्हता तर भाजपा सारख्या नीतीमत्तेच्या गप्पा मारणार्‍यांकडून हा दुराचार झाल्याबद्दल आहे. भाजपने हे सगळं इतक्या बेमालूमपणे आणि लपूनछपून केलं की 50 वर्षे राजकारणात वावरणार्‍या भीष्माचार्य पवारांना आणि दोन्ही मांडवांचे यजमानी असलेल्या संजय राऊतांचा रक्तदाब वाढवण्यासाठी पुरेसे होते.

- Advertisement -

शुक्रवारी रात्री मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नासह मातोश्रीवर परतणार्‍या उध्दव ठाकरेंवर मंत्रालयाच्या सहा मजल्यावर जाण्याआधी अंधेरीच्या पंचतारांकित ‘ललित’च्या सहाव्या मजल्यावर जाऊन आपले आमदार सुरक्षित आहेत की नाही हे पाहण्याची वेळ आली. कालपर्यंत चर्चगेटच्या भाजपा कार्यालयात सत्ता धारातीर्थी पडल्याने शोकाकुल वातावरण होतं. शनिवारच्या पहाटे मोदी-शहांच्या आशीर्वादाने आणि राज्यपालांच्या कृपेने जे घडलं त्यामुळे पवारांची राजकीय वाटचाल पाहता काटेवाडीच्या पैलवानाभोवती संशयाचे ढग जमा झाले. मोदी-पवारांच्या भेटीत याची बीजं पेरली गेली असा कयास अनेकांनी व्यक्त केला. हे खरं की खोटं हे ते दोघंच जाणोत. पण आम्हाला भीती आहे ती शिवसेनेसारख्या अस्मितेचे भांडवल करत वाटचाल करणार्‍या आणि मराठी बाण्याच्या गप्पा मारणार्‍या शिवसेनेच्या फरफटीची. आणि राजकीय सभ्यतेची-नीतीमत्तेची. कारण अजित पवारांनी जे केलं त्यामुळे त्यांनी सगळ्यांनाच संशयाच्या खाईत लोटलं आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या राजकीय साधनशुचिता बाळगणार्‍या नेत्याने जे केलं ते खचितच न पटणारं आहे.

पण प्रेमात आणि युध्दात सगळं क्षम्य असतं असं म्हणतात. इथे हे युध्द राजकीय आहे. पण या युध्दातील शरणार्थींची घरवापसी दिवसभर सुरू होती. त्यामुळे हे सगळा शपथविधी आणि मुख्यमंत्री फडणवीसांचा राज्यभिषेक कायदेशीर कचाट्यात अडकवण्याचा प्रयत्न भाजपच्या दिल्लीश्वरांकडून सुरू होईल. त्यात तीन पायांची शर्यत पळणारे जिंकणार की उसणं अवसान घेऊन ‘पुन्हा आलोय’ म्हणणारे जिंकणार हे 30 तारखेला विधानसभेत बहुमत सिद्ध करताना कळेलच. पण तोपर्यंत देशातील एका विकसित राज्यात उष:काल होता होता काळरात्र होते की काय अशी भीती वाटायला लागली आहे. ‘सिंहासना’साठी सुरू असलेल्या या सगळ्या लढाईत मराठी मुलखाची मान शरमेने खाली जाऊ नये इतकीच आमची अपेक्षा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -