घरफिचर्सफलज्योतिषांना करोनाचा गुंगारा!

फलज्योतिषांना करोनाचा गुंगारा!

Subscribe

करोनाच्या संसर्गाने सध्या सगळे जग लॉकडाऊनमध्ये अडकलेले असताना आपल्या देशातील फलज्योतिषांकडून सन २०२० या वर्षाच्या भविष्यांमध्ये कुणीही, कोठेही या आगामी वर्षाच्या सुरुवातीलाच जगावर एका प्रचंड मोठ्या करोना महामारीचे संकट कोसळेल, त्यात असंख्य लोकांचे प्राण जातील, असे काही सांगितले गेले नव्हते. सध्या या सगळ्या फलज्योतिषांची मती कुंठीत होऊन त्यांनी तोंडात मिठाची गुळणी धरलेली आहे. त्यांच्या चाहत्या वर्गानेही सोयीस्कर मौन बाळगलेले दिसते. म्हणजे या महामारीबाबतचे काही भाकित कुणीही कुठेही केले नव्हते. असे का व्हावे? त्यांचे गाणित आणि कोष्टके कुठे चुकली? म्हणजे या फलज्योतिषांना करोना विषाणूने गुंगारा दिला असेच म्हणावे लागेल.

सध्या सर्वत्र चर्चेचा एकच विषय आहे, तो म्हणजे अर्थातच जवळजवळ सर्वच जगाला ग्रासून टाकणारा करोना हा भयंकर वेगाने फैलावणारा रोग! हे अरिष्ट कधी टळणार, किमान त्याचा जोर कधी ओसरणार, याचीच सर्वजण उत्कंठेने वाट बघत आहेत. कोणी याबाबत नुसतेच अंदाज करत आहेत (त्यांत आशावादच जास्त दिसतो), तर कुणी इतिहासाचा दाखला देऊन त्याआधारे त्या मोठ्या रोगांच्या, म्हणजे गेल्या शतकाच्या सुरुवातीला आलेल्या स्पॅनिश फ्लू, प्लेग, इ. रोगांच्या साथींबाबतचे नोंदवण्यात आलेले अनुभव ध्यानात घेऊन, काही काळाने आपोआपच या महामारीचा जोर ओसरू लागेल, असे सांगत आहेत. इतर कुणी कालांतराने लोकांमधील प्रतिकारशक्ती वाढून त्यामुळे आपोआपच या महामारीला अटकाव होईल, असे म्हणत आहेत.

दुसरीकडे अनेक देशांतील शास्त्रज्ञ, संशोधक यावर लस तयार करण्याचा नेटाने अविरत प्रयत्न करत आहेत. या रोगाची लागणच होऊ नये म्हणून लस तयार करण्यासाठी. याचबरोबर उपलब्ध औैषधांतील औषधे काही प्रमाणात तरी उपयोगी पडतात का, या पाहणीसाठी, विविध प्रकारच्या औषधांच्या चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत. तर क्षय, एच.आय.व्ही, स्वाईन फ्लू, इत्यादींवर यशस्वी ठरलेल्या लसी, औषधे त्यासाठी उपयोगात आणून, त्यांच्यातील काहीजण हा रोग झालेल्यांना लवकर बरे करण्याचे मार्ग शोधण्यात गर्क आहेत. त्या दृष्टीने अनेक प्रयोग सुरू आहेत.

- Advertisement -

कुणी लोकांच्या हिंडण्या-फिरण्यावर बंधने घालू नका, असेही सांगत आहेत. त्यांना या हर्ड थिअरीय म्हणजे झुंडीच्या सिद्धांताद्वारे ही बहुसंख्य लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिकारशक्ती निर्माण होऊन, महामारी आपोआप कमी होईल, असे वाटते. काही देशांत तसे दिसून आले आहे. कारण या प्रयोगामध्ये लोकांचा एकदुसर्‍याबरोबर संपर्क होत राहतो आणि त्यामुळे विषाणूंबरोबर त्यांना प्रतिकार करणार्‍या अँटीबॉडीजही संक्रमण करत असतात. त्यामुळे साथीला आळा घातला जातो. (अर्थात या प्रयोगात मोठ्या प्रमाणावर मृत्यू होऊ शकतात, पण त्याआधी २० ते ६० टक्के लोकांना याची लागण व्हावी लागते. शिवाय मानवी शरीरामध्ये अशा प्रकारे अँटीबॉडीज तयार होण्यासाठी काही काळ जावा लागतो. बहुधा म्हणूनच हा मार्ग बहुतेक देश टाळत आहेत.)

पण नवल वाटावे अशी आणि खरे तर कुणालाही आश्चर्य वाटेल अशी बाब म्हणजे या सार्‍या चर्चांमध्ये कुणाही ज्योतिषाचा म्हणजे ज्योतिर्विद, ज्योतिर्भास्कर इ. इ.पैकी कुणाचाही सहभाग दिसत नाही. असे का व्हावे, हे कोडे काही केल्या सुटत नव्हते. त्याबाबत विचार करत असताना अचानक एक गोष्ट जाणवली. दरवर्षी साधारण दसरा, दिवाळीच्या सुमाराला किंवा त्यानंतर काही काळातच, म्हणजे नवे वर्ष सुरू होण्याआधी, अनेक ठिकाणी म्हणजे वर्तमानपत्रे, साप्ताहिके, मासिके. इत्यादींमध्ये वार्षिक भविष्ये येतात, साप्ताहिके, आणि दैनिकामध्येही भविष्ये येतात. काहींच्या तर वर्षभविष्याच्या पुस्तिकादेखील निघतात. अनेक लोक हे सारे अगदी भक्तिभावाने वाचतात, हे सर्वांनाच माहीत आहे. ‘साधना’ साप्ताहिकासारखे काही अपवाद वगळता, सर्वच नियतकालिकांमध्ये आणि वर्तमानपत्रांमध्येही अगदी रोज, आणि आठवड्याच्या आठवड्याला ही भविष्ये छापली जातात. याला इंग्रजी वर्तमानपत्रे, नियतकालिकेदेखील अपवाद नाहीत. दूरचित्रवाणीच्या काही वाहिन्यांवरही असे कार्यक्रम असतात, हे सर्वांना माहीत असेलच.

- Advertisement -

सांगायची गोष्ट म्हणजे या सार्‍या भविष्यवेत्त्यांकडून दिल्या गेलेल्या सन २०२० या वर्षाच्या भविष्यांमध्ये कुणीही, कोठेही या, आगामी वर्षाच्या सुरुवातीलाच जगावर एका प्रचंड मोठ्या (रोगाच्या) महामारीचे संकट कोसळेल, त्यात असंख्य लोकांचे प्राण जातील, असे काही सांगितले गेले नव्हते. निदान पाहण्यात तरी आले नाही किंवा त्यांचे नहेमीचे वाचकही त्याबाबत बोललेही नाही. अशा गोष्टी तर समाजमाध्यमांवरील अफवांपेक्षाही जास्त वेगाने पसरतात.(आठवा, गणपती दूध पितो, ही वार्ता किती वेगाने पसरली होती!) म्हणजे या महामारीबाबतचे काही भाकित कुणीही कुठेही केले नव्हते, असे आपण म्हणू शकतो. असे का व्हावे?

खरे म्हणजे याबाबत कुठेच काही बोलले गेले नाही, या गोष्टीचे तर जास्तच आश्चर्य वाटते. एरवी बघा, आम्ही अगोदरच सांगितले होते किंवा सर्वांना सावध करण्याचे काम आम्ही केले होते, तसा इशारा दिला होता, वगैरे मोठ्या आवाजात सांगणारे अनेकजण असतात. त्यांनाही प्रसिद्धी दिली जाते. मग असे का व्हावे. खरे म्हणजे हे अशा प्रकारचे महान संकट कुणाच्याही ध्यानात आले नव्हते. अर्थात आरोप होत असलेल्या, हे विषाणू तयार करणार्‍या प्रयोगशाळेतील चिनी संशोधक आणि शास्त्रज्ञांचाच अपवाद असू शकेल, पण ते असा काही इशारा देणे शक्यच नव्हते, म्हणजे त्यांनी हे अमेरिका म्हणते त्याप्रमाणे हेतुपूर्वक केले असले तर! अशीही शक्यता आहे की, कदाचित त्यांनीही या विषाणूच्या अतिशय व्यापक आणि घातक स्वरुपाची कल्पना केली नसेल. जगबुडी वगैरेची भाकिते करणार्‍यांना आणि आम्ही हा इशारा पूर्वीच दिला होता, असे सांगणार्‍यांना मात्र हे कसे समजू शकले नाही, याचे नवल वाटते. अष्टग्रही वगैरे अरिष्टे आणि त्यांवर उपाययोजना सांगणारे यावेळी मात्र एकदम अगदी गप्प आहेत.

पण या लोकांनी आणि त्यांच्या कथनावर विश्वास असणार्‍यांनीही धीर सोडण्याचे काहीही कारण नाहीे! आता विविध ठिकाणी चाललेल्या संशोधकांच्या प्रयत्नांना, काही प्रमाणात का होईना, यश येण्याची चिन्हे दिसत आहेत, पूर्णपणे नाही तरी करोना मोठ्या प्रमाणात आटोक्यात येईल, अशी खात्री आता वाटायला लागली आहे. तशा बातम्या अनेक देशांतून येत आहेत. प्रयोगशाळेमध्ये तयार करण्यात आलेल्या लसींच्या चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत. थोड्याच काळात त्या मानवावरही केल्या जातील. डॉक्टर आधीच्या साथींवर उपयुक्त ठरलेल्या वेगवेगळ्या औषधांच्या चाचण्या घेत आहेत. मूलपेशींचा वापर करूनही प्रयोग केले जात आहेत आणि त्यांनाही काही प्रमाणात यश येत असल्याचे दिसते.

म्हणून आता फार घाबरून जाण्याचे कारण नाही, असे चित्र हळूहळू दिसू लागले आहे. त्यामुळे आता जर कुणी भविष्य विचारण्यासाठी ज्योतिष्यांकडे गेले आणि त्याने त्यांना याबाबत काही प्रश्न केले, तर आपले ज्योतिषी ठामपणाने (तोवर वर्तमानपत्रांत आलेल्या बातम्यांच्या अनुषंगाने) सांगू शकतील (सांगू लागतील) की आणखी सहा-आठ महिने थांबा. मग बघा ही महामारी पळूनच जाते का नाही आणि पुढे म्हणतील ः अहो सांगतो ना, सध्याची ही परिस्थिती विपरीत ग्रहदशेमुळे निर्माण झाली आहे. अमुक अमुक ग्रह नेमक्या या काळातच एका ठिकाणी जमल्याने हे अरिष्ट ओढवले आहे. ते तातडीने टळण्याजोगे नाहीच, पण आता तुम्हाला सांगतो, आणखी थोडा काळ धीर धरा. थोडी कळ सोसा. मग बघा करामत आमच्या या ग्रहांची. एकदा का ते एकामागोमाग एक असे त्या स्थानापासून दूर गेले की मग हे अरिष्ट टळायला कितीसा वेग लागणार? अहो, नंतर तर सर्वांनाच चांगले दिवस येणार आहेत. इ. इ.

आता हे सारे ऐकल्यावर, ज्योतिषावर विश्वास ठेवणारा कुणीही त्यांना म्हणेल, की काय हो, हे आता तुम्ही जे काही सांगत आहात, ते बरोबरच असणार, पण त्यापुढे जाऊन कुणीही म्हणणार नाही की, फक्त एक शंका आहे, ती म्हणजे हे सारे ग्रह त्या ठराविक ठिकाणी एकत्र येणार आहेत, हे तुम्हाला आधीच कसे माहीत नव्हते?

त्यानंतर दूरचित्रवाणी वाहिन्यांवरही याबाबत प्रचंड मोठ्या प्रमाणात आणि त्यांच्या वैशिष्ठ्याप्रमाणे मोठ्या आवाजात जोरजोरात चर्चा होईल. वादविवाद होईल. लोकांचाही वेळ मजेत जाईल. त्यांचीही चांगली करमणूक होईल असे म्हणणार होतो, पण कदाचित त्यामुळेही कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या तर, अशी सध्या नेहमीच असते तशी भीती वाटली, म्हणून तसे म्हणण्याचे टाळले आहे, हे जाणकार वाचकांनी ओळखले असेलच!

खरेच सांगायचे, तर हा विषय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा, पण त्यांनी तो (कोणत्याही कारणाने असेल) बराच काळपर्यंत उपस्थित केला नव्हता. परवा विनोदशी (साधना साप्ताहिकाचे संपादकः विनोद शिरसाठ) बोलताना सहजच हा विषय निघाला, तेव्हा त्याने सांगितले की, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लोकांनी गेल्या आठवड्यातच हा विषय लावून धरला आहे. ही गोष्ट चांगलीच आहे. त्यातून काय निष्पन्न होते बघायचे. या सार्‍यातून काय धडा घ्यायचा ते ज्याचे त्याने ठरवावे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -