घरफिचर्सएक ग्लास पाणी..फक्त पाच पैसे!

एक ग्लास पाणी..फक्त पाच पैसे!

Subscribe

शीर्षक वाचून तुम्हाला ठसका वगैरे लागला असल्यास अगोदर एक ग्लास पाणी प्या...! प्यायलात पाणी? आता एकेक घोट पाणी प्यायल्यागत एकेक गोष्ट समजून घ्या.

अनोळखी बॉलीवूड

आज पाच- दहाच काय, पण ’पावली’ म्हणजेच पंचवीस पैसेही चलनात नाहीत. तर मग हे पाच पैशात पाणी कुठे मिळते? हा दर आजचा नाही. तर सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीस गिरगावातील ’मॅजेस्टिक’, जे १९७२ साली बंद पडले, ’सेन्ट्रल’, ’इंपीरियल’ अशा अनेक चित्रपटगृहांत मोठ्या मडक्यातून पाणी विक्री होई. त्याकाळात खरंतर चित्रपट पाहायला जाताना घरूनच खाऊचा डबा आणि प्लॅस्टिकची पाण्याची बाटली बरोबर नेण्याची प्रथा होती. तरी एखादा प्रेक्षक पाणी विकत घेई.
पण मुंबईत असे प्यायचे पाणी विकत घ्यायचे? हा प्रश्न कोणाचा? ’पहचान ’ मधला मनोजकुमार, ’एक बेचारा ’ मधला जीतेंद्र अशा काही चित्रपटातील ग्रामीण नायक मुंबईत येताच तहान लागते म्हणून चौपाटीवरच्या पाणी विक्रेत्याकडील एक ग्लास पाणी पिऊन निघताच त्याला अडवून म्हटले जाई, ’मुफतमें पानी पियेंगे? पाच पैसा दो!’ गावाकडून आलेला हीरो ’विकतचे पाणी प्यायलो आपण?’ या कल्पनेने आश्चर्यचकित होई. कारण गावात रस्त्यावरील माणसाला पाणी प्यायला देणे ही आपण आपली संस्कृती समजतो.

- Advertisement -

पूर्वी चित्रपट स्टुडिओपैकी राजकमल कलामंदिर स्टुडिओ व फिल्मीस्तान या दोन ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे नळ होते. आणि ते पाणी फुकट मिळायचे. राजकमलमध्ये प्रवेश केल्यावर आजही तो नळ सुरु असल्याचे दिसते. चित्रपती व्ही.शांताराम यांनी चित्रपटाच्या व माणसाच्या गरजा या दोन्हीचे भान ठेवून स्टुडिओ उभारला. शशीधर मुखर्जी यांनी फिल्मीस्तान, फिल्मालय या स्टुडिओउभारणीत तेच भान ठेवले. अनावश्यक व्यावसायिकता येण्यापूर्वीचा तो काळ होता. मोठे कलाकार घरुन पाण्याची बाटली घेऊन येत. ’आपण उकळलेले पाणी पितो’ हे एखाद्या स्टारने सांगणे प्रतिष्ठेचे होते. कोल्हापूरमधील जयप्रभा स्टुडिओ व शांतकिरण येथे शूटिंग असताना रंकाळ्याचे पाणी पिऊन सगळे काम चालायचे!
पण काळ बराच बदलला.

पाण्याच्या बंद बाटल्यांनी बघता-बघता ( की पिता, पिता? ) सगळेच समाजजीवन व्यापले. त्याला चित्रपटसृष्टी अपवाद कशी राहील? स्टारच्या व्हॅनिटीपासून डबिंग थियेटरपर्यंत सगळीकडे लहान-मोठ्या पाण्याच्या बाटल्या आल्या. आता त्यात भेदभाव कसला आलाय? पण मोठ्या स्टार्सच्या बाटलीतील पाणी ज्युनियर आर्टिस्टला मिळणार नाही (एखादा अपवाद असूही शकतो) आणि ज्युनियर आर्टिस्टनी अनेकांनी मिळून एकच पाण्याची बाटली वापरायची. काही मोठे स्टार तहान लागल्यावर प्रत्येक वेळेस नवीन बाटली फोडणार! अर्धी बाटली पाणी पिणार आणि उरलेले पाणी फुकट घालवणार. अशाने एका चित्रपटासाठी किती पैसे ’पाण्यात ’ जातात हे तो निर्माताच जाणो! पाणी असे बाटलीत आले आणि चित्रपटाचे बजेट आपोआप वाढू लागले.

- Advertisement -

मध्यंतरी एका मराठी चित्रपट निर्मात्याने असेच ’पाणी पुराण ’ ऐकवले. सत्तावीस दिवसात पूर्ण होईल अशा त्याच्या चित्रपटाला छत्तीस दिवस लागले याचे कारण एकच, पाण्याची बाटली. झाले असे, की त्याच्या चित्रपटाचे एका गावात चित्रीकरण असताना त्याने प्रथेनुसार पाण्याच्या बाटल्यांचे बॉक्स तयार ठेवले. पण कोणीही कलाकार एकदा उष्टी केलेली बाटली पुन्हा हाती घेत नसे. बरं हे प्रकरण दिग्दर्शकाच्या अखत्यारीत येत नसल्याने तो याबाबत कसलीच सूचना देऊ शकत नसे आणि ’आपल्या पाहुण्या स्टार्सना का दुखवायचे’ म्हणून निर्माता गप्प बसून राही. या गडबडीत लक्षात येई की, पाण्याचा पुरवठा संपलाय. लगेचच तालुक्याच्या ठिकाणी माणूस पाठवा व पाणी आणा सुरु होई. त्यात अर्धा दिवस शूटिंगच ठप्प!

सेटवरचे पाणी ही गोष्ट साधी वाटते पण ते कसे वाहतेय ते कळाले ना? अर्धे करिअर होईतोवर घरुन पाणी आणणार्‍या कलाकारांनीही मग बंद बाटलीतील पाण्याची सवय लावून घेत काळानुसार स्वतःमध्ये बदल घडवला. हवं तर मराठीतील जुन्या निर्मात्यांना विचारा..!


– दिलीप ठाकूर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -