घरफिचर्सअणुबॉम्ब हल्ल्याचा काळाकुट्ट दिवस

अणुबॉम्ब हल्ल्याचा काळाकुट्ट दिवस

Subscribe

या हल्ल्यानंतर जगाने मानवाचे दोन चेहरे पाहिले. अमेरिकेने कोणताही विचार न करता क्रूरपणे जपानवर हल्ला चढवत माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडवून आणली, पण या घटनेने जपानमधील लोकांनी एकत्रित येत केलेल्या प्रगतीने आज तेथील अणुबॉम्बच्या हल्ल्याचे घाव पुसून टाकले आहेत.

कोळसा, लाकडाचे इंधन आणि विद्युत शक्ती हे ऊर्जेचे स्त्रोत संपल्यानंतर पुढे काय? असा प्रश्न पडून जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांनी विसाव्या शतकाच्या सुरुवातीला एक सिद्धांत मांडला. त्यानुसार पदार्थाला शक्तीमध्ये व शक्तीला पदार्थात द्रव्यशक्ती समीकरणाद्वारे परावर्तीत करणे शक्य आहे, असे ते समीकरण होते. त्यानुसार एक औंस इंधनाने पंधरा लाख टन कोळशाची शक्ती देणार्‍या आण्विक शक्तीचा शोध लावण्याच्या प्रयत्नांना सुरुवात झाली. त्यानुसार जर्मनीने सर्वप्रथम आण्विक शक्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली. या प्रयत्नातून आण्विक शक्तीचा शोध लागला नसला तरी जर्मनीने केलेल्या अभ्यासातून उपलब्ध झालेली माहिती पुढे आण्विक शक्तीच्या शोधासाठी उपयुक्त ठरली. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फ्रेंकलिन रुझवेल्ट यांनी विज्ञानशास्त्रज्ञ आईनस्टाईन यांच्याकडून प्रेरणा घेत अणुबॉम्बची निर्मिती करण्याचे ठरविले. त्यानुसार १९४० मध्ये सुप्रसिद्ध भौतिक शास्त्रज्ञ डॉ. रॉबर्ट ओपेनहाइमर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. या अणुबॉम्ब निर्मितीत जर्मनी, युरोप आणि अमेरिकेतील प्रमुख वैज्ञानिकांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभाग होता. अखेर १३ जुलै १९४५ रोजी एलामोगेडरो वाळवंटात अणुबॉम्बची चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. परिसरातील जवळपास ९ मैलांपर्यंत अणुबॉम्बच्या ज्वालांची उष्णता पसरली, तर एक मैल त्रिज्येतील अंतरावरील असंख्य जीवजंतू मुत्युमुखी पडले. अशाप्रकारे अणुबॉम्बची निर्मिती झाली. दुसर्‍या महायुद्धाच्या कालखंडातच अणुबॉम्ब तयार करण्यात आला होता. हिरोशिमावर फेकण्यात आलेल्या अणुबॉम्बचे ‘लिटल बॉय’ नामकरण करण्यात आले. ४ हजार किलोग्रॅम वजनाच्या ‘लिटल बॉय’ बॉम्बची लांबी ३ मीटर आणि व्यास ७१ सेंटीमीटर होता. १३-१८ किलो टन टीएनटी (ट्रायनायट्रोटालूईन) क्षमतेच्या ‘लिटल बॉय’ अणुबॉम्बने जपानवर हल्ला न करता, जपानच्या शरणागतीसाठी त्यांना केवळ अणुबॉम्बची माहिती देण्यात यावी, असे मत अणुबॉम्बची निर्मिती करणार्‍या शास्त्रज्ञांनी मांडले. पण, अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष ट्रुमन यांनी शास्त्रज्ञांच्या मताला डावलून अमेरिकन हवाई दलाला जपानवर अणुबॉम्ब हल्ला करण्याचे आदेश दिले. त्यानुसार वैमानिक कर्नल पॉल डब्ल्यू आणि मेजर थॉमस डब्ल्यू. फीअरबी हे अणुबॉम्ब घेत जपानच्या हिरोशिमाकडे रवाना झाले. विशेष म्हणजे त्यापूर्वी कधीच या अणूबॉम्बच्या शक्तीची जगाच्या पाठीवर कोणालाच माहिती नव्हती. हिरोशिमावर अणुबॉम्बचा हल्ला करण्यासाठी गेलेल्या अमेरिकन वैमानिक आणि अणुबॉम्ब फेकणारा त्याचा साथीदार हे सुद्धा त्याला अपवाद नव्हते. त्यानुसार ६ ऑगस्ट १९४५ रोजी सकाळी ८.१५ मिनिटांनी जपानमधील ‘आइओई’च्या ‘टी’ ब्रिजवर जवळपास ९४०० मी. उंचीवरून अणुबॉम्बचा हल्ला करण्यात आला. हल्ल्याच्या काही सेकंदातच अणुबॉम्बच्या स्फोटाचे परिणाम दिसू लागले. हिरोशिमा शहराच्या १७० मैल परिसरात बॉम्बचा हादरा बसला. बॉम्ब पडलेल्या १ मैल परिसरातील एकही सजीव त्या स्फोटात जिवंत राहिला नाही. एका क्षणात जवळपास ६० हजार लोकांचा मृत्यू झाला. या स्फोटात तेथील लोकांनी सूर्यापेक्षाही प्रखर उष्णतेचा गोळा डोळ्यांदेखत फुटताना पाहिला. त्यामुळे ३ लाखांहून अधिक जणांची दृष्टी गेली. हा विनाश एवढ्यावर थांबला नाही. या स्फोटात जखमी झालेल्या लाखांहून अधिक लोकांनी अणुबॉम्बच्या किरणोत्सर्गाच्या परिणामांचा सामना करत अखेर मृत्यूला कवटाळले. या हल्ल्यात ७८ हजार १५० जणांचा मृत्यू, १३ हजार ९८३ जण बेपत्ता, ३७ हजार ४२४ जण जखमी तर २ लाख ३५ हजार ६५६ जणांना इतर प्रकारच्या जखमा असे एकूण ३ लाख ६५ हजार २१३ लोकांना या हल्ल्याच्या दुष्परिणामांचा सामना करावा लागला. त्यानंतर ९ ऑगस्ट १९४५ रोजी जपानमधील नागासाकी येथे दुसरा अणु हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर जगाने मानवाचे दोन चेहरे पाहिले. अमेरिकेने कोणताही विचार न करता क्रूरपणे जपानवर हल्ला चढवत माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडवून आणली, पण या घटनेने जपानमधील लोकांनी एकत्रित येत केलेल्या प्रगतीने आज तेथील अणुबॉम्बच्या हल्ल्याचे घाव पुसून टाकले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -