घरफिचर्सभाषेसाठी जगणारा लेखक!

भाषेसाठी जगणारा लेखक!

Subscribe

‘मातृभाषेवर प्रेम करायचे म्हणजे काय करायचे?’ तर ‘रवींद्रबाब यांनी आपल्या कोकणी भाषेसाठी जे केले,ते करायचे !’ रवींद्रबाब म्हणजे रवींद्र राजाराम केळेकर. कोकणी भाषेला ‘राजभाषेचा दर्जा’, पहिला साहित्य अकादमी पुरस्कार आणि पहिला ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार मिळवून देणारे साहित्यिक. अनेक भाषांवर प्रभुत्व असूनही ‘लिहायचे ते फक्त कोकणीतच व कोकणीकरिताच’ अशी ठाम भूमिका घेणारे भाषाप्रेमी. ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानीत वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रजांच्या जन्मदिवशी २७ फेब्रुवारीला साजरा होणार्‍या मराठी राजभाषा दिनी असाच संकल्प मराठी भाषिकांनी मराठी भाषेसाठी करायला काय हरकत आहे.

‘इव्हेंटोक्रसी’ ही नवी कल्पना सध्या भलतीच लोकप्रिय झाली आहे. गोष्ट, मग ती किती का साधारण असेना, तिचा ‘इव्हेंट’ जोरदार झाला पाहिजे, यावर सध्या भलताच भर आहे.‘इव्हेंट’ कसा झाला, यावरूनच आता गोष्टीची गुणवत्ता जोखली जातेय. अशा ‘इव्हेंटोक्रसी’च्या उत्सवी झगमगाटात ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ झोकात पार पडला. समस्त सरकारी कार्यालये आणि शाळा-महाविद्यालये पंधरा दिवस मातृभाषेच्या प्रेमात आकंठ बुडालेली होती. शासकीय आदेशातून स्फुरलेले हे प्रेम इतके ‘ओतीव आणि अतीव’ होते की बिच्चार्‍या मायमराठीचा जीवच गुदमरून जावा.

कुणाला हा उपरोध जरा जास्तीच जहाल वगैरे वाटेल; रांगोळ्या, निबंध स्पर्धा, व्याख्याने, कविसंमेलने यापेक्षा भाषेवर प्रेम दाखविण्याची अन्य रीत कोणती असा रोकडा सवाल या मंडळींकडून विचारला जाईल. तसे तर या सवालाचे अनेकानेक जवाब संभवू शकतील; पण तूर्तास याचे एकच उत्तर द्यायचे झाल्यास इतकेच म्हणता येईल : ‘मातृभाषेवर प्रेम करायचे म्हणजे काय करायचे?’ तर ‘रवींद्रबाब यांनी आपल्या कोकणी भाषेसाठी जे केले,ते करायचे !’

- Advertisement -

रवींद्रबाब म्हणजे रवींद्र राजाराम केळेकर. कोकणी भाषेला ‘राजभाषेचा दर्जा’, पहिला साहित्य अकादमी पुरस्कार आणि पहिला ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार मिळवून देणारे साहित्यिक. देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनात सक्रिय असलेले, गोवामुक्ती आंदोलनात पुढाकार घेतलेले स्वातंत्र्यसैनिक. अगोदर देश, मग प्रदेश आणि पुढे भाषेच्या मुक्तीसाठी अखंड झुंजलेले झुंजार सैनिक. भक्कम तात्त्विक आणि वैचारिक पाया असलेले प्रतिभावंत लेखक. ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी; जाळूनी किंवा पुरुनी टाका’ हा बाणा ठेऊन सतत नवीन विचारांना दिशा दाखविणारे दीपस्तंभ. पोर्तुगीज, इंग्रजी, गुजराती, बंगाली, हिन्दी, मराठी आणि कोकणी अशा अनेक भाषांवर प्रभुत्व असूनही ‘लिहायचे ते फक्त कोकणीतच व कोकणीकरिताच’ अशी ठाम भूमिका घेणारे भाषाप्रेमी.

भाषातज्ज्ञांच्या मते जगातील एकूण भाषांची संख्या जवळपास सहा हजार आहे. जगाची एकूण लोकसंख्या 700 कोटी. त्यात चीनी बोलणारे 130 कोटी, इंग्रजी बोलणारे 40 कोटी, स्पॅनिश बोलणारे 30 कोटी, हिन्दी 25 कोटी, अरेबिक 20 कोटी, बंगला 20 कोटी, रशियन 16 कोटी, पोर्तुगीज 14 कोटी, जपानी 12 कोटी, फ्रेंच 12 कोटी, जर्मन 11 कोटी, मराठी 10 कोटी आणि कोकणी बोलणारे अंदाजे 24 लाख….कोटींच्या पटीत असणार्‍या अन्य भाषिकांच्या तुलनेत कोकणी बोलणार्‍यांची संख्या अगदीच तोळामासा. परंतु ‘सत्य असत्यासी मन केले ग्वाही, मानियेले नाही बहुमता’ या न्यायाने रवींद्रबाब यांनी अखंडपणे मातृभाषेप्रतिची आपली आस्था आत्मीयतेने जपली,जोपासली.त्यांनी नेमके काय केले, हे समजून घेण्यापूर्वी त्यांचा थोडक्यात परिचय करून घेऊ.

- Advertisement -

रवींद्र राजाराम केळेकर. जन्म 7 मार्च 1925 चा. जन्मगाव दक्षिण गोव्यातील प्रियाळ. वडील प्रख्यात डॉक्टर. भाषा आणि साहित्यविषयक प्रेमाचे संस्कार वडिलांकडूनच आलेले. तरुण वयात अगोदर स्वातंत्र्य आंदोलन आणि पुढे गोवामुक्ती आंदोलनात सक्रिय सहभाग. यातूनच महात्मा गांधी, राम मनोहर लोहिया आणि काका कालेलकर यांच्या विचारांनी प्रभावित…ज्यातून पुढे त्यांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान आकाराला आले. आणि मग साहित्य असो वा जीवन त्याकडे ते आंदोलनाचाच भाग म्हणून पाहात राहिले. कोकणी, मराठी, हिंदी आणि गुजराती अशा चार भाषांत मिळून त्यांची 32 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत, ज्यामध्ये ‘हिमालयांत’ हे प्रवासवर्णन, ‘ओथांबे’, ‘दिवास्वप्न’ हे लघुनिबंधसंग्रह तर ‘एका विचाराची जीवीत-कथा’ आणि ‘भाषिक संघर्षाचे समाजशास्त्र’ हे वैचारिक लेखांचे संग्रह विशेष चर्चेत राहिलेले आहेत. ज्यापैकी ‘हिमालयांत’ या चिंतनपर प्रवासवर्णनाला साहित्य अकादमीचा पुरस्कार असून एकंदर साहित्यिक योगदानासाठी साहित्य अकादमीची प्रतिष्ठित फेलोशिप मिळाली आणि 2006 मध्ये त्यांना भारतीय साहित्यातील सर्वोच्च अशा ‘ज्ञानपीठ’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

खरेतर जन्म इस. 1925, मृत्यू इस.2010; एकूण पंच्याऐंशी वर्षांचे त्यांचे आयुष्य. त्यातच शिक्षण, नोकरी, लेखन, लग्न, मुले-बाळे, पारितोषिके, पुरस्कार वगैरे….हा तसा फक्त आकडे दाखविणारा तपशील. प्रत्येकवेळी त्यातून फार काही मूलभूत हाती लागतेच असे नाही.रवींद्रबाब यांचे ‘खास असे’ वेगळेपणही वर उल्लेख केलेल्या तपशिलात सापडणारे नाही.

भाषाप्रेमी, भाषातज्ज्ञ आणि मातृभाषा अभिमानी ही केळेकरांची खरी ओळख. तसे त्यांचे जगभरातील सगळ्याच भाषांशी सारखेच सख्य; पण त्यातही भारतीय भाषांवर विशेष प्रेम. आणि मातृभाषा कोकणीवर तर जीव ओवाळून टाकण्याची तयारी.

‘भाषा हे केवळ संपर्काचे साधन’ असली गुळगुळीत आणि मिळमिळीत भूमिकाच त्यांना मान्य नाही. त्यांच्या मते ‘भाषा ही मानवी संस्कृतीचा सर्वोच्च आविष्कार!’ एका लेखात त्यांनी ही भूमिका ठामपणे मांडली आहे: ‘भाषेकडे फक्त संपर्काचं एक साधन- a means of communication म्हणून पाहणं योग्य नाही. भाषा खरे म्हणजे सांस्कृतिक आविष्काराचे एक माध्यम असते- a medium of cultural expression! भाषा माणसाला आयडेंटीटी देते. त्याची त्यालाच आणि जगाला ओळख करून देते. मी पंजाबी, बंगाली, मराठी असे कोणतेच भेदभाव मनात नाही. मी ‘भारतीय’ आहे असेच मानतो; पण ‘मी भारतीय’ असे कितीही ओरडून सांगू दे, ‘तू कोंकणी’ असं माझी भाषा मला सांगते आणि ‘हा कोंकणी’ अशी जगालाही ओळख करुन देते. आपण हे लक्षात घ्यायला हवे की भाषेची आयडेंटीटी धर्माच्या आयडेंटीटीपेक्षा अधिक तीव्र असते. फ्रांस, इटली आणि स्पेन हे धर्माच्या दृष्टीने एक : रोमन कॅथॉलिक ख्रिस्ती; पण भाषेच्या दृष्टीने एकमेकांपासून वेगळे. आणखी एक उदाहरण म्हणजे धर्मामुळे बंगाल प्रांताचा एक तुकडा हिंदुस्थानपासून वेगळा झाला आणि पूर्व पाकिस्तान झाला, पण भाषेने त्याला पाकिस्तानपासून वेगळा केला आणि ‘बांगलादेश’ केला.’

याचा अर्थ भाषिक आयडेंटीटी ही प्रदेश, धर्म, पंथ, जात अशा ओळखींपेक्षा जास्त महत्त्वाची आणि परिणामकारक ठरणारी आहे. ‘भाषिक संघर्षाचे समाजशास्त्र’ यात त्यांनी आपल्या याच मताचे विश्लेषण केले आहे. या ग्रंथातील मध्यवर्ती मुद्दा म्हणजे ‘भारत हा मुळापासूनच बहुभाषिक होता आणि पुढेही तो बहुभाषिकच राहणार आहे. बहुभाषिकत्व हा या देशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे. मागील तीन हजार वर्षांपासून सर्व भाषा परस्परांना प्रभावित करूनही एकमेकांच्या सहकार्याने जगत आहेत. म्हणजे बहुभाषिकत्व हे काही भांडणाचे निमित्त नव्हे; तर ती शांततेने नांदण्याची गुरुकिल्ली आहे.

यातील दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ‘आंतरराष्ट्रीय’ होण्याच्या हव्यासापोटी आपण इंग्रजीची गुलामगिरी स्वीकारून स्वतःचा सांस्कृतिक र्‍हास करून घेत आहोत. आपले नेते हे स्वतंत्र राष्ट्राचे नेते राहिलेले नाहीत. ते अमेरिका-इंग्लंडच्या सांस्कृतिक वसाहतीचे नेते बनले आहेत, याबद्दलची खंत व्यक्त करून ‘भारत’ ही वसाहत ‘इंग्रजी’च्या अंधानुकरणातून कशी घडवली आहे याची चर्चा केली आहे.

इंग्रजी शिकण्यास त्यांचा विरोध नाही; पण इंग्रजीतून शिकण्यास त्यांचा कडवा आक्षेप आहे. हा आक्षेपही ते तिखट शब्दांत मांडतात, ‘नवीन भारत निर्माण करणं हा आपला उद्देश असेल तर मौलिक विचार करणार्‍यांचा एक वर्ग आपणाला लागेल. तो इंग्रजीच्या मार्फत निर्माण होणे शक्य नाही. हे परकी माध्यम कधीच आपल्याला मौलिक विचार करायला शिकवणार नाही. हे माध्यम फार तर नकलाकार-इमिटेटर्स निर्माण करू शकेल, अन् नकलाकार कधीच राष्ट्र उभारणीचे काम करु शकत नाहीत.’

यापुढे ते म्हणतात, ‘लोक मुलांना ज्ञान संपादन करण्यासाठी शिक्षण देत नसतात. नोकरी मिळावी म्हणून शाळेत शिक्षण घ्यायला पाठवतात. मुलांना ‘येते’ त्या भाषेतून शिक्षणाची संधी मिळत नाही, ‘येत नाही’ त्या भाषेमार्फत त्यांना शिकावे लागते.’

हे टाळण्यासाठी काही उपाय त्यांनी सुचवले आहेत. ज्यातला एक उपाय ‘इंग्रजीचे प्रशासनातून पूर्ण उच्चाटन करून हे प्रशासन पूर्णपणे स्थानिक भाषांतून चालवावे आणि दुसरा ‘मातृभाषा’ ही संकल्पना न वापरता त्याऐवजी ‘परिसर भाषा’ ही संकल्पना वापरून लहान मुले ज्या भाषेतून परस्परांशी बोलतात, भांडतात, परस्परांना शिव्या देतात ती भाषा शिक्षणाचे माध्यम म्हणून वापरावी.

भाषेविषयीचे हे मूलभूत चिंतन केळेकरांना अन्य अनेक साहित्यिकांपेक्षा वेगळे करते. लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे त्यांचे ‘भाषाचिंतन’ आणि ‘जीवनचिंतन’ या जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. किंवा दुसर्‍या शब्दांत असेही म्हणता येईल की त्यांच्या सगळ्याच प्रकारच्या लेखनात ‘भाषाचिंतन’ हेच केंद्रवर्ती राहिलेले आहे. ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार स्वीकारताना त्यांनी जे मनोगत व्यक्त केले त्यातही याचेच प्रतिबिंब पडल्याचे दिसून येते :‘इंग्रजी भाषेचा देशी भाषेत शिरकाव झाल्याने सांस्कृतिक ‘बोन्सायीकरण’ झाले आहे. आज इंग्रजी भाषेने आपल्या देशात बोन्साय लेखक, बोन्साय विद्वान-विचारवंत आणि बोन्साय विद्यार्थी निर्माण केले आहेत. बोन्साय विद्वान देशाच्या विकासासाठी ठोस असे काहीच देऊ शकत नाहीत; ते केवळ परिसंवादाची शोभा वाढवू शकतात.’

आज आपण ज्या पद्धतीच्या भाषिक-सांस्कृतिक पर्यावरणात वावरत आहोत. त्यात त्यांची ही भूमिका कडवट, कटू आणि एकारली वाटू शकते. पण आपण हे समजून घ्यायला हवे की, त्यांचा विरोध इंग्रजी भाषेला नाही; तर ‘इंग्रजीच्या प्रभुत्वा’ला आहे. गावपाड्यात पावसाळ्याच्या छत्र्यांप्रमाणे उगवणारी इंग्रजी शाळांची दुकाने म्हणजे या प्रभुत्वापोटी जन्माला आलेली पिलावळ आहे. जगाचे आणि जगभर पसरलेल्या मानवी जगण्याचे आकलन करून घेण्यासाठी ‘साधन’ म्हणून इंग्रजी गरजेची आहे, याला त्यांचा आक्षेप नाही; त्यांचा विरोध आहे ‘माध्यम’ म्हणून इंग्रजीचे अवास्तव स्तोम वाढविण्यावर. अशातून लहान-सहान प्रदेशाच्या पर्यावरणासाठी प्राणवायू म्हणून कार्यरत असणार्‍या ‘परिसर भाषां’चा जीव गुदमरून जातो. त्या परीघावर फेकल्या जातात.आणि हळूहळू त्यांचे मोल उणावत अखेरीस नामशेष होतात.असे भाषांचे नामशेष होणे हे मानवी संस्कृतीचे सगळ्यात मोठे नुकसान ठरते हे भाषा आणि संस्कृतीचे अभ्यासक म्हणून रवींद्रबाब यांचे जे म्हणणे होते-ते जगभरातील भाषेचा कोणताही अभ्यासक नाकारू शकणार नाही.

भारतीय भाषांच्या लोकसर्वेक्षणाचा बृहद प्रकल्प हाती घेणारे डॉ.गणेश देवी यांचे संशोधनही केळेकरांच्या मांडणीला अनुमोदन देणारे आहे. देवींनी म्हटले आहे : ‘भारतात होत असलेला भाषिक र्‍हास हा फक्त अल्पसंख्य तसेच बोली भाषांबाबतच घडतो आहे असं नाही. हीच वस्तुस्थिती ज्या भाषांना मोठी साहित्यिक परंपरा आहे, ज्यांना तात्त्विक तसेच सृजनशील लिखाणाचा मोठा वारसा लाभलेला आहे अशा महत्त्वाच्या भाषांबाबतही दिसून येते. मराठी, गुजराती, कन्नड, ओरिया या समृध्द साहित्याची परंपरा असलेल्या भाषा आपापल्या मातृभाषा आहेत, असा दावा करणारे जे समाज आहेत, त्यांच्यातील कुमार वयाच्या वर्गाला त्यांच्या भाषेतील या समृद्ध वारशाची फारच थोडी ओळख आहे, किंवा जवळजवळ नाहीच असे म्हटले तरी चालेल. ते त्यांची स्वतःची भाषा ‘परभाषका’ इतपत बोलू शकतात.’ (भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण-प्रस्तावना,पद्मगंधा,पृ.38)

केळेकर इंग्रजीच्या प्रभुसत्तेला जसा विरोध करतात. तसेच कोकणीला ‘स्वतंत्र भाषा’ न मानता मराठीची ‘बोली’ मानण्याच्या दादागिरीवरही आक्षेप घेतात. केळेकर गोव्यात मराठी-कोकणी सहयोग असावा असे मानणारे आहेत. या सहयोगासाठी मराठीने हेकेखोरपणा सोडून समंजसपणाची भूमिका घ्यावी, असे त्यांचे म्हणणे आहे. कोंकणी ही केवळ ख्रिस्ती समाजाची भाषा नाही; तर ती गोव्यात राहणार्‍या मराठी समाजाचीही भाषा आहे. कोंकणी ही इतर विकसित भाषांइतकी विकसित नसली तरी ती एक वेगाने विकसित होत राहिलेली विकसनशील भाषा आहे. ही वस्तुस्थिती मान्य करून तिला ‘बोली’ मानणे सोडून दिले पाहिजे आणि तिच्या विकासाला सर्व कोकणी माणसांनी हातभार लावला पाहिजेत, असे त्यांचे म्हणणे आहे.

‘भाषा संवर्धन पंधरवड्याच्या’ निमिताने मराठीप्रेमाचे ‘शासकीय गोडवे’ गात असतांना रवींद्र केळेकरांचे हे ‘भाषाभान’ आपणाला ‘भाषेवर प्रेम करायचे म्हणजे काय करायचे?’ हे कळण्यासाठी पुरेसे आहे.

नवजात इस्त्राईलच्या एलिझेर बेन यहुदाने हिब्रू भाषेसाठी जे केले तेच कोकणीसाठी रवींद्रबाब यांनी केले. ‘घरीदारी सगळीकडे हिब्रूच बोलली जाईल यासाठी त्यानं मोहीमच उघडली. त्यावेळेपर्यंत हिब्रू केवळ बोलली जात होती, लिहिली जात नव्हती. बेन यहुदानं हिब्रूला लिपी दिली. नवेनवे शब्द दिले. पोटच्या पोराच्या कानावर हिब्रूखेरीज एकही शब्द पडणार नाही, याची काटेकोर काळजी घेतली. आणि या पोराला पहिला हिब्रू जाणणारा, बोलणारा, लिहिणारा नवजात नागरिक म्हणून जगापुढे आणलं.’

जागतिकीकरणाच्या झपाट्यात अनेकानेक भाषा नामशेष होण्याच्या मार्गावर असताना प्रादेशिक भाषेत साहित्यसर्जन करणार्‍या लेखकाने आपापल्या भाषेसाठीची अशी लढाई लढण्यासाठी सतत तयारच असायला हवे. कारण रवींद्रबाब म्हणतात त्याप्रमाणे ‘प्रत्येक रायटरने अगोदर फायटर असले पाहिजे!’

– विश्वाधार देशमुख

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -