घरफिचर्सआत्मचरित्र ..चरित्र इत्यादी

आत्मचरित्र ..चरित्र इत्यादी

Subscribe

आपल्याकडे आत्मचरित्र लिहिण्याची प्रथा फारशी नाही. एक तर लोक म्हणतात, त्यात काय लिहायचंय किंवा आपलं आपणच लिहायचा संकोच वाटतो. दुसरं असं की त्यांना कुणाला दुखवायचं नसतं. उगाच आता या वयात कशाला कुणाचं वैर ओढवून घ्या, असं त्यांना वाटत असतं. त्यामुळे खरं सांगवत नाही, अन खोटं लिहिता येत नाही. असं काहीतरी स्वरूप होतं आणि लिहिलेलं अगदी साधं खरं तर सपक बनतं. अर्थात हंसा वाडकर सांगते ऐका या सारख्या पुस्तकांचा अपवाद आहेच. तरीही बरेच जण अप्रिय टाळूनही वाचनीय आणि वास्तवाशी फारकत न घेणारं लिहू शकतात. त्यामुळं बर्‍याच गोष्टींची वाचकांना आणि अर्थातच त्यांच्या चाहत्यांना माहिती होते. काही जणांनी स्वतः लिहिलं नाही, तरी ते आपलं चरित्र लिहायला इतरांना परवानगी देतात. कुणीतरी सांगतात आणि त्याचं शब्दांकन केलं जातं. यात दुहेरी फायदा असतो. चांगलं म्हटलं गेलं तर समाधान आणि नावं ठेवली गेली, तर मात्र त्या लेखकानं ते बरोबर मांडलं नाही वा गफलत केलीय वा सनसनाटी निर्माण करायचा प्रयत्न केलाय असं सांगून आपला बचावही करता येतो. एक गोष्ट मात्र खरी, की अशा प्रकारच्या कलाकारांच्या जीवनाबाबतचं लिखाण वाचायची सर्वांनाच आवड असते. जे काही वेगळंच असतं, त्याबाबत नेहमीच कुतूहल असतंच ना! त्यामुळंच अशा चरित्र आत्मचरित्रांना चांगली मागणी असते.

सुदैवानं अलीकडच्या काही वर्षांत आत्मचरित्रं जरी फारशी प्रकाशित झाली नसली, तरी कलाकारांची चरित्र मात्र बर्‍याच प्रमाणात येत आहेत. काही अविस्मरणीय कलाकृतींची निर्मिती कशी झाली, याबाबतच्या पुस्तकांनाही वाचक मोठ्या प्रमाणात लाभले आहेत. कारण त्या कलाकृती आजही लोकांच्या स्मरणात आहेत आणि त्याबरोबरच नव्या पिढीलाही त्यांचं आकर्षणच नाही, तर मोह पडतो आहे. त्यामुळंच संगीतकार, गीतकार अशा अनेकांबाबत आता पुस्तकं येत आहेत आणि त्यांच्यामुळं अधिकाधिक माहिती मिळात आहे. काही जणांवर लघुचित्रपटही तयार करण्यात आले आहेत. हे सारे रसिकांची भूक भागवण्याचा प्रयत्न करत आहेत. अगदीच नाही त्यापेक्षा काहीतरी माहिती मिळते आहे, यातच वाचकांना समाधान आहे. शिवाय गप्पाटप्पांना ही पुस्तके खमंग विषय पुरवतात हे कुणीच अमान्य करणार नाही.

भारतातील रुपेरी पडद्यावर दीर्घकाळ अंमल गाजवणारी त्रिमूर्ती म्हणजे दिलीप कुमार, देव आनंद आणि राज कपूर. राज कपूर केल्याच शतकात गेला तर देव आनंद या शतकाच्या दुसर्‍या दशकाच्या सुरुवातीलाच. त्या तिघांतला एक दिलीप कुमार. एवढ्या वयस्कर माणसाला ए जा करणं बरोबर नाही, पण सवय. ती मोडायला हवी. तर दिलीप कुमार हे त्या सर्वांत लहान आणि त्यांच्या चित्रपटांची संख्याही त्यामानाने मर्यादित म्हणजे सुमारे 55 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत 62 चित्रपट. अलीकडच्या कलाकारांचा वेग पाहता हा अतिसंथच मानला जाईल. पण अचूकतेच्या आग्रहाचा हा परिणाम. अर्थात त्यामुळंच त्यातील अनेक आजही लोकांच्या स्मरणात आहेत हेही तितकेच खरे. त्यांच्या चित्रपटांची यादी नावनिशीवार देण्याची आवश्यकता नाही. 1944 च्या ज्वार भाटा पासून 1998 च्या किल्ला पर्यंत, काही अपवाद वगळता प्रत्येक चित्रपटांत त्यांचा प्रभाव जाणवत होता. अर्थात काही विस्मरणीयच होते हे ही खरे. ते कदाचित नोंदी करणार्‍यांखेरीज अन्य कुणाला आठवतही नसतील. पण एवढ्या प्रदीर्घ कारकिर्दीत असे काही असणारच हे कुणीही समजू शकेल.

- Advertisement -

हे सगळं सांगायचं कारण म्हणजे दिलीप कुमार यांचं काही वर्षांपूर्वी प्रकाशित झालेलं आत्मचरित्र. ते तसं रंजक आहे आणि वाचनीयही. त्यामुळंच त्याबाबत लिहायला काही वाटत नाही, उलट अनेकांना ते वाचण्याची उतसुकता निर्माण होईल अशी खातरी आहे. प्रत्येकाचा आवडता कलाकार कुणीतरी असतोच. तरीही त्याला इतरांबाबत कुतूहल असतं हेही खरंच. त्यामुळेच तुमचा आवडता हीरो कुणीही असो, तुम्हाला इतरांबाबत माहिती हवीच असते. त्यातही अनेकांचे हीरोच ज्याला हीरो मानतात त्या हीरोंच्या हीरो चे आत्मचरित्र वाचायला कुणाला आवडणार नाही?

भारतीय चित्रपट सृष्टीतील अनभिषिक्त अभिनयसम्राट दिलीप कुमार यांचे दिलीप कुमारः सबस्टन्स अ‍ॅन्ड द शॅडो; अ‍ॅन ऑटोबायॉग्राफी हे आत्मचरित्र. त्यांनी उदयतारा नय्यर यांना कथन केले आणि त्यांनी ते शब्दबद्ध केलेे. पुस्तकाचे दोन भाग असून पहिला आत्मचरित्रपर निवेदनाचा आहे. तर दुसर्‍या भागात चित्रपटसृष्टीत या ना त्या प्रकारे कार्यरत असलेल्यांबरोबरच दिलीप कुमारच्या काही जिवलगांनीही आपल्या आठवणी सांगून, आदरभाव व्यक्त केला आहे. यात या अभिनेत्याच्या समकालिनांचा (त्यांपैकी बहुतेकजण दिवंगत झाले असल्यामुळे) फारसा समावेश नाही. त्यामुळे अर्थातचे सारे लेखन केवळ त्यांच्याबाबतचा आदरभाव दाखवणारेच आहे. तरीही ते काहीसे दुरूनच केलेले असल्याने अपेक्षित जवळीक त्यात आढळत नाही. तरीही दिलीप कुमार यांच्याबाबतच्या वाचकांच्या भावनाच त्यांच्या कथनात व्यक्त झाल्याचे आढळते व म्हणून ते आवडण्याजोगे आणि दिलीप कुमार यांच्याबाबतचा आदरभाव वाढवणारेच ठरते.

- Advertisement -

युसुफ सरवार खान म्हणजे सर्वांना ठाऊक असलेले दिलीप कुमार. जन्मापासून ते लेखनकालापर्यंतचा, म्हणजे ब्याण्णव वर्षांचा (आज ते शहाण्णव वर्षांचे आहेत) आणि साधारण सहा दशकाच्या चित्रपटसृष्टीतील अभिनेता म्हणून त्यांनी केलेल्या प्रवासाचा काळ यात आहे. मुख्य म्हणजे वाचकांना माहीत असलेले चित्रपटांसंबंधी व अन्य किस्से कमी आहेत. पण काही किस्से मात्र प्रथमच सांगण्यात आले आहेत आणि त्यामुळे पुस्तकाची खुमारी वाढलीच आहे. त्यांचे बालपण, घरातील व्यक्ती, वातावरण, जीवनातील स्थित्यंतरे आणि वेगवेगळ्या अनुभवांचा समावेश आहे. देविकाराणी यांनी त्यांचे रुपेरी पडद्यासाठी दिलीपकुमार हे नामकरण कसे केले, ही हकीकत प्रत्यक्ष त्यांच्याकडून ऐकण्यात औरच मजा आहे. त्यामुळे नवे काहीतरी वाचल्याचे समाधान तर मिळतेच पण आपल्या या अभिनेत्याबाबत बरेच काही नव्याने माहीत होते.

या आत्मचरित्राला प्रस्तावना दिलीपकुमार यांची पत्नी सायरा बानू यांची आहे, तर शब्दांकन करणार्‍या उदयतारा नय्यर यांनी स्वप्नपूर्ती या नावाने निवेदन केले आहे. हे दोन्ही वाचनीय आहे. दुसर्‍या भागात चाळीसच्यावर व्यक्तींनी सांगितलेले दिलीपकुमार यांच्या संबंधीचे त्यांचे अनुभवही बरेच काही सांगून जातात. दिलीप कुमार यांच्या जीवनाची वाटचाल 25 प्रकरणांमध्ये असून, अनेक छायाचित्रांची तसेच त्यांच्या चित्रपट कारकिर्दीची -अगदी अप्रकाशित वा गुंडाळल्या गेलेल्या प्रकल्पांसकट- जोड दिली असल्याने संग्राहकांच्या दृष्टीने संदर्भमूल्यही लाभले आहे.

लहानपणापासून ते रुपेरी पडद्यावरील कारकीर्द सुरू होईपर्यंतच्या काळात हा नायक चांगलाच रमतो आणि ते साहजिकच. पेशावर ते मुंबई व्हाया नाशिक आणि पुणे हा प्रवास रंजक आहे. दिलीप कुमार यांचे नवेच रूप त्यात पाहण्यास मिळते. पुण्यातील विविध उपक्रम, तसेच देवळाली कॅम्पमध्ये भटक्या कुत्र्यांना परवानगी नसल्याने, त्यांना गोळी घालून ठार करून त्यांच्या शेपट्या पिशवीत ठेवणारा (कारण त्याला वापलेल्या गोळ्यांचा हिशेब द्यावा लागत असे) व त्यामुळे द डॉग मॅन म्हणून ओळखला जाणारा, कॉर्पोरल मार्लो पुण्यात पुन्हा भेटतो व सुरुवातीच्या धाकानंतर त्याच्याशी सख्य कसे जमते हा भाग रंजक आहे. (पुण्यात मात्र त्याला तशी संधी क्वचितच मिळते.) पुण्यातच क्लबमध्ये कार्पोरलची मुलगी काय थेर करते आणि त्याचा गाजावाजा होऊ नये म्हणून घेतलेली काळजी, असे अनुभव थरारक आहेत. खान परिवाराची कपूर कुटुंबाबरोबर पेशावरपासून आजोबाच्या काळापासूनच असलेली कॉलेजमध्ये राज कपूरच्या साथीत कशी तजेलदार झाली याचे झकास वर्णन आहे. त्यात राजच्या सहजपणे कोणत्याही मुलीबरोबर बोलण्याचे कौतुक करतानाच आपला भिडस्त, लाजरा म्हणावा असा कसा होता हे प्रांजलपणे कथन केले आहे.

देविकाराणींनी कोणतीही परीक्षा न घेता मअभिनेता म्हणून आमच्या कंपनीत ये, तुला महिना 1250 रुपये पगार देऊ,य असे सांगताच आपण कसे थक्क झालो होतो, तेही सांगितले आहे.

बहुतेकांना उत्सुकता वाटणार्‍या अस्मा प्रकरणाबाबत थोडक्यात आणि कोणत्याही प्रकारचा आव न आणता, वा आपला बचाव करण्यासाठी काहीही कांगावा न करता, प्रांजलपणे जे काही घडले ते कसे घडले होते ते सांगून ते एक भयस्वप्न होते, आणि सायराबरोबरच्या माझ्या वैवाहिक जीवनावर भयानक सावट आणणार्‍या या प्रसंगामध्ये, मी परिस्थितीचा बळी होतो, असे म्हणून तो विषय संपवण्यात आला आहे. सायराबाबत मात्र (अर्थातच) मोठ्या कौतुकाने लिहिले आहे. आपल्या वयाच्या (लग्नाच्या वेळी ते तिच्या जवळपास दुप्पट वयाचे होते) माणसाच्या प्रेमात ही तरुणी पडल्याने अचंबित झाल्याचे त्याने म्हटले आहे. त्याबरोबरच तिचे प्रेम हे कसे खरेखरे आहे आणि आजही ते कसे कायम आहे हे सांगताना, ती कधीकधी आपल्याला प्रेमाने चिको अशी हाक मारते हे सांगतो. पुण्यात ब्रिटिश लोक त्यांना चिको असे प्रेमाने हाकारत. त्याचा अर्थ स्पॅनिशपमध्ये नौजवान किंवा छोकरा असा आहे. हे त्याने आधीच कथन केेले आहे व त्या संदर्भातच हा उल्लेख आहे. संदर्भानुसार हे कथन अशा प्रकारे हे आत्मकथन काळाच्या हिंदोळ्यावर पुढे मागे जाते, त्यामुळे ते एकसुरी होत नाही.

सार्‍याच गोष्टी या मर्यादित जागेत सांगता येणार नाहीत. पेपरबॅक आवृत्ती प्रकाशित झाल्याने आता हे पुस्तक वाचकांच्या आवाक्यात आले असल्याने त्यांनी ते स्वतःच वाचलेले चांगले. अर्थात आपल्या सदरामध्ये प्रसंगावशात, आवश्यक असेेल तेव्हा त्यातील काही भाग येईलही. त्यामुळे ज्यांना ते पुस्तक वाचायची संधी मिळाली नसेल, त्यांचीही काही प्रमाणात सोय होईल. व ते वाचायचं राहूनच गेलं याबाबत हळहळ वाटणार नाही.

दिलीप कुमारः सबस्टन्स अ‍ॅन्ड द शॅडो; अ‍ॅन ऑटोबायॉग्राफी; शब्दांकन ः उदयतारा नय्यर; प्रकाशक ः हे हाउस इंडिया पब्लिकेशन, पाने ः 456 ; किंमत ः 499 रुपये.

-आ. श्री. केतकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -