घरफिचर्सबँक खात्यांची भाऊगर्दी टाळा !

बँक खात्यांची भाऊगर्दी टाळा !

Subscribe

आपण सर्वच बँक खाती आणि अनेक प्रकारची कार्ड्स बाळगून फिरत असतो. तसे बघितले तर जास्तीच्या सुविधांचे जणू अजीर्ण झाल्यागत असते. मिळते म्हणून किती घ्यावे? बँकांना धंदा आणि नफा वाढवायचा असल्याने ते आपल्याला ‘ग्राहक-कम्-गिराहिक’ करतात, म्हणून आपण का ‘बकरा’ व्हायचे? नेमके काय करावे? किती बँक खाती ठेवावीत? हे आपण पाहणार आहोत.

आजच्या घडीला प्रत्येक घरटी प्रत्येकाचे किमान एकेक खाते हे असतेच, हे चित्र आपल्या महानगरी भागातले असले तरी अजून गाव-खेड्यातील परिस्थिती विदारक आहे. अजून बँक माहीत नसलेली प्रजा आहे. अनेक पातळीवर प्रयत्न चालू असले तरी देशातील शंभर टक्के बँकिंगचे स्वप्न पूर्ण होण्यास अजून काही कालावधी लागेल. सर्वसमावेशक बँकिंग होणे हे अपरिहार्य आहे. आज आपण शहरी-निम-शहरी व ग्रामीण विकसित भागातील नागरिक बचतीचे महत्व जाणतो, पण ही सुविधा अजून सर्व देशबांधवाना मिळालेली नाही. देशाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी हे आवश्यक आहे.

- Advertisement -

समाजातील विषमता दूर होण्यासाठी, समान संधी मिळण्यासाठी आणि देशाच्या अर्थव्यवस्थेच्या उन्नतीसाठी बँकिंगचा परीघ विस्तारायला हवा. हे होत असताना अर्बन भागात बँकांचा इतका पसारा वाढलेला आहे, परिणामी आपण सर्वच बँक खाती आणि अनेक प्रकारची कार्ड्स बाळगून फिरत असतो. तसे बघितले तर जास्तीच्या सुविधांचे जणू अजीर्ण झाल्यागत असते. मिळते म्हणून किती घ्यावे? बँकांना धंदा आणि नफा वाढवायचा असल्याने ते आपल्याला ‘ग्राहक-कम्-गिराहिक’ करतात, म्हणून आपण का ‘बकरा’ व्हायचे? नेमके काय करावे? किती बँक खाती ठेवावीत? हे आपण पाहणार आहोत.

पार्श्वभूमी- सदा साटम परवा मार्केटात भेटले, नेहमीप्रमाणे घरगुती तक्रारी सांगत होते. यावेळी मुलगा आणि सुनेने उगाच बँकांत खाती उघडण्याच्या व्याप करून ठेवलेला आहे-हा विषय खास त्यांनी मला माझी बँकिंग पार्श्वभूमी असल्याने सांगितला. ते पुढे म्हणाले ,‘अरे ते पाच-सहा आकडी पगार कमावतात, उडवतातही बेदम ! खिश्यात कार्डांचे हे जाड-जूड गठ्ठे, म्हटले तुमचे खिसे फाटत कसे नाही? आणि चार बँकातील खाती, पाच कार्ड झेपतात तरी कशी?’ माझ्याकडे उत्तर नव्हते. पण विचार केला तर खरेच आज अशी परिस्थिती आहे असे मात्र जाणवले. आजची यंगिस्तानवाली पिढी कमावते आणि खर्च करते. त्यासाठी ते अनेक बँकात खाती उघडतात आणि भरपूर क्रेडीट आणि डेबिट कार्ड्स आपल्यापाशी बाळगतात.

- Advertisement -

एकापेक्षा अधिक बँकखाती का असतात?- पूर्वीचा जमाना वेगळा होता, कमावता एक होता, खर्चाची तोंडे अनेक होती, पैसे साठवायला वावच नव्हता. बँक खाते काढण्याची ऐपत नव्हती, ते काम श्रीमंत आणि उच्चभ्रूंचे. पुढे घरातली मुले-मुली शिकल्या, नोकरीला लागल्या. मग ‘चार पैसे’ बाजूला टाकण्याची समज आली आणि तसे जमुही लागले. हळूहळू उत्पन्नाचे आकडे वाढू लागले. राहणीमान आणि चैनीत जगणे हे जरुरीचे झाले. बँक्स विस्तारल्या, बचतीसाठी अनेक योजना पुढे आल्या. जॉब बदलत राहणे अपरिहार्य होत गेले. मग नवीन जॉबचा पगार त्यांच्या बँकेमार्फत थेट जमा होणार म्हणून त्या बँकेत खाते ओपन करणे मस्ट झाले. पुढे करिअर आणि बेटर ऑप्शन म्हणून हातातला जॉब सोडून दुसरा जॉब धरणे हे आजकाल कॉमन. परिणामी नवीन ऑफिसातील पगार तिसर्‍याच बँकेकडून मिळणार म्हणून त्याबँकेत आणखीन एक खाते उघडणे जरुरीचे झाले. अशारीतीने गरज म्हणून एकापेक्षा अधिक खाती उघडली जातात. हा अनुभव बर्‍याच मंडळींचा आहे. पण हे इतके सहज आणि नकळत होते की, तितकेसे लक्षातही येत नाही.

नोकरी हेच काही कारण नाही. अनेकदा व्यवसाय-धंदा करणारेदेखील विविध हेतू किंवा सोयीचे व्हावे म्हणून एक खाते असले तरी दुसरीकडे किंवा तिसर्‍या बँकेत खाते उघडत आहेत. घरगुती कारणांनीदेखील एखादे जादा खाते उघडले जाते. मुलींच्याबाबतीत तर काय, लग्न झाल्यावर नवीन खाते किंवा संयुक्त खाते उघडावे लागते, अर्थात तसे करणे हे नक्कीच चांगले असते. नाते आणि पैसा टिकण्यासाठी असे ‘खाते’ उपयुक्त ठरते.

एकापेक्षा अनेक खाती उघडण्याची काही कॉमन कारणे –
1) नवीन नोकरी -नवीन बँक खाते
2) लग्न केले, म्हणून नवे खाते, जॉईंट खाते
3) घर बदलले या कारणाने घराजवळील बँकेत खाते ओपन करणे
4) व्यवसायाची गरज म्हणून
5) धंदा वाढला म्हणून अधिक बँक खाते
6) कर्ज देणार्‍या बँकेत खाते उघडणे
7) पार्टनरशिप सुरू केल्यावर किंवा बंद केल्यास
8) बँक सोयीची नाही- शाखा दूर गेली /चार्जेस वाढवले-परवडत नाही /विलीनीकरण झाले
9) अचानक काही कारणाने नवे खाते उघडण्याची वेळ येते
10) नवीन बँक सुरु झाली /नवीन स्कीम वा आकर्षक योजनेचा लाभ घेण्यासाठी
11) एखादे खाते असलेली बँक बुडाली तर नवीन खाते
12) रिझर्व्ह बँकतर्फे एका बँकेतील एकाच खात्याला एक लाख रुपये इतकेच विमा संरक्षण मिळते. त्याकरिता अनेक खाती असू नयेत.
13) घरगुती कारणे असतात, म्हणून खाते उघडले जाते
14) नवीन बँक/शाखा उघडली जाते,तेव्हा कशी सेवा मिळते पाहूया असे ठरवून
15) आपल्या परिचयातील बँकेत काम करणारी व्यक्ती आग्रह करते म्हणून
16) स्टेट्स म्हणून एखाद्या मोठ्या प्रायव्हेट बँकेत खाते उघडून मोठेपण घेणे
17) एखाद्या बँकेच्या आकर्षक-स्कीमचा लाभ घेण्यासाठी
18) बदली वा स्थलांतर झाल्याने
19) हौसेने छोट्या मुलांची खाती उघडली जातात
20) काही तात्पुरत्या कामांसाठी बँक-खाते उघडले जाते -उदाहरणार्थ -सत्कार समिती किंवा संमेलन कार्यक्रम निधी जमवणे व खर्च करणे यासाठी

अधिक बँक-खाती असण्याचे दुष्परिणाम- आपण सहजपणे अनेक बँक-खाती उघडतो, पूर्वी अशी खाती असली तर तितके त्रासदायक वाटायचे नाही, पण आता अशी खाती चालू ठेवणे-त्यात पैशाची सतत उलाढाल करणे हे अनेकदा सोयीचे नसते. आर्थिकदृष्टीने परवडणारेही नसते. नेमका काय त्रास होऊ शकतो ते आपण पाहूया.

1) मिनिमम रकमेची अट- ही अट लय भारी असते. पूर्वी अशी अट नसल्याने खूप खाती असणे उपद्रवकारक नव्हते. पण आता प्रत्येक बँकेची किमान जमा रक्कम ही वेगवेगळी असते आणि कमी वापरातल्या खात्यातील जमा कमीकमी झाल्यास ‘किमान’च्या खाली जाण्याचा धोका असतो. त्याकडे दुर्लक्ष झाले, तर आपल्याला भूर्दंड पडतो. याचा फटका बसू नये, म्हणून आपण आपल्या मोबाईलमधला नको असलेल्या गोष्टी डिलीट करतो, त्याप्रमाणे वर्षाच्या शेवटी आपल्या बँक खात्यांचा आढावा घेवून काही खाती सरळ बंद करावीत. म्हणजे न वापरली जाणारी खाती डोईजड होणार नाहीत. आणि व्याज-उत्पन्न कमाईऐवजी दंड भरत राहण्याची पाळी येणार नाही.

2) निद्रिस्त खाती-बंदिस्त निधी- अनेकदा जी खाती तात्पुरत्या कारणांसाठी उघडली जातात, ती नंतर मात्र तशीच चालू राहतात. उपयोग नसल्याने आपण त्याकडे चक्क दुर्लक्ष करतो, कालांतराने आपण विसरूनही जातो. अशा खात्यांबाबत बँक आपल्याला स्मरणपत्रे पाठवते, आपण काही प्रतिसाद दिला नाही, तर रिझर्व्ह बँक नियमानुसार असे खाते ‘निद्रिस्त’ ठरवून त्यातील व्यवहार फ्रीज केले जातात. अशी लाखो खाती सर्वच बँकांकडे पडून आहेत आणि त्यातील जमा रक्कमही कोटींच्या घरात आहे. म्हणून आपण जागरूक राहिले पाहिजे व बदली-तात्पुरते कारण म्हणून काही खाती उघडली गेली असतील, ती लागलीच बंद केली पाहिजेत. वापर नाही, तर उपयोगात नसलेली ‘निकामी’खाती ठेवायची का?

3) घोटाळे-भ्रष्टाचाराला निमंत्रण – अनेक खाती असल्यास आणि त्यांचा वापर क्वचितच होत असेल तर सांभाळा! कारण बँकेची संपूर्ण माहिती काढून फसवणूक करणारी टोळी अशी खाती हेरते व त्याद्वारे मोठी हेराफेरी केली जाते. कधी कधी कर्मचारी-शर्विलक यांच्या संगनमताने अशी खाती गैरव्यवहार करण्यासाठी वापरली जातात. म्हणून बिनकामाचे खाते बंद करणे हेच आपल्या व बँकेच्या हिताचे असते.

पर्यायी एकतरी खाते का असावे? आजचे फास्ट लाईफ आणि विभक्त कुटुंबपद्धती यांचा विचार केला तर कोणाचेही एकच खाते असू नये आणि त्याचप्रमाणे भाराभर बँक खातीदेखील असू नयेत. जितकी खाती तितकी जबाबदारी वाढते. मात्र अगदी एकच खाते तेही व्यक्तिगत तर कधीच असू नये. कारण संकटे कधीही येऊ शकतात, उदाहरणार्थ-

1) वैयक्तिक अडचणी
2) बँकेबाबत काही समस्या -घोटाळे उद्भवल्यास
3) एखादी विशिष्ट सेवा तुमची बँक देवू शकत नसेल, आणि दुसरे खाते अशी सेवा देणार्‍या बँकेत असल्यास फरक पडतो
4) सहकारी बँक/सरकारी बँक /खाजगी बँक /विदेशी बँक-अशी व्हरायटी असल्याने प्रत्येक बँकेची सेवा-विविधता वेगवेगळी असते, यापैकी एका बँकेत खाते असल्यास, दुसरी बँक देत असलेली सेवा कदाचित तुम्हाला मिळू शकणार नाही
5) काही व्यवहार वेगळे असावेत म्हणून व्यक्तिगत व्यवहारात मिक्स होऊ नयेत म्हणून वेगळे खाते असणे जरुरीचे
6) गुप्त परंतु वैध व्यवहार करण्यासाठी वेगळे खाते असणे ठीक
7) एखादे संयुक्त खाते असावे याकरिता

तेव्हा बँकेत खाते असावे आणि पर्यायी खाते उघडून नक्की ठेवा. खात्यांचा वाजवीपेक्षा अधिक पसारा झेपणारा नसल्याने आवर घालावा. पैशांची बचत करण्यासाठी किंवा वृद्धी करण्यासाठी केवळ बँकेत खाते उघडणे हा काही एकमेव पर्याय नाही. हे ध्यानात घेऊन आपली गुंतवणूक विविध साधनांत करावी हेच अधिक श्रेयस्कर आणि लाभदायक.

-राजीव जोशी -बँकिंग-अर्थ अभ्यासक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -