घरफिचर्सऐ मालिक तेरे...आणि चंदू पारखी

ऐ मालिक तेरे…आणि चंदू पारखी

Subscribe

कमी पैशात आणि इनमिन ओळखीवर आपलं नशीब आजमावायला मुंबई गाठणं हा जीवघेणा जुगार तर होताच, पण खोल दरीत घेतलेली आंधळी उडीसुध्दा होती. पण हे सगळं दुर्दम्य साहस करताना चंदू पारखींच्या मनात नेहमी एक गाणं तरळायचं, ते होतं ‘दो आंखे बारह हात’मधलं ‘ऐ मालिक तेरे बंदे हम, ऐसे हो हमारे करम…’

जगण्याच्या वाटेवर अनेकदा कडूगोड प्रसंगांना माणसाला तोंड द्यावं लागतं. माणूस श्रीमंत असो की गरीब, या सगळ्या प्रसंगांना तोंड देताना कधी त्याचा विजय होतो, कधी त्याचा पराजय होतो, कधी कधी तर तो साफ मेटाकुटीला येतो, मोडून पडतो. अशा वेळी तो गाण्यावर, सुरांवर, संगीतावर प्रेम करणारा असेल तर त्याला कोणतं तरी गाणं आठवतं, कधी तो एखादं गाणं ऐकतो तर कधी एखादं गाणं स्वत:शीच पुटपुटतो किंवा गुणगुणतो. अशा वेळी गाणं त्याला जगण्याचं भान मिळवून देतं, जगण्याचा संघर्ष साजरा करण्याचं बळ प्राप्त करून देतं किंवा त्याच्या मनावरचा ताणतणाव किमान कमी करून देतं. संगीत तपशीलात कळो किंवा न कळो, संगीतात फक्त रूची असणार्‍यांना किंवा संगीतात कायम रस घेणार्‍यांना संगीत जगण्यासाठी भरभरून देत असतं असा अनुभव काहीजण व्यक्त करून गेले आहेत, त्यातलं एक नाव आहे दिवंगत अभिनेते चंदू पारखी.

- Advertisement -

चंदू पारखी यांचं आयुष्य जागोजागी खाचखळग्यांनी भरलेलं. अभिनयाशिवाय दुसरं आपल्याला काहीच करता येणार नाही हे त्यांच्या मनाने ठरवून टाकलेलं. त्यासाठी इंदुरातल्या त्यांच्या घराभोवतीच्या परिसरात त्यांनी आपला अभिनय आजमावून पाहिला. त्याला तिथल्या रसिकजनांकडून प्रचंड दाद मिळाली. पण आपला हा जातिवंत अभिनय फक्त इंदूरपुरताच मर्यादित राहिला तर आपल्याला आपल्या भवितव्याच्या दृष्टीने, चरितार्थाच्या दृष्टीने काहीच साधता येणार नाही हे त्यांनीही ओळखलं आणि त्यांच्या मित्रमंडळींनी, आप्तस्वकियांनी आणि हितचिंतकांनीही सांगितलं.

चंदू पारखी या माणसाकडे खरंच एक उंचीचा आणि तगडा अभिनय होता. पाठीला किंचित बांक असलेल्या या माणसाचे डोळे फार भेदक असायचे. संवाद समजून घेऊन त्याची उत्कृष्ट फेक करण्याची ढब या अभिनेत्याकडे होती. त्याचं दिसणं तसं मानलं तर फाटक्या अंगाचंच होतं, पण रंगभूमीवरचा किंवा कॅमेर्‍यासमोरचा त्यांचा वावर सहज असायचा. चंदू पारखींकडे अभिनयाचा हा जातिवंत गुण जात्याच होता. पण ते त्यांच्या इंदूरमध्येच राहिले असते तर त्यांच्या या गुणाचं फार चीज झालं नसतं. आपला अभिनय हे आपल्या चरितार्थाचं साधन म्हणून वापरायचं असेल तर इंदूरहून मुंबईच्या मायानगरीत येण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही हे शेवटी त्यांच्या मनाने घेतलं आणि एके दिवशी खिशात फक्त शे-दोनशे रुपये असताना त्यांनी सरळ इंदूर ते मुंबई गाडी पकडली. इतक्या कमी पैशात आणि इनमिन ओळखीवर आपलं नशीब आजमावायला मुंबई गाठणं हा जीवघेणा जुगार तर होताच, पण खोल दरीत घेतलेली आंधळी उडीसुध्दा होती. पण हे सगळं दुर्दम्य साहस करताना चंदू पारखींच्या मनात नेहमी एक गाणं तरळायचं, ते होतं ‘दो आंखे बारह हात’मधलं ‘ऐ मालिक तेरे बंदे हम, ऐसे हो हमारे करम…’

- Advertisement -

चंदू पारखींना हे गाणं त्या निराधार क्षणी आधार देऊन जायचं, पुढची वाट शोधण्यासाठी मदतीचा हात देऊन जायचं. त्यांच्या एका मित्राकडे ते आपल्या शबनममध्ये असलेली त्या गाण्याची कॅसेट घेऊन जायचे. त्याला विनंती करून ते गाणं चंदू पारखी ऐकायचे आणि आपल्या पुढच्या प्रवासासाठी त्या गाण्यातल्या त्या करूण सुरांचं इंधन घेऊन निघायचे आणि आपला प्रवास सुकर होतो आहे याची त्यांना जितीजागती अनुभूती यायची. ही अनुभूती घेऊनच ते मुंबई दूरदर्शनच्या मनोर्‍यात जायचे आणि तिथे त्यांना एखादं काम मिळून त्यांच्या सातआठ दिवसांच्या जगण्याची सोय होऊन जायची.

जगण्याची ही अशी काट्याकुट्यांनी भरलेली वाट चालत असताना त्यांच्या मनात ‘ऐ मालिक तेरे बंदे हम, ऐसे हो हमारे करम…’ या गाण्याचे सूर मनात सतत रेंगाळत राहायचे. आजुबाजूला कुणीही नसताना मनातल्या मनात रेंगाळत राहणार्‍या या गाण्याची त्यांना साथ आणि सोबत मिळायची. त्यांच्याकडे ते गाणं तालासुरात गाण्याचं कौशल्य कधीच नव्हतं, पण तरीही ते गाणं ते स्वत:शी आपल्याला हवं तसं गुणगुणायचे, कधी कधी स्वत:शीच पुटपुटायचे. ‘हैं तेरी रोशनी में जो दम, तू अमावस को कर दे पुनम’ ही त्या गाण्यातली ओळ आणि हे शब्द त्यांना आशेचा किरण दाखवून जायचे, त्यांच्यात प्रखर आशावाद जागवून जायचे. जेव्हा जेव्हा त्यांच्या जगण्याची वाट बिकट होऊन जायची तेव्हा तेव्हा त्यांना ही ओळ आणि ते शब्द त्यांना लख्ख आठवायचे.

या प्रवासातच त्यांना ‘निष्पाप’ नावाचं नाटक मिळालं आणि तिथून त्यांचे बहरलेले दिवस सुरू झाले. मग त्यांना नाटकं, सिनेमे, मालिका मिळत गेल्या. त्यांच्या जगण्याचा भरकटलेला पतंग स्थिरावू लागला. पण हे सगळे सुखाचे दिवस पहाण्याआधी त्यांचे दिवस किती हालअपेष्टांनी भरलेले होते हे सांगण्यासाठी त्यांनीच सांगितलेली एक गोष्ट सांगावीच लागेल…

‘निष्पाप’ हे त्यांचं नाटक सुरू असताना त्यांचा राहण्याचा, जेवण्याखाण्याचा खर्च कसाबसा सुटत होता. पण कधी कधी अशी वेळ येत होती की जेवणासाठी त्यांच्याकडे पैसे नसायचे. अशा वेळी पोटात जो आगडोंब उसळायचा तो शमवण्यासाठी त्यांनी स्वत:च एक शक्कल शोधून काढली होती. ते आपल्या झब्ब्याच्या खिशात दहा-बारा लसणाच्या पाकळ्या घेऊन फिरायचे. पोटात भुकेचा असा आगडोंब उसळला की खिशातल्या चार-पाच लसणाच्या पाकळ्या काढायचे, त्या खायचे आणि त्यावर ग्लासभर पाणी प्यायचे. त्यामुळे त्यांची भूक शमायची किंवा मारली तरी जायची.

लसणाच्या पाकळ्या हे चंदू पारखींनी आपल्याला लागणार्‍या भुकेवर शोधलेलं औषध असायचं. पण कडक भुकेवर फक्त लसणाच्या पाकळ्यांचा सतत हा इलाज करत राहण्यामुळे चंदू पारखी प्रचंड आजारी पडले. डॉक्टरांनी त्यांना इंजेक्शनचा कोर्स घ्यायला भाग पाडलं. चंदू पारखींनी ती इंजेक्शन्स घेताना नाटकातल्या आपल्या सहकारी कलाकारांना ते कळणार नाही याची दक्षता घेतली. त्याच कारण एकच होतं की आपण आजारी आहोत आणि आपल्याला इंजेक्शन्स घ्यावी लागतात हे कळलं तर त्याचा आपल्या वर्तुळात बभ्रा होईल. त्यामुळे आपल्याला कामं मिळताना कठीण जाईल अशी चंदू पारखींना भीती होती. पण हा मोठा आजार पार करतानाही चंदू पारखींच्या अंतर्मनात ‘ऐ मालिक तेरे बंदे हम, ऐसे हो हमारे करम…’ हे गाणं गुंजत राहिलं. ते गाणं कधी मनातल्या मनात घोळताना त्यांना मनातल्या मनात कधी रडूही आलं. पण त्या गाण्याची त्यांच्याशी असलेली संगतसोबत ते कधीच विसरले नाही, त्या गाण्याला कोणत्याही निराशेच्या प्रसंगी त्यांनी स्वत:पासून दूर केलं नाही.

खरंतर वसंत देसाईंच्या संगीतात नटलेलं हे गाणं अतिशय करूण आणि अंतर्मुख करणारं आहे, कोणत्याही माणसाच्या चेहर्‍यासमोर आरसा धरणारंही आहे. चंदू पारखींनी आपल्या आयुष्याची बिकट वाट चालताना हे गाणं आंधळ्याच्या हातातल्या काठीसारखं आपल्यासोबत मनात जपलं…आणि आपली वाट यशस्वीरित्या शोधली…धन्य ते गाणं आणि धन्य ते चंदू पारखी!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -