घरफिचर्सबँकांच्या स्थायी सूचना ऑनलाईन होणार

बँकांच्या स्थायी सूचना ऑनलाईन होणार

Subscribe

स्थायी सूचना थेट ऑन-लाईनवर देता येणार आहेत. आजचा जमाना हा ऑन-लाईनचा असल्याने बँक-ग्राहकाला मिळणार्‍या सेवा अधिकाधिकपणे जलद-सुलभ आणि ग्राहक-स्नेही असणे जरुरीचे आहे. शिवाय तसे करताना बँक आणि ग्राहकांच्या खात्याची, संपूर्ण व्यवहाराची सुरक्षा व गोपनीयता पाळली जाणे अत्यावश्यक आहे. नुकत्याच कळलेल्या माहितीनुसार सुरुवातीला सात बँका अशाप्रकारची ऑन-लाईन सूचना-सेवा देणार आहेत.

बँका या काही पैसे घेणे आणि देणे इतक्या व्यवहारापुरत्या नसतात, याव्यतिरिक्त अनेक सेवासुविधा बँकिंगतर्फे दिल्या जात आहेत. त्यापैकीच एक म्हणजे एस.आय. म्हणजेच खातेदाराने आपल्या बँकेला दिलेल्या काही सूचना. पैशाचे व्यवहार तर बँकेत होतच असतात, त्याव्यतिरिक्त काही प्रासंगिक सेवादेखील दिल्या जातात. उदाहरणार्थ- बँक आपल्याला दागदागिने -महत्वाची कागदपत्रे ठेवण्यासाठी लॉकर उपलब्ध करून देतात. तशाच काही सेवा बँक आपल्या बचत आणि चालू खातेदारांना देत असतात.

- Advertisement -

अर्थात पैसा कमावणे हा तर हेतू असतोच पण विविध प्रकारच्या सेवा उपलब्ध करून देणे हाही एक महत्वाचा हेतू गृहीत धरलेला असतो. गेली अनेक वर्षे असंख्य बँकांच्या अनेक ग्राहकांना अशा स्थायी सूचनांच्या सेवेचा लाभ मिळालेला आहे. हे म्हणजे नेमके काय? कोणत्या प्रकारची पेमेंट्स अशा सुविधेमार्फत केली जातात, कोणती बँक हे काम करते? असे अनेक प्रश्न -शंका यांचे निराकरण आपण करणार आहोत. बदलत्या बँकिंग युगात अनेक बदल होत असतात, एक चाणाक्ष आणि चोखंदळ ग्राहक म्हणून आपल्याला अद्ययावत माहिती असणे जरुरीचे आहे. म्हणूनच हे म्हणजे नेमके काय आहे? हे आज आपण जाणून घेणार आहोत आणि आपली आर्थिक साक्षरता विकसित करणार आहोत.

पार्श्वभूमी- बँका ज्याकाही सेवासुविधा देतात, त्यापैकी एक सर्वसाधारण बँक ग्राहकांना सोयीची म्हणजे स्थायी सूचना-सुविधा. फार पूर्वीपासून केवळ आपल्या देशातच नव्हे तर जगातील अनेक देशांत- यु.के., जर्मनी, स्वित्झर्लंड, बल्गेरिया, रशिया, पाकिस्तान, श्रीलंका आणि आपल्याकडे अशी सोय उपलब्ध आहे.

- Advertisement -

हेतू -उपयोग- बँक ग्राहक म्हणून आपल्याला काही पेमेंटस अगदी नित्य-नेमाने करावी लागतात. प्रत्येकवेळी अगदी लक्षात ठेवून चेकने किंवा रोख पैसे देऊन पेमेंट करणे जमत नाही. मग काहीवेळा दंड आकारला जातो. जागेचा हफ्ता वगैरे असेल तर आणखी जोखीम. हे टाळण्यासाठी बँकेची स्थायी सूचना-सेवा उत्तम अशी आहे. विम्याचा हफ्ता ठराविक रक्कम-ठराविक तारखेलाच भरली पाहिजे. आपण आपल्या रुटीन जीवनात कदाचित विसरू शकतो. म्हणून बँकेला सांगितले की, माझा एक तारखेला पगार झाला की पाच तारखेला अमुक पैसे विमा कंपनीला मिळाले पाहिजे. यालाच स्थायी सूचना देऊन आपले काम साधणे असे म्हणतात. अमुक फी किंवा घर-कर्जाचा हफ्ता वेळेवर भरणे हे अगदी सहजपणे होऊ शकते. ही बँकिंगची एक प्रकारची पारंपरिक सेवा आहे असे म्हटले तरी चालेल. कमी फी घेऊन अनेक बँक्स अशी सेवा पूर्वीपासून देत आलेल्या आहेत.आपल्या बचत किंवा चालू खात्यात जमा असलेल्या रकमेतून हे पैसे वजा केले जातात.

फायदे – १) वेळेवर पेमेंटचा भरणा होणे, दिरंगाई न होणे
२) ठराविक रक्कम बिनचूकपणे भरली जाणे
३) पेमेंटचे आखलेले शेड्यूल वेळेवर पाळले जाणे
४) भुर्दंड पडेल अशी भीती नाही.
५) वेळेवर पेमेंट देणारी व्यक्ती म्हणून आपला क्रेडीट-रेकोर्ड आणि पत स्वच्छ-निष्कलंकित राहू शकतो.
६) आपले व्यवहार पारदर्शी राहतात
७) मोजकी फी असल्याने आपल्याला हे साधन सोयीचे व रास्त किंमतीचे वाटते
तोटा-किंवा काही गैरसोयी –
१) बँकेकडून चूक झाल्यास आपले नुकसान होऊ शकते.
२) बँकेने चुकीची रक्कम -चुकीची तारीख किंवा चुकीची पार्टी असे व्यवहार नजरचुकीने केल्यास आपला तोटा होऊ शकतो.
३) निश्चित रक्कम नसलेली काही प्रकारची पेमेंटस-ज्यात दर महिन्याला किंवा मुदतीला भरण्याची रक्कम निश्चित नसते,अशी करणे अवघड असते.(उदाहरणार्थ – घरगुती पाईप गॅसचे महिन्याचे किंवा दोन महिन्यांचे येणारे बिल – हे दर महिन्याला फिक्स कसे असेल? आपण किती व कसा वापर करू? त्यावर अवलंबून असते. त्यानुसार त्या-त्या कालावधीचे बिल हे कमी किंवा जास्त होऊ शकते. हे बँकेला कसे कळणार? कारण स्थायी सूचना ही निश्चित रकमेसाठीच तर दिली जाते.

कशासाठी ? कोणती पेमेंटस करता येतील? – दर महिन्याचे घराचे भाडे भरणे, कर्जाचा हफ्ता देणे (लोन-
एमाय), इतर कर्ज घेतले असल्यास त्याचे मुद्दल-व्याज भरणे, शैक्षणिक संस्थेची दर महिन्याची फी भरणे, वीज-पाणी अशी ठरविक मुदतीने येणारी बिले भरणे.

नेमके कशाप्रकारे काम केले जाते हे पाहूया– आपले ज्याबँकेत खाते असते, तिथे आपल्याला स्थायी सूचना देण्यासाठी लेखी पत्र द्यावे लागते. त्यात मुदत -म्हणजे कधी पेमेंट करायचे? महिन्याच्या कोणत्या तारखेला? कोणासाठी? कशासाठी? हे सर्व तपशील द्यावे लागतात. शिवाय कोणत्या खात्यातून कधी डेबिट करायचे हेही नीटपणे सांगावे लागते. अर्थात अशी सूचना दिल्यावर खातेदार म्हणून आपली जबाबदारी असते की, आपल्या खात्यात तेव्हा-त्यातारखेला पुरेशी रक्कम ठेवणे-खाते क्रेडीटमध्ये असणे आवश्यक असते.अन्यथा तशी सूचना पाळणे बँकेला अवघड होऊ शकते. आणि तसे झाल्यास एखादे महत्वाचे पेमेंट (विमा हफ्ता /जागेच्या कर्जाचा हफ्ता) चुकण्याची शक्यता आहे. आपल्या खात्यात दर महिन्याला किंवा कशा मुदतीने पैसे जमा होणार? मासिक पगाराद्वारे की, बँकेच्या व्याज-रकमेतून की, अन्य मार्गाने तेही लक्षात ठेवावे. कारण खात्यात आलेल्या रकमेतून विशिष्ठ कारणासाठी पैसे वजा होणार असतील, तर त्यात नियमित पैसा येत राहणे जरुरीचे आहे.

आपण तसे पत्र देवून काम भागत नाही, कारण पहिले डेबिट आणि यापुढील डेबिटकरता दिलेली स्थायी सूचना त्याच तारखेला कार्यान्वित होते की नाही? हे पाहण्याची आपली जबाबदारी आहे. बँकेकडून निष्काळजीपणा किंवा दिरंगाई वा चूक झाल्यास आपणच ती वेळीच दाखवून दिली पाहिजे. त्यांच्या तपासणीत चूक ध्यानात येईल आणि चुकीची दुरुस्ती लागलीच केली जाईल अशी भाबडी अपेक्षा करणे अवास्तव आहे. कारण बँकेकडे आपल्यासारख्या अनेकांच्या स्थायी सूचना प्रतिदिन असू शकतात आणि त्यात गफलत होण्याची शक्यता असू शकते. तेव्हा दोष शोधण्याआधी आपणच व्यवस्थित काळजी घेतली, तर आपले पेमेंट नीटपणे होऊन आपला व्यवहार पूर्ण होऊ शकतो.

डायरेक्ट डेबिटचा पर्याय – ज्यांना स्थायी सूचना द्यायची नसेल किंवा तसे पेमेंट दर महिन्याला किंवा नित्य-नेमाने करायचे नसेल, तर बँकेला पत्र देवून अमुक रकमेचे डेबिट करून तमुक पार्टीला डेबिट करा. अशी सूचना देता येते. २०१२ पासून इसीएस डेबिट -सुविधा कार्यान्वित आहे आणि ज्याद्वारे इन्सुरन्स-म्युचुअल फंडबाबतचे व्यवहार केले जातात.

आता स्थायी सूचना थेट ऑन-लाईनवर देता येणार आहेत. आजचा जमाना हा ऑन-लाईनचा असल्याने बँक-ग्राहकाला मिळणार्‍या सेवा अधिकाधिकपणे जलद-सुलभ आणि ग्राहक-स्नेही असणे जरुरीचे आहे. शिवाय तसे करताना बँक आणि ग्राहकांच्या खात्याची, संपूर्ण व्यवहाराची सुरक्षा व गोपनीयता पाळली जाणे अत्यावश्यक आहे. नुकत्याच कळलेल्या माहितीनुसार सुरुवातीला सात बँका अशाप्रकारची ऑन-लाईन सूचना-सेवा देणार आहेत.(बाकीच्यादेखील लवकरच या सेवा-पर्वात सामील होतीलच) काही खाजगी बँक्स आपल्या डेबिट कार्डद्वारे अशी सुविधा देत आहेत.

वैशिष्ट्ये आणि कार्यपद्धती- एनपीसीएलच्या माध्यमातून बँका ही सेवा आपल्याला देवू शकणार आहेत. राष्ट्रीय-स्तरावर सर्व प्रकारची पेमेंट्स सुलभ-सुरक्षितपणे व्हावीत म्हणून हा खास प्लाटफॉर्म उपलब्ध केलेला आहे. बँक-ग्राहक आपल्या नेट-बँकिंगच्या माध्यमातून ई-मेंडेट-म्हणजे स्थायी सूचना आपल्या बँकेला (जी ऑन-लाईन सेवा देत आहे) देवू शकतात. मात्र सध्या ई-साईन सुविधा स्थगित असल्याने सही-तपासणीसाठी कागद-माध्यम वापरावे लागेल, बाकी सर्व ऑॅन-लाईन होऊ शकेल.

१) पेमेंट्सचे प्रकार – फंड ट्रान्स्फर २) थर्ड पार्टी पेमेंटस ३) एनइएफटी- आरटीजीएस पेमेंटस
२) अनेक खाती- वेगवेगळ्या सूचना – आपल्या जितक्या खात्यांना अशी सुविधा हवी आहे, तशी वेगवेगळी पत्रे-सूचना आपण बँकेला देवू शकता. भिन्न कालावधी-भिन्न रक्कम याबाबत सूचना देता येतात.
३) आपण खरेदी केलेल्या वस्तूंबाबत,आपली रेग्युलर बिले, म्युचुअल फंड-विमाविषयक पेमेंटस, लोन ईएमआय पेमेंटस करू शकता
४) तुमच्या सूचनेनुसार बँकेमार्फत जेव्हा जेव्हा पेमेंट केले जाईल, तेव्हा तेव्हा तुम्हाला एसेमेसद्वारे माहिती पुरवली जाईल. म्हणजे तुम्हाला लगेच पेमेंट झाले असे कळू शकेल.
५) आपली सूचना रद्द करायची असल्यास तशी आपल्याला विनंती करावी लागेल, तरच आपण दिलेली स्थायी सूचना रद्द करता येते.
६) क्रेडीट-कार्ड व्यवहार हा महागडा असल्याने हा पर्याय सोयीचा आणि किफायतशीर म्हणता येईल.
७) आता ही सेवा संपूर्ण देशभरात आणि लघु-कालावधीसाठी (६ महिने ते १ वर्षे) तसेच दीर्घकालीन पेमेंटसाठी वापरता येईल.
८) ही सेवा ऑन-लाईन तसेच बँकेत जावूनदेखील सुरु करता येते.
आज मोजक्या बँकाच जरी ही सेवा सुरु करत असले, तरीही लवकर अनेक बँक्स असे व्यवहार सुरु करतील, कारण त्यांना स्पर्धेत टिकायचे आहे म्हणून ग्राहकांना अधिक कार्यक्षम सेवा ज्याच्या आहेत. आजचे बँकिंग हे आपल्याला अधिकाधिक सुविधा देऊ करीत आहे. मात्र आपण ते योग्य तर्‍हेने आणि काळजीपूर्वक वापरले पाहिजे आणि अर्थात किती निकड आहे? त्यासाठी वेळ-खर्चदेखील पहायला पाहिजे. विनाकारण एखादी सुविधा घेतली तर आपल्याला तिचा वापर नीटपणे आणि सर्वार्थाने करता आला पाहिजे. बँक-ग्राहक हादेखील ‘राजा’ आहे.

-राजीव जोशी -बँकिंग आणि अर्थ-अभ्यासक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -