घरफिचर्सदैव देते अन् कर्म नेते

दैव देते अन् कर्म नेते

Subscribe

आपल्या विरोधकांना शब्दशः उचलून आणणे, त्यांना बेदम मारहाण करणं हा स्व. आनंद दिघेंच्या कार्यशैलीचा एक भाग होता. ठाण्यात त्यांची वेगळीच राजकीय, सामाजिक दहशत होती. पण तो काळ २५-३० वर्षांपूर्वीचा होता. तेव्हा ना मोबाईल होते ना सीसीटीव्ही फुटेज तपासलं जायचं की ना आरटीआय कायदा नव्हता. त्यातही महत्त्वाचं दिघेंना निवडणूक लढवायची नव्हती की मंत्री व्हायचं होतं. पण आव्हाडांचं तसं नाही. त्यांना दिघेंसारखं रॉबिनहूड पण व्हायचं आहे आणि मंत्री म्हणून सॅल्यूट पण मिळवायचा आहे.

जगभरात अधिकृतरित्या पाऊण लाख नागरिकांना आपला जीव गमवावा लागलेल्या करोनाने १८५ देशांत धुमाकूळ घातला आहे. भारतात सर्वाधिक बळी जाणार्‍या महाराष्ट्रात दुसरीकडे याच सरकारच्या एका कॅबिनेट मंत्र्यांच्या बंगल्यावर ठाण्यात अनंत करमुसे या मराठी इंजिनिअर तरुणाला फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली म्हणून अमानुष मारहाण करण्यात आली. या मारहाणीमुळे राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड अडचणीत आले आहेत. हा तरुण शिव प्रतिष्ठानचा ठाणे विभागाचा पदाधिकारी आहे. त्याला त्याच्या उन्नती गार्डन या संकुलातील घरातून मंत्री आव्हाड यांच्या सुरक्षा कवचातील पोलीस कर्मचार्‍यांनी बोलावून नेले. आणि त्यानंतर ही अमानुष मारहाण करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी रितसर तक्रार दाखल केली आहे. फडणवीस यांनी आव्हाडांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

याबाबत पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना कारवाई संदर्भात विचारणा केली असता, पोलीस अधिक तपास करून नियमानुसार कारवाई करतील असं त्यांनी सांगितलं. राज्यातीलच नव्हे तर देशभरातील पहिल्या २० कर्तव्यकठोर आयपीएस अधिकार्‍यांमध्ये विवेक फणसाळकर यांचं नाव घेतलं जातं. फणसाळकर यांची स्वत:ची कर्तव्यशैली आहे. त्या शैलीनुसार अजून तरी आव्हाड प्रकरणात त्यांच्याकडून काही भरीव घडलेलं नाही. राजकीय दबाव, मंत्र्यांचा सर्वपक्षीय- सर्वव्यापी जनसंपर्क अनेकांना परिचयाचा आहे.पण त्या दोन पोलीस कर्मचार्‍यांना निलंबित करण्याची गोष्ट आयुक्तांच्या कार्यकक्षेत आहे ना? मग त्यावर आयुक्तांनी हा स्तंभ लिहीपर्यंत काही केलं नव्हतं. या ठिकाणी मला अनंत करमुसे याच्या आक्षेपार्ह पोस्टचं मुळीच समर्थन करायचं नाही. ते साफ चुकीचं होतं, पण त्यासाठी पोलिसांचा सायबर विभाग आहे, तिथे न जाता आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी गुंडगिरी केल्यानं त्यांनी स्वत:चं नुकसान करून घेतलं आहे. पण त्याहीपेक्षा पोलीस गणवेशात जाऊन एका तरुणाला पोलीस ठाण्यात बोलावलंय हे खोटं सांगून जीवघेण्या हल्ल्यात सहभागी होणार्‍या शिपायांमुळे ठाणे पोलिसांची छी थू झाली आहे. या पोलिसांचं निलंबन, आणि मारहाण करणार्‍यांवरची कारवाई पोलिसांना करावीच लागेल.

- Advertisement -

जितेंद्र आव्हाड हे हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला अडचणीत आले आहेत. हनुमानाची जितकी रामावर श्रध्दा होती तितकीच आव्हाडांची शरद पवारांवर निष्ठा आहे. शरद पवार या पलिकडे जितेंद्र आव्हाडांचं राजकीय विश्व नाही. त्यामुळेच त्यांना राजकीय तणातणीच्या दिवसांतही मंत्री करण्यात आले आहे.त्यातही मुख्यमंत्र्यांनी नेहमी स्वतःकडे ठेवण्यात धन्यता मानलेलं गृहनिर्माण मंत्रीपद आव्हाडांना देण्यात आलं आहे. पुढच्या २ वर्षांत देशातील प्रत्येक बेघराला घर देण्याचा पंतप्रधान मोदींचा मनोदय आहे त्या दिवसांत आव्हाडांना इतकं महत्त्वाचं मंत्रीपद पवार- ठाकरेंनी दिलं आहे. पण प्रत्यक्षात आव्हाड थोडे जास्तच प्रसिध्दी आणि इतर काही गोष्टींमध्ये आपला वेळ घालवत आहेत असं खेदानं म्हणावं लागतंय. जितेंद्र आव्हाड हे अत्यंत कठीण समजल्या जाणार्‍या मुंब्रा-कळवा या मुस्लीम बहुल मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व करतात. या मतदारसंघाच्या गरजेच्या सगळ्या गोष्टी आपल्या शर्टाची वरची दोन बटणं उघडी ठेवून आव्हाड करत असतात. त्यातली प्रमुख गोष्ट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोध.

हा विरोध आव्हाड शैलीत केला की, मुंब्र्याच्या मोहल्ल्या- मशिदीतून ‘बॉस सॉलिड’… ’आवाडसाब एकदम सही’ अशा शुभेच्छांमुळे आव्हाडांची छाती एकदम फुगते. या भागात जितेंद्र आव्हाड यांनी विकासाचं खूपच काम केलंय. खरंतर ठाण्यात शिवसेनेचा गड एकदम मजबूत. पण त्या गडाची कळवा पुलापलिकडची सुभेदारीची अलिखित वाटणीच जणू त्यांनी करून घेतली आहे. लोकसभेला कळवा-मुंब्र्यात डॉ.शिंदे यांना आव्हाडांनी बाधा आणायची नाही आणि विधानसभेत शिंदेशाही कडून या पवारांच्या शिष्याला अपशकुन करायचा नाही हे जणू काही सेनेचं ठरलेलंच आहे. त्यामुळे कामं करून बांधलेल्या मतदारसंघात राजकीय निर्भयता मिळाल्याने आव्हाड काहीसे बेफिकीरीत वागत आहेत, त्याचं मूर्तीमंत उदाहरण ही करमुसे मारहाणीची घटना आहे. आपल्या विरोधकांना शब्दशः उचलून आणणे, त्यांना बेदम मारहाण करणं हा स्व. आनंद दिघेंच्या कार्यशैलीचा एक भाग होता. ठाण्यात त्यांची वेगळीच राजकीय, सामाजिक दहशत होती. पण तो काळ २५-३० वर्षांपूर्वीचा होता. तेव्हा ना मोबाईल होते ना सीसीटीव्ही फुटेज तपासलं जायचं की ना आरटीआय कायदा नव्हता. त्यातही महत्त्वाचं दिघेंना निवडणूक लढवायची नव्हती की मंत्री व्हायचं होतं. पण आव्हाडांचं तसं नाही. त्यांना दिघेंसारखं रॉबिनहूड पण व्हायचं आहे आणि मंत्री म्हणून सॅल्यूट पण मिळवायचा आहे. अत्यंत गरीब बहुजन कुटुंबातून आल्यामुळे त्यांचा स्वभाव बंडखोर आहे.

- Advertisement -

याच स्वभावातून ते मोंदीवर टिकाही करतात आणि अजित पवारांना थोरल्या पवारांना दुखावल्याने अपशब्दांची लाखोलीही वाहतात. स्वत: मरीन इंजिनिअरिंग केलेला हा तरुण नेता विषय समजून घेतो, वाचतो, तज्ज्ञांशी बोलतो, माध्यमकर्मींचा मित्र आहे, कॅमेरा समोर सराईतपणे वावरतो त्यामुळेच पक्षातल्या अनेकांना तो भारी पडतो. याच गुणांच्या जोरावर आणि मंत्रीपदाच्या अधिकारामुळे, सामान्यांची कामे होत असल्याने कार्यकर्त्यांचा गराडा असतो. त्यातून मुंब्रा-कळव्यातील सामाजिक विषमतेमुळे रिकामटेकड्या मंडळींची संख्याही कमी नाही. त्यातून ‘बॉस आप बोले तो उठाके लाओ’. या प्रकाराने मंत्री आव्हाडांना एक कैफ चढला. त्यातून हा प्रकार घडला, याचा फायदा त्यांचे विरोधक आणि पक्षातील अतृप्त दोघेही उचलणार आहेत. म्हणूनच आव्हाडांची प्रतिक्रिया आली, ‘हे राजकीय षड्यंत्र आहे’. बरोबर आहे असू शकेल. कार्यकर्ता किंवा निकटवर्तीय यांची कामे त्याक्षणी थेट फोन उचलून करणारे जे काही राजकारणी मला माहिती आहेत त्यात आव्हाडांचा क्रमांक वरचा लागतो. पण चेहर्‍यावरून रावडी वाटणार्‍या पण आतून हळवा असणार्‍या आव्हाडांनी आपल्याला पवारांकडे पर्याय नाही असं मुळीच समजू नये.

शरद पवार योग्य बॅट्समन योग्य वेळी मैदानात अचूक उतरवतात हे आव्हाडांना माहीत नाही का? ८०व्या वर्षात त्यांचा निर्णय किती बिनचूक असतो हे समजून घेण्यासाठी त्यांनी पवारांच्या ‘मुख्यमंत्री उध्दव ठाकरे’ या निवडीकडे पहावे. राजकारणात प्रत्येकाला ‘पर्याय’ असतो, पक्षश्रेष्ठी तो आपापल्या सोयीने आणि सवडीने निवडत असतात. भारतीय राजकारणात वयाची साठी तरुणपणाचा टप्पा समजला जातो. आव्हाडांकडे खूप वेळ आहे. ते खरंच कामात वाघ आहेत. वाघाने रोज (कॅमेरा समोर बसून) डरकाळी फोडायची गरज नसते, जंगलाला त्याच्या वावरण्यातून ‘वाघपण’ कळत असतं… म्हणून जितेंद्र आव्हाडांसारख्या मंत्र्यांने बालिश चुका करून इतक्या वर्षांचा राजकीय संघर्ष वाया दवडू नये. नाही तर ‘स्वर्गातून देव आला तरी मला हरवू शकत नाही’ असं म्हणणार्‍यांना सध्या पावलोपावली देव आठवतोय… तर राजकीय पैलवान असलेल्या पद्मसिंह पाटलांना एक चूक किती महागात पडली हे आव्हाडांशिवाय कोण जाणतं?.. उध्दव ठाकरेंना लाईटली घेणं फडणवीसांना कुठे घेऊन गेलं? म्हणून आव्हाडांना इतकंच सांगायचंय थोडं दमानं घ्या…आणि प्रति…दुसरा… वगैरे काही व्हायच्या भानगडीत न जाता… जितेंद्र आव्हाड म्हणूनच वाटचाल करा…तीच सगळ्यांच्या हिताची!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -