दूध मागणार्‍या भिकारणी…

पहिली दुसरीच्या खांद्यावर डोकं टेकत म्हणाली, मी सांगते, भाईजान, आम्हा सर्वांना फार लहान बाळं आहेत... त्यांना दूध नाहीये. तेवढंच हवंय. आमच्या आत आता त्यांना पाजायला दूधच उरलं नाही. म्हणून आलोय. तिच्या तोंडातून रडतारडता आलेल्या लाळेच्या तारा दिसत होत्या. सारा दिवसभर चालत आलोय आम्ही. घरं, बागा, तारेची कुंपणं, भिंती, ओढेनाले ओलांडत येऊन कशाबशा पोहोचलो आहोत, आम्हाला थोडं दूध दे रे, भावा, भीक घाल एवढी आम्हाला...

Mumbai

वसंताची सुरुवात होती… आमच्या घरासमोर गुलाबांची झुडपं शेकडो कळ्यांनी डंवरली होती… जणू शेकडो लालचुटुक पक्षीच त्यावर उतरले होते.

आणि नूर खानच्या दुकानासमोर काही अगदी थकल्या भागल्या बाया गोल करून बसल्या होत्या. त्यातल्या बहुतेकजणी रडत होत्या. बाकीच्या त्यांची समजूत घालत होत्या.

त्यांना विचारलं काय हवंय तुम्हाला. त्यांचे हुंदक्यांनी भिजलेले आवाज फुटत नव्हते. दोनच शब्द कळत होते. आमची मुलं, आमची तान्हुली…
मी बाबांनी बोलवून आणलं. बाबांना मी खेचतच आणलं खाली.

दहाबाराजणी होत्या त्या. सगळ्यांचा रंग पिवळट पडलेला जणू कावीळ झाल्यासारखा. बाबा त्यांच्याशी बोलायला उभे राहिले. पण त्यांचे हंबरडे थांबत नव्हते. बाबांनी नूरला पाणी आणायला लावलं. ते त्यांच्यापुढे धरलं. थोडी टायगर बिस्किटं आणि जुनाटसा ऑरेंज स्क्वाशही देऊ केला.
त्यांचे कृश, निळ्या शिरांनी तटतटलेले हात चाचरतच पुढे झाले. त्यांनी एखादं बिस्किट घेतलं. पाणी प्यायल्या. सार्‍याच पांढर्‍या पडलेल्या अशक्त बायका. बाबांनी बसायला सांगितलं. त्यांना पुरुषांसमोर वावरायची सवय नसावी. त्या उभ्याच राहिल्या. खोल गेलेल्या, पाझरणार्‍या डोळ्यांनी पाहात राहिल्या.
कपड्यांवरून बर्‍या घरच्या असाव्यात असं वाटत होतं. बाबांनी त्यातल्या सगळ्यात लहान मुलीच्या खांद्यावर थोपटलं, मला सांगा, मी इथला सरपंच आहे. काय झालंय, काय हवंय सांगा. मी शक्य तेवढी मदत करेन. वचन देतो. मुलीसारखी आहेस तू माझ्या. सांग, कुठून आलात तुम्ही. अशी का अवस्था झालीय तुमची? निःशंकपणे मला सांगा. मी नक्की मदत करीन. सांगा मला.

ती टपोर्‍या डोळ्यांची लहानशी स्त्री म्हणाली-अस्सलाम आलैकुम. तिच्या पाठोपाठ सुकले ओठ विलग करत सार्‍याच म्हणाल्या. बाबांनी वालैकुम म्हटल्यावर ती बोलत राहिली…
आम्ही खूप दुरून आलो आहोत. तीन महिने कर्फ्यू उठलेला नाही. खायला काहीही उरलेलं नाही घरात…
पण मग दुसरी तिला थांबवत, हुंदका रोखत म्हणाली- नाही नाही, भाईजाना, आमच्यासाठी काही नकोय. आम्ही भागवतो कसंही… पण आमची…, तिला पुन्हा रडू कोसळलं. ती वयाने सर्वात लहान असावी.
पण मग बाकीच्या सार्‍याच एकदमच बोलू लागल्या, आम्हाला रित्या हाती पाठवू नका, भाईजान.. खूप दुरून आलोत आम्ही.
बाबा गोंधळून गेले होते.
मग तिसरी म्हणाली, ‘आम्ही आमच्या लहान लेकरांसाठी आलो इतक्या दूर…’ तिचे डोळे आसवांनी डबडबले होते.

बलराज सहानीच्या कृष्णधवल चित्रपटाचा न पुसता येणारा परिणाम जसा असतो तसा तो दिवस माझ्यासाठी आहे. त्या स्त्रिया रडत, गागत, हुंदके देत, आक्रोश करत उभ्या होत्या. त्या सगळ्या जणू एकसारख्या दिसत होत्या. रडत होत्या, सुस्कारत होत्या, कधी एकजण सांगत होती, कधी सगळ्या एकदम… तेच तेच सांगत होत्या. भुताटकीचे आवाज यावेत तसे त्यांचे स्वर चिरफाळत होते, दुःखभाराने फाटत होते… त्यांच्याकडे पाहताना मला आठवत होतं आमच्या काश्मिरी बायका अशा गोलात उभ्या राहून लग्नाची गाणी म्हणतात, जन्माची गाणी म्हणतात, सुगीची गाणी म्हणतात. पाहिलं होतं मी… या दुधाची भीक मागत होत्या… एकमेकींच्या खांद्यांवर हात ठेवून रडत नूर खानच्या दुकानासमोर अर्धवर्तुळात त्यांचे शोकगीत जणू सुरू होते. बायका अशा किंचित मागेपुढे झुलत आनंदाची गाणी गातात, पहिलीची ओळ अर्ध्यावर येताच बाकीच्या ती उचलतात आणि गाणे सुरू रहाते. वानुवुन आणि रौफ अशा दोन शैली असतात उत्सवी गाण्यांच्या… हे काहीसं तसंच होतं. फक्त या बायकांच्या गालांवरून आसवांची धार लागली होती, त्यांच्या मानाही आसवांनी भिजून गेलेल्या, त्यांच्या फेरानचा गळ्याकडचा सारा भाग, छातीपर्यंत भिजून गेलेला… मी जिथे होतो तिथे खिळून राहून पाहात होतो. रडू आवरणं मुश्किल होतं.

नूर खान त्यांच्यासाठी आणलेला पाण्याचा जग हातात घेऊन तसाच उभा होता. बाबा दाढी खाजवत होते. आणि त्या बायका बोलताना पुढे झुकून बोलत होत्या.
चौथी म्हणाली, आम्हाला फक्त दूध हवंय, भाईजान, आम्हाला थोडं दूध द्या.
पण तुम्ही आलात कुठून?
पहिली दुसरीच्या खांद्यावर डोकं टेकत म्हणाली, मी सांगते, भाईजान, आम्हा सर्वांना फार लहान बाळं आहेत… त्यांना दूध नाहीये. तेवढंच हवंय. आमच्या आत आता त्यांना पाजायला दूधच उरलं नाही. म्हणून आलोय. तिच्या तोंडातून रडतारडता आलेल्या लाळेच्या तारा दिसत होत्या. सारा दिवसभर चालत आलोय आम्ही. घरं, बागा, तारेची कुंपणं, भिंती, ओढेनाले ओलांडत येऊन कशाबशा पोहोचलो आहोत, आम्हाला थोडं दूध दे रे, भावा, भीक घाल एवढी आम्हाला…
थोडंसं दूध, चौथी बाई म्हणाली. नाहीतर आमची तान्हुली मरून जातील. झुबेदाची मुलगी काल रात्री मरून गेली… ऐकताय ना… ऐकताय ना भाईजान?
ती तिसरी पुन्हा बोलू लागली, आमच्या छात्या आता सुकून गेल्या… बाळांसाठी काहीही नाही उरलं. थेंब नाही येत…
घरातला सगळा तांदूळ, संपला, कडधान्य खाऊन झाली, दूध यावं म्हणून बागेतलं गवतही खाऊन संपवलं आम्ही.. आता आमची अब्रूही संपवतोय… त्यातली वयाने सर्वात मोठी- आतापर्यंत गप्प होती, ती विव्हल हुंदका देत म्हणाली, बघा, माझ्या छातीत आता काहीही राहिलं नाही. तिने तिचा फेरान वर उचलला… पोटाच्या खळग्यावर दोन सुकून गेलेले, निळे पडलेले स्तन… स्तनाग्रांभोवती चावल्याच्या जखमा झालेल्या…

बाबांनी नजर वळवली… मी अश्रू आवरत स्तब्ध उभा राहिलो… तिच्या छातीवर पुवाचा टपोरा दाणा होता.
माझं बाळ मरेल… मरेल माझं बाळ… मागची एक बाई आक्रोशू लागली…
मला दूध दे, मी माझी एक मुलगी तुला देईन-
फक्त दूध हवंय, भाईजान… फक्त दूध…
सगळ्यांच्या तोंडून कोरससारखे तेच शब्द फुटू लागले…
आम्हाला रिकाम्या हाती पाठवू मका, भायू… नका विन्मुख पाठवू… खूप दूरवरून आलोय आम्ही आशेने…
संपेल हे कधीतरी… खरंच संपेल… मग दूध मिळेल. कर्फ्यूचा राजा मरून जाईल एक दिवस… आणि मग दूध मिळेल…

द कोलॅबोरेटर या मिर्झा वाहीद नावाच्या काश्मिरी लेखकाच्या कांदबरीतले हे एक प्रकरण… पुस्तकाबद्दल बोलताना एका साहित्य विषयक परिषदेत साहित्याच्या प्राध्यापिकेने सांगितलेलं… तुम्ही वाचलंत तर तुम्हाला वाटेत यात अतिशयोक्ती आहे. पण खरं तर हे खूप सौम्य करून लिहिलेलं सत्य आहे…

कर्फ्यू, झडती, लष्कर, दहशतवादी या सर्वांच्या जात्यात भरडून निघालेलं काश्मिरी जीवन आपल्याला खर्‍या अर्थाने कधीच माहीत होणार नाही. पण नेहमीच-भोगणार्‍या समाजातल्या स्त्रिया सर्वाधिक नरक भोगत असतात…
पंडितांची कत्तल झाली, त्यांच्या स्त्रियांवर बलात्कार झाला असं खूप जोरात सांगणारे आता त्याचा बदला घेण्याची भाषा करीत आहेत. कारण तसं न करणं ही सद्गुण विकृती आहे असं सांगणारी अधम वैचारिकता झिरपत मान्य झाली आहे.
किंवा 370 आणि 35 अ रद्द झाल्यानंतर काश्मीरच्या गोर्‍या मुलींशी आमचे तरुण लग्न करतील असं एक लोकनेता जाहीर सभेत सांगतो आहे… किंवा बघा आता अशा सुंदर काश्मिरी तरुणींशी तुम्ही लग्न लावू शकता- असं म्हणत कुठल्यातरी अज्ञात काश्मिरी मुलींचे फोटो फिरवले जात आहेत…

ते पाहून ऐकून कोलॅबोरेटरमधले हे प्रकरण हंबरडा फोडत आठवून गेले… फार काही बोलायची गरज उरली आहे का आता?
थांबावे इथेच.
जमलं तर काश्मीरसंबंधीचे केवळ राजकीय कथन ऐकून न थांबता, त्यांच्या साहित्यातही डोकावून पहा… सुखदुःखाचा आरसा असलेले साहित्य कदाचित् थोडे सत्यही सांगून जाईल आपल्या कानांत.

– मुग्धा कर्णिक