घरफिचर्सबेस्ट संप संपला, मराठी माणूस जिवंत राहिला!

बेस्ट संप संपला, मराठी माणूस जिवंत राहिला!

Subscribe

रे झिला बसलंय काय… दत्ता सामंत आपल्या चुनाभट्टीक ईलत. चल पिशये घे. गहू, तांदूळ दितत. त्याकाच बिचर्‍याक आमची गरीबांची काळजी. या महिन्याचा रेशन तर झाला. पुढचा पुढे… माझी आई मला सांगत होती आणि मीसुद्धा बारावीचा अभ्यास बाजूला ठेवून तिच्याबरोबर मोफत धान्य आणायला धावत सुटलो. 1982-83 सालातले ते दिवस. अजूनही गिरणी कामगारांचा तो संप आठवला की अंगावर सरसरून काटा उभा राहतो. चुनाभट्टीच्या स्वदेशी मिलच्या डोंगरावर झोपडपट्टीत शेकडोंनी राहणार्‍या मिल कामगारांच्या कुटुंबीयांपैकी आमचे एक परबांचे कुटुंब. आजूबाजूला गावात जीव जगत नाही म्हणून कोकणातून तसेच घाटावरून मुंबईत जीवन जगायला आलेली असंख्य माणसे, त्यातले आम्ही एक.

परब, सावंत, राणे, जाधव, कदम, मेस्त्री, घाडीगांवकर, पवार आणि बरेच… असे आम्ही सारी हातावर पोट असणारे त्या दिवशी डोंगरावरून खाली धावत रस्त्यावर आलो आणि रेशन घेताना तो आमचा देव माणूस डॉ. दत्ता सामंत मला समोर दिसला. अजूनही तो चेहरा लख्ख आठवतो. गोरेपान, डोळ्यावर चष्मा आणि चेहर्‍यावर प्रखर तेज… मला देवच स्वर्गातून आल्यासारखा वाटला. रेशन घेतले आणि नमस्कार करायला खाली वाकलो. त्यांनी पायाला हात लावू दिला नाही… जवळ घेऊन म्हणाले, बाळा काय करतोस. मी उत्तरलो : बारावीला आहे. उत्तम, कॉलेज सोडू नको. हे सुद्धा दिवस जातील. आई त्यांच्याकडे बघत होती… नमस्कार करून आम्ही घरी परतलो. तो चेहरा आजही डोळ्यासमोर तसाच आहे… तेजस्वी! नऊ दिवस चाललेला बेस्ट संप संपला आणि 35 हजार मराठी माणसे या घडीला वाचली. जीव भांड्यात पडला.

- Advertisement -

गिरणी कामगारांचा संप अजूनही कागदोपत्री सुरू आहे. माझे गिरणी कामगार बाबा आज हयात नाहीत आणि आमचा देव दत्ता सामंतही या जगात नाही. देवासारखी माणसे या क्रुर जगाला नकोशी असतात… त्यांच्या स्वार्थी दुनियेत ती अडसर असतात. म्हणून सामंत यांना पाठीमागून गोळ्या घालून ठार मारले! पण, ते तर आमच्या लाखो मराठी कामगार आणि त्यांच्या मुलांच्या काळजात आहेत… बेस्ट संप संपल्यानंतर त्या रात्री ते माझ्या स्वप्नात आले… हजारो कामगारांसमोर उभे राहून श्रमिकांचा विजय असो…अशी ते घोषणा देत होते आणि त्यामागून आवाज घुमत होता, ‘दत्ता सामंत जिंदाबाद’. मीसुद्धा त्या घोषणा देणार्‍यांपैकी एक होतो. मी जागा झालो. ते स्वप्न होते. पण, दत्ता सामंत अमर आहेत. बेस्ट संप निकराने लढणार्‍या 35 हजार कामगारांमध्ये ते अजूनही वास्तव करून आहेत. त्याला शरीर नाही, पण जिता जागता आवाज आहे, ‘डॉ. दत्ता सामंत अमर रहे’!

बेस्ट संप संपल्याची घोषणा केल्यानंतर बेस्ट कामगार कृती समितीचे नेते शशांक राव म्हणालेही, आज दत्ता सामंत यांची पुण्यतिथी आहे. हा संप यशस्वी झाल्याने आमचा हा विजय सामंत यांना आदरांजली म्हणून अर्पण करतो. शशांक, आम्ही गिरणी कामगारांची मुले तुझी आभारी आहोत. बेस्ट आणि मिल कामगार काही वेगळे नाहीत. हा अस्सल मराठी माणूस आहे. या मातीतला. भूमिपुत्र! मराठी माणसांच्या नावाने मते मागायची आणि त्यांना देशोधडीला लावायचा धंदा करणार्‍या नेत्यांपैकी आमचा देव डॉ. दत्ता सामंत नव्हते. म्हणून त्यावेळी काँग्रेसला ते नको तर होतेच आणि मराठी माणसांच्या नावाने गळे काढणार्‍या शिवसेनेच्याही ते डोळ्यात खुपत होते… आज मागे वळून बघताना मिल कामगारांचा तो जागतिक संप डोळ्यासमोरून सरकत जातो तेव्हा दत्ता सामंत पुन्हा दत्त म्हणून उभे राहतात…

- Advertisement -

चुनाभट्टीच्या आमच्या परिसरात बहुसंख्य माणसे मिल कामगार. अठरा पगड जातीची, पण मिल कामगार. कापूस छातीत जाऊन जाऊन छातीचा पिंजरा झालेली. रात्र पाळी करून आमचे बाबा घरी आले की त्यांना येणारी खोकल्याची जीव जाणारी उबळ अजून माझ्या कानात घुमते. ते घरगाडा मुंबईचा आणि गावाचा चालला पाहिजे म्हणून चालता बोलता पिंजरा झाले होते. मला आठवते दहावी पास झाल्यानंतर कामगारांच्या मुलांचा सत्कार बाबा काम करत असलेल्या लालबागच्या फिन्ले मिलमध्ये ठेवला होता. सत्कार झाल्यानंतर मला ते काम करत असलेल्या खात्यात घेऊन गेले. धाग्याची रिळे लावून साचा सुरू राहणारा तो विभाग. प्रचंड आवाज आणि कापूस नाका तोंडात भरून राहणारा. मला त्यानंतर दोन दिवस ऐकायला येत नव्हते… असे रक्ताचे पाणी करणार्‍या मिलमध्ये बाबांनी इतकी वर्षे कशी काढली असतील हे आठवूनही शहारे येतात.

डॉ. दत्ता सामंतप्रणित मुंबईच्या गिरणी संपाला 18 जानेवारीला 38 वर्षं पूर्ण झाली. 65 गिरण्यांतल्या अडीच लाख कामगारांनी या संपात भाग घेतला होता. या संपाची संपूर्ण जगाने नोंद घेतली. अधिकृतपणे हा संप आजही मागे घेतलेला नाही. अनेक कामगारांना उध्वस्त करणारा आणि कामगार संस्कृतीला ग्रहण लावणारा हा संप त्यामुळेच ऐतिहासिक ठरतो. संप 18 जानेवारी 1982 पासून सुरू झाला तरी त्याची बीजं त्याआधी तीन महिने दिवाळी बोनसच्या निमित्तानेच पडली होती. गिरणी कामगारांची अधिकृत युनियन राष्ट्रीय मिल मजदूर संघाने कामगारांना 20 टक्के बोनस द्यायला लावू, असं आश्वासन देऊन आयत्यावेळेला 8.33 ते 17.33 टक्के बोनसवर मालकांशी तडजोड केल्याने कामगारांत विश्वासघाताची भावना निर्माण झाली होती. निषेध म्हणून 15 गिरण्यांनी उत्स्फूर्तपणे संप पुकारला. दुसर्‍या दिवशी त्यातल्या सात गिरण्यांचे कामगार कामावर परतले तरी हिंदुस्थान मिलच्या 4 गिरण्या, स्टॅण्डर्ड, श्रीनिवास, प्रकाश कॉटन आणि मधुसूदन मिलमध्ये संप सुरूच राहिला.

22 ऑक्टोबर रोजी स्टॅण्डर्डचे कामगार अरविंद साळसकरांच्या नेतृत्वाखाली डॉ. दत्ता सामंतांच्या घाटकोपरच्या ऑफिसवर मोर्चाने गेले. त्यांनी सामंतांना नेतृत्व स्वीकारायची गळ घातली आणि डॉक्टरांनी त्यांना तेव्हा चक्क नकार दिला होता. डॉक्टर म्हणत होते, ‘संपाच्या भानगडीत पडू नका. वेळ बरोबर नाही, गोदामात कापडाचे तागे पडून आहेत, मालकांना कामगार कपात हवी आहे, तशात लढायला कामगारांची तयारीही झालेली नाही.’ पण कामगार पेटलेले होते. म्हणाले, आम्हाला लढायचं आहे, तुम्ही नेतृत्व करा, बास! सामंत समजावू लागले तेव्हा त्यांनी सामंतांना सुनावले. तुम्ही ‘हो’ म्हणत नाही तोवर आम्ही इथून जाणार नाही, आम्ही घेराव घालू, असं म्हणाले. त्यांचा निर्धार पाहून अखेरीस डॉक्टर तयार झाले. तिथून हा मोर्चा ‘डॉ. दत्ता सामंत की जय’ असं ओरडत मध्यरात्री गिरणगावात शिरला तेव्हा सगळा परिसर जागा होता. वार्‍याने वणवा पेटत जावा तशी ही ठिणगी सगळ्या गिरण्यांमध्ये पसरत गेली आणि सगळीकडे मेसेज गेला, डॉक्टर गिरणीच्या लढ्यात उतरतायत आणि एकदम वीज संचारल्यासारखं झालं सर्वांना.

तरीही एक मोठा गट शिवसेनेकडे आशेने बघत होता. कारण कामगार विभागात सेनेचं वर्चस्व मोठं. एक नोव्हेंबरला बाळासाहेबांनी एक दिवसाच्या बंदचा कॉल दिला होता, तो प्रचंड यशस्वी ठरला होता. बाळासाहेब म्हणाले, कामगारांना 200 रुपये पगारवाढ दिली नाही तर 15 नोव्हेंबरपासून गिरण्या बंद होतील. पण काय कांडी फिरली कुणास ठाऊक, कामगार मैदानावरच्या कामगार सेनेच्या भव्य मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे बंदचा कॉल देणार म्हणून मोठ्या आशेने कामगार जमले असता खुद्द बाळासाहेबांचा पत्ता नव्हता. वामनराव महाडिक, नवलकर आदी नेते भाषणातून वेळ काढत होते. कामगार बाळासाहेबांची वाट बघत होते. मुख्यमंत्री अंतुलेंची भेट घेऊन ठाकरे आले आणि म्हणाले, आपण संप करत नाही आहोत. बघता बघता कामगार उठून उभे राहिले आणि जथ्याजथ्याने बाहेर पडले. मैदान रिकामं झालं. कामगार उठले ते सरळ सामंतांकडे गेले. त्याआधी सामंतांनी एम्पायर डाइंग मिलच्या कामगारांना 200 रुपये पगारवाढ त्यांच्या युनियनला मान्यता नसताना मिळवून दिली होती. कामगारांना खात्री पटली, आता आपला तारणहार एकच. डॉ. दत्ता सामंत!

18 जानेवारीच्या आदल्या रात्री संपूर्ण गिरणगावात उत्साह सळसळत होता. चाळींच्या पटांगणांत दिवे पेटले होते, पण त्याहून हजारो व्होल्टचे दिवे तिथे जमलेल्या कामगारांच्या तनामनात पेटलेले होते. मुलंबाळं रस्त्यावर उतरून मोठ्यांच्या गप्पा लक्षपूर्वक ऐकत होती. बायका हिरीरीने आपली मतं मांडत होत्या. मध्येच कुठल्यातरी गल्लीतून ‘डॉ. दत्ता सामंत झिंदाबाद!’ ‘कोण म्हणतो देणार नाय, घेतल्याशिवाय र्‍हाणार नाय’, अशा घोषणा देत मोर्चा निघून जाई आणि वातावरण पुन्हा तापे. दुसर्‍या दिवशी कामावर जायचंच नाही, या कल्पनेने कामगार त्या रात्री झोपलेच नाहीत.

गिरणी कामगारांच्या ऐतिहासिक संपाला सुरुवात झाली. 65 गिरण्यांमध्ये एकदम शुकशुकाट पसरला. भोंगे थांबले. संपाच्या तिसर्‍या दिवशी बॅरिस्टर अंतुले जाऊन मुख्यमंत्रीपदी आलेल्या बाबासाहेब भोसलेंनी कामगारांना 30 रु. अंतरिम वाढ आणि 650 रु. अ‍ॅडव्हान्स देऊ केला, पण सामंतांशी बोलणी न करताच. मात्र डॉक्टर सामंतांची मागणी होती 150 ते 200 रुपये पगार वाढीची, अन्य सुविधांची. मान्यताप्राप्त युनियनशीच वाटाघाटींची सक्ती करणारा बी.आय.आर. कायदा रद्द करावा ही प्रमुख मागणी होती, पण त्यांच्या संपाचा कणा ठरली ती बदली कामगारांच्या प्रश्नांची मागणी. गिरण्यांत 40 टक्के बदली कामगार होते आणि त्यांना महिन्याचे केवळ 4 ते 15 दिवस काम मिळायचं. वर्षानुवर्षं ते परमनंट होत नव्हते. तशात त्यांना रजा आणि अन्य सुविधांसाठी वर्षाकाठी 240 दिवस भरण्याची सक्ती होती. आठ-आठ वर्षं बदलीत घालवलेले हजारो तरूण तडफडत होते. ते सगळे रस्त्यावर उतरले.

गिरण्यागिरण्यांमधून कमिट्या स्थापन झाल्या. त्यांच्या गेटवर मिटिंगा होऊ लागल्या. गेटवर कामगार पहार्‍याला बसले. सहा गिरण्यांचा एक झोन करून त्याची एक कमिटी करण्यात आली. या कमिट्या सामंतांच्या संपर्कात राहात आणि पुढची दिशा ठरवत. घाटकोपरचं कार्यालय रात्रंदिन गजबजलेलं असे. पुढे पुढे काहीच तोडगा निघण्याची चिन्हं दिसेनात तेव्हा कामगारांना डॉक्टर म्हणायचे, बघा, हे असं आहे. काय करायचं? तुम्ही म्हणत असाल तर तडजोड करून संप मिटवूया. मात्र कामगार हट्टाला पेटले होते. ते मागण्या मान्य झाल्याशिवाय कामावर यायला तयार नव्हते. आज काही महाभाग दत्ता सामंत यांच्यामुळे मिल कामगारांची धूळधाण झाली, असा अप्रचार करतात त्यांना ही गोष्ट समजली पाहिजे की हट्टाला पेटलेला मिल कामगार आणि संप फोडून त्यावर पोळी भाजणारी मालक आणि राजकीय नेते मंडळी यांनी मिल कामगारांचे वाटोळे केले. हा संप यशस्वी झाला असता तर डॉ. सामंत मोठे झाले असते आणि हीच भीती असल्याने काँग्रेस आणि शिवसेनेने ठरवून संप चिघळत ठेवला.

संप फुटण्याची चिन्हं दिसत नव्हती. अशावेळी इंदिरा गांधींनी मिसाखाली अटक केलेल्या बाबू रेशीम, बाब्या खोपडे आदी गँगस्टर्सना सोडलं. मिलमध्ये माणसं घुसवायची कामगिरी त्यांच्यावर होती. कमिटीच्या माणसांवर केसेस घालण्यात आल्या. अनेक कार्यकर्ते भूमिगत झाले. जे होते त्यांना पोलीस अपरात्री उचलू लागले. मिलमध्ये जाण्यासाठी आमिषं दाखवली जाऊ लागली. टेक्निकल स्टाफ अधिकार्‍यांना पोलीस संरक्षण देऊन आत घुसवण्यात आलं. बाहेर कामगार अन्नाला मोताद झाले होते आणि आत घुसणार्‍यांसाठी मटण सागुतीच्या जेवणावळी झडत होत्या. अधिकारी मग साचे साफ करू लागले. संघाचे कामगार येऊ लागले. घरी बसलेल्या कामगारांत चलबिचल सुरू झाली. तरीही अनेकांची गिरणीत घुसण्याची छाती होत नव्हती. सामंतांचे कार्यकर्ते तिथे असत. संपाच्या बाजूने असलेले संप फोडणार्‍यांना ट्रेनमध्ये गाठत आणि धुलाई करत.

अनेकांचा पाठलाग होई. आमच्या शेजारी राहणार्‍या अशा संप फोडणार्‍यांनी मार खालेला होता. वातावरण चोवीस तास पेटलेलं असे. मोर्चे तर रोजच निघत. संघाचे भाई भोसले, होशिंग यांच्या घरांवर हल्ले झाले. जेलभरो आंदोलनं झाली. तुरुंग अपुरे पडत होते. 16 सप्टेंबरला सामंतांनी विधान भवनावर दीडलाख कामगारांचा प्रचंड मोर्चा नेला. पण या सगळ्याचा सरकारवर काहीही परिणाम झाला नाही. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी जखमी अमिताभला पाहायला मुंबईला आल्या होत्या. मात्र काहीही करून सामंतांशी बोलायचंच नाही, हा केंद्राचा एककलमी अजेंडा होता. यात भरडला तो निरपराध गिरणी कामगार.

अनेक उत्तर प्रदेशीय कामगार भिवंडीला लूम्स चालवायला गेले. अनेकजण आधीच गावी जाऊन बसले होते. पण मुंबईच्या मनिऑर्डरीवर जगणारं कोकण या वाताहतीत अधिकच कर्जबाजारी झालं. मुंबईत तर कामगारांनी दागदागिनेच विकले नाही तर स्वत:च्या राहत्या जागा विकल्या. अनेक घरांत फुटके टोप आणि स्टोव्हही राहिले नाहीत. बायकांच्या गळ्यात खोट्या मण्यांची मंगळसूत्रं आली. बाबा मिटिंगवरून येताना काय बातमी आणतात याकडे मुलं आशेने भिरभिरी बघत जागत बसायची आणि उपाशी झोपायची. वह्या-पुस्तकं वाटपाचे कार्यक्रम अनेक झाले, कामगारांना कपडे आणि धान्य वाटप झालं. पण आभाळच फाटलं होतं, तिथे ठिगळ कुठवर लावणार? कामगार मिळेल ती कामं करू लागले.

भाजी विकू लागले, बिगारी कामाची भीक मागू लागले. या संपाने एक झालं, लोकांना भीक मागायचीही लाज वाटेनाशी झाली. त्यांचा ताठ कणा पुरता मोडून गेला. स्वाभिमान ठेचला गेला. ते खुरडत, लाचार होत मिलच्या दारात काम मागायला आले. मालकांनी आणि संघवाल्यांनी त्यांच्याकडून शरणपत्रं लिहून घेतली, त्यात भविष्यात कधीही संप न करण्याची, मिळेल ते काम निमूट करण्याची हमी घेतली होती. ज्यादा काम लादलं होतं. अडीच लाख होते, परतले तेव्हा लाखच होते. दीड लाखांची वाताहत झाली.

व्यवस्थेपुढे शरण गेलेल्या 1 लाख कामगारांपैकी माझे एक बाबा होते. माझ्या बाबांचे सहापैकी 3 भाऊ मिलमध्ये कामाला होते. वडिलांसकट चारपैकी तीन भाऊ अगतिकपणे मिलमध्ये पुन्हा कामावर गेले. मोरारजी मिलमध्ये असणारे आमचे भाऊ काका मात्र दत्ता सामंत जिंदाबाद करत अजूनही कामावर गेलेले नाहीत… संपानंतर ते गावाला गेले. आज ते थकलेत. पण, सामंत हे नाव ऐकले की ते तरुण होतात. भाऊ म्हणतात, ‘अरे सामंतांसारखो माणूस जावक नाय. देव माणूस होतो तो. आमका ते सांगत. काय तरी मार्ग काढूया. पण फटकी आमच्यार भरली होती. आम्हीच ऐकलो नाय’.

मिलच्या इतिहासाला जाग येताना बेस्ट संप नवव्या दिवशी संपला. हे एका अर्थाने बरे झाले. पण, हा संप संपला ही काळ रात्र आहे. या काळ्या रात्रीच्या गर्द अंधारात उद्याच्या बेस्टच्या उध्वस्त धर्मशाळेची बीजं रोवली आहेत, ही भीती कामगाराचा मुलगा म्हणून काळीज पोखरणारी आहे… रात्र वैर्‍याची आहे. सावध राहिले पाहिजे!

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -