घरफिचर्सभजनाचं वेड लावणारा भजन सम्राट,अनुप जलोटा!

भजनाचं वेड लावणारा भजन सम्राट,अनुप जलोटा!

Subscribe

अनुप जलोटांनी खरोखरच एक भजनयुग निर्माण केलं होतं. ‘ऐसी लागी लगन, मीरा हो गई मगन, वो तो गली गली हरीगुन गाने लगी’ असे त्यांच्या गळ्यातले शब्द वातावरणात उमटले तरी अवघ्या वातावरणाचं देवालय होऊन जायचं. त्यांच्या आवाजात असं पवित्रपावन वातावरण निर्माण करायची ती ताकद होती.

तीस-पस्तीस वर्षांपूर्वीची गोष्ट. अचानक जिकडेतिकडे भजनांची मंगलमय लहर आली होती. देशात तर ती आली होतीच; पण परदेशातही भजनाचे सूर लहरू लागले होते. एकाएकी चहुबाजूंनी लोकांना भजन आवडू लागलं होतं. तसं पाहिलं तर आपल्या आजुबाजूचे लोक सर्रास ईश्वरवादी असतात, देवादिकांची पूजाअर्चा करणारे असतात, उपासतापास करत असतात, व्रतवैकल्य करत असतात, आध्यात्मिक वृत्तीचे असतात; पण म्हणून काही ते सगळेच सकाळ-संध्याकाळ फक्त भजन गात किंवा ऐकत नसतात. पण तरीही तो एक काळ असा आला होता की सगळे लोक भजनाच्या भक्तीत नव्हे तर भजनाच्या प्रेमात पडले होते, सकाळ संध्याकाळ भजनं ऐकत होते. अर्थात, असा तो भजनाचा काळ निर्माण करणारं ते नाव होतं अनुप जलोटा. आजही इतक्या वर्षांनंतरही त्यांच्या नावापुढे भजनसम्राट हीच उपाधी लागते. आजही त्यांच्या कार्यक्रमांमध्ये भजनाची फर्माइश होत असते, इतकं भजनाचं वेड त्यांनी त्या काळात लोकांना लावलं होतं.

अनुप जलोटांनी त्या संपूर्ण काळात खरोखरच एक भजनयुग निर्माण केलं होतं. ‘ऐसी लागी लगन, मीरा हो गई मगन, वो तो गली गली हरीगुन गाने लगी’ असे त्यांच्या गळ्यातले शब्द वातावरणात उमटले तरी अवघ्या वातावरणाचं देवालय होऊन जायचं. त्यांच्या आवाजात असं पवित्रपावन वातावरण निर्माण करायची ती ताकद होती म्हणूनच तसं काहीतरी वातावरणाचं होऊन जायचं. अनुप जलोटांनी त्यांच्या गाण्याची दीक्षा त्यांचे वडील पुरूषोत्तमदास जलोटांकडून घेतली होती; पण आयुष्यातल्या एका वळणावर त्यांनी भजनाची वाट निवडली आणि भजन हा त्यांच्या आयुष्याचा एक महामार्ग झाला. खरंतर त्यांनी अधेमधे ‘तुम्हारे शहर का मोसम बडा सुहाना लागता हैं, मैं एक शाम चुरा लू , अगर बुरा ना लगे तो’ ह्यासारख्या नितांत सुंदर गझलाही गायल्या होत्या; पण लोक त्यांच्या भजनालाच इतके भुलले होते की त्यांनी गझलाही गायल्या आहेत हे लोकांच्या गावी नव्हतं. अतिशय कमी लोकांचा सन्माननीय अपवाद वगळता ह्या गझलांची लोकांनी फारशी दखल घेतली नाही. अनुप जलोटांमधला गझलगायक जरी बेदखल राहिला तरी त्यांच्यातल्या भजनसम्राटाने मात्र ंकिर्ती मिळवली. भजनाने त्यांना लोकप्रिय केलं असं जरी त्यांचं वर्णन आज कुणी केलं तरी त्याच वेळी त्यांनीही भजन लोकप्रिय केलं किंवा अगदी भजनही लोकप्रिय होऊ शकतं हे दाखवून दिलं. वास्तविक तो काळ आर.डी. बर्मन, बप्पी लाहिरी ह्यांच्या संगीतातल्या पाश्चिमात्य धाटणीच्या बहराचा काळ होता. तशा प्रकारच्या पाश्चिमात्य संगीतावर थिरकण्याला प्राधान्य देणारी एक नवी पिढी त्या काळात उदयाला आलेली होती. अशा काळात सिनेमातलं एखादं भजन, भक्तिगीत लोकप्रिय होण्याची जिथे मारामार होती, तिथे अनुप जलोटांनी त्यांच्या भजनावर लोकांना तल्लीन व्हायला लावणं ह्या किमयेला चमत्काराशिवाय दुसरं कोणतंच नाव देता येणार नाही. त्या काळातला तो चमत्कार त्यांच्याशिवाय इतर कुणालाच जमला नसता हे सत्य कालही कुणाला नाकारता आलं नाही आणि आजही कुणाला नाकारता येणार नाही.

- Advertisement -

अनुप जलोटांचं ते भजन अतिशय मुक्तछंदात असायचं. भजनाच्या शब्दांतला आशय ते खुलवत-फुलवत सांगायचे, त्यासाठी ते गाता गाता मध्ये ‘शब्दों की ओर ध्यान दो’ असं म्हणायचे आणि आपण सादर करत असलेल्या भजनातल्या शब्दांच्या सौंदर्याकडे लक्ष वेधून घ्यायचे. मध्येच स्वरलिपी म्हणजे सरगम गात त्या भजनात संगीतातला आणखी एक वेगळाच रंग भरायचे. मध्येच एखादा आलाप इतक्या उंच सुरांत वरच्या टोकाला नेऊन इतका वेळ भिडवायचे की तिथे त्यांचा तो वरच्या पायरीवर पोहोचलेला तार सप्तक त्याच पायरीवर रेंगाळत ठेवायचे. त्यांच्या त्या सूर रेंगाळत ठेवण्यावरून ते लोकांच्या टाळ्या मिळवण्याची वाट पहातात, अशी क्वचितप्रसंगी त्यांच्यावर चेष्टावजा टीकाही व्हायची; पण अनुप जलोटांच्या गाण्याची ती एक शैली होती आणि त्या शैलीचं लोकांनाही एक सुप्त आकर्षण होतं हे त्या काळातल्या कुणालाच विसरता येणार नाही.

मुळात अनुप जलोटांचा आवाज भजनासाठी खूपच पोषक म्हणजे प्रासादिक होता, तो खुला आणि खडा होता, सुस्पष्ट होता आणि त्यात एक सुंदर फिरत होती. कोणत्याही भजनासाठी लागणारं सगळं भागभांडवल त्या आवाजात होतं. हेच कारण असेल की ज्यामुळे त्यांची भजनं त्या काळात प्रचंड लोकप्रिय झाली, आपल्या मुलुखाच्या सीमारेषा ओलांडून पार सातासमुद्रापार गेली; पण त्यांच्या गझलांना मात्र एका छोट्या परिसराचं छोटं कुंपणही भेदता आलं नाही. भजनाबाबत असं म्हटलं जातं की ते एका विशिष्ट वयात किंवा माणसाच्या सेवानिवृत्तीच्या काळात म्हणजे हरी हरी म्हणण्याच्या अवस्थेत आवडू लागतं. पण अनुप जलोटांच्या भजनांना माणसाच्या वयाचा तो निकष त्या काळात अजिबात लागू पडला नाही. अनुप जलोटांचं ते भजन वयस्करांपासून नव्या पिढीलाही मनोमन आवडलं.

- Advertisement -

बरं, भजनाच्या बाबतीत असं म्हटलं जातं की एखाद्या गायकाचं एखादं भजन लोकप्रिय होऊ शकतं. त्याने गायलेली सगळीच्या सगळी भजनं एकगठ्ठा लोकप्रिय होण्याची शक्यता इतकी कमी असते की जवळ जवळ ती शक्यच नसते. पण अनुुप जलोटा त्या नियमाला चिरंतन अपवाद ठरले. त्यांची सगळीच भजनं हिट झाली. त्यांच्या भजनांनी व्यावसायिकतेच्या बाबतीतही अबाधित राहिलेले उच्चांक लिलया मोडले. परदेशातही त्यांच्या भजनाला तुफान मागणी आली. ‘जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम, बोलो राम राम राम’ ह्या त्यांच्या भजनावर तर लोक हातात चिपळ्या, टाळ न घेताही मंत्रमुग्ध होऊन अर्धा अर्धा तास डुलत राहिलेले आहेत.

अनुप जलोटांच्या एखाद्या भजनाला कधी कधी काळवेळाचं बंधन उरत नसे, ते त्यांच्या भजनात इतके गुंगून जात की त्यांच्या एखाद्या भजनाचा एक अंतरा संपवायला त्यांना दहा-बारा-पंधरा मिनिटं लागत असत; पण त्यांच्या भजन गायनात ते स्वत:च आधी इतके आनंदूून जात की ते भजन ऐकणाराही त्या भजनात रंगून जात असे, आनंदून जात असे आणि गुंतून पडत असे. ज्या काळात गुलाम अली खाँ, पंकज उधासच्या इश्क मोहब्बतीवरच्या गझलाच्या नशेचं व्यसन लोकांना लागलं होतं, त्या काळात अनुप जलोटा नावाच्या माणसाने लोकांना आपल्या भजनांनी आसक्त केलं होतं आणि देवाचं व्हावं तसं भक्त केलं होतं.अनुप जलोटा आपल्या भजनांचं वेड लोकांना लागण्याचं श्रेय नम्रपणे देवाला देतात. अर्थात तो त्यांचा विनय झाला; पण त्यात त्यांच्या कलाकौशल्याने गायलेल्या भक्तिसंगीताचा मोठा वाटा आहे हे मानायला हवंच!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -