घरफिचर्सभीषण विध्वंसाच्या कटू आठवणी 

भीषण विध्वंसाच्या कटू आठवणी 

Subscribe
दुसऱ्या महायुद्धात जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरावर विध्वासंक अणुबॉम्ब टाकले होते यामध्ये अनेक निरापराध लोकांचे बळी गेले होते. हिरोशिमा शहरावर ६ ऑगस्ट १९४५ रोजी अमेरिकेने पहिला अणुबॉम्ब टाकला होता. त्यात सुमारे १ लाख ४० हजार नागरिक ठार झाले होते. ९ ऑगस्ट रोजी नागासाकी वर दुसरा अणुबॉम्ब टाकला होता. त्यात ७४ हजार लोक ठार झाले होते. कित्येक जण त्या अणुबॉम्बच्या स्फोटामुळे निर्माण झालेल्या आगीत ठार झाले. नंतर कितीतरी जखमी आणि स्फोटामुळे निर्माण झालेल्या किरणोत्सर्गाने आजारी पडून आठवड्यात, महिन्यात आणि वर्षात मरण पावले.
जर्मन फौजांनी पोलंडवर १९३९ मध्ये हल्ला केल्यामुळे सुरू झालेले दुसरे जागतिक युद्ध हिटलरच्या आत्महत्येबरोबर ३० एप्रिल १९४५ रोजी संपल्यात जमा होते. मात्र कमकुवत झालेल्या जपानची शरणागती तेवढी बाकी होती. अमेरिका, कॅनडा आणि इंग्लंड यांनी मिळून अणुबॉम्ब तयार करण्याचे मिशन हाती घेतले होते. त्याला अमेरिकेने मॅनहॅटन प्रोजेक्ट असे नाव दिले होते. लाखभर संशोधकांना हातीशी धरून अमेरिकेने दोन अणुबॉम्ब तयार केले. छोट्या बॉम्बचे नाव होते लिटिल बॉय जो हिरोशिमावर टाकला; अन् मोठ्या बॉम्बचे नाव होते फॅट मॅन, जो ९ ऑगस्ट १९४५ च्या भल्या पहाटे ३ वाजून ४६ मिनिटांनी नागासाकी शहरावर टाकला. या दोन्ही महाभयंकर स्फोटांनी जपानमध्ये विध्वंस घडविला. तब्बल ३ लाखांहून अधिक बळी घेतले. अणुबॉम्बचा स्फोट होऊन ज्वाळा उसळल्या. जमीन ४ हजार अंश सेल्सिअसपर्यंत तापली.
युद्धाच्या दरम्यान जपानच्या शरणागतीची कलमे जाहीर करण्यासाठी अमेरिकेचे हॅरी ट्रमन, इंग्लंडचे चर्चिल आणि तैवानस्थित चँग कै शेक यांची बैठक अमेरिकी राष्ट्राध्यक्षांमुळे लांबत होती. जगातील पहिली अण्वस्त्र चाचणी अमेरिकेने जुलै १६ रोजी केल्यानंतर ट्रमन यांनी ती बातमी २४ जुलै रोजी स्टालिन यांना दिली. हेरगिरीतून ही बातमी स्टालिन यांना आधीच कळाली होती. सोविएत रशियाने जपानवर हल्ला करण्याची जोरदार तयारी चालविल्याची बातमी ट्रमन यांनादेखील हेरगिरीतूनच कळाली होती. महायुद्धाने स्पर्श न केलेल्या हिरोशिमा, कोकुरा, निईगाटा आणि नागासाकी या जपानी शहरांपैकी कोणत्याही एका लक्ष्यावर ३ ऑगस्ट नंतर योग्य हवामान पाहून अणुबॉम्ब टाकण्याचा आदेश जनरल कार्ल स्पाट्झ यांना २५ जुलै रोजी मिळाला. दुसऱ्याच दिवशी जपानला शरणागतीचा निर्वाणीचा इशारा देणारी ती लांबलेली बैठक जर्मनीतील पोस्टडॅम येथे झाली. त्याच दिवशी तो इशारा आणि इशारा न पाळल्यास ‘न भूतो..’ हानी करण्याची धमकी नभोवाणीवरून प्रथम इंग्रजीत आणि नंतर दोन तासांनी जपानी भाषेत जपानकडे पोहोचविली. राजनैतिक पातळीवरून हा इशारा मात्र जपानी शासनाला पोहोचविला नाही. त्यानंतर हा नरसंहार झाला.
या विध्वंसातील मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहून या नरसंहाराची आठवण दरवर्षी देशोदेशींचे लाखो लोक जागवितात. ‘हिरोशिमा पुन्हा नाही’ असे म्हणत पुन्हा कधीही कोणीही अणुबॉम्बचा वापर करू नये अशी इच्छा व्यक्त करतात. परंतु काही जण मात्र अजूनही या अणुबॉम्ब हल्ल्याचे समर्थन करतात. ‘झाले हे वाईट झाले, पण अणुबॉम्ब वापरला नसता, तर दुसरे महायुद्ध खूप लांबले असते व त्यात जास्त माणसे मारली गेली असती, असे म्हणतात. अणुबॉम्ब हल्ल्यानंतरच्या ७० वर्षांत कोणत्याही अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी हिरोशिमाला भेट दिली नव्हती. बाराक ओबामा हे पहिले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते ज्यांनी हिरोशिमाला भेट देऊन घडलेल्या घटनेविषयी खेड व्यक्त केला.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -