घरफिचर्सभाजपच्या मनात काहीतरी शिजतंय...

भाजपच्या मनात काहीतरी शिजतंय…

Subscribe

आता भाजपचे लक्ष्य आहे ते महाराष्ट्राची सत्ता पुन्हा एकदा हाती घेण्याचे. सोबत शिवसेना असो नसो काही फरक पडत नाही. त्यांची एकट्याची तयारी कधीपासून सुरू झाली आहे. सराव झाला आहे आणि अमित शहा यांचे विश्वासू चंद्रकांत पाटील हे सराव सामने घेत आहेत. फासे टाकून शिवसेना, मित्र पक्ष यांना खेळवायला सुरुवात केली आहे. शिवसेनेला कदाचित दगाफटकाही दिला जाऊ शकतो... 

लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. अजूनही या निकालांवर विश्वास बसत नाही… मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या निकालाचे एका शब्दात वर्णन केले आहे ते म्हणजे अनाकलनीय… आणि ते एका अर्थाने बरोबरही आहे. आता त्याला ईव्हीएममधील घोटाळा म्हणा किंवा हिंदी भागातील विधानसभांच्या निवडणुकांमध्ये स्वतःला हरवून फायनल मात्र आपण जिंकायची, असे भाजपचे डावपेच म्हणा; पण या शंकांचे उत्तर काही केल्या सापडत नाही. खरे काय तो राम जाणे! आता भाजपचे लक्ष्य आहे ते महाराष्ट्राची सत्ता पुन्हा एकदा हाती घेण्याचे. सोबत शिवसेना असो नसो काही फरक पडत नाही. त्यांची एकट्याची तयारी कधीपासून सुरू झाली आहे. सराव झाला आहे आणि अमित शहा यांचे विश्वासू चंद्रकांत पाटील हे आता सराव सामने घेत आहेत. फासे टाकून शिवसेना, मित्र पक्ष यांना खेळवायला सुरुवात केली आहे. शिवसेनेला कदाचित दगाफटकाही दिला जाऊ शकतो… भाजपच्या मनात काही तरी शिजतंय हे नक्की!

केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र हा भाजपचा फॉर्म्युला आधीच ठरला आहे. आता वर नरेंद्र आलेत, आता खाली देवेंद्र येणार आणि ते सुद्धा २०२४ पर्यंत राज्य करणार. आता शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाचे गाजर दाखवले जात असेल तर त्यांनी भले गाजराच्या माळा गळ्यात घालून फिरायला हरकत नाही. पण वास्तव काही वेगळे आहे. भाजप हा काही काँग्रेस नाही, चलता है, होता है, बघू, विचार करू असे म्हणत उद्ध्वस्त धर्मशाळेच्या जागी युगांत उलटून गेल्यासारखा बसणारा पक्ष नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालमीत तयार झालेल्या या पक्षाने नागपूरच्या रेशीम बागेत बसून एक वर्ष आधीच चिंतन केलंय. कोणाला कधी धक्क्याला लावायचे आणि कोणाला सोबत घेऊन जायचे. लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेची गरज होती. आता विधानसभेसाठी असेलच असे नाही. अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद आणि २८८ जागांपैकी पैकी १४४- १४४ असे वाटप अशा फॉर्म्युल्यावर भले लोकसभेसाठी युती झाली असेल; पण तसे काही वागायलाच हवे, असा काही नियम नाही. लोकसभेच्या पुलाखालून आता पाणी वाहून गेले आहे. भाजप आता मोठा भाऊ आहे. तो ठरवणार शिवसेना आणि मित्र पक्षाला किती जागा द्यायच्या? युतीतील सहकारी पक्ष नाही ठरवू शकत. यायचे तर या सोबत, नाही तर तुमचा रस्ता मोकळा. भाजपचा हा सध्या रोकडा हिशोब आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपचा हा डाव बरोबर ओळखला आहे. तुम्ही काय आम्हाला संपवणार, आम्हीच जातो बाजूला. हरलो तर आमच्या कर्माने आणि जिंकलो तर आमच्या ताकदीवर… पुढील वर्षी होणार्‍या बिहार विधानसभा निवडणुकीची तयारी त्यांनी आतापासून करायला घेतली आहे. जशी नेहमी भाजप करते तशी. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर मोदी आणि शहा यांच्या वागण्यात झालेला बदल नितीश यांनी बरोबर हेरला. शिवसेना भले ‘अवजड’ ओझे घेऊन भाजपच्या लग्नात नाचली असेल; पण नितीश यांना ‘बेगाना शादी मे अब्दुल्ला दिवाना’ व्हायचे नव्हते. गंमत बघा एनडीएत १८ खासदार जिंकून दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष शिवसेना, १६ खासदार जिंकून तिसर्‍या क्रमांकाचा पक्ष जनता दल संयुक्त. पण सेनेच्या ‘अवजड’ खात्याचे ओझे आणि जनता दलाला असेच काहीसे दुय्यम खाते दिले जाणार होते; पण, नितीश यांनी त्याला साफ नकार दिला.

- Advertisement -

शिवसेनेला हे कळतंय की नाही माहीत नाही; पण, शिवसेना स्टाईल आक्रमकतेचा अभाव असलेल्या आणि स्वतःच्या ताकदीवर गोरेगावमधूनही निवडून येऊ न शकलेल्या (भले २०१४ च्या मोदी लाटेत अनेक दिग्गज पडले असतील; पण शिवसेनेचे ६३ आमदार निवडून आले होते) शिवसेना नेते सुभाष देसाई यांना पहिल्या अडीच वर्षांत उपमुख्यमंत्रीपदाचे वेध लागले असतील आणि त्यानंतर अडीच वर्षे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पाहत असतील तर शिवसेना डोळे आणि कान बंद करून ‘खयालो की खिचडी’ पकवत आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे काही खरे नाही, असेच म्हणावे लागेल. आठवून पाहा २०१४ चा भाजपचा नाट्यप्रयोग तो मी नव्हेच! या प्रयोगाचे लेखन केले होते मोदी आणि शहा यांनी. त्यांचे दिग्दर्शन फडणवीस करत होते आणि मुख्य भूमिकेत होते एकनाथ खडसे (आता ते कुठे आहेत, माहीत नाही). यावेळीही तेच लेखक आणि तेच दिग्दर्शक आहेत, फक्त मुख्य भूमिका चंद्रकांत पाटील करत आहेत. बरोबर सहाय्यक अभिनेते गिरीश महाजन आहेतच. कपडेपट आणि रंगभूषेची जबाबदारी विनोद तावडे यांच्यावर असेल. लोकसभेतही त्यांच्यावर तेच मनसेचे ‘लाव रे तो व्हिडिओ’, असे दुय्यम काम दिले होते.

चेहर्‍यावर रंग लावून चंद्रकांत पाटील यांनी पहिला अभिनय केला तो औरंगाबादला. भाजप १३५ आणि शिवसेना १३५. उरलेल्या १८ जागा मित्र पक्षांना. या मित्र पक्ष असलेल्या एकातही स्वतःच्या जीवावर दोन एक जागा जिंकून आणण्याची ताकद नाही. रामदास आठवले, महादेव जानकर, सदाभाऊ खोत आणि विनायक मेटे (ते आता भाजपसोबत आहेत की नाही हे तेच सांगू शकतात. कारण सत्तेचे फायदे घेण्यासाठी ते शिवस्मारकाचे काम पाहतात आणि राजकीय फायदा होत नाही म्हणून बीडमधून भाजपविरोधात झेंडा फडकवतात)यांना भाजप काडीमात्र किंमत देत नाही. हवे तर या सोबत, नाही तर लागा वाटेला, असा भाजपचा सरळ फंडा आहे. आणि हे त्यांना मान्य असल्याने हे मित्र पक्ष आता भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढायला तयार आहेत आणि हे परस्पर चंद्रकांतदादा यांनी ठरवून टाकले. युती असूनही शिवसेनेला विचारले नाही. म्हणजे भाजप १३५+१८= १५३ जागा घेणार आणि शिवसेना १३५ जागांवर एकटी पडणार. खडाखडीला खरं तर येथूनच सुरुवात व्हायला पाहिजे; पण, शिवसेना मग्न तळ्याकाठी बसली आहे.

- Advertisement -

चंद्रकांत पाटील यांनी आता युतीच्या भविष्याबाबत दोन प्रयोग करून झाले आहेत. आता तिसरा प्रयोग ते राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेसच्या आमदारांच्या भाजप प्रवेशानंतर करतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारही आता भाजपमध्ये येण्याच्या तयारीत आहेत. चालणार्‍या गाडीत हवा खात बसायला आता सर्व उतावीळ झाले आहेत. काँग्रेस म्हणा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस म्हणा सत्तेविना यांचा जीव तुटतो, अस्वस्थ होतात, घाम फुटतो, जीव घाबराघुबरा होतो. कारण सत्ता! सत्तेतून पैसा, पैशांतून संस्थाने आणि पुन्हा सत्ता. पाच वर्षे केंद्रात नाही आणि राज्यात नाही म्हटल्यावर आपल्या सात पिढ्यांचे खायचे वांदे होणार, ही भीती त्यांना सतावत आहे. निष्ठा आणि विचार खुंटीला अडकवून राजकारणाचा धंदा करायचा हेच आताचे गणित आहे. विखे घराणे तर यासाठी प्रसिद्ध आहे. काँग्रेस, शिवसेना, पुन्हा काँग्रेस आणि आता भाजप… अरे एखादी नटीही एवढ्या वेगाने कपडे बदलून स्टेजवर येत नाही. कार्यकर्त्यांनी फक्त यांचे बदललेले कपडे उचलून ठेवायचे. इतके दलबदलू राजकारण महाराष्ट्राच्या वाट्याला यावे, याची लाज वाटते. गेली साडेचार वर्षे राज्याचा विरोधी पक्ष नेता राहून विखे यांनी काय दिवे लावले ते एकदा उभ्या महाराष्ट्राला समजले तर बरे होईल. त्यांचा धाक सरकारला कधीच नव्हता. फक्त हवेत आरोप करून चालत नाही तर सत्ताधार्‍यांना सळो की पळो करून सोडण्याची ताकद हवी; पण बिनकण्याची पाठ असली की सत्ताधारी त्याच पाठीवर उभे राहून विरोधी पक्षाला नामशेष करणारच आणि तेच राज्यात गेल्या साडेचार वर्षांत झाले आहे.

चंद्रकांतदादा यांच्या आताच्या दोन प्रयोगाआधी अमित शहा यांच्या टीमने राज्यात विधानसभेची फायनल खेळण्यासाठी २८८ मतदारसंघांचा नीट अभ्यास केला आहे. स्वतःचे दोन सर्व्हे, पोलीस आणि आयबी रिपोर्ट त्यांच्या हाती आहे. शिवसेनेची स्वतःची एकट्याने जिंकण्याची ताकद किती आहे, राष्ट्रवादी किती जागांवर आपले बळ दाखवू शकते, पाण्यात बसलेली काँग्रेस कुठल्या जागांवर उठून बसू शकते, लाव रे तो व्हिडिओ फेम राज ठाकरे यांचा मनसे किती जागांवर प्रभाव टाकू शकतो. या सार्‍याचा अभ्यास करून भाजप विधानसभेच्या रंगमंचावर कधीच उतरली आहे. शिवसेनेला मागे मिळालेल्या ६३ जागा आणि आता लोकसभेत कमावलेल्या १८ पैकी किती जागांवर विधानसभा मतदारसंघात त्यांनी आघाडी घेतली आहे, याचा सारा डाटा तयार तर आहे; पण २८८ मतदारसंघांत तयारीला लागा हे आदेश लोकसभा निवडणुकीआधीच गेले आहेत. पाठांतर चोख असल्याने परीक्षेला कुठलेही पेपर येवो, काही फरक पडत नाही, अशी भाजपची तयारी आहे. यामुळेच चंद्रकांतदादांकडून युतीच्या मानापमानाचे आणखी दोन तीन प्रयोग करून घेऊन शेवटच्या क्षणी शिवसेनेबरोबर युती तुटल्याची घोषणा होऊ शकते… भाजपच्या मनात काहीतरी शिजतंय हे नक्की!

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -