बाळासाहेब, अखेर उद्धवने ‘मुख्यमंत्रीपद घेऊन (करुन) दाखवलं’च ! 

balasaheb
आज १७ नोव्हेंबर २०२० ! हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या महानिर्वाणाला आठ वर्षे पूर्ण होत आहेत. एकचालकानुवर्ती संघटना ! एक ध्वज, एक नेता अशा सतत पन्नास वर्षे सर्वच राष्ट्रद्रोह्यांना आपल्या नजरेच्या धाकात ठेवणारे ज्वालाग्राही नेतृत्व १७ नोव्हेंबर २०१२ रोजी शांत झाले. धगधगता निखारा शांत झाला पण या धगधगत्या निखाऱ्याची धग आजही तितकीच प्रखर तेजाने जाणवते आहे. त्यांचे सुपूत्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शिवतीर्थावर अरबी समुद्राच्या आणि अथांग जनसागराच्या साक्षीने शपथ घेतली. बाळासाहेब ठाकरे यांना दिलेले वचन पूर्ण करतांना कसे कसे, कुणा कुणाचे हिशेब चुकते केले, याचा थोडक्यात परामर्श घेणारा ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या संपादकत्वाखाली प्रसिद्ध होणाऱ्या ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या दैनिक सामना मध्ये १५ डिसेंबर १९८८ पासून १९ ऑक्टोबर २०१३ अशी तब्बल पंचवीस वर्षे उपसंपादक, वरिष्ठ वार्ताहर अशा पदांवर  सेवा बजावणारे  योगेश वसंत त्रिवेदी यांनी लिहिलेला लेख खास माय महानगरच्या वाचकांसाठी    
बाळासाहेब ! 23 जानेवारी 1926 रोजी या वसुंधरेवर आपण अवतार घेतलात. भगवान श्रीकृष्णाने सांगितले होते की, ‘यदा यदाही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत । अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं स्रुजाम्यहम ।। परित्राणाय साधूनाम । विनाशाय च दुष्कृताम ।। धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ।। बाळासाहेब, आज आपली 94 वी जयंती. खरं म्हणजे आपण आमच्यातच आहात. त्यामुळे जयंती म्हणणे माझ्या दृष्टीने अप्रस्तुत वाटते. भगवान श्रीकृष्णाने धर्माला जेंव्हा जेंव्हा ग्लानि येईल, तेंव्हा तेंव्हा मी अवतार घेईन. धर्माच्या रक्षणासाठी माझा अवतार असेल. त्याच न्यायाने आपण या कलियुगात अवतार धारण केलात. आपण आंतरराष्ट्रीय कीर्ति चे व्यंगचित्रकार होतात. आपण फर्डे वक्ते होतात. आपल्याला राजकारणातले छक्केपंजे कधी कळलेच नाहीत. जे ओठात तेच पोटात आणि जे पोटात तेच ओठांवर असा आपला परखड स्वभाव. आपण ज्याच्यावर विश्वास टाकलात, ज्याच्यावर प्रेम केलेत ते अगदी मनापासून. त्यामुळे आपल्या चांगुलपणाचा अनेकांनी गैरफायदा घेतला. आपण अनेक दगडांना शेंदूर फासले, त्या प्रत्येक व्यक्तीला आपण देवच झालो आहोत, असा त्याचा गोड गैरसमज झाला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा उभारण्यात आला. बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदरसह 865 मराठी भाषिक गावांनी संयुक्त महाराष्ट्राच्या कोंदणात सहभागी होण्यासाठी संघर्ष केला. पण 1956 पासून आजतागायत ते महाराष्ट्रात येऊ शकलेले नाहीत. 1 मे 1960 रोजी मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र झाला, मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी झाली, परंतु मुंबईत महाराष्ट्र दिसत नव्हता. म्हणून बाळासाहेब, आपण 13 ऑगस्ट 1960 रोजी जगाच्या पाठीवरच्या पहिल्या अशा ‘मार्मिक’ या व्यंगचित्र साप्ताहिकाचा प्रारंभ केलात आणि मुंबईत असलेल्या आस्थापनांमधील बिगर मराठी उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची ठळकपणे नांवे प्रसिद्ध करुन ‘वाचा, आणि थंड बसा’ असा मथळा दिलात.
yogesh trivedi
मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी आपण 19 जून 1966 रोजी ति. स्व. दादांच्या (प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे) यांच्या साक्षीने ‘शिवसेना’ स्थापन केलीत. ति. स्व. दादांनीच शिवसेना हे नाव या जाज्वल्य स्वाभिमानी संघटनेला दिले. हा बाळ मी महाराष्ट्राला अर्पण करीत आहे, हे दादांचं वाक्य होतं. हां हां म्हणता शिवसेना मुंबई, ठाण्यापासून पुढे मराठवाडा, विदर्भापर्यंत फोफावली. आपले परममित्र शरदचंद्र गोविंदराव पवार यांनी पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडविल्या. त्यातलीच एक म्हणजे शिवसेना भारतीय जनता पक्ष युती. आपण स्वतः च ही गोष्ट मान्य केली आहे. कारण ओठात एक आणि पोटात एक असा आपला स्वभावच नव्हता मुळी. आपण डॉ. बालाजी तांबे यांच्या कार्ला (लोणावळा जवळ) येथे गेला होतात आणि त्या मतदारसंघात असलेले शरदरावांचे विश्वासू आमदार मदनशेठ बाफना (ते तेंव्हा मंत्रीही होते)  आपल्या स्वागतासाठी आले. विनम्रपणे आपल्याशी बोलतांना आपण त्यांना म्हणालात, ” या, मदनशेठ या. अहो तुमच्या त्या XXXXXसाहेबाने त्या कमळाबाईला माझ्या मांडीवर बसवले  आहे'” हा किस्सा स्वतः मदनशेठ बाफना यांनी आमच्या सोबत दिलखुलास गप्पा मारतांना बऱ्याच वेळा सांगितलाय. हिंदुत्वाच्या आधारावर शिवसेना भारतीय जनता पक्ष युती झाली असल्याचे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते अगदी बेंबीच्या देठापासून ओरडून सांगतात. मुळात भारतीय जनता पक्षाच्या धाटणीत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व बसूच शकत नाही. ‘पानी तेरा रंग कैसा, जिसमें मिलाए वैसा’, हीच आपमतलबी प्रवृत्ती या पक्षाची सुरुवातीच्या काळापासून आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेचा हा पक्ष असल्याचे सांगितले जाते परंतु त्यांच्याशी यांना काही देणेघेणे नाही. जेव्हा सोयीचे असेल तेंव्हा संघाच्या शाखेत जायचे, एवढाच काय तो संबंध. अर्थात अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, नितीन गडकरी असे काही अपवाद निश्चितच आहेत. पण प्रत्येकाचा ‘वापर’ हा आपल्या फायद्यासाठी करुन घ्यायची यांची प्रवृत्तीच.
बाळासाहेब, आपणच खरे समाजवादी आणि आपणच खरे हिंदुत्ववादी. आपण कधी जातपात मानलीच नाही. ब्राह्मण म्हणून आपण डॉ. मनोहर गजानन जोशी यांना मुख्यमंत्री केले नाहीत की नारायण राणे मराठा म्हणून त्यांच्यावर महत्वाच्या पदांचा वर्षाव केला नाहीत. मग ते शाखाप्रमुख पद असो, बेस्टचे अध्यक्षपद असो, आमदारकी, मंत्री पद अगदी मुख्यमंत्री पद सुद्धा आपण राणेंना बहाल केलतं छगन भुजबळ यांना माळी म्हणून महापौर केलं नाहीत की आमदारकी दिली नाहीत. लीलाधर डाके यांना आगरी म्हणून प्रबोधन प्रकाशन च्या विश्वस्त, आमदार, मंत्री या पदांवर बसविले नाहीत. अहो, अत्यंत कडवट मुसलमान असलेल्या साबीरभाई शेख यांना महाराष्ट्राच्या कामगार मंत्री पदावर विराजमान केलेत. कुणालाही तो कोणत्या जातीचा, धर्माचा, पंथाचा म्हणून पदे, लालदिव्यांच्या गाड्या दिल्या नाहीत प्रत्येक व्यक्तीला त्याची क्षमता ओळखून एखाद्या कसलेल्या रत्नपारख्याच्या नजरेतून आपण पदे भरभरुन दिलीत. 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद उद्ध्वस्त झाली तेव्हा भारतीय जनता पक्षाचे नेते सुंदरसिंग भंडारी यांनी पत्रकारांना उत्तर देताना, “नहीं, वो आर एस एस के नही थे, बजरंग दल के नहीं थे, विश्व हिंदू परिषद के नही थे, भारतीय जनता पार्टी के नहीं थे. शायद वे शिवसेना के होंगे ।” असं सांगून काखा वर केल्या. त्याचवेळी वांद्रे येथील कलानगर, मातोश्रीवरुन आपण वाघाची डरकाळी फोडलीत आणि “जर ते शिवसैनिक असतील तर मला त्यांचा गर्व आहे, अभिमान आहे” असं ठणकावून सांगितले. हेच आपले बावनकशी खणखणीत हिंदुत्व आहे. “महाराष्ट्रात राहतो तो मराठी, गुजरात मध्ये राहतो तो गुजराती, बंगालमध्ये राहतो तो बंगाली, या न्यायाने हिंदुस्थानात राहतो तो हिंदू. आमचे हिंदुत्व हे शेंडीजानव्याचे नव्हे तर आमचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे” ही आपली सरळसोट हिंदुत्वाची व्याख्या 11 डिसेंबर 1995 रोजी डॉ. मनोहर जोशी यांच्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाचे न्या. मू. जे. एस. वर्मा यांनी सुद्धा मान्य केली आहे.
त्यामुळे आपण जसे खरे समाजवादी तसेच परखड  हिंदुत्ववादी आहात, हे भारतातील तमाम हिंदूच नव्हे तर आपल्याला पाण्यात पाहणारा पाकिस्तान सुद्धा मान्य करतो. एकदा पाकिस्तान ने तर आम्ही आमच्या तुरुंगातील सारे भारतीय कैदी सोडतो तुम्ही एक बाळ ठाकरे आमच्या ताब्यात द्या, असेही म्हटले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते, खासदार वसंतराव चव्हाण यांनी “आमचे कितीही वैचारिक मतभेद असतील पण बाळासाहेब ठाकरे हा आमचा एक अलंकार आहे, दागिना आहे, आम्ही तो मुळीच देणार नाही, अशी ठणकावून सांगणारी प्रतिक्रिया दिली होती, जी दैनिक सामनामध्ये पहिल्या पानावर मुख्य मथळ्यात छापली होती. भारतीय जनता पक्षाने शिवसेनेबरोबर युती केली. परंतु ती करतांना मखलाशी अशी केली की विदर्भात जास्त जागा स्वतः कडे घेतल्या तर शिवसेनेच्या पारड्यात कमी जागा टाकल्या आणि ज्या पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसच्या शिवाय कुणीही त्यावेळी निवडून येऊ शकत नव्हते, त्यावेळी जास्त जागा पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेच्या वाट्याला आल्या. गुलाबराव गावंडे या मराठा महासंघाच्या नेत्यांनी आपला महासंघ शिवसेनेत समाविष्ट केला आणि स्वतंत्र विदर्भाच्या विरोधात शिवसेनेची भूमिका असतांना भारतीय जनता पक्षाने तिथे जास्त जागा लढविल्या. परिणामी शिवसेनेच्या जास्त जागा लढवून कमी आणि भारतीय जनता पक्षाच्या कमी जागा लढवून जास्त जागा निवडून आल्या. शिवसेनेला 171 पैकी 52 आणि भारतीय जनता पक्षाला 117 पैकी 42 अशा 94 जागा 1990 साली युतीला मिळाल्या होत्या. ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री असे सूत्र ठरले होते. म्हणून शिवसेनेच्या जागा पाडण्यासाठी भारतीय जनता पक्षाने प्रयत्न केले. 1991 साली छगन भुजबळ यांनी 15 आमदार सोबत घेऊन शिवसेना सोडली त्यावेळी डॉ. मनोहर जोशी हे विरोधी पक्षनेते असतांना भारतीय जनता पक्षाचे विधिमंडळ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत डॉ. मनोहर जोशी यांनी पत्रकार परिषदेत युतीचा नेता म्हणून विरोधी पक्षनेता राहू शकतो, असे स्पष्ट केले. गोपीनाथ मुंडे यांनी हो म्हणून सुद्धा प्रेमकुमार शर्मा यांनी विधानसभा अध्यक्ष मधुकरराव उर्फ बाळासाहेब चौधरी यांच्याकडे भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षनेते पदावर दावा करीत असल्याचे पत्र दिले. तेंव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी सामना मध्ये पहिल्या पानावर ‘लोणी, बोका आणि सिंक’ असा अग्रलेख लिहून आपली नाराजी जाहीर केली होती.
Yogesh Trivedi
 1999 सालीच प्रमोद महाजन यांनी स्वतंत्र निवडणुका लढविण्याचे संकेत दिले असल्याच्या बातम्या आल्या होत्या आणि ‘शत प्रतिशत भाजप’ अशी घोषणा सर्वप्रथम प्रमोद महाजन यांनी केली होती. 1999 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत फाजील आत्मविश्वास आणि असुरी महत्वाकांक्षा यामुळे शिवसेना भारतीय जनता पक्ष युतीची सत्ता येऊ शकली. नाही. बाळासाहेब, आपण हळूहळू शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीत फेरबदल करीत होतात. महाबळेश्वरला झालेल्या शिवसेनेच्या राष्ट्रीय अधिवेशनात नेते आणि पदाधिकारी यांच्या आग्रहाखातर उद्धव ठाकरे यांना आधी शिवसेनेचे कार्यप्रमुख बनविलेत. मी आपल्यावर नेतृत्व लादणार नाही, तुम्हाला उद्धव मध्ये नेतृत्व करण्यासाठी आवश्यक असलेले गुण दिसत असतील तर बेलाशक स्वीकारा, असे ठणकावून सांगितलेत. 2005, साली नारायण राणे यांनी आणि 2006 साली राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली. पुत्रवत प्रेम करुनही हे दोघे वेगळे झाल्यावर आपण थोडेसे नाराज झालात. साहजिकच आहे. पण काही जण स्वतःला स्वयंप्रकाशित समजत असतील तर त्याला आपण काय करणार ? असो, परंतु पुढे उद्धव ठाकरे यांनी विविध निवडणुकीत आपले नेतृत्व सिद्ध केले. आपण 17 नोव्हेंबर 2012  रोजी या विश्वाचा निरोप घेतला. केवळ मुंबई, महाराष्ट्र, हिंदुस्थान नव्हे तर अवघे विश्व आणि अवघा हिंदु बांधव हळहळला. अनेकांचे अश्रू थांबत नव्हते. 2014 ची निवडणूक आली. नेहमीप्रमाणे शिवसेनेला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने केला. आपल्या नातवाने म्हणजेच उद्धवपुत्र आदित्य ठाकरे यांनी आपले नेतृत्व गुण दाखवायला सुरुवात केली. 151+ चा नारा आदित्य ठाकरे यांनी दिला. शिवसेनेचे मुख्यमंत्री बनविण्यासाठी तेंव्हाच बीजारोपण केले होते. भारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदी यांच्या नावावरकत उड्या मारायला सुरुवात केली होती. लोकसभेत घवघवीत यश मिळाल्याने भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे हात गगनाला भिडले होते. पण गोपीनाथ मुंडे यांचे दुर्दैवी निधन झाले आणि महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाच्या ‘शाखेला’ झटका बसला. गोपीनाथ मुंडे यांनी सोशल इंजिनिअरिंग करुन, मातोश्रीवर आपला रिश्ता कायम राखीत, सारे गैरसमज मिटवून वातावरण चांगले तयार केले होते. त्यामुळे मुंडे यांच्या निधनानंतर महाराष्ट्र भाजप सरबरीत झाल्यासारखा झाला असल्याचे बोलले जात होते.  शिवसेनेने ज्या जागा कधीच जिंकल्या नाहीत त्या जागा आम्हाला द्या आणि ज्या जागा आम्ही हरत आलो आहेत त्या आम्ही तुम्हाला देतो, असा एक शेखचिल्लीसारखा प्रस्ताव शिवसेनेला दिला. उद्धव ठाकरे हे काय लल्लूपंजू वाटले काय ? यापेक्षा 288 पैकी 144/144 अशा निम्म्या निम्म्या जागा देऊन टाका नां ? पण ‘तुझे ते माझे आणि माझे ते माझ्या बापाचे’ असं कुणी म्हणत असेल तर मग नाईलाज म्हणावा लागेल. अखेर 25 सप्टेंबर  2014 रोजी एकनाथराव खडसे यांनी भारतीय जनता पक्ष  शिवसेनेबरोबरची युती तोडत असल्याची घोषणा केली.
त्यानंतर बाळासाहेब, आपल्या अनुपस्थितीत पण आपल्याच आशीर्वादाने उद्धव ठाकरे यांनी अभिमन्यू सारखी एकहाती लढत देत शिवसेनेकडे 288 पैकी 63 जागा खेचून आणल्या. शिवसेना विरोधी पक्षात बसली. शरद पवार यांच्या नांवाने बोटं मोडणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर स्वतःच्या सरकारचे बहुमत सिद्ध केले.  परंतु बुद्धिचातुर्य दाखवून देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्रीवर चंद्रकांतदादा पाटील आणि धर्मेंद्र प्रधान या दोन दूतांना पाठवून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समवेत चर्चा करुन शिवसेनेबरोबर तडजोड घडवून आणली आणि या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी आपले सरकार स्पष्ट बहुमत मिळवीत हलवून खुंटा बळकट केला. 2019 पर्यंत हे सरकार जागेवरून हलू शकत नव्हते. 2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूक आणि या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सोयीची व्हावी याद्रुष्टीने देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना भरीस घातले. 18 फेब्रुवारी 2019 रोजी अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बरोबर रेनीसान्स, मातोश्री येथे प्रदीर्घ चर्चा केली. या फक्त दोन पक्षप्रमुखांमध्ये झालेली चर्चा देवेंद्र फडणवीस यांना माहीत नव्हती. त्यामुळे 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पदांचे समसमान वाटप करण्याचा मुद्दा देवेंद्र फडणवीस यांच्या खिजगणतीतही नव्हता. त्यामुळेच 24 ऑक्टोबर 2019 रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या मागणीला जुमानले नाही. उद्धव ठाकरे यांना भारतीय जनता पक्षाच्या आजवरच्या सर्वच प्रकारच्या वागणूक/वर्तणुकीचा सोक्षमोक्ष लावून विश्वासघात करणाऱ्यांची नांगी ठेचायची होती. बाळासाहेब, उद्धव ठाकरे यांनी ‘या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर शिवसैनिकालाच बसविणार’ असे वचन आपल्याला दिले होते. पदांच्या समसमान वाटपात मुख्यमंत्री हे पद येत नसल्याची धारणा कदाचित देवेंद्र फडणवीस यांना असावी. म्हणून ते मान्य करायला तयार नव्हते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे समोर आले नाहीत. अमित शाह हे आले खरे पण फार उशीरा. “बंद कमरेमें जो बातें हुई, वह जाहिर करना मुनासिब नहीं,” असं म्हणत अमित शाह यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.
परंतु ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ अशी मनाशी खुणगांठ बांधून उद्धव ठाकरे कंबर कसून कामाला लागले. भारतीय जनता पक्षाच्या आजवरच्या कारकीर्दीत त्यांनी प्रत्येक राज्यात मित्रपक्षांचा केसानेच गळा कापला आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्या मित्रपक्षांना नमविण्याचाच डाव भाजप खेळत आलाय. मायावती, जयललिता, प्रकाशसिंह बादल, नितीशकुमार, नवीन पटनाईक, मेहबुबा मुफ्ती आदींचा केवळ सत्तेचा सोपान चढण्यासाठी उपयोग करून घेतला.  बाळासाहेब, आपल्याला ते नमवू शकले नाहीत, परंतु  इमोशनल ब्लॅकमेल  करण्याचा प्रयत्न केला. नरेंद्र मोदी यांना अटलबिहारी वाजपेयी यांनी बदलण्यासाठी पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला. लालकृष्ण अडवाणी मातोश्रीवर आले, बाळासाहेब, आपल्याला ते भेटले. तेंव्हा आपण त्यांना ठणकावून सांगितले की, नरेंद्र मोदी को मत हटाओ, नरेंद्र मोदी गया तो समजो गुजरात से भाजपा गया. शंकरसिंग वाघेला भारतीय जनता पक्ष सोडून बाहेर पडले, ते मातोश्रीवर आले आणि आपल्याला म्हणाले, बालासाहब, आप मुझे शिवसेना मे प्रवेश दो, मैं शिवसेना का गुजरात का मुख्यमंत्री बनूंगा. पण आपण ठणकावून सांगितले की आम्ही वाघ आहोत, वाघेला नहीं. मित्रपक्षाला सांभाळून घेण्याची आपली दानत होती. अन्यथा अख्खा गुजरात आपण ठरवले असते तर शिवसेनेच्या भगव्या रंगाने न्हाऊन निघाला असता. आता भारतीय जनता पक्षाने पंजाबात सुद्धा दात बाहेर काढायला सुरुवात केली आहे. या सर्वच गोष्टींचा हिशोब चुकता करुन, आपल्याला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी 22 नोव्हेंबर 2019 पर्यंत कुणाच्याही ध्यानी मनी नसतांना शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या समर्थनानंतर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची धुरा स्वीकारण्यासाठी संमती दिली आणि 28 नोव्हेंबर 2019 रोजी बाळासाहेब, बरोब्बर 24 वर्षानंतर आपल्या आवडत्या शिवतीर्थावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या करवी महाराष्ट्राचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आपल्याला दिलेले वचन पूर्ण केले.
 बाळासाहेब, महाराष्ट्र विधानसभेत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि आपले प्रपौत्र आदित्य ठाकरे हे पर्यटन व पर्यावरण मंत्री म्हणून पहायला मिळाले. अगदी झपाटल्यासारखे उद्धव ठाकरे हे काम करीत आहेत, स्पष्ट, परखड, संयमी, निर्णयक्षम असा विवेकी मुख्यमंत्री महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेला मिळाला. काही वेळा काहींना स्मृती भ्रंश होतो की काय ? अहो बाळासाहेब, देवेंद्र फडणवीस भर सभागृहात म्हणाले की शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्रित येत असतील तर काहीही शक्य आहे. बाळासाहेब, का हो 22 नोव्हेंबर 2019 च्या संध्याकाळी वरळीच्या नेहरू सेंटर मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिनही पक्षांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावावर महाराष्ट्र विकास आघाडी चे नेते म्हणून शिक्कामोर्तब केले. पण 23 नोव्हेंबर 2019 च्या भल्या पहाटे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतांनाच त्यांच्या बरोबर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे कोण होते ? बरोबर नां साहेब ? अहो, उद्धव ठाकरे यांनी शपथ घेण्यापूर्वी वसंतराव नाईक यांच्या नंतर सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदाचा विक्रम ज्यांच्या नावे होता तेच देवेंद्र फडणवीस हे केवळ ऐंशी तासाचे मुख्यमंत्री हाही विक्रम स्वतःच्या नावावर नोंदविते झाले.  23 नोव्हेंबर 2019 ची सारी वृत्तपत्रे रद्दीत पाठविणाऱ्या विक्रमादित्य व्यक्तीला उद्धव ठाकरे यांनी विरोधी बाकांवर बसविले. उद्धव ठाकरे माझे मोठे भाऊ आणि नरेंद्र मोदी उद्धव ठाकरे यांचे मोठे बंधू अशी घोषणा करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी साऱ्या नात्यांचाच बोऱ्या वाजविला. बाळासाहेब, शिवसेना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनसंघ आणि भारतीय जनता पक्ष यांच कधीच जमलं नाही. उलट आपल्याला कितीही शिव्याशाप देणारे समाजवादी खरे तर आपले खरे मित्र म्हणावे लागतील. 1955 साली प्रकाशभाई मोहाडीकर यांच्या समवेत श्याम नावाच्या नियतकालिकात आपण व्यंगचित्र काढीत होतात. 1956 सालच्या मुंबई सह संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात दिनू रणदिवे आणि अशोक पडबिद्री यांच्या बरोबर संयुक्त महाराष्ट्र पत्रिकेत ति. स्व. दादा हे शीर्षक द्यायचे आणि आपण ‘मावळा’ नांवाने व्यंगचित्र काढीत होतात. 1966 साली आपण शिवसेना स्थापन केलीत आणि 1968 च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत प्रजा समाजवादी पक्षाचे प्रा. मधू दंडवते यांच्या बरोबर युती केलीत. राजापूर आणि दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात आपण प्रा. मधू दंडवते आणि प्रमिलाताई दंडवते यांना पाठिंबा दिला होतात. या समाजवादी साथींची संघ/जनसंघवाल्यांनी जनता  पक्षात काय दुर्दशा केली ते जर पहायचे असेल तर नरीमन पॉईंटवरची भारतीय जनता पक्ष आणि जनता दल ही दोन कार्यालये पाहिली तरी कल्पना येऊ शकेल. जनता पक्षाच्या स्थापनेत समाजवादी पक्ष, भारतीय जनसंघ, भारतीय लोकदल आणि संघटना काँग्रेस या चार पक्षांचा समावेश होता. इंदिरा गांधी यांनी 1975  साली आणिबाणी लादल्या नंतर जनता पक्ष  1977 साली स्थापन झाला. भारतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा खऱ्याअर्थाने 1977 नंतरच फोफावल्या. समाजवाद्यांनी राष्ट्र सेवा दलाकडे लक्ष दिले नाही. जनता पक्षात मोक्याची पदे संघवाल्यानी पटकावली आणि दुय्यम पदे नेहमीच समाजवाद्यांच्या वाट्याला आली. त्यामुळेच बाळासाहेब, आता उद्धव ठाकरे यांनी आपल्याला दिलेल्या वचनपूर्तीसाठी आणि भारतीय जनता पक्षाला धडा शिकविण्यासाठी शरद पवार यांच्यापासून काँग्रेस पक्षात असलेल्या समाजवाद्यांपर्यंत  झाडून सारे एकत्र झालेले दिसताहेत. बाळासाहेब, खरंच आपण समाधानी, आनंदी झाला असाल नाही हे चित्र पाहून ? आपले आशीर्वाद उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या पाठीशी सदैव राहोत आणि उद्धव ठाकरे-आदित्य ठाकरे यांच्या महाराष्ट्रातील जनतेची सेवा करण्यासाठी जे जे स्वप्न उराशी बाळगले असेल ते पूर्ण करण्यासाठी त्यांना शक्ति मिळो. शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात,  अशोक चव्हाण, जयंत पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील या धुरिणांसोबतच आदित्य ठाकरे, अदिती तटकरे, रोहित पवार, अमित देशमुख, त्रतुराज पाटील, धीरज देशमुख आदींची दुसरी मजबूत फळीसुद्धा कामाला लागली आहे. काही विपरीत ना घडो आणि हे महाविकास आघाडी च्या सरकारकडून बरीच वर्षे राज्यातील जनतेची सेवा घडत राहो, या मनःपूर्वक शुभेच्छा ! यासाठी या ‘टीम उद्धव’ला  उदंड आयुष्य  आणि ठणठणीत आरोग्य प्राप्त होवो, अशी एकवीरेचरणी विनम्र प्रार्थना ! बाळासाहेब, आपल्या पवित्र स्मृतींना मानाचा मुजरा !!

(लेखक जेष्ठ पत्रकार आहेत)