घरफिचर्सनिळा नायक दुर्मिळच!

निळा नायक दुर्मिळच!

Subscribe

नुकत्याच आलेल्या ‘काला कारिकालन’मधून दलित-शोषित-कनिष्ठवर्गीय असा असंघटीत कामगारवस्तीतला नायक चित्रपटांच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा दिग्दर्शक पा. रंजिथचा प्रयत्न यशस्वी झालाय. हिंदी आणि मराठी पडद्यावरही हाताच्या बोटावर मोजण्याइतके अपवाद सोडल्यास दलित-पीडित नायकाचा एल्गार समोर आलाच नाही...

ठळकपणे जातवास्तवावर भाष्य करणारा सिनेमा मराठी-हिंदीत अगदीच दुर्मिळ आहे. तुलनेने कामगारवर्गाचा संघर्ष पडद्यावर साकारण्याचे प्रयत्न मात्र बरेचसे यशस्वी झालेत. त्यात योगदान होते कामगारांच्या चळवळीबाबत संवेदनशील असलेल्या सलीम जावेद किंवा रवी चोप्रांसारख्या लेखक दिग्दर्शकांचं, कामगारांच्या चळवळीची मांडणी जरी पडद्यावर केली गेली. त्यात खलनायक भांडवलदार आणि नायक कामगारांचा नेता असेच ढोबळ चित्रण होते. तत्वज्ञानाला थेट पडद्यावर स्थान देण्याचा विचार प्रकर्षाने झाला नाही. त्यामुळेच वैचारिक लढा किंवा भूमिका यांचे चित्रण तेवढ्या परिणामकारकपणे झाले नाही. सुखवस्तू कुटुंबातल्या समस्या म्हणजेच माणसाच्या प्रातिनिधिक समस्या असे ठसवणाèया हिंदी आणि मराठी सिनेमांच्या मुख्य प्रवाहाला ‘नाही रे’ वर्गाची स्वप्नं, लहानमोठी सुखदु:खं, वेदना-संवेदना पडद्यावर साकारण्याची गरज वाटली नाही. त्यामुळे ‘सिंहासन,’ ‘सुर्योदय,’ ‘जोगवा,’ ‘भस्म’सारखे काही अपवाद वगळले तर चकचकीत हिंदी सिनेमांची भ्रष्ट नक्कल करण्यापलिकडे मराठीचा पडदा गेला नाही.

भांडवलदारांपुढे हतबल ठरलेल्या पत्रकारितेचा कथाविषय असलेल्या ‘मशाल’मध्ये आलोकनाथच्या वर्तमानपत्राच्या कार्यालयात मार्क्सचा फोटो असतो. हे प्रतिक होते ८० च्या दशकातल्या कामगार चळवळीतील. अनिल कपूरच्या वार्ताहर म्हणून नोकरीचा विषय निघाल्यावर संपादक असलेला आलोकनाथ म्हणतो, यहाँ कोई नौकर नही है…और मालिक भी नही…एक दिन आएगा..जब हर जगह यही होगा, कोई नौकर नही कोई मालिक नही’ या संवादातून मार्क्सवादी चळवळीचे उद्दिष्टच समोर येते. अमिताभ, शशी कपूरच्या ‘दिवार’ची सुरुवातच पडद्यावर कामगारांच्या आंदोलनाने होते. कामगारांचा नेता सत्तेन कप्पू भाषणात म्हणतो, ‘हमें इस बात की शिकायत नही के उनके (भांडवलदार मालकांच्या) घरमें शमा क्यूं जलती है..हमारी शिकायत यह है के मजदूरोंके घरोंमें चूल्हे ठंडे क्यूं है’ ही तक्रार ‘दिवार’च्या कथानकाचा पाया होती. पण वास्तवाला भिडणारा थेट आंबेडकरवादी नायक इथेही टाळलाच होता.

- Advertisement -

वंचित घटकांचा नायक थेट आंबेडकरवादी किंवा मार्क्सवादी दाखवण्याचे प्रयत्न खूपच कमी झाले. त्यामुळे आंबेडकरी आणि कामगार चळवळीच्या साहित्यातला हुंकार पडद्यावर थेटपणे आला नाही. मराठीत लेखक विजय तेंडुलकर, कादंबरीकार अरुण साधू आणि दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी ‘सिंहासन’ (१९७९) बनवून वंचित घटकांच्या आक्रंदनाचा धाडसी प्रयोग मराठीत केला. यातील दलित महिलेवरील अत्याचारातून राजकीय उद्दिष्ट साध्य करणारे राजकारणी होते. तसेच कामगार चळवळीला राजकीय दावणीला बांधणारे नेतेही होतेच. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतला थेट व्यवस्थेला भिडणारा नायक जब्बार पटेल यांनीच ‘मुक्ता’ (१९९४) मधून जवळपास १५ वर्षांनी समोर आणला. त्यात कवी नामदेव ढसाळांनी लिहिलेली ‘शहराला आग लावत चला…’ ही कविता अविनाश नारकरने साकारलेल्या दलित नायकाच्या तोंडी होती. वंचित घटकांवर बनलेल्या तत्कालीन सिनेमांमध्ये सोसलेपणाच अधिक होता. मराठीतला नाना पाटेकर, दिप्ती नवलचा ‘सुर्योदय’ किंवा हिंदीतला श्याम बेनेगलांचा ‘आक्रोश’ या सिनेमांमध्ये दलित हतबलतेचे चित्रण होते. ‘आक्रोश’ मधला ओम पुरींचा ‘लहान्या’ किंवा अगदी अलिकडचा ‘लगान’मधील कचरा या व्यक्तिरेखा सोशिक होत्या, बंड करणाऱ्या नव्हत्या.

प्रकाश झा ने २०११ मध्ये ‘आरक्षण’ बनवला. त्याच्या त्याआधी आलेल्या ‘गंगाजल’मुळे सामाजिक विषयावरील सिनेमांची आवड असलेल्या प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. ‘आरक्षण’मध्येही राखीव जागांचा प्रश्न होता. त्याचे समर्थन आणि विरोध असा संघर्ष कथानकात असणार हे उघड होते. सामाजिक न्यायावर आधारीत आरक्षित जागांचा विषय आल्यावर आंबेडकरांचा विषय टाळणे शक्य नव्हते. सैफ अली खानचा नायक आक्रमक होता. ‘मौका मिलनेपर इस देश का संविधान लिखनेवाला हमारेमेंसेही एक था’ असा तडाखेबंद डायलॉग अमिताभसमोर मारणारा आंंबेडकरी चळवळीशी नाते सांगणारा पडद्यावरचा नायक यात होता. ‘आरक्षण’ची घोषणा केल्यापासून प्रकाश झा ला अनेक वादविवादांना तोंड द्यावे लागले होते. मात्र या सिनेमातही आरक्षणाची गरज त्याचे समर्थन, विरोध, सामाजिक परिणाम, धर्म आणि जातीव्यवस्थेची गुंतागुंत टाळून अखेर शिक्षणाच्या बाजारीकरणाकडे आरक्षणाचे कथानक वळवले गेले. आंबेडकरी विचारांचा नायक पडद्यावरून बाजूलाच पडला. महेश मांजरेकरांच्या ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ मध्ये आजच्या सामाजिक संदर्भांवर मार्गदर्शन करणारे छत्रपती शिवाजी महाराज हेच कथानकाचे खऱ्या अर्थाने नायक होते. अखेरीस चित्रपटाचा नायक निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतो त्यावेळी घटनेतील मूलभूत अधिकारांच्या संदर्भाने डॉ. बाबासाहेबांचा उल्लेख होतो. मांजरेकरांच्याच हिंदी ‘विरुद्ध’चा रिमेक असलेल्या ‘कोकणस्थ’ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सदस्य असलेल्या मध्यमवर्गीय ब्राह्मण व्यक्तीरेखेसोबत संघर्ष करणारी व्यक्तीरेखा म्हणून पँथरमधील आक्रमक आंबेडकरी तरुण उपेंद्र लिमयेने साकारला होता.

- Advertisement -

नागराजच्या फँंड्रीमध्ये जब्याने व्यवस्थेवर भिरकावलेल्या दगडामागे सोसलेपणाच्या परिणामाचा उद्वेक असतो. या दगडाला दिशा नसते. डुकराच्या स्तरावर जगणाऱ्या माणसांची या पातळीला नकार देण्याची धडपड दशा इथे दिसते. तर सैराटमध्ये जातवास्तवाचा करुण शेवट होतो. दशा म्हणजे सोसलेपण आणि आंबेडकरवाद म्हणजे दिशा, येणारा काळ हा याच दिशेचा असावा.

रंजिथच्या ‘कबाली’मध्ये शिर्षक भूमिकेतला नायक रजनीकांत खलनायक भांडवलदारांसमोर उद्वेगाने बोलतो. ‘मै सूट पहनूंगा..स्टाईलमें बैठूंगा..’ हेच तर सन्मानाने जगण्याची मागणी करणाऱ्या चळवळीचे आक्रंदन असते. म्हणूनच कबालीच्या पडद्यावरील कोनातून चे गव्हेरा, मार्क्सचे चेहरे समोर येतात. ‘काला’सुद्धा त्यापुढे बुद्ध आणि भिमवाडा दाखवत ‘नाही रे…’ गटातल्या वंचितांचे पडद्यावरचे प्रतिक म्हणून समोर येतो. इथं काळ्या रंगाचे गौरवीकरण हे पांढरपेशा वृत्तीसह उजळ रंगासमोर सांस्कृतिक आव्हान असते. जातीअंत, सामाजिक न्याय, सर्वप्रकारच्या शोषणाला विरोध आणि मानवी अभिव्यक्तीचा पुरस्कार करणाऱ्या बाबासाहेबांच्या विचारांना पडद्यावर स्थान देण्याचे टाळत हिंदी-मराठी पडदा संघर्षकारी कथानकांपासून जाणीवपूर्वक वंचित ठेवला गेला. ‘काला’च्या निमित्ताने दक्षिणेकडून ही पोकळी भरण्याचा झालेला प्रयत्न त्यामुळेच महत्त्वाचा ठरतो.


-संजय सोनवणे
(लेखक ‘आपलं महानगर’मध्ये वरिष्ठ उपसंपादक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -