घरफिचर्सनशेखोरी, बॉलिवूड आणि राजकारण

नशेखोरी, बॉलिवूड आणि राजकारण

Subscribe

हिंदी चित्रपट जगतात नशेखोरीचा विषय नवा नाही. अगदी ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यातही हा विषय चर्चिला गेला होता. तारे तारकांमधील प्रेमभंगातील विरहातून आलेल्या नशेखोरीची चर्चा त्यावेळी सिनेमासिकातूंन केली जात होती. पडद्यावर सर्रास ओढल्या जाणार्‍या सिगार, पाईप, सिगारेट्स या अशोक कुमार, रेहमान, प्राण, अमिताभ यांच्या इमेज अभिनयाचा भाग होत्या. त्या काळी अशा अमली पदार्थांच्या व्यसनाच्या प्रसंगात आजच्यासारखा वैधानिक इशाराही पडद्याखाली दाखवला जात नव्हता. मात्र, त्या काळात हे पडद्यावरील आणि पडद्यामागीलही व्यसन आजच्याइतके घातक आणि तीव्र स्वरूपाचे नव्हते. हिंदी पडद्याची ओळख ही अभिनय आणि कलेसाठी होती, नशेखोर सिनेजगत अशी नकारात्मक ओळख देण्याची घाई त्यावेळी राजकारणाचा भाग नव्हती.

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा फोकस आता गरजेनुसार रिया, कंगना, बच्चन कुटुंब, उर्मिला असा पूर्ण वळवण्यात आलेला आहे. माध्यमांना चघळण्यासाठी आणि चॅनल्सचे पडदे महत्त्वाच्या प्रश्नांनी व्यापले जाऊ नयेत, यासाठी सुरू असलेल्या मोठ्या नियोजनाचा हा भाग यशस्वी होताना दिसत आहे. लॉकडाऊननंतर विस्कटलेला शेतकरी, कामगार, छोट्या उद्योग संपुष्टात आल्यानंतर निर्माण झालेली बेरोजगारी, आर्थिक मंदीचे गडद होणारे सावट, रिझर्व्ह बँकेसमोरील निधीचा प्रश्न, विकले जाणारे सरकारी उद्योग व्यवसाय, कोरोनामुळे उद्योगांसमोरील निर्माण झालेले संकट आणि खालावणारा आर्थिक विकास दर असे महत्त्वाचे प्रश्न समोर येऊ नयेत यासाठी माध्यमांचे कॅमेरे सुरुवातीच्या काळात राम मंदिर, तबलिगी, कोरोना त्यानंतर सुशांत, रिया तसेच पुढे कंगना आणि आता उर्मिलाच्या छबीने भरून टाकण्याचा हा जाणीवपूर्वक सुरू असलेला प्रयत्न आहे. ठाकरे सरकार त्याला काही अंशी बळी पडले. कोरोनाच्या लढाईत महाराष्ट्राचा गड लढवणार्‍या ठाकरे सरकारला खरे तर विरोधकांचे बळ मिळणे अपेक्षित होते. मात्र, कोरोना लढ्यातही राजकीय कुरघोडीची संधी शोधणार्‍यांना कंगना प्रकरणाने आयते कोलीत हाती मिळवून दिले.

कंगनाने राज्यपालांची घेतलेली भेट, तिच्या इमारतीवर झालेली कारवाई तसेच या अभिनेत्रीला केंद्रातून मिळालेली सुरक्षा या सर्वच घडामोडीनंतर हा विषय निव्वळ राजकीय होताच. विरोधकांनी या विषयावरून दोन हेतू साध्य केले एक केंद्र सरकारच्या आर्थिक धोरण आणि निर्णयांवर चर्चा करण्याची संधी माध्यमांना दिली नाही आणि राज्याचा कोरोनाविरोधातील लढाईचे चित्रही धूसर करण्यात आणि सत्ताधार्‍यांना निव्वळ राजकीय मुद्यांवर अडकवण्यात आले. कंगनाने याआधी आणि नुकतीच केलेली विधाने तपासल्यावर महत्त्वाच्या मुद्यांवरून लोकांचे ध्यान हटवण्यासाठी जाणीवपूर्वक सुरू असलेले नियोजन असल्याचे स्पष्ट होत आहे. जया बच्चन यांच्या संसदेतील विधानावर कंगनाने उत्तर दिले. त्यानंतर उर्मिलाविरोधातही तिने टीकेचा सुरू लावला. या दोन्ही टीकांमध्ये स्त्रीवादाचा कुठलाही विषय नव्हता. जया बच्चन, हेमा मालिनी, उर्मिला विरोधात कंगना असा हा सामना होता. मात्र, कंगनाने केलेल्या बेछूट विधानांमुळे तिला मिळणारे समर्थन कमी होत गेले आणि टीकाकार वाढत गेले. कंगनाचा केवळ आणि केवळ राजकीय वापर होत असल्याचे आता पुरते स्पष्ट झाले असून ज्या विषयावरून हे सर्व नशानाट्य सुरू झाले ते सुशांत सिंह प्रकरणाचा विषय पूर्णपणे राजकीय कोनातून वळवण्यात आलेला असून तो हिंदी चित्रपटसृष्टीतील नशेखोरीच्या विषयावर आणण्यात आलेला आहे.

- Advertisement -

हिंदी चित्रपटसृष्टीवर याआधीही गुन्हेगारी आणि नशेखोरीचे आरोप झाले होते. हिंदी चित्रपटसृष्टीचे आणि संघटीत गुन्हेगारी टोळ्यांचे विषय नवे नाहीत. त्यावर हिंदी पडद्यावरही अनेक चित्रपट येऊन गेले आहेत. करीम लाला, कुप्रसिद्ध दाऊद, छोटा शकील, राजन यांचा पैसा बॉलिवूडमध्ये कसा खेळला खेळवला गेला हे सर्वज्ञात आहे. दुसरीकडे अमली पदार्थांचा विषयही बॉलिवूडमध्ये नवा नव्हता. मात्र, संपूर्ण चित्रपटसृष्टीला नशेखोर संबोधण्याची चूक या अभिनेत्रीकडून झाली. बॉलिवूडमध्ये आपापले हितसंबंध जोपासणारे विविध समूह काम करतात हे सत्य लपलेले नाही. हा प्रकार आधीही होत होताच. एखाद्या समूहाचे सदस्य होऊन काम करणारे सहसा दुसर्‍या समूहात जात नव्हते. करन जौहरच्या चकचकाटी सिनेमांचा जसा एक हुकमी प्रेक्षक आहे तसाच अशा सिनेमात काम करणार्‍या कलाकारांचाही एक वर्ग आहे. हे सिनेमे मुख्य प्रवाहातील असल्याचा प्रवाद बॉलिवूडमध्ये जाणीवपूर्वक चालवला गेला आहे. ज्यात यशराज, आर.के. असे बडे बॅनर्सचे सिनेमे मेन स्ट्रीम सिनेमा मानण्याचे प्रकार सुरू झाले. या अशा (मेन स्ट्रीम) सिनेमांविरोधात कल्ट सिनेकर्त्यांनी एक समांतर चित्रपट सृष्टी उभारली. ज्यात ऐंशीच्या दशकात गोविंद निहलानी तर अलीकडच्या काळात रामगोपाल वर्मा, अनुराग कश्यप ही मंडळी होती. अभिजन वर्गाने या सिनेमांविरोधात त्यावेळीही नाके मुरडली होती. बॉलिवूडमधील सध्या सुरू असलेल्या वादाला अशा समूहवादातील संघर्षाचीही बाजू आहे.

नशेखोरीचा इतिहास बॉलिवूडसाठी नवा नाही. जुन्या ब्लॅक अँड व्हाईट जमान्यातही तारे तारकांच्या नशेखोरीच्या चर्चा तत्कालीन सिनेमासिकांमध्ये केल्या जात होत्या. मात्र, त्यावेळी कमालीच्या हानीकारक अमली पदार्थांनी हिंदी चित्रपटसृष्टीत शिरकाव केलेला नव्हता. यार अमित तेरे हाथ में सिगारेट अच्छी नही लगती, असं अमिताभला सेटवर प्राणसाहेबांनी सुनावलं होतं. त्यावेळी अमिताभने बोटातली सिगारेट विझवून या व्यसनाचा निरोप घेतल्याची चर्चा होती. हिंदी पडद्यावर अगदी ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यातही अशोक कुमार, राज कुमार मंडळींच्या बोटात असलेल्या सिगार दृष्यावर पडद्याखाली कधी तंबाखू सेवनाच्या हानीचा वैधानिक इशारा दिला जात नव्हता. मात्र, तरीही हिंदी पडदा अमली पदार्थांच्या विळख्यात अडकलेला नव्हता. तारे तारकांच्या मद्याच्या व्यसनामागे असलेल्या ब्रेक अपच्या कहाण्या सिने मासिकांमध्ये छापल्या जात होत्या. मात्र, त्याहून घातक व्यसनांचा विषय हिंदी पडद्यापासून दूरच होता.

- Advertisement -

ज्या काळात सिनेमांमध्ये पडद्यावर खलनायकाकडून कोकेन, ब्राऊन शुगर अशा कमालीच्या धोकादायक व्यसनांची फॅक्टरी चालवली जात होती, हा तोच ८० च्या दशकातील काळ होता. फिरोज खानच्या सिनेमांनी हा विषय पडद्यावर पहिल्यांदा आणला. त्याआधी धार्मिक मालिकांसाठी ओळखल्या गेलेल्या सागर फिल्म्सने अमली पदार्थांच्या विषयावर चरस नावाचा सिनेमा सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीलाच बनवला होता. अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या संजय दत्तला या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी सुनील दत्त यांनी रॉकी नावाचा सिनेमा बनवला होता. त्यावेळीही हिंदी चित्रपट क्षेत्रात अमली पदार्थांच्या व्यसनाला प्रतिष्ठा मिळालेली नव्हती. फिरोज खानला अमली पदार्थांच्या विषयावरील सिनेमांचे आकर्षण होते. मात्र, मुलगा फरदीनवर कोकेन सेवनाचे आरोप झाल्यावर या प्रकरणातून त्याला बाहेर काढताना फिरोजची दमछाक झाली होती. मॉडलिंग आणि सिनेक्षेत्रातील ग्लॅमरस जगात नशेखोरी ही सामान्य बाब असल्याचे मधुर भांडारकरने त्याच्या चित्रपटात मांडले होते. तर अनेकदा अनेक एकमेकांवरील टीकेच्या ओघात नशेखोरीचे आरोप केले होते.

बॉलिवूडमध्येही अमली पदार्थांचे सेवन केले जात असल्याच्या बातम्या अलीकडच्या आहेत. त्यात तथ्यही आहे. ड्रग्ज तस्कर आणि बॉलिवूड कलाकारांचे संबंध अनेकदा उघड होण्याआधीच त्यावर पडदा पडल्याच्या घटना घडल्या आहेत. बॉलिवूड आणि विकी गोस्वामी या ड्रग डिलरच्या नावाचा उल्लेख अधून मधून अमली पदार्थविषयक तपासातील बातम्यांमधून होत असतो. अमली पदार्थांचे जग हे महागडी नशा करणार्‍यांचे असते, ते सामान्यांचे नसते, बॉलिवूडमधील हा आरोप काही अंशी खरा जरी असला तरी अमली पदार्थ हे एकच वैशिष्ठ्य या इंडस्ट्रीचे नाही. अभिनय, कलेसाठीही हे जग ओळखले जाते. मात्र, बॉलिवूडमधील अमली पदार्थाच्या विषयाचे होणारे अलीकडचे राजकारण नवे आहे. या दोन्ही धोकादायक प्रकारांपासून पडद्यावरील उद्योगनगरीची सुटका होणे गरजेचे आहे. लोकांच्या जीवनमरणाच्या प्रश्नाला बगल देण्यासाठी सुरू झालेल्या अमली पदार्थांच्या या राजकीय विषयाचे गांभीर्य केवळ राजकारणापुरतेच वापरले जाण्याचा खरा धोका आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -