घरफिचर्सकिताबी किड्यांचे चर्चगेट मार्केट!

किताबी किड्यांचे चर्चगेट मार्केट!

Subscribe

चर्चगेट बाजारात पुस्तके, कपडे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून सर्व काही मिळते. पण हे मार्केट खर्‍या अर्थाने प्रसिद्ध आहे ते कपड्यांसाठी. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूही इथे मोठ्या प्रमाणात मिळतात. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे येथे मिळणारी सेकंडहँड पुस्तके!

चर्चगेटला मार्केट असेल याची क्वचितच कोणी कल्पना केली असेल. पण खर सांगतो चर्चगेटला मार्केट आहे. मी कॉलेजला असताना आम्ही अनेकदा लेक्चर बंक करून या मार्केटमध्ये फिरायला जायचो, स्वस्तात जीन्स, टी शर्ट खरेदी करायचो. आजही हे मार्केट तेथेच आहे; पण त्याची रया बदललेली आहे. चर्चगेट म्हटले की अकबरअली, एशियाटिक अशी मॉलची मोठी नावे डोळ्यांपुढे येतात, त्यात जाऊन खरेदी करणे हे सर्वसामान्यांचे काम नाही.पण असे मॉल फिरायला काहीच हरकत नाही. येथे फिरायचं. मस्त थंड झालं की चर्चगेटच्या मार्केटमध्ये शॉपिंग करायची.

चर्चगेट मार्केट अशी काही फिक्स वास्तु नाही. येथिल रस्त्यावर जे फेरीवाले बसतात त्यांचा समुदाय म्हणजे चर्चगेट मार्केट. जसे रस्त्यावर कुलाबा मार्केट अस्तित्वात आले तसेच हे चर्चगेट मार्केट तेथे स्थापन झाले. साधारण सत्तरच्या दशकात, चर्चगेट आणि फोर्ट भागात तेथे कामाला जाणार्‍या सर्वसामान्य मुंबईकरांची सोय आणि बाहेरून येणार्‍या परप्रांतीयांची रोजगाराची संधी ही दोन कारणे हे मार्केट अस्तित्वात यायला कारणीभूत ठरली. तसेच या भागात परदेशी नागरिकही फिरायला यायचे. त्यामुळे ग्राहक होता, तो येथिल फेरीवाल्यांनी मिळवला. त्यातून आजचे हे मार्केट उभे राहिले. पूर्वी हे फेरीवाले चर्चगेट स्टेशनच्या बाहेरून समोर थेट एलआयसी इमारतीच्याबाहेरपर्यंत बसायचे. तसेच ओव्हल मैदान, फोर्टपासून व्हिटीपर्यंतचा फुटपाथ आणि फोर्टपासून रिगल सिनेमापर्यंत त्यांचा डेरा असायचा. आता मात्र फोर्टच्या फुटपाथला ते तुरळक बसलेले दिसतात. महानगरपालिकेने त्यांच्यावर कारवाई केल्यामुळे आज त्यांची संख्या मर्यादित आहे. त्यातील अनेकांना फॅशन स्ट्रीटवर दुकान मिळालेले आहे. असे जरी असले तरी हे फेरीवाले गतकाळातील चर्चगेट मार्केटचे कथित वैभव दाखवण्यासाठी पुरेसे आहेत. कामाच्या दिवशी येथे फार फेरीवाले नसतात. पण वीकेंडला मात्र येथे बर्‍यापैकी बाजार भरतो.

- Advertisement -

या बाजारात पुस्तके, कपडे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून सर्व काही मिळते. पण हे मार्केट खर्‍या अर्थाने प्रसिद्ध आहे ते कपड्यांसाठी. विशेषतः जीन्स, टी शर्ट आणि इतर फॅशनेबल कपडे येथे स्वस्त मिळतात. ती इथली खासियत आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूही इथे मोठ्या प्रमाणात मिळतात. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे येथे मिळणारी सेकंडहँड पुस्तके. चर्चगेट बाजार हा पुस्तकांसाठी खूप प्रसिद्ध आहे. आता येथे पुस्तक विकणार्‍या फेरीवाल्यांची संख्या कमी झाली असली तरी येथे जे फक्त पुस्तकांसाठी येतात ते दर्दी वाचक असतात. फोर्टला हुतात्मा चौकातील नाक्यावर तुम्ही गेलात तर समोर पाणपोईजवळ पुस्तकांचा ढीग दिसेल. तेथे तुम्हाला जगातील कुठलेही पुस्तक हमखास मिळू शकते. त्यामुळे तेथे बरीच गर्दी असते. त्या पुस्तकवाल्यांकडे मेडिकलपासून ते हिस्टरीपर्यंत ते स्पोर्ट्सपासून वास्तुशास्त्रापर्यंत सर्व प्रकारची पुस्तके मिळू शकतात. येथे आल्यावर एक-दोन तास आरामात निघून जातात. आपल्याला हवी ती पुस्तके चाळायला मिळतात. येथील पुस्तके त्यावरील छापील किमतीपेक्षा कमी दरात मिळतात.

फक्त तुम्हाला भाव करता आला पाहिजे. येथे खरेदी करताना ज्याला तोंडावरचे भाव लपवता आले तो जिंकला! कारण तो पुस्तकवाला सतत तुमच्या तोंडाकडे बघत असतो. त्या पुस्तक गर्दीत एखादे तुम्हाला हवे असलेले पुस्तक मिळाले की तुमच्या चेहर्‍यावरचे भाव बदलतात. ते भाव तो पुस्तकवाला बरोबर टिपतो. मग त्या पुस्तकाचे बार्गेनिंग करायला तो तुम्हाला देत नाही. मग तो सांगेल ते पैसे देऊन तुम्हाला पुस्तक खरेदी करावे लागते. म्हणून येथे खरेदी करताना तुम्हाला स्थितप्रज्ञ राहावे लागते.येथे मिळणार्‍या जीन्सचेही एक कोडे आहे. येथे जीन्सचे लिवाईस, रँग्लरली असे ब्रँड फक्त २०० ते ३००रुपयाला मिळतात. अर्थात बार्गेनिंग करून! पण त्या जुन्या असतात. विक्रेत्याला विचारले, की तो म्हणतो, गोदीचा माल आहे. पण त्यापेक्षा तो जास्त काही सांगत नाही. अर्थात जीन्स घेताना जरा जपून घेतलेली बरी. एकंदरीत चर्चगेट बाजार आता नवा राहिलेला नाही. कदाचित तो अजून दोन वर्षांनी तेथे नसेल पण त्याच्या आठवणी कायम असतील.

Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -