चमकेश गर्दीचा हिरोईजम आणि बचावकार्य!

डोंगरी आणि दुर्घटना घडली तो परिसर चिंचोळ्या गल्ल्यांनीच भरलेला आहे. त्यामुळे अशा ठिकाणी बचाव पथकं पोहोचेपर्यंत स्थानिकांनी लोकांना बाहेर काढण्याचं काम केलं हे निश्चितच कौतुकास्पद आणि धैर्याचं होतं.. आणि त्याबद्दल स्थानिकांचं कौतुकच व्हायला हवं, पण एकदा तिथे बचाव पथकं आल्यानंतरदेखील मोठ्या संख्येने तिथेच गर्दी जमलेली होती. जिथून जखमींना बाहेर मुख्य रस्त्यापर्यंत किंवा अ‍ॅम्ब्युलन्सपर्यंत आणायचं होतं, त्या ६ ते ७ फुटांच्या गल्लीतच किमान १५० ते २०० माणसं उभी होती! अशा स्थितीत जखमींना बाहेर काढण्याचं महाकठीण काम करणार्‍या एनडीआरएफ जवानांना या गर्दीला बाजूला सारून मार्ग काढण्याचं अजून कठीण काम करावं लागत होतं.

Dongri Building Collapse

डोंगरीला ४ मजल्यांची इमारत कोसळली… शब्दश: एखाद्या पत्त्यांच्या घरासारखी… काही क्षणात संसार उद्ध्वस्त झाले…माणसं दबली गेली, मारली गेली…आणि पुन्हा सुरू झाली एक अखंडपणे चालणारी चर्चा! मुंबईतल्या जर्जर झालेल्या इमारतींची सुरक्षा, स्ट्रक्चरल ऑडीट, बेकायदा बांधकाम, निर्वासितांचं पुनर्वसन, रहिवाशांचा हट्टीपणा आणि दगड झालेलं प्रशासन हे त्या चर्चेत हमखास फेकले जाणारे शब्द! अशा दुर्घटना घडतात, तेव्हा तिथे सर्वात आधी बचावकार्य करतात ते तिथले स्थानिक, कारण ते ‘तिथे’च असतात. त्यामुळे त्यांच्या मागून तिथे पोहोचलेल्या प्रशासनावर ‘उशिरा’ पोहोचले असा सहज ठपका लागतो. काही घटनांमध्ये ते खरंही असलं, तरी सगळीकडेच असं घडतं असं मात्र म्हणता येणार नाही, पण आपणच मदतकार्य करतोय, हा जोश स्थानिकांमध्ये इतका भिनतो की नंतर घटनास्थळावर आलेल्या बचाव पथकांनाच काम करणं कठीण होऊन बसतं! आणि मग त्यांच्यासमोर एक सोडून दोन टास्क उभी राहातात. एक म्हणजे युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करणं आणि दुसरं म्हणजे आसपास जमा झालेल्या हिरोईजमने ग्रासलेल्या अतिउत्साही नागरिकांना आवरणं!

डोंगरी इमारत दुर्घटनेमधून मुंबईकरांचा हाच अतिउत्साह पुन्हा एकदा प्रकर्षानं समोर आला. प्रकर्षाने यासाठी कारण तिथे झालेल्या गर्दीमुळे जो काही अडथळा बचाव पथकाला ‘सहन’ करावा लागला, त्यामुळे बचावकार्य अजूनच लांबलं. स्थानिक मुंबईकर जर परिस्थितीचं गांभीर्य ओळखून जबाबदारीने वागले असते, तर सुमारे २४ तास चाललेलं बचावकार्य कदाचित १७ किंवा १८ तासांमध्येच संपलं असतं. कुणास ठाऊक, कदाचित अजून काही जीव एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांना वाचवता आले असते. डोंगरीचा भाग मुळातच चिंचोळा. अगदी ६ ते ७ फूट असलेल्या चिंचोळ्या गल्लीत ही इमारत पडली. त्यामुळे आधीच बचाव पथकांना तिथपर्यंत पोहोचण्यात प्रचंड अडचणी आल्या. त्यामुळे आधीच उशीर झालेल्या एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाला या गर्दीमुळे अधिकच उशीर झाला. घटनास्थळापर्यंत पोहोचल्यानंतर देखील तिथली गर्दी हटायचं नाव घेत नव्हती. प्रत्येकालाच या बचावकार्यामध्ये आपलं योगदान द्यायचं होतं. कदाचित असं म्हणणं थोडं धाडसाचं आणि मुंबईकरांना न रुचणारं देखील ठरेल. मात्र, थोडं वास्तवाकडे जाणारं ठरेल की, कुणालातरी वाचवण्याच्या हिरोईजमने इथल्या लोकांना इतकं पछाडलं होतं की आपण असं करून त्याच बचावकार्यात मोठा अडथळा आणतोय हे त्यांच्या ध्यानातच आलं नाही! एका लहानशा बाळाला वाचवून मलब्याबाहेर काढल्याची दृश्य वृत्तवाहिन्यांवरून वारंवार दाखवली जात होती, पण या चिमुरडीला सुरक्षित स्थळापर्यंत नेईपर्यंत किमान १० ते १२ जणांनी उचलून घेतलं होतं. या प्रयत्नातच या चिमुरडीला इजा होतेय की काय? अशी धास्ती वाटायला लावणारी ती दृश्य होती!

वास्तविक मुळातच डोंगरी आणि दुर्घटना घडली तो परिसर चिंचोळ्या गल्ल्यांनीच भरलेला आहे. त्यामुळे अशा ठिकाणी बचाव पथकं पोहोचेपर्यंत स्थानिकांनी लोकांना बाहेर काढण्याचं काम केलं हे निश्चितच कौतुकास्पद आणि धैर्याचं होतं.. आणि त्याबद्दल स्थानिकांचं कौतुकच व्हायला हवं, पण एकदा तिथे बचाव पथकं आल्यानंतरदेखील मोठ्या संख्येने तिथेच गर्दी जमलेली होती. जिथून जखमींना बाहेर मुख्य रस्त्यापर्यंत किंवा अ‍ॅम्ब्युलन्सपर्यंत आणायचं होतं, त्या ६ ते ७ फुटांच्या गल्लीतच किमान १५० ते २०० माणसं उभी होती! अशा स्थितीत जखमींना बाहेर काढण्याचं महाकठीण काम करणार्‍या एनडीआरएफ जवानांना या गर्दीला बाजूला सारून मार्ग काढण्याचं अजून कठीण काम करावं लागत होतं. चिंचोळ्या गल्लीमुळे स्थानिकांनी मानवी साखळी करून जखमींना बाहेर काढण्यासाठी मदत केली. ही कल्पना नक्कीच चांगली होती, पण या मानवी साखळीसाठीही आवश्यकतेपेक्षा कितीतरी पटींनी जास्त लोकांनी गर्दी केली होती आणि हीच गर्दी बचाव पथकांसाठी अडचणीची ठरत होती.

Dongri Building

दुर्घटना कुठलीही असो, मग ती डोंगरीची असो, मालाड भिंतीची असो किंवा मग गेल्या वर्षी वडाळ्यात दोस्ती पार्कसमोरची पार्किंग खचण्याची घटना असो. या सर्वच घटनांमध्ये स्थानिकांनी बचावकार्य केलं हे जितकं स्वागतार्ह होतं, तितकाच तिथल्या गर्दीचा अडसर बचाव पथकांसाठी त्रासदायक ठरला होता. यासंदर्भात मुंबई अग्निशमन विभागाचे प्रमुख प्रभात रहांगदळे यांनीदेखील सामान्य मुंबईकरांना हीच विनंती केली आहे. ‘अशा घटनांमध्ये मुंबईकरांनी बचावपथकांना सपोर्टिव्ह भूमिकेमध्ये रहावं आणि बचावाचं कार्य जवान करत असताना किमान क्राऊड कंट्रोल त्यांनी करावा’, अशी अपेक्षा ते व्यक्त करतात. यातला क्राऊड कंट्रोल हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. डोंगरीच्या त्या चिंचोळ्या गल्लीत दुर्घटनेच्या दिवशी इतकी गर्दी झाली होती की एलफिन्स्टच्या ‘फूल गिरा-पूल गिरा’सारखी एखादी अफवा जर कुणी उच्चारली असती, तरी तिथल्या चेंगराचेंगरीत किमान ५० ते ६० जणांचा मृत्यू ओढवला असता. अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी मुंबईकरांकडून कुणालातरी वाचवण्याच्या स्वाभाविक हिरोईजमपेक्षाही भान राखून वागणं या बचावपथकांना अपेक्षित असतं, पण अशा घटनांमध्ये पुढे राहून आपला बचावकार्याला ‘हातभार’ लावण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते आणि त्यातूनच ते कार्य अधिकच अवघड होऊन बसतं!

बघ्यांची गर्दी हे एक या गर्दीचं मोठं लक्षण आणि विश्लेषणदेखील ठरतं. अशा ठिकाणच्या गर्दीमध्ये मदत करणार्‍यांपेक्षा बघ्यांचीच गर्दी जास्त असते. त्यात हल्ली समोर घडणारं प्रत्येक वेगळं वाटणारं दृश्य मोबाईलमध्ये कैद करून ठेवण्याची अहमहमिका सगळीकडेच पहायला मिळते. मग तो रस्त्यावर घडलेला अपघात असो किंवा मग डोंगरीसारखी भीषण दुर्घटना. घडलेली घटना इतरांपर्यंत पोहोचवणं याही व्यतिरिक्त वृत्तवाहिन्यांमध्ये चालणार्‍या सर्वात प्रथम किंवा एक्सक्लुझिव्ह सारख्या प्रकाराची लागण सामान्य नागरिकांनादेखील झाल्याचं अशा ठिकाणी दिसून येते. सर्वात आधी आणि सर्वात जवळची दृश्य मोबाईलमध्ये घेण्याची स्पर्धा घटनास्थळावर वेगळाच गोंधळ निर्माण करतात आणि यातून मदतकार्यापेक्षाही शूटिंग जास्त महत्त्वाचं ठरू लागतं. डोंगरी दुर्घटनेवेळी हीच गर्दी वृत्तवाहिन्यांच्या व्हिडिओ कॅमेर्‍यांनादेखील तिथून हाकलत असल्याचं पहायला मिळालं.

वास्तविक घटना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी आणि कॅमेरामन करत असतात. मात्र, त्यांच्यावर दमदाटी करणारे, त्यांच्या सामानाची मोडतोड करणारे किंवा प्रसंगी या प्रतिनिधींवरदेखील हल्ला करणारे महाभाग याच गर्दीतून समोर येतात. त्यामुळे नक्की त्यांना कुणाचा बचाव करायचा असतो आणि त्यासाठी कुणावर हल्ला करायचा असतो? याचा ताळमेळ लागणं कठीण होऊन बसतं. शिवाय, अशा ठिकाणी एनडीआरएफ, बचावपथकं यांच्यापेक्षाही आपणच कसे सर्व जबाबदारी पार पाडत आहोत आणि सगळ्या बचावकार्याचा भार आपल्याच खांद्यांवर कसा आहे, या अविर्भावात अनेक जण घटनास्थळी वावरत असतात. अशांना आवरणं हे एक मोठंच संकट टास्कफोर्सपुढे असतं. कारण, अशी मंडळी त्यांना पटतील अशा पद्धतीने जमावाला निर्देश देत असतात, ज्यामुळे प्रसंगी घटनास्थळी अधिकच गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असते. ज्याचा काही प्रमाणात अनुभव डोंगरी दुर्घटनेवेळीदेखील बचापथकांना आला. अनेक स्थानिक एनडीआरएफच्या जवानांच्या आजुबाजूलाच घोळका करत असल्यामुळे शेवटी त्यांना बळजबरीने हाकलण्याशिवाय जवानांपुढे पर्याय उरला नाही.

वास्तविक अशा दुर्घटनांमध्ये जमलेली ही अतिरिक्त ‘मॅनपॉवर’ बचाव पथकांसाठी खूप मोठी उपलब्धी असते. त्यांच्या मदतीने कार्यक्षमपणे बचावकार्य राबवणं आणि पूर्ण करणं शक्य असतं. मात्र, हा जमाव परिस्थितीचं गांभीर्य आणि त्याचं पुरेसं भान असणारा असावा लागतो. ज्यामुळे त्यांची योग्य पद्धतीने, नेमक्या ठिकाणी आणि आवश्यक तितकीच मदत घेणं शक्य होऊ शकतं, पण ही मदत न होता आपण बचाव पथकांवर बोजाच ठरत आहोत ही बाब अनेक मुंबईकरांना उमजतच नाही. त्यामुळेच अशा घटनांच्या वेळी मुंबईकरांनी दुसर्‍याला वाचवण्याच्या अतिउत्साही हिरोईजमपेक्षाही समजूतदार भान ठेवून बचाव पथकांसाठी ‘सपोर्टिव्ह’ भूमिका वठवणं जास्त महत्त्वाचं आणि अपेक्षितही आहे!