घरफिचर्सझोपडपट्ट्यांमागील जळीत कांड

झोपडपट्ट्यांमागील जळीत कांड

Subscribe

गरीब नगर असो की नर्गिस दत्तनगर दोन्ही ठिकाणी अवैध, बहुमजली झोपड्या आढळतात. या झोपड्यांमध्ये तळमजल्यावर कुटुंब राहते. वरचा प्रत्येक मजला कुटीर उद्योग किंवा गोदाम म्हणून भाड्याने दिलेला असतो. झोपडीदादा हे महापालिका, पोलिसांना हाताशी धरून अगदी 25 हजार ते एक लाख रुपयांपर्यंत खर्च करून अवघ्या काही तासांत झोपड्या उभारतात आणि भाड्याने देतात. या झोपड्यांवर कारवाई होऊ नये यासाठी महापालिका अधिकारी, पोलीस बीट चौकीतील अधिकारी-कर्मचार्‍यांना खूश केले जाते.

सालाबादप्रमाणे यंदाही वांद्रेतील नर्गिस दत्तनगर झोपडपट्टीला आग लागली. मंगळवारी लागलेल्या या आगीत सुमारे 50हून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या. यात 6 जण जखमी झाले. तब्बल 22 अग्निशमन दलाच्या गाड्यांच्या सहाय्याने सुमारे 4 तास शर्थीचे प्रयत्न करून अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग विझवली. 2011 सालापासून या ठिकाणी चौथ्यांदा आग लागली आहे आणि यावेळीदेखील ही आग लागली नसून लावली असावी, असाच संशय संबंधित यंत्रणांना आहे. त्यानुसार पोलीस आणि महापालिका प्रशासन तपास करत आहेत. कारणही तसेच आहे. या ठिकाणी झोपड्या जाळायच्या आणि त्यानंतर त्या अधिकृत असल्याचा दावा करायचा किंवा महापालिकाकडून या ठिकाणच्या बेकायदा झोपड्यांवर कारवाई होणार असेल, तर त्याआधीच झोपड्या जाळून कारवाई खंडित करायची, अशा एक ना अनेक कारणांसाठी येथील झोपडपट्टीदादा वारंवार आगी लावत असतात. 2017 साली लागलेल्या आगीप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली होती, तेव्हा नर्गिस दत्तनगर येथे महापालिका बेकायदा झोपड्यांवर कारवाई करत होती, ती थांबवण्यासाठी ही आग लावण्यात आल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले होते. त्यामुळे या झोपडपट्टीमध्ये लागलेल्या आगी या जाणीवपूर्वक लावल्या जातात, असे आता सिद्धच झाले आहे.

धारावीप्रमाणे नर्गिस दत्तनगर येथील झोपडपट्टी दिवसागणिक वाढत आहे. या ठिकाणी नुसत्या झोपड्याच बांधल्या जात नाहीत, तर त्यावर तीन-तीन मजले चढवून त्यामध्ये लघु उद्योग, छोटे कारखाने चालवले जात आहेत. अशा प्रकारे मजल्यांवर मजले चढवून ते भाड्याने देण्याचा प्रकार नर्गिस दत्तनगर झोपडपट्टीत वर्षांनुवर्षे सुरू आहे. म्हणून या ठिकाणी लागणार्‍या आगीमागे झोपडीदादांचे अर्थकारण किंवा अन्य हेतू तर नाही ना, या दृष्टीने पहिल्याप्रथम पोलीस आणि अग्निशमन दल चौकशी करत असतात.

- Advertisement -

गेल्या वर्षी 26 ऑक्टोबर 2017 रोजी या झोपडपट्टीला वांद्रे रेल्वे स्थानकानजीकच मोठी आग लागली होती. ही आग इतकी मोठी होती की थेट हार्बर लाईन रेल्वेच्या फलाटापर्यंत ही आग पसरली होती. तेव्हा मुंबई महापालिकेकडून या झोपडपट्टीतील अवैध झोपड्या जमीनदोस्त करण्याची कारवाई सुरू होती. ही कारवाई थांबावी या हेतूने येथील झोपडीदादा सलीम लाइटवाला आणि त्याच्या साथीदारांनी गरीब नगर येथे जाणीवपूर्वक आग लावली, असे पोलीस तपासात स्पष्ट झाले होते. पोलिसांनी लागलीच आरोपींना अटक केली. गरीब नगर असो की नर्गिस दत्तनगर दोन्ही ठिकाणी अवैध, बहुमजली झोपड्या आढळतात. या झोपड्यांमध्ये तळमजल्यावर कुटुंब राहते. वरचा प्रत्येक मजला कुटीर उद्योग किंवा गोदाम म्हणून भाड्याने दिलेला असतो. झोपडीदादा हे महापालिका, पोलिसांना हाताशी धरून अगदी 25 हजार ते एक लाख रुपयांपर्यंत खर्च करून अवघ्या काही तासांत झोपड्या उभारतात आणि भाड्याने देतात. या झोपड्यांवर कारवाई होऊ नये यासाठी महापालिका अधिकारी, पोलीस बीट चौकीतील अधिकारी-कर्मचार्‍यांना खूश केले जाते.

एखाद्या चाळवासीयाने व्हरांडा बांधला म्हणून धावत येणारे महापालिकेचे अधिकारी वांद्रे येथील या गरीब नगर आणि नर्गिस नगर झोपडपट्टीत तीन-तीन मजली झोपड्या उभारल्या जातात तरी त्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत, इतका या भागातील झोपडपट्टीला राजाश्रय देण्यात आला आहे. 2016 सालीदेखील या ठिकाणी आग लागली होती. सिलेंडरचा स्फोट होऊन ही आग लागली होती, त्यावेळीही 20-25 झोपड्या जळून खाक झाल्या होत्या. या भागात अत्यंत दाटीवाटीने झोपड्या बांधल्या आहेत. इलेक्ट्रीक वायर्स कशाही लावण्यात आल्या आहेत. तसेच बेकायदा छोटे कारखाने उभारण्यात आले आहेत. त्यासाठी सिलेंडर्स वापरण्यात येतात. त्यामुळेच या ठिकाणी 2016 साली आग लागली होती.

- Advertisement -

बेकायदा झोपड्यांना नियमित करण्यासाठी 2004 सालाची कट ऑफ लाइन आता आता 2006, 2011 करत 2014 पर्यंत आली आहे. निवडणुकांच्या जाहीरनाम्यात हा मुद्दा अधोरेखित असतोच. आता 2016पर्यंत कट ऑफ लाइन वाढवण्याची मागणी होऊ लागली आहे. म्हणूनच गरीब नगर, नर्गिस नगरसारख्या झोपडपट्ट्यांना सर्व पक्षांकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठिंबा दिला जातो. ज्या ज्या वेळी या ठिकाणी झोपडपट्टीला आग लागते, त्या त्या वेळी सत्ताधारी पक्षांनी उलट भरपाई करून नव्याने झोपड्या बांधून दिल्या आहेत. 2011 साली या ठिकाणी सर्वात मोठी आग लागली होती. त्यात सुमारे 800 झोपड्या जळून खाक झाल्या होत्या. त्यानंतर त्यावेळीच्या आघाडी सरकारने प्रत्येक झोपडीसाठी 25 हजार रुपये अर्थसहाय्य केले होते. त्याच वेळी प्रथम या ठिकाणी लांबसडक लाल रंगाच्या पत्र्याच्या सहाय्याने एक सारख्या झोपड्या उभारण्यात आल्या. त्या झोपड्या तेव्हापासून दुमजली, तीन मजली झाल्या.

केवळ राजकीय आश्रयामुळे या झोपडपट्टीला कुणीच हात लावत नाही. उलटपक्षी आग लागली की, या झोपड्या अधिकृत होत असल्याचे दिसून आले आहे. बहुमजली झोपडपट्टीला जेव्हा जेव्हा आग लागते, तेव्हा तेव्हा हमखास त्यांचे पुनर्वसन झालेले आहे, पुन्हा त्याठिकाणी एकमजली झोपड्यांवर एक एक मजले वाढू लागले आहेत. वास्तविक झोपडपट्टी पुनर्वसन कायद्यानुसार मूळ झोपडीवासीयालाच घर मिळते. झोपडीवर मजला चढविलेला असला तरी त्याला मोफत घर मिळू शकत नाही. परंतु एकदा आग लागली की, प्रत्येक बहुमजली झोपडीला स्वतंत्र फोटोपास मिळतो. त्यामुळे ते अधिकृत होतात आणि सरकारी योजनेला पात्र ठरतात, असेही दिसून आले आहे.

वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकालगत असलेल्या ज्या मार्गावर ज्येष्ठ साहित्यिक अनंत काणेकर मॉर्निंग वॉक घेत होते त्या मार्गाला त्यांचे नाव देण्यात आले असले तरी हा मार्ग आता बेहरामपाड्यातील चार-पाच मजली झोपड्यांमुळे ओळखला जात आहे. प्रचंड गलिच्छपणा आणि दादागिरी हे या झोपडपट्टीचे वैशिष्ठ्य आहे. बिनधास्तपणे झोपड्यांंवर मजल्यावर मजले चढत असले तरी पालिकेचा एच पूर्व विभाग मूग गिळून गप्प बसलेला असतो. गेल्या अनेक वर्षांंपासून बेहरामपाडा या बहुमजली झोपडपट्टीचे पुनर्वसन करण्याचे प्रयत्न शासन दरबारी होतात आणि ते राजकीय मंडळी हाणून पाडतात. या झोपडपट्टीतून मिळणार्‍या एक गठ्ठा मतांसाठी हे राजकारणी प्रयत्नशील असतात. वास्तविक या झोपडपट्टीमध्ये असलेल्या चिंचोळ्या गल्ल्यातून पोलिसांना गस्तीसाठी शिरणेही कठीण होते. याचाच परिणाम म्हणजे वांद्रे रेल्वे स्थानकात बॅगा चोरणारे याच परिसरात वास्तव्याला असतात.

अनेक कट्टर गुंड वा प्रसंगी अतिरेकीही लपले असले तरी त्याची माहिती मिळण्याची शक्यता नसल्याचे पोलीसच सांगतात. गेल्या वेळी आग लागली तेव्हा या बहुमजली झोपड्या बेचिराख झाल्या आणि आता त्याच ठिकाणी बहुमजली झोपड्या दिमाखात उभ्या आहेत. हा राजकीय आश्रय केव्हा संपणार, असा सवाल केला जात आहे. एकागठ्ठा मतांचे राजकारण करण्यासाठी या झोपडपट्ट्या निवडणुकांच्या कालखंडात विशेष भूमिका बजावत असतात. त्यामुळेच सर्व पक्षांनी मुंबईत झोपड्या वाढण्यासाठी हातभार लावला आहे. हातचे मतदार जाऊ नयेत यासाठी लोकप्रतिनिधी या अवैध बांधकामांकडे दुर्लक्ष करतात आणि त्या तुटू नयेत यासाठी यंत्रणांवर दबाव आणतात.

नर्गिस दत्त नगर झोपडपट्टी ज्या भूखंडावर वसली आहे. तो म्हाडाच्या मालकीचा आहे. या जागेवर पुनर्वसनाची योजना 2010 च्या पूर्वीपासून तयार करण्यात आली आहे. मात्र त्याकाळी सर्व्हे करून परिशिष्ट – 2 ही तयार करण्यात आले. मात्र सुमारे 20 वर्षे ही योजना प्रत्यक्षात उतरली नाही. त्यामुळे झोपड्यांवर झोपड्या चढत गेल्या. याच झोपडपट्टीत 2014 च्या निवडणुकी दरम्यान बांगलादेशी नागरीक व सुमारे 2100 बोगस मतदार कार्डे सापडली होती. या विषयाचा पाठपुरावा एसआरएमध्ये गेल्या 6 वर्षांपेक्षा जास्त काळ करत आहे. तरीसुद्धा अजूनही या योजनेने वेग पकडलेला नाही. अशा प्रकारे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बांगलादेशी मुसलमान आणि परप्रांतीयांनी ताबा घेतला आहे.

संपूर्ण हार्बर लाइन परिसरात वसलेय नर्गिस दत्तनगर

जेव्हा जेव्हा वांद्रे रेल्वे स्थानकानजीक गरीब नगर, नर्गिस दत्त नगर झोपडपट्टीला आग लागते, तेव्हा तेव्हा मुंबईतील रेल्वे स्थानकानजीक अन्य झोपडपट्ट्यांचाही विषय ऐरणीवर येतो. सँडहर्स्ट रोडपासून मध्य आणि विशेष म्हणजे हार्बर लोकलला झोपड्यांचा विळखा सुरू होतो. मध्यंतरी सँडर्हस्ट रोड स्टेशन परिसरात शेजारील वस्तीची संरक्षक भिंत रेल्वे रुळांवर कोसळली होती. त्यामुळे रेल्वे मार्ग बंद करावा लागला होता. रेल्वे रुळांच्या शेजारील वस्त्यांमधील सांडपाणी या भिंतींमध्ये झिरपते. त्यामुळे भिंती कमकूवत होतात. त्याशिवाय या भिंतीवर वाढलेल्या झाडांच्या मुळांमुळे भिंती कमकूवत झालेल्या आहेत. लोकलच्या हादर्‍यांमुळे भिंती अधिकच कमकुवत होत जातात. मशिद बंदर व सँडहर्स्ट रोड स्टेशनच्या आसपासच्या वस्तीतील सांडपाणी थेट रुळांवर येते. त्यामुळे स्लीपरही कमकुवत होत आहेत. डॉकयार्ड रोड स्टेशनमध्ये शिरताना डाव्या बाजूला छोटी टेकडी आहे. त्यावरील दगड रुळांवर कोसळतात.

रे रोड स्टेशनमध्ये लोकल शिरते ती झोपड्यांच्या साम्राज्यातूनच. या झोपड्यांना आग लागली तर आगीच्या ज्वाळा थेट लोकलवरच येतील अशी परिस्थिती आहे. रे रोडच्या पुलावर प्रचंड झोपड्या आहेत. या झोपड्यांमध्ये दुर्घटना घडली तर थेट ओव्हरहेड वायरवरच झोपड्या कोसळतील. कॉटन ग्रीन, शिवडीमध्येही झोपड्या आहेत. शिवडी स्टेशनमध्ये शिरताना डाव्याबाजूला झोपड्यांचे साम्राज्य आहे. जरी स्वच्छ भारत अभियानाचा डिंगोरा सरकारकडून बडवला जात असला तरी आजही सकाळच्या वेळेत जीटीबी नगर ते चुनाभट्टी स्टेशन दरम्यान झोपडपट्टीवासीयांचे प्रातविर्धीपासून धार्मिकविधी रुळांवरच होतात. जीटीबी ते वडाळा दरम्यान अक्षरशः झोपडपट्यांमधून आपण जात असल्याचा अनुभव येतो, या मार्गात झोपडपट्टीतील नागरिक, लहान मुले, बाया बापडे दिवस-रात्र रुळावर असतात.

गाडी आली की तेवढ्या पुरते बाजूला होऊन पुन्हा रुळावर किंवा बाजूला बसायचे असा त्यांचा क्रम ठरलेला आहे. त्यांच्यासाठी तो व्हरांडा बनला आहे. चेंबूर स्टेशनमध्ये ट्रेन शिरताना दोन ट्रॅक एकमेकांना आडवे जातात. या ठिकाणी मोठ्या संख्येने अपघात झालेले आहेत. या दोन स्टेशन दरम्यान दोन शाळा आहेत. शाळा सुटल्यावर असंख्य शाळकरी मुले रुळांतूनच चालत शेजारच्या झोपडपट्टीत शिरतात. रुळांमध्ये मुलांची रांग लागलेली असते. लोकल आल्यावर मुले बाजूला होतात. त्यांच्यामधून लोकल पुढे जाते. मुलांना व त्यांच्या पालकांना त्याचे काही वाटत नाही. मानखुर्द स्टेशनच्या पुढे मात्र रेल्वेचे रुळ मोकळे आहेत. या स्टेशनच्या पुढे झोपडपट्टी नाही. त्यामुळे लोकल वेगाने नवी मुंबईच्या दिशेने रवाना होते.

दरम्यान याआधी हार्बर लाइनची वेग मर्यादा ताशी 30 कि.मी. होती. मात्र आता ती 80 करण्यात आली असल्याने धोका अधिक वाढला आहे. या ठिकाणी झोपड्या असणे किती धोकादायक बनले आहे, याचा प्रत्यय येतो. अशा प्रकारे मुंबईला पडलेला झोपडपट्ट्यांचा विळखा आणि त्याभोवती फिरणारे मतांचे राजकारण या सर्वांचा परिणाम थेट मुंबईच्या पायाभूत सुविधांवर होत आहेच, त्याचबरोबर शहराच्या सुरक्षेवर आणि सामाजिक स्वास्थ्यावरही होत आहे. ज्या दिवशी मतांच्या राजकारणापासून राजकीय पक्ष दूर जातील तो सुदिन असेल आणि तेव्हाच मुंबई शहर झोपडपट्टीमुक्तच्या दिशेने वाटचाल करील.

(लेखक आपलं महानगरमध्ये मुख्य उपसंपादक आहेत)

Nityanand Bhise
Nityanand Bhisehttps://www.mymahanagar.com/author/bnityanand/
राष्ट्रीय भावना अधिक असलेला तितकाच सामाजिक जाणिवांबाबत हळवा असलेला मी धर्म, देव, श्रद्धा या बुरसटलेल्या, थोतांड गोष्टी मानणार्यामधला नाही, मी पुरोगामी नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -