घरफिचर्सआमाशयाचा कॅन्सर : आयुर्वेदीय दृष्टीकोन

आमाशयाचा कॅन्सर : आयुर्वेदीय दृष्टीकोन

Subscribe

कोळसा, रबर, अ‍ॅसबेस्टॉस, लेड यांच्या सतत संपर्कात काम करणार्‍या व्यक्तींमध्येही आमाशय (जठर) कॅन्सरची शक्यता बळावते. विशेषत: चिकित्सेसाठी अधिक प्रमाणात दिलेला किरणोत्सर्ग (रेडिएशन) हेही या व्याधीस कारणीभूत ठरते. मानसिक कारणांचा विचार करता चिंतातूर स्वभाव, काळजी करण्याचा स्वभाव, संतापी स्वभाव, दीर्घकालीन मानसिक ताण यांचाही परिणाम पचनावर होतो व आमाशय कॅन्सरला कारणीभूत ठरतो.

मागील सदरात आपण अन्ननलिकेच्या कॅन्सरबाबत माहिती जाणून घेतली. आजच्या सदरात आपण आमाशयाच्या (जठर) कॅन्सरबाबत जाणून घेणार आहोत.

आमाशयाचा कॅन्सर हा कॅन्सरप्रकारांपैकी जगभरात पाचव्या क्रमांकाने आढळणारा कॅन्सर असून तिसर्‍या क्रमांकाचा मृत्यूस कारणीभूत असलेला कॅन्सर आहे. स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये हा कॅन्सर होण्याची संभावना दुप्पटीने अधिक आहे. जागतिक आरोग्य संघटनेने २०१८ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार जगात १० लाखांपेक्षा अधिक रुग्णांना आमाशयाच्या कॅन्सरचे निदान झाले आहे.

- Advertisement -

आमाशय हा पचनसंस्थेतील महत्त्वाचा अवयव आहे. असंतुलित व अपथ्यकर आहार हे अन्नपचनासंबंधीच्या सर्व विकारांचे व प्राधान्याने आमाशयाच्या कॅन्सरचे महत्त्वाचे कारण आहे.

आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार एच्. पायलोरी हा जंतूसंसर्ग, बॅरेट इसोफेगस असलेल्या रुग्णांत या प्रकारचा कॅन्सर होण्याची संभावना वाढते. आहारात भाज्या व फलाहाराचा अत्यल्प वापर, खारट पदार्थांचे अतिसेवन, स्थूलता, अतिमद्यपान, धूम्रपान व काही प्रमाणात अनुवंशिकता ही आमाशयाच्या कॅन्सरची प्रामुख्याने आढळणारी कारणे आहेत.

- Advertisement -

इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रिटमेंट व रिसर्च सेंटर, वाघोलीच्या गेल्या अनेक वर्षातील निरीक्षणांनुसार आमाशयाच्या कॅन्सरमध्ये आहारीय कारणांचा विचार करता वरचेवर व अधिक प्रमाणात प्राधान्याने अतिशय आंबट व खारट पदार्थ, खारवलेले मासे व मांस, पचनास जड असा मांसाहार, आटवलेले दुग्धजन्य पदार्थ, शिळे अन्नपदार्थ सेवन यांचा समावेश होतो. तसेच आयुर्वेदानुसार हिरवी मिरचीसारखे विदाह निर्माण करणारे तिखट पदार्थ अधिक प्रमाणात व वारंवार सेवन केल्याने आमाशयाचा क्षोभ होतो. याशिवाय दीर्घकाळ आम्लपित्त, अपचन, आमाशय व्रण (अल्सर) हे आजार असल्यास व त्यांची योग्य चिकित्सा व पथ्यपालन न केल्यास आमाशयाच्या कॅन्सरला आमंत्रण ठरते. कोळसा, रबर, अ‍ॅसबेस्टॉस, लेड यांच्या सतत संपर्कात काम करणार्‍या व्यक्तींमध्येही या आजाराची शक्यता बळावते. विशेषत: चिकित्सेसाठी अधिक प्रमाणात दिलेला किरणोत्सर्ग (रेडिएशन) हेही या व्याधीस कारणीभूत ठरते. मानसिक कारणांचा विचार करता चिंतातूर स्वभाव, काळजी करण्याचा स्वभाव, संतापी स्वभाव, दीर्घकालीन मानसिक ताण यांचाही परिणाम पचनावर होतो व आमाशय कॅन्सरला कारणीभूत ठरतो.

आयुर्वेद शास्त्रानुसार कफज कृमी व पुरीषज कृमी ही आमाशयागत व्याधींची महत्त्वाची कारणे सांगितली आहेत. त्यामुळे कृमींची निर्मिती व पोषण करणारे पेढे, बर्फी, बासुंदी यासारखे पदार्थ, चॉकलेट्स सारखे अतिशय गोड पदार्थ, चिंच, व्हिनेगर असे अति आंबट पदार्थ, लोणचे-पापड असे अतिशय खारट पदार्थ, दही-गूळ असे शरीरात स्त्राव निर्माण करणारे अभिष्यंदी पदार्थ यांचे वरचेवर व अधिक प्रमाणात सेवन तसेच व्यायाम न करणे, दिवसा जेवणानंतर झोपणे यासारख्या सवयी पचनशक्तीला मंद करतात. परिणामी आमाशयाचा क्षोभ करून कॅन्सरला हेतूभूत ठरतात.

भूक मंदावणे, उलटी होणे, जेवणानंतर पोट जड होणे, पोट दुखणे, पोटात अस्वस्थता, छातीत जळजळ होणे, घशात अन्न अडकल्यासारखे वाटणे अशी अपचनाची लक्षणे दीर्घकाळ वैद्यकीय उपचारांनीही बरी न झाल्यास आमाशयाच्या कॅन्सरची संभावना असू शकते. अशी लक्षणे बराच काळ राहिल्यास कॅन्सर तज्ज्ञांचा सल्ला घेणे श्रेयस्कर. एंडोस्कोपी, सोनोग्राफी, सी. टीस्कॅन, पेटस्कॅन, बायोप्सी व मलतपासणी द्वारे आमाशयाच्या कॅन्सरची निदान निश्चिती होते.

-वैद्य स. प्र. सरदेशमुख
-ए. व्ही. पी., पीएच्. डी. (आयुर्वेद)
-संचालक, इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रिटमेंट अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर, वाघोली, पुणे

मागील लेख
पुढील लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -