घरफिचर्सचांदणे फुलले माझ्या मनी...

चांदणे फुलले माझ्या मनी…

Subscribe

‘चांदणे फुलले माझ्या मनी’ या गाण्याच्या मुखड्यातल्या शेवटच्या ओळीत ‘चांदणे’ या शब्दानंतर संगीतकार दत्ता डावजेकरांनी अर्ध्या सेकंदाचा जो पॉज योजला आहे तो मुळात खरोखरच दाद देण्याजोगा आहे. तो पॉज लता मंगेशकरांनीही असा काही अनोख्या नजाकतीत पेश केला आहे की, गाणं ऐकताना काळजाचं पाणी पाणी व्हावं!

चोवीस-पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट. ठिकाण होतं जुनं रवींद्र नाट्य मंदिर. महाराष्ट्र सरकार नुकतंच स्वरसम्राज्ञी लता मंगेशकरांच्या नावाने, संगीत क्षेत्रातल्या कर्तृत्ववान व्यक्तीला पुरस्कार देऊ लागलं होतं. त्या दिवशी हा पुरस्कार दत्ता डावजेकरांना दिला जाणार होता. पुरस्कार देण्याचा तो क्षण जवळ आला. निविदिकेने दत्ता डावजेकरांचं नाव घोषित केलं. व्यासपीठावरच्या एका आसनावर बसलेले दत्ता डावजेकर पुढे आले. त्यांना शाल-श्रीफळ देण्यात आलं. पुरस्काराची रक्कम देण्यात आली. गुलाबांच्या पाकळ्यांची त्यांच्यावर उधळण करण्यात आली…आणि नेमकं त्याचवेळी संपूर्ण थिएटरात एका गाण्याचे मंद सूर ऐकू येऊ लागले…

चांदण्यात ह्या
धरणी हसते,
चंद्र हसे गगनी,
चांदणे फुलले माझ्या मनी!

- Advertisement -

दत्ता डावजेकरांच्याच संगीतातलं ते गाणं. त्या गाण्याच्या त्या मंदधुंद सुरांचा स्पर्श त्या क्षणाला झाला…आणि नेमक्या त्याच वेळी, त्याच क्षणी गायिका डॉ. अपर्णा मयेकर या त्यांच्या कन्या धावत धावत व्यासपीठावर आल्या. त्यांनी दत्ता डावजेकरांना मिठी मारली. वडिलांच्या कर्तृत्वाला दिलेली ती दाद होती. दरम्यान फुलांच्या पाकळ्या बरसतच होत्या. त्या गाण्याचे ते सूर गाणं संपता संपता अजून त्याच प्रसन्नतेत तसेच ठिबकत होते. दत्ता डावजेकरांच्या संगीतातलं ते गाणं त्या संपूर्ण कार्यक्रमातल्या त्या घटकेला एक वेगळीच कलाटणी देऊन गेलं होतं.

डावजेकर तो मानाचा पुरस्कार घेत असताना डावजेकरांच्या संगीतातलं ते गाणं एका सरकारी कार्यक्रमात पार्श्वभूमीवर वाजवलं जाण्याची ज्याची कुणाची कल्पना होती त्याला खरोखरच सलाम ठोकावासा वाटत होता. कारण डावजेकरांचं ते गाणं, त्यातले ते तरल शब्द, तितकाच तरल अन्वयार्थ, गाण्यातलं नाजूकसाजूक वातावरण यामुळे डावजेकरांना पुरस्कार देण्याचा तो क्षण भावूक झाला होता.

- Advertisement -

आज इतक्या वर्षांनंतरही तो क्षण तसाच नजरेसमोर आहे आणि विशेषत: ते गाणं जसंच्या तसं कानात गुंजतं आहे. कारण डावजेकरांच्या संगीतातलं ते गाणं होतंच तसं खास! मला आठवतंय, संगीतात थोडाफार रस असलेल्या माझ्या एका डॉक्टर मित्राचंही ते आवडतं गाणं होतं, पण त्याने ते गाणं हृदयनाथ मंगेशकरांच्या संगीतातलं आहे का म्हणून मला विचारलं होतं. मला त्याच्या त्या प्रश्नाचं हसू आलं होतं, पण दत्ता डावजेकर नावाच्या संगीतकाराचा तो बहुमानही वाटला होता. ते गाणं त्याला हृदयनाथ मंगेशकरांचं वाटावं यातच त्या गाण्याच्या भावसंगीतातला वेगळाच कलात्मक साज मला कळून आला होता.

…पण आजची गोष्ट वेगळी आहे. आज डावजेकरांचं ते गाणं कुठल्या कुठे लुप्त झालं आहे. ते इतकं नितांतसुंदर गाणं आज कुठे ऐकू येत नाही. कुणाच्या तरी मनाच्या सांदीकोपर्‍यात हे गाणं आजही दडलेलं असेल किंवा कुणीतरी आज गुगलवर, युट्युबवर हे गाणं धुडाळून काढेल, कुणीतरी कोणत्या तरी एखाद्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये ते गाऊन त्या जुन्या काळातल्या त्या सुप्त गोडव्याला उजाळा देईल, असं या गाण्याच्या बाबतीत कायम वाटतं. पण दुर्दैवाने तो क्षण कधीच अनुभवायला मिळत नाही, मिळाला नाही. डावजेकरांच्या त्या गाण्यावर का कुणास ठाऊक आजतरी अन्यायच झाल्यासारखं वाटतं आहे.

त्या गाण्याची काही वैशिष्ठ्यं आहेत, सौंदर्यस्थळं आहेत, त्या गाण्याच्या मुखड्यातल्या शेवटच्या ओळीत ‘चांदणे’ या शब्दानंतर डावजेकरांनी अर्ध्या सेकंदाचा जो पॉज योजला आहे तो मुळात खरोखरच दाद देण्याजोगा आहे. तो पॉज लता मंगेशकरांनीही असा काही अनोख्या नजाकतीत पेश केला आहे की गाणं ऐकताना काळजाचं पाणी पाणी व्हावं! कित्येकदा तर तो पॉज ऐकण्यासाठी गाणं पुन्हा पुन्हा मागे न्यावं इतका तो पॉज लोभसवाणा आहे. गाण्यात पॉज नेमका कुठे असावा याचा डावजेकरांचं हे गाणं आदर्श ठरावं!

गाण्याच्या पुढच्या अंतर्‍यातले शब्द आहेत-

आभाळाची धरणीवरती,
अशीच आहे अखंड प्रीती,
त्या प्रीतीच्या शीतलतेने
सुखावली रजनी.
चांदणे फुलले माझ्या मनी!

या अंतर्‍यातसुध्दा एखाद्या लाघवी माणसाच्या स्वभावासारखी लाघवी सुरावट डावजेकरांच्या कल्पनेतून उतरली आहे. विशेषत: ‘आभाळाची धरणीवरती, अशीच आहे अखंड प्रीती’ या दोन ओळींनंतरची ती आर्त तान गाणं ऐकणार्‍याला आतून कुठेतरी हलवून जाते. ती आर्त तान म्हणजे गाण्यातली एक सुरेख, सुंदर रेघ वाटते. एखाद्या चित्रातली एखादी रेखीव रेघ जशी लक्षात राहावी तशी ही तान गाणं संपल्यानंतरही लक्षात राहते.

दुसर्‍या अंतर्‍यातले शब्द आहेत-

ओली वाळू झाली रूपेरी,
नाच नाचती सागर लहरी,
माडामधुनी लबाड वारा,
चांदणे फुलले माझ्या मनी!

इथेही लबाड या शब्दाचा उच्चार लतादीदींनी असा काही केला आहे की एखाद्या लहान बाळाला लाडिकपणे ‘चल लबाडा’ म्हणावं! पण हे इतकं सुंदर गाणं या दुसर्‍या अंतर्‍यातच संपतं तेव्हा मनात कालवाकालव होते. संपूर्ण मनावर ओलावा पसरून राहिलेलं हे गाणं संपूच नये असं वाटतं. आणखी एखादा तसाच आर्त मधूर अंतरा हवा होता असं वाटत राहतं. आपलं अख्खं मन कवेत घेणारी गाणी ऐकता ऐकता अशी पटकन संपली की रंगात आलेल्या सतारीची तार तुटल्यासारखं वाटतं! संगीतकार सलील चौधरींच्या बर्‍याच बंगाली गाण्यांबद्दल तर नेहमी असं होतं. किंबहुना, अशा वेळी संगीतकाराचा किंचित रागही येतो.

असो, हे गाणं आज फार ऐकू येत नाही. काळाच्या ओघात त्या गाण्याचं अदृश्य होणं मनाला पटत नाही. ज्या गाण्यात आपलं गुंतलेपण असतं त्या गाण्यावर जगानेही तितकंच प्रेम करावं अशी आपली इच्छा असते. पण जगावर आपला ना अधिकार असतो, ना मालकी असते. पण जेव्हा असं गाणं एखाद्या बेसावध क्षणी जगाच्या आजही कानी पडतं तेव्हा त्यालाही वाटतं या गाण्यावर खरोखरच अन्याय झालाय! डावजेकरांचं गाणं तिथे जिंकलेलं असतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -