चंद्रकातदादांना सुबुद्धी दे रे बाप्पा…

दरवर्षी साधारणपणे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघरमधून किमान 25 लाख चाकरमानी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात जात असतात. खड्डे बुजविण्याच्या राजकीय घोषणा कितीही झाल्या तरी चाकरमानी व कोकणातील प्रवाशांच्या नशिबात खड्ड्यांचा प्रवास तूर्तास तरी थांबेल, अशी चिन्हे दिसत नाहीत. मुंबई ते गोवा या महामार्गाची दुर्दशा झालेली आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम मंत्री असूनही चंद्रकात पाटील यांना गणेश भक्तांच्या हालाचे ना सोयर ना सुतक. आम्ही मात्र पक्षवाढीसाठी बैठका घेणार आणि आयाराम गयारामांसोबत फोटो घेत धन्यता मानणार, अशीच त्यांची भूमिका दिसते.

Mumbai

मागील आठवड्यात बहुतांश घरगुती गणेशांचे म्हणजे गणपती बाप्पांचे विसर्जन झाले तर दोन दिवसांनी गुरुवारी अनंत चतुर्दशीला 1० दिवसांच्या गणपतींचे आणि सार्वजनिक गणेश मंडळांच्या बाप्पांचे विसर्जन होईल. गणेश म्हणजे बुद्धीची देवता आणि विघ्नहर्ता असे आपण अनादी काळापासून मानत आलोय आणि अनुभवतही आलोय. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात गणेशाच्या स्मरणाने केली जाते आणि त्यामुळे येणारी विघ्ने दूर होतात अशी भावना आहे. यावेळी जे कोणी गणेशभक्त, चाकरमानी आपल्या मुळगावी गेले त्यांची विघ्ने काही गणपतीने दूर केली नाहीत, असेच म्हणावे लागेल. तसेच लाखो भक्तांना कोकणात जाताना होणारा खड्ड्यांचा त्रास, रस्त्यांचे दर्जाहिन काम नीट करायला बाप्पाने सार्वजनिक बांधकाम मंत्री, महसूल मंत्री असलेल्या राज्यातील दोन क्रमांकाच्या नेत्याला सुबुद्धी दिली नाही, असेच खेदाने म्हणावे लागेल.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून आपल्याकडील खात्याकडे पूर्णपणे डोळेझाक करीत चंद्रकांतदादा हे इतर पक्षातल्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना भाजपात आणता येईल, कुणाच्या गळ्यात पक्षाचे उपरणे घालायला मिळेल, याच कामात अडकले आहेत. पक्षवाढीसाठी आणि सर्वाधिक आमदार निवडून आणण्यासाठी जेवढा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत नाहीत. करीत नाहीत यासाठी की विरोधी पक्षातील आमदार संभाव्य पराभवाच्या भीतीने स्वत:हूनच भाजपच्या कळपात सामील होत आहेत. दादा मात्र शिवसेनेला 144 जागा देता येणार नाहीत… मित्रपक्षांना भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवा… तर शिवसेनेशी युती होणार… सर्वाधिकार मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच… आठवडाभरात युतीचा फॉर्म्युला… आचारसंहिता कोणत्याही क्षणी…अशा एका ना अनेक घोषणा करण्यात मश्गुल दिसतात.

दादा अजून निवडणूक जाहीर व्हायला अवधी आहे. आपण आजही सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री आहात. आपल्याकडे राज्यातील रस्ते आणि पूल बांधणे, त्यांची दुरुस्ती करणे याची जबाबदारी आहे याचे भानच आपल्याला नसल्याचे जाणवते. कारण गणेशोत्सवापूर्वी आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे टीव्ही चॅनेलवर बाईट देताना यावेळी मुंबई-गोवा महामार्गावर खड्डे कमी असतील. गणपतीच्या आगमनापूर्वी सर्व खड्डे बुजवलेले दिसतील आणि खड्डा दाखवा 1000 रुपये मिळवा, अशा अनेक हास्यास्पद घोषणा करताना लोकांनी पाहिले आहे. मात्र आता 1० दिवसांच्या गणेशाचे विसर्जन 48 तासांवर आले तरीही सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून चंद्रकांत पाटील खड्डे, रस्त्यांची झालेली चाळण याबाबत तोंडातून ब्र काढताना दिसत नाहीत.

दरवर्षी साधारणपणे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघरमधून किमान 25 लाख चाकरमानी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात जात असतात. खड्डे बुजविण्याच्या राजकीय घोषणा कितीही झाल्या तरी चाकरमानी व कोकणातील प्रवाशांच्या नशिबात खड्ड्यांचा प्रवास तूर्तास तरी थांबेल, अशी चिन्हे दिसत नाहीत. मुंबई ते गोवा या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून, काही ठिकाणी फ्लायओव्हर बांधले जात असताना दिसत आहेत. मात्र केलेले काम इतक्या निकृृष्ट दर्जाचे आहे हे यावेळच्या पावसाच्या तडाख्याने दाखवून दिले. त्यामुळे मुंबईपासून सुमारे 450 किलोमीटरच्या रस्त्यावर केवळ 50 किमीच्या मार्गात खड्डे नसतील. कारण केवळ तेवढाच मार्ग सिमेंट काँक्रिटने बनविण्यात आला आहे.

मात्र उरलेल्या 400 किमीच्या रस्त्यावर पावलागणिक खड्डे आहेत. यावेळच्या गणेश चतुर्थीला गेलेल्या वाहन चालकांना आणि गाडीतील प्रवाशांना आपण गाडीत आहोत की होडीत हेच कळत नव्हते. या खड्ड्यांमुळे 10 तासांच्या प्रवासाला किमान 20 ते 24 तास लागत होते. कोकणात जाताना आणि येताना दोन्ही वेळा जागोजागी ट्रॅफिक जाम झालेली दिसत होती. वाहतूक विभागाने माणगावनंतर लावलेल्या चुकीच्या दिशादर्शक बोर्डामुळे लाखो प्रवाशांना मनस्ताप सोसावा झाला. मात्र मंत्री असूनही चंद्रकात पाटील यांना गणेश भक्तांच्या हालाचे ना सोयर ना सुतक. आम्ही मात्र पक्षवाढीसाठी बैठका घेणार आणि आयाराम गयारामांसोबत फोटो घेत धन्यता मानणार, अशीच त्यांची भूमिका दिसते.

मुंबई-गोवा महामार्गावर कोकणात व गोव्याकडे जाणार्‍या पर्यटकांची सतत वर्दळ असते. मात्र, यंदा महामार्ग पूर्णत: उखडला गेला आहे. निमित्त पावसाचे दिले जात असले तरी दर्जाहीन कामाकडे मात्र दुर्लक्ष केले जाते. ठेकेदार व देखभालाची जबाबदारी असणार्‍या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या संगनमतानेच रस्त्यांची सातत्याने दुर्दशा जनतेच्या नशिबी येते, हा अनुभव आहे. चौपदरीकरणाच्या कामाला गती दिली जात असताना सध्याचा महामार्ग मात्र संपूर्णत: उखडला आहे. यामुळे प्रवासातच जनतेचा तासन्तास वेळ वाया जात आहे. वाहनांची दुर्दशा वेगळीच. मुंबईकडे जाणारा प्रवासी वेळ दुपटीने वाढला आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये संतप्त भावना आहे. सातत्याने कोकणी जनतेच्या नशिबी खड्ड्यांतूनच प्रवास होत आहे. त्याच्या निषेधार्थ अनेक ठिकाणी जनतेनेच नाराजी नोंदवली. मात्र, सत्ताधारी शिवसेना, भाजप व विरोधी राष्ट्रवादी व काँग्रेसच्या आघाडीमधून मात्र कोणीच रस्त्यावर उतरत नसल्याने कोकणी जनतेच्या मनात तीव्र संताप दिसत होता.

कोकणात यापूर्वी नारायण राणे यांचा धाक होता. तो धाक अधिकार्‍यांना होता, कंत्राटदारांना होता आणि लोकप्रतिनिधींनाही होता. मात्र 2014 नंतर नारायण राणे यांचा कुडाळ मतदारसंघातील पराभव, त्यानंतर वांद्रे पोटनिवडणुकीतला पराभव, काँग्रेसला सोडचिठ्ठी, स्वाभिमान आणि नंतर भाजपची राज्यसभेची खासदारकी पदरात पाडून घेतल्याने कोकणात राणेंचा तो दरारा राहिला नाही. निवडणुकीच्या तोंडावर स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन होणार असल्याने राणेंचा उरला सुरला आवाजही यापुढे कोकणच्या विकासासाठी ऐकायला मिळणार नाही, अशीच चिन्हे आहेत.

त्यामुळे 10 वर्षे सत्तेत, पालकमंत्री आणि 5 वर्षे विरोधी पक्षात असल्याने राणे आणि त्यांचा मुलगा आमदार नितेश राणे वेळोवेळी कोकणावर अन्याय झाल्यानंतर आवाज उठवत होते. आता राणेंच्या भाजप प्रवेशामुळे कोकणला कुणीच वाली उरलेला नाही असेच म्हणावे लागेल. यापूर्वी कोकण आणि शिवसेना असे समीकरण होते. मात्र मागील पाच वर्षांत शिवसेना भाजपसोबत सत्तेत असल्याने आणि आता निवडणुकीच्या तोंडावर कोकणातील रस्त्यांच्या दुर्दशेवरुन भाजपला धारेवर धरेल, असा शिवसेनेत एकही नेता नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना जाबच विचारायचे धारिष्ट कुणी करत नाही. कारण गणेशोत्सवाच्या 15 दिवस अगोदर पाटील यांनी रस्त्यांची दुर्दशा बघण्यासाठीच पाहणी दौरा केला. मात्र त्याचे पुढे काय झाले असा सवालच विचारायला कोकणात कोणत्याही पक्षात नेता उरलेला नाही असेच दिसते. यावर्षी वेगवान प्रवास होण्याची आशा बाळगून कोकणच्या वाटेवर निघालेल्या चाकरमान्यांच्या प्रवासात अडथळ्यांचे स्पिड ब्रेकर होते.

महामार्गाची दुर्दशा, अपूर्ण काम, ठिकठिकाणी देण्यात आलेली बाह्यवळणे, वाहतूक कोंडी यामुळे पुन्हा एकदा जागोजागी ट्रॅफिक, अडथळे पार करत कोकणापर्यंत प्रवास करावा लागला. मुंबई-गोवा महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्यातील चौपदरीकरणाला २०११ मध्ये सुरुवात झाली होती. हे काम २०१४ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र २०१९ साल उजाडले तरी हे काम पूर्ण होण्याची चिन्हे नाहीत. ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर पनवेल येथील सुप्रीम कंपनी आणि इंदापूर टोलवेज प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांना या महामार्गाचे कंत्राट देण्यात आले. ९४२ कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी ठेकेदार कंपनीने स्वखर्चाने रस्त्याची बांधणी करायची होती. मात्र हे काम रखडलेले आहे.

वन आणि पर्यावरण विभागाच्या परवानग्यांसाठी हे काम रखडल्याचे सांगण्यात आले. नंतर भूसंपादनात दिरंगाई झाल्याचे कारण पुढे करण्यात आले. यानंतर कामाला गती मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र अजूनही महामार्गाच्या कामाला अपेक्षित गती मिळू शकलेली नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी रस्त्याची कामे झाली आहेत, तिथेही रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेली आठ वर्षे मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम रखडले आहे. रस्त्याची दुरवस्था असल्याने वाहनचालक आणि प्रवाशांचे अतोनात हाल होताहेत. रस्ते वाहतुकीचा पुरता बोर्‍या वाजलेला असताना कोकण रेल्वेचा अनुभवही काही वेगळा नाही. चार महिने अगोदर कन्फर्म तिकीट काढूनही आपल्या जागेवर बसण्यासाठी कोकणवासीयांना तारेवरची कसरत करावी लागली. एसी, स्लीपर कोचमध्येही चाकरमानी असे काही घुसतात की पाय मोकळे करायला प्रवाशांना आठ तास लागत असल्याचा अनुभव अनेकांना आला.

सार्वनिक बांधकाम मंत्री असूनही चंद्रकांत पाटील यांना रस्ते आणि खड्डे बघायला वेळ नाही. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वेळात वेळ काढून या मार्गाचा दौरा करावा जेणेकरुन कामाला गती येईल. गडकरी यांच्या कामाचा धडका आणि अधिकार्‍यांवर असलेला कंट्रोल समस्त राज्यातील जनतेने 20 वर्षांपूर्वी अनुभवलाय. जे जे फ्लायओव्हर असो की मुंबई-पुणे एक्सप्रेस वेचे काम असो. ज्या जलद गतीने पूर्ण झाले ते पाहाता गडकरींसारखा टास्क मास्टर मंत्री महाराष्ट्रात का नाही, असा सवाल लाखो गणेशभक्त करीत असतील. कारण ज्यांनी या मार्गावरुन प्रवास केला ते नक्कीच म्हणत असतील हे देवा म्हाराजा. पुढच्या येळेस मंत्री म्हणून चंद्रकांतदादांका पुन्हा कोकणात पाठवू नको रे… महाराजा. त्यांका पक्षकार्यातच जुंपून ठेव… आणि आमची सुटका कर रे म्हाराजा…बघूया विघ्नहर्ता गणपती बाप्पा कोकणवासीयांचे गार्‍हाणे ऐकतो का.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here